निसर्गरमणीय अशी ‘सुंदरवाडी’...

एका बाजूला ब्रिटिशांची हद्द, दुसऱ्या बाजूला गोव्याकडून पोर्तुगीज आणि तिसरीकडे स्वकीयांमधली सत्ताकारणं... अशातच १९४८ मध्ये ८ मार्चला सावंतवाडी संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झालं.
Shivramraje bhosale and jagganathrao bhosale
Shivramraje bhosale and jagganathrao bhosalesakal
Summary

एका बाजूला ब्रिटिशांची हद्द, दुसऱ्या बाजूला गोव्याकडून पोर्तुगीज आणि तिसरीकडे स्वकीयांमधली सत्ताकारणं... अशातच १९४८ मध्ये ८ मार्चला सावंतवाडी संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झालं.

‘वाडी सुंदर... वेंगुर्ला बंदर...

मोचेमाड गुळी... आरवली खुळी...

शिरोडा शेटुक... आरोंद्यान्‌ मारल्यान्‌ बेटुक....’

अशा लोकगीतांमधूनसुद्धा आंबोलीचा घाट उतरल्यानंतर लागणारी खेमसावंत भोसले यांची राजधानी असलेली सावंतवाडी ही सुंदरवाडी कशी आहे, याचं नेमकं वर्णन पहायला मिळतं. निसर्गाने अक्षरशः चहूकडून या गावावर सौंदर्याची उधळण केली आहे. विशेषतः ऐन पावसात न्हालेली आणि धुक्यात हरवलेली सावंतवाडी पाहणं हा श्रीमंत निसर्गानुभव आहे. आंबा, काजू, माड, फणस, पोफळी, कोकम अशा भरभरून देणाऱ्या वृक्षराजीत हरवलेली, बहुसंख्य उतरत्या कौलांची घरं; पण आता सिमेंटच्या इमारतींवर पत्र्याचं छप्पर असलेल्या इमारती. अनेक ठिकाणी विखुरलेली लहान-मोठी स्वच्छ मंदिरं, तसंच स्वच्छ अंगण आणि परसू, विशेषतः पावसाळ्यात रोपलावणीनंतर उगवलेली हिरवीकंच भाताची खाचरं पाहात सावंतवाडीसह ऐन तळकोकणात फिरणं हा स्वर्गीय अनुभव असतो.

एका बाजूला ब्रिटिशांची हद्द, दुसऱ्या बाजूला गोव्याकडून पोर्तुगीज आणि तिसरीकडे स्वकीयांमधली सत्ताकारणं... अशातच १९४८ मध्ये ८ मार्चला सावंतवाडी संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झालं. इथले पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज ऊर्फ पंचम खेमराज यांनी केलेल्या राज्यकारभाराला खुद्द महात्मा गांधीजींनी इथं येऊन ‘रामराज्य’ असं संबोधलं होतं. १९३४ मध्ये एका न्यायालयीन खटल्याच्या निमित्ताने इथं आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही बापूसाहेब महाराजांचं कौतुक केलं होतं. या बापूसाहेब महाराजांनी इंग्लंडमध्ये शिक्षण घेतानाच पहिल्या महायुद्धात भाग घेतला होता. त्यांचं लष्करी शिक्षणही झालं होतं. युद्धातील कामगिरीबद्दल पंचम जॉर्ज बादशहाने बापूसाहेब महाराजांना कॅप्टन आणि हिज हायनेस पदव्यांनी सन्मानित केलं.

माजगाव, कोलगाव आणि चराठे या गावांपासून सावंतवाडी तयार झाल्याचं सांगण्यात येतं. नरेंद्र डोंगरावरच्या जुन्या राजवाड्याच्या खुणा, मोती तलावाच्या काठावरील दिमाखदार नवीन राजवाडा, जुना बाजार, सालईवाडा, सबनीसवाडा, उभा बाजार, चितारी आळी, कोलगाव दरवाजा, रघुनाथ मार्केट, वैश्यवाडा, बाहेरचा वाडा, गवळी तिठा, जमनाबाई पॅव्हेलियन, खासकीलवाडा, माठेवाडा या आणि अशा वैशिष्ट्यपूर्ण विशेषनामांसह परिचित असलेले इथले उपविभाग आणि त्यामागचा इतिहास खुद्द वाडीकरांच्याच तोंडून ऐकण्यातली मजा आगळीच!

