खेळ मनाचा, घात शरीराचा

डॉ. सागर पाठक
रविवार, 8 सप्टेंबर 2019

ताण- टेन्शन- दडपण ही आजच्या धकाधकीच्या आयुष्यातील सगळ्यात जास्त निर्माण होणारी भावना ठरली आहे. कधी अगदी सहज व्यक्त होणारी, तर कधी कधी आपल्या माणसांपासून अव्यक्त असणारी आणि अनेकदा असूनही अमान्य केली जाणारी.

ताण- टेन्शन- दडपण ही आजच्या धकाधकीच्या आयुष्यातील सगळ्यात जास्त निर्माण होणारी भावना ठरली आहे. कधी अगदी सहज व्यक्त होणारी, तर कधी कधी आपल्या माणसांपासून अव्यक्त असणारी आणि अनेकदा असूनही अमान्य केली जाणारी.

मग ही मानसिक हुरहूर कुठल्याही कारणामुळे येऊ शकते. एखाद्या मनपसंत गोष्टीचा आनंददेखील आपण या टेन्शनमुळे उपभोगू शकत नाही. उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह व इतर अनेक शारीरिक आजार या मानसिक ताणतणावांमुळे निर्माण होतात व बळावतात. याच ताण-तणावांचा आघात आपल्या वैयक्तिक आयुष्यावरदेखील होतो. पती-पत्नीमधील शारीरिक सहजीवनावरही होतो. आधीच आपण लैंगिक जीवनाविषयी बोलताना कचरतो, त्यातच ताणतणावांमुळे जर शारीरिक संबंधांवर परिणाम झाल्यास ती बाब लपवूनच ठेवली जाते. आता समीर आणि दीप्तीचेच घ्या ना...

ही रूढार्थाने सर्वसुखी जोडी! लग्नानंतरची बारा वर्षे आनंदात गेली. आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये दोघेही उच्चपदावर आहेत. दोघे माझ्याकडे समुपदेशनासाठी आले तेव्हा एकमेकांशी बोलणेही बंद होते. भांडत राहण्यापेक्षा वेगळे व्हा, असे अनाहूत सल्ले घेऊन ते माझ्याकडे आले होते. चर्चा केल्यावर लक्षात आले, त्यांच्यात वादविवादाचे मोठे मुद्दे अस्तित्वातच नाहीत. लग्नानंतरची पहिली बारा वर्षे आनंदात उपभोगली. समीरच्या कामांमध्ये त्याला अनेक पदोन्नती मिळत गेल्या; पण या यशाबरोबर जबाबदाऱ्यादेखील वाढल्या. त्याने स्वतःला कामांमध्ये आकंठ बुडवून ठेवले होते. घरी असतानाही डोक्यात कामाचेच विचार. या सवयीमुळे त्याचे घराकडे, बायकोकडे, मुलांकडे खूप दुर्लक्ष झाले. त्यामुळे परिवाराच्या छोट्या-मोठ्या सुख-दुःखांच्या क्षणांपासून तो वंचित झाला. या दडपणाचा परिणाम समीर व दीप्तीच्या लैंगिक सहजीवनावरही झाला. सुरवातीला शारीरिक गरजेपोटी शरीर संबंध येत होते; परंतु कामाच्या दडपणामुळे समीर निवांतपणे शरीरसुख उपभोगू शकत नव्हता. अनेकदा मानसिक दडपणामुळे समीरला संबंध ठेवायची इच्छाही होत नसे. इच्छा झाली तरीही शरीर साथ देत नसे. त्यामुळे त्याच्या मनावरील ताण वाढला व तो पत्नीशी जवळीकही टाळू लागला. कालांतराने त्यांच्यातील लैंगिक संबंध जवळजवळ संपुष्टात आले. या सगळ्यामुळे दीप्तीच्या मनाची घुसमट व्हायला लागली. आपला नवरा आपल्याकडे लक्ष देत नाही, आपल्यावरील प्रेम नाहीसे झाले आहे, असे गैरसमज तिने करून घेतले. त्यांच्यातील विसंवादाचे हेच कारण होते.

