कौमार्याची एकमेव खात्रीलायक तपासणी म्हणजे...

डॉ. सागर पाठक
रविवार, 14 जुलै 2019

कौमार्याची एकमेव खात्रीलायक तपासणी या जगात असेल, तर ती म्हणजे जोडीदारांचा एकमेकांवरचा विश्वास. आपल्याला आपल्या जोडीदाराच्या कौमार्यावर विश्वास नसल्यास संशयाचे भूत मानगुटीवर घेऊन लग्न करण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला माहीत आहेच, की संशयाच्या भुताला काहीच उपाय नसतो.

‘‘ डॉक्‍टर मला एक सर्टिफिकेट पाहिजे,’’ केबिनचे दार उघडता उघडताच राजू बोलत होता.

‘‘अरे, कसले सर्टिफिकेट पाहिजे?’ माझा आपला नेहमीचा प्रश्न. ‘‘डॉक्‍टर, मी लग्न करतोय आणि माझ्या होणाऱ्या बायकोला म्हणजेच स्नेहलला मी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. ती बाहेर बसली आहे. तुम्ही तिला तपासा व तिच्या कौमार्याचे मला सर्टिफिकेट द्या. म्हणजे मग मी तिच्याशी लग्न करायला मोकळा!’’

कौमार्य (वर्जिनिटी) आणि लग्न यांचे अतूट नाते असते, असा गोड गैरसमज आपल्या समाजाने निर्माण केलेला आहे. त्यातही पुरुषांपेक्षा स्त्रीच्या कौमार्याला जास्त महत्त्व दिले जाते.

पण, हे कौमार्य म्हणजे काय? एखाद्या स्त्री किंवा पुरुषाचे शारीरिक संबंध येण्याआधी त्यांना ‘कुमारी’ किंवा ‘कुमार’ असे म्हटले जाते. लग्नाआधी कौमार्य अबाधित राखणे, हे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्य समजले जाते. असे न करणाऱ्या स्त्रीला समाजामध्ये अनेक मानसिक व सामाजिक त्रासांना तोंड द्यावे लागते.

ही प्रथा पाळणे पूर्वीच्या काळामध्ये अगदी सहजशक्‍य होते. कारण, त्या काळामध्ये लग्न ही वयाच्या १३ ते १८व्या वर्षांपर्यंत होऊन जात असत. मुलगी कळती झाली म्हणजेच तिची मासिक पाळी सुरू झाली, की लगेचच बोहल्यावर तिला चढविले जायचे. लहान अजाणत्या वयामध्ये लग्नापूर्वी कौमार्यभंग व्हायची कुठलीच भीती नसायची. त्यामुळे या प्रथेला कोणीच विरोध केला नाही.

परंतु, आता सध्याच्या काळामध्ये लग्नं ही खूप उशिरा होत आहेत. वयाच्या २७ ते २८ वर्षांपर्यंत मुला-मुलींना लग्नच करायचे नसते. त्यांचे शिक्षण, करिअर, नोकरी या त्रिकुटामध्ये लग्नाचे एकूणच वय खूप वाढले आहे. लग्नासाठी लागणारी वचनबद्धता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी लहान वयात आजची पिढी तयार नाही. पण, लग्न उशिरा होत आहे म्हणून वयानुसार निर्माण होणारी शारीरिक संबंधांची इच्छा काही कमी झालेली नाही. किंबहुना, शारीरिक जवळिकीची ही गरज आपल्या आधुनिक जीवनशैलीमुळे खूपच जास्त वाढलेली आहे. या तरुण वयामध्ये स्त्री व पुरुष दोघांमध्ये शारीरिक जवळीक साधणे, ही एक भावनिक-शारीरिक गरज असते. मग ही गरज लग्नाअगोदर लैंगिक संबंध प्रस्थापित करून पुरविली जाते. यातूनच मग रूढार्थाने कौमार्याचा भंग होतो. असे विवाहपूर्व संबंध ठेवावेत की नाही, हा एक वादातीत प्रश्न आहे. परंतु, एक समाज म्हणून आपण हे जाणून घ्यायला पाहिजे, की आजचे तरुण असे संबंध प्रस्थापित करीत आहेत. ही एक नाकारता न येणारी सत्य परिस्थिती आहे. यातूनच मग आजच्या पिढीच्या मनात कौमार्याबद्दल अनेक समज-गैरसमज निर्माण झालेले आहेत. म्हणूनच, आपल्याला आपल्या कौमार्याविषयीची व्याख्या बदलायला लागणार आहे.

वरील उदाहरणातील राजूच्या बाबतीतही असेच काहीसे घडले होते. त्याने इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अनेक कौमार्याबद्दलच्या चाचण्यांबद्दल वाचले होते. कौमार्याविषयीचे गैरसमज व या चाचण्यांबद्दल असणारे अज्ञान, यातूनच तो माझ्याकडे कौमार्याचे सर्टिफिकेट मागायला आला होता.

सद्य परिस्थितीत मात्र या जगात कौमार्याबद्दल कुठलीही शंभर टक्के खात्रीलायक अशी तपासणी अस्तित्वात नाही. उपलब्ध तपासणींद्वारे आपण कौमार्याबद्दल फक्त अंदाज बांधू शकतो आणि असे अंदाज सपशेल फसू शकतात. समुपदेशनाद्वारे राजू व स्नेहलला हेच स्पष्टपणे समजावून सांगितले गेले.

कौमार्याबद्दल आपले निकष बदलायची वेळ आलेली आहे. आतापर्यंत कधीही शारीरिक संबंध न आलेल्या स्त्रीला आपण कुमारी म्हणत असू. आता मात्र लग्नाअगोदर आलेल्या शरीर संबंधाने कौमार्याचा भंग झाला, असे समजण्यात येऊ नये.

लग्नाच्या वेळेला प्रत्येक व्यक्तीचे कौमार्य अबाधित आहे, असे समजण्यात यावे. लग्नानंतर मात्र आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणाशीही शरीरसंबंध येऊ न देणाऱ्या व्यक्तीला कुमारिका किंवा कुमार म्हटले जावे. लग्नानंतर दोघांनीही एकमेकांशी आनंदाने सुख-समाधानाने शरीरसंबंध स्थापित करावेत. ते तसेच राखावेत म्हणजे मग कौमार्याची संपूर्ण व्याख्याच आपल्याला बदलता येईल. यामुळे समाजामध्ये कौमार्याबद्दल असलेले अनेक समज-गैरसमज दांपत्याला टाळता येतील. तसेच अनेक लग्न, जी केवळ कौमार्याबद्दलच्या संशयावरून विस्कळित होतात ती आपल्याला वाचविता येतील.

नात्यांमध्ये पडल्यावर आपल्या जोडीदाराबद्दल एकनिष्ठता दाखविणे व ती सांभाळणे हीच कौमार्याची नवीन व्याख्या करता येईल. ही व्याख्या समाजात रुळेल तेव्हाच राजूसारखे लग्न करणारे कौमार्याविषयी सर्टिफिकेट मागणार नाहीत. त्याचबरोबर आपल्या जोडीदारावरचा विश्वास द्विगुणित होईल; जेणेकरून त्यांचा संसार सुख-समाधानाने चालू राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Sagar pathak article on Virginity Test