राणी पार्वतीदेवी हायस्कूल, पंचम खेमराज महाविद्यालय, श्री पाटेश्वर दैवतासह अनेक मंदिरं, मशिदी, चर्चेस, १८५२ मध्ये स्थापन झालेलं श्रीराम वाचनमंदिर, सेंट्रल ऊर्दू हायस्कूल, सेंट फिलोमिना हायस्कूल अशा अनेक वास्तू आणि संस्था वाडीकरांच्या जिव्हाळ्याच्या आहेत.

संत सोहिरोबा आंबिये, वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबेस्वामी यांच्यासह जीवनाच्या विविध क्षेत्रांतील दिग्गजांची नाळ ही सावंतवाडी आणि या परिसराशी जुळलेली आहे. कवी केशवसुत काही काळ इथं होते. वेदमहर्षी श्रीपाद सातवळेकर, प्रख्यात चित्रकार सावळाराम हळदणकर, १९०४ मध्ये वेदपाठशाळेची स्थापना करणारे विठ्ठलशास्त्री अळवणी, ज्ञानेश्वरीतील शब्दांचा मराठी कोश साकारणारे शंकरशास्त्री देवस्थळी, ‘वैदिक काळची व आजची स्थिती’ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिणारे शंकरराव कळसूलकर वकील, संतसाहित्यकार ज. र. आजगावकर, नाटककार मो. ग. रांगणेकर, प्रख्यात संपादक ग. त्र्यं. माडखोलकर यांनी सावंतवाडीचा लौकिक सर्वदूर नेला. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि. स. खांडेकर यांचं दत्तकघर इथलंच.

वाडीजवळच्या तिरोडा गावचे जनरल जगन्नाथराव भोसले हे आझाद हिंद सेनेतील सेनापती म्हणून सुभाषचंद्र बोस यांचे निकटवर्ती होते.

रत्नागिरी जिल्ह्याचे पहिले खासदार आणि पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात पुनर्वसनमंत्री म्हणून त्यांनी कामगिरी बजावली. महाविद्यालयीन तरुणांमध्ये देशसेवेची आवड निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (N S S) ही जनरल भोसले यांची कल्पना होती. याखेरीज सावंतवाडीचे भूतपूर्व महाराज आणि माजी आमदार शिवरामराजे भोसले, प्रख्यात अभिनेत्री हंसा वाडकर, माधवराव लेले, माधवराव वालावलकर, अनंत वाटवे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त गायिका जयश्री आजगावकर, ‘वैनतेय’चे संस्थापक मे. द. शिरोडकर, मराठी-इंग्रजीत काव्यरचना करणारे सरदार पांडुरंग बाळकृष्ण दडकर, सावंतवाडी दरबारचे राजकवी य. म. केणी, शिक्षणाधिकारी वि. कृ. नेरुरकर, कविवर्य शि. अ. लुकतुके, वसंत सावंत, मनोहर नाईक, विद्याधर भागवत यांच्यासह कुस्तीच्या क्षेत्रातील पै मास्तर आणि कृष्णा स्वार, बुद्धिबळात लौकिक मिळवणारे बाळ फाटक आणि दाजी फाटक पिता-पुत्र, सामाजिक पुढारी मंगेशराव रामचंद्र सबनीस, सव्वाशे वर्षांहून जुन्या असलेल्या नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष काझी अब्दुल रझाक, अलीकडच्या काळात राजकारणात स्वतःची ओळख निर्माण करणारे दीपक केसरकर हे सारे मान्यवर ही सावंतवाडीची खास ओळख म्हणता येईल.