असे अनेकजण लैंगिक समस्या किंवा नात्यातील विसंवाद घेऊन माझ्याकडे समुपदेशनासाठी येतात. गोळ्या, औषधे, इंजेक्शनची मागणी करतात. मूळ कारण त्यांना पटवून दिले जाते, तेव्हाच समस्या दूर करता येतात.

लैंगिक संबंध हे कधीच क्षणिक नसतात. सावकाशपणे, निवांतपणे कुठलाही ताणतणाव मनावर न घेता उपभोगायचे असे हे नाते असते. आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवणे म्हणजे वेळेचा सदुपयोग करणे, हे जाणले पाहिजे. जोडीदाराबरोबरचे जिव्हाळ्याचे क्षण जगातील रुढार्थाने असलेल्या कामाचा हुरूप अधिकच वाढवतात. दडपणाखाली लैंगिक सहजीवन उपभोगायचा प्रयत्न केल्यास समीरप्रमाणे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आपल्या कामाच्या व्यापातून दोघांनीही लैंगिक सहजीवनासाठी वेळ काढायला हवा. विशिष्ट दिवस-वेळ निश्चित करून ती वेळ दोघांसाठीच खर्च करायला पाहिजे. जगातील इतर सर्व गोष्टींबद्दल मनात येणारे विचार हे शयनकक्षाच्या बाहेरच थांबविले पाहिजेत. हळुवारपणे एकमेकांना समजून, वेळ देऊन लैंगिक सुखाची अनुभूती घ्यायला पाहिजे. दोघांमधील लैंगिक सहजीवन यशस्वी झाले तर नक्कीच इतर गैरसमज बाजूला पडतात. मनावरील ताण कमी करायला शारीरिक व्यायाम, ध्यानधारणा, योगासने या गोष्टी प्रत्येकाने अंगीकारल्या पाहिजेत. सात्त्विक आहार घ्यावा. व्यसनांपासून दूर राहावे. 

आजच्या जगामध्ये कामाच्या दडपणाखाली नातलगांना, मित्रांना भेटायला आपल्याकडे वेळच नाही. मनावरील दडपण दूर करायला मात्र आपल्याला हा वेळ शोधून काढायलाच हवा. आपल्या जोडीदाराबरोबर, मित्र-मैत्रिणींबरोबर घालवलेले मोजकेच क्षण आपल्याला नवीन ऊर्जा देऊन जातात. या अशा क्षणांना आपण जाणून-बुजून आपल्या जीवनात आणायला पाहिजे. 

हीच गोष्ट समीरला समजावून देण्यात आली. वेळेचे नियोजन कसे करावे, जरुरीच्या गोष्टींना प्राधान्य कसे द्यावे, याचे शिक्षण देण्यात आले. लिहिताना, वाचताना हा बदल करणे खूप सोपे आहे असे वाटते. परंतु आपल्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल करणे खूप कठीण आहे. यानंतर समीरचे मानसिक, शारीरिक आरोग्य तर बदललेच; त्याचबरोबर त्याला उद्‍भवलेल्या लैंगिक समस्याही आपोआप दूर झाल्या. आज  समीर-दीप्तीचे वैयक्तिक आयुष्य व करिअर खूप आनंदात चालले आहे; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे हे, की दोघेही कुठल्याही मानसिक दडपणाशिवाय या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत आहेत. 

सगळेच जण आपल्याला नेहमी सशक्त, सुदृढ बनायला सांगत असतात. सुदृढ होणे म्हणजे फक्त शरीर सशक्त बनविणे एवढेच नव्हे, तर आपल्या मनाला सशक्त बनवले नाही तर थोड्या कालांतराने शरीर परत पूर्वस्थितीत येऊन जाते. आपले मन सशक्त बनले तरच आपण आपले शरीर सक्षम करू शकतो.

आपणा सर्वांना या पळत राहणाऱ्या जगामध्ये मानसिक निवांतपणाचा अनुभव घेता यावा व आपले सहजीवन यशस्वी व्हावे हीच मनापासून इच्छा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Sagar Pathak article