बापूसाहेब महाराजांच्या निधनानंतर राणी पार्वतीदेवी महाराज संस्थानचा कारभार पाहू लागल्या. त्या काळातही सावंतवाडीत मुलींची स्वतंत्र शाळा होती. १९३६ मध्ये पार्वतीदेवींच्या प्रयत्नाने ‘महिला समाज’ ही संस्था स्थापन झाली. स्वतंत्र इमारतीसह वाचनालय, शिवणकाम, विणकाम आणि महिलांसाठी बॅडमिंटनचीही सोय तिथे होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या संस्थेतील महिलांनी लोकरीचं सामान आणि सैनिकांसाठी कपडे तयार करून पाठवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं. सावंतवाडीच्या राजघराण्यातील श्रीमंत गजराराजे भोसले यांनी बंगालीतून अनुवादित केलेली ‘आयुष्याचे मोल’ ही कादंबरी १९११ मध्ये प्रसिद्ध केली होती. इंदिराबाई रांगणेकर, मालतीबाई बाक्रे, ‘वळेसर’ हा कथासंग्रह लिहिणाऱ्या राधाबाई मुळीक, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षिका मीरा जाधव, पारमार्थिक पद्यरचना करणाऱ्या उमाबाई माईणकर अशा अनेक महिलांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

गोविंदशेठ केसरकर आणि रामकृष्णराव मसूरकर यांची व्यापारी पेठेतील ख्याती अशी होती की, ‘पाच वर्षांचं मूल पाठवून माल आणावा!’ सावंतवाडी आणि परिसरात लहान प्रमाणात फळप्रक्रिया उद्योग आधी घरगुती स्वरूपात आणि आता काजू कारखान्यांच्या रूपाने वाढला आहे. माजगाव औद्योगिक वसाहत असली तरी एखादा मोठा प्रकल्प अजूनही इथं दिसत नाही. मात्र रंगकाम, लाकूडकाम, चित्रकला, गंजिफा, लाखेचं काम, कळसूत्री बाहुल्या आणि विविध प्रकारची लाकडी खेळणी तयार करणारं गाव म्हणून गेल्या कित्येक वर्षांत सावंतवाडीची विशेष ओळख आहे. इथल्या चितारी आळीत सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेलं लाखेचं काम पाहता येईल. राजघराण्याच्या प्रोत्साहनामुळे अशा कारागिरांसाठी ‘सावंतवाडी लॉकर वेअर्स’ ही संस्था स्थापना करण्यात आली होती. इथला गंजिफाचा सेट आणि खेळाचे पत्ते मुंबई, बडोदा इथल्या संग्रहालयांबरोबरच लंडन, जर्मनी आणि अमेरिकेतील संग्रहालयांमध्येही जपून ठेवण्यात आले आहेत. ही कला जतन करण्यासाठी शासनाने विशेष मदत करण्याची गरज आहे.

१९२६ मध्ये इथं ललित कलोत्तेजक संस्थेची स्थापना झाली आणि त्याच वर्षी ‘राणीचा बावटा’ हे पहिलं नाटक सादर झालं. तर, १९४६ मध्ये कलाभुवन संस्था सुरू झाली. डॉ. वसंत सावंत, तुकाराम नाईक, डॉ. एच. व्ही. देशपांडे यांच्या पुढाकाराने १९७१ मध्ये स्थापन झालेल्या दक्षिण रत्नागिरी साहित्य संघाचं काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग साहित्य संघ असं नामकरण करण्यात आलं आहे. हरिहर आठलेकर, महेश केळुस्कर आणि सहकाऱ्यांनीही यात योगदान दिलं. प्रवीण बांदेकर आता तिचं नेतृत्व करतात. दिनकर धारणकर, प्रा. रमेश चिटणीस, प्रा. काशिनाथ वाडेकर, एच. व्ही. देशपांडे आदींनी नाट्यदर्शन संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबवले. १९७८ मध्ये याच संस्थेने प्रा. भालबा केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडीत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन घेतलं होतं. खऱ्या अर्थाने तळकोकणाचं प्रवेशद्वार असलेली सावंतवाडी इतकी सुंदर असेल, तर उरलेलं कोकण किती सौंदर्यसमृद्ध असेल, याची कल्पनाच केलेली बरी!

(सदराचे लेखक पत्रकार असून, शिक्षणक्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com