कोरोनासोबत शाळांचं जगणं !

मागच्या वर्षी पहिल्या लाटेदरम्यान ब्राझीलमध्ये अनेक मुलं कोरोना काळात दगावली होती. यातील काही मुलं ही कोरोना पॉझेटिव्ह होती.
Corona and School
Corona and SchoolSakal

गेल्या काही दिवसापूर्वी पाचवीपासून पुढचे वर्ग भरवण्याचा शासन निर्णय झाला होता, पण दुसऱ्या दिवशीच हा निर्णय मागे घेण्यात आला. या मागे राज्याच्या ‘कोविड टास्क फोर्स’ने शाळा सुरु करण्यास केलेला विरोध हे कारण पुढे आले. टास्क फोर्सच्या मतानुसार तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यादरम्यान मुलांना अधिक लागण व धोका होण्याची शक्यता आहे. मुलांमार्फत कोरोनाची लागण शाळेत व समाजात मोठ्या प्रमाणावर झाल्यास तिसऱ्या लाटेचा प्रसार झपाट्याने होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. मुलांना लसीकरण झालेले नसल्याने शाळा सुरु करू नयेत अशी टास्क फोर्स ची भूमिका असल्याचे समजते.

याबद्दल जगातील इतर देशात कोरोनाची मुलांमधील लागण, मुलांना असलेला धोका, शाळेंबाबत परिस्थिती, शाळेचा काही देशातला अनुभव याबाबत उपलब्ध आकडे काय सांगतात याबाबतचा आढावा इथे घेऊया.

मागच्या वर्षी पहिल्या लाटेदरम्यान ब्राझीलमध्ये अनेक मुलं कोरोना काळात दगावली होती. यातील काही मुलं ही कोरोना पॉझेटिव्ह होती, परंतु कोरोनामुळे दगावलेल्या मुलांची तंतोतंत आकडेवारी समोर आली नाही. ब्राझील सोडून जगातील इतर कुठल्याही देशात अशा पद्धतीने मुलांना धोका झाल्याची माहिती पहिल्या लाटेदरम्यान समोर आली नव्हती. ह्यासाठी कदाचित ब्राझील मध्ये त्यावेळी निर्माण झालेला कोरोना व्हायरसचा व्हेरियंट (गामा) जबाबदार असावा.

सुदैवाने हा व्हेरियंट जगात इतर भागात फार पसरला नाही. आता दुसऱ्या लाटेत इंडोनेशियामध्ये अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. अर्थातच दुसरी लाट सध्या डेल्टा या व्हेरियंटने निर्माण केलीय. इंडोनेशियात डेल्टामध्ये एवढी मुलं का गंभीर आजारी पडली आणि दगावलीत हे अजून न सुटलेलं एक कोडं आहे. या लाटेतही जगातील इतर कुठल्याही देशात अशा प्रकारे कोरोनाने बालमृत्यू झालेले नाहीत.

आता काही पश्चिमी श्रीमंत देशांतील उदाहरणं बघुयात. ब्रिटन मध्ये सध्या डेल्टा ची तिसरी लाट ओसरते आहे. इथे लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालेय. ‘यूसीएल’ या लंडन स्थित रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार ब्रिटनमध्ये अठरा वर्षाखालील मुलांची संख्या सव्वा करोड एवढी आहे. ब्रिटनमध्ये आजपर्यंत जवळ जवळ एक लाख ३० हजार लोक कोरोना ने मृत्युमुखी पडलेत. यात अठरा वर्षाखालील मुलांची संख्या केवळ २५ एवढी आहे. या २५ मृत्यूंपैकी १५ मुलं गंभीर आजारांनी आधीच आजारी होती, इतर मुलांमध्येही काही निदान न झालेल्या घटकांमुळे धोका झाला असावा असं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे. साधारणपणे समाजातील दहा लाख मुलांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका दोन मुलांना असतो असा ब्रिटनमधील आकड्यांवरून निष्कर्ष काढता येतो. सुरुवातीपासूनच मुलांना गंभीर कोरोना होणं किंवा त्यांना दवाखान्यात उपचाराची गरज लागण्याचं प्रमाण मोठ्यांच्या तुलनेत अगदीच कमी आहे. तिसऱ्या लाटेत देखील मुलांबाबत हिच परिस्थिती दिसून येते आहे.

डिसेंबर २०२० मध्ये ब्रिटनमधल्या शाळांचा सेरोसर्व्हे करण्यात आला होता. यात शाळेच्या कर्मचाऱ्यांपैकी १५ टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडी आढळून आल्या होत्या, तर हेच प्रमाण दवाखान्यातील स्टाफमध्ये २५-५० टक्के होते. याचा सरळ अर्थ असा की लसीकरण झालेले नसताना समाजात जेव्हा कोरोना सुरु होता त्यावेळी शाळा कर्मचाऱ्यात कोरोना संक्रमणाचं प्रमाण हे दवाखान्यातील संक्रमणापेक्षा खूपच कमी आढळलं. हे प्रमाण समाजातील कोरोनाएवढंच साधारणतः होतं. ह्याचाच अर्थ असा की शाळेत कोरोना प्रसार हा समाजातील प्रसाराप्रमाणेच आहे, शालेय स्टाफला अतिरिक्त धोका मुलांमुळे होतं नाही. ह्याच काळात केलेल्या दुसऱ्या एका सर्व्हे मध्ये ब्रिटिश शाळांत कोरोनाची अँटीजेन टेस्ट मुलांमध्ये १.२ टक्के तर स्टाफची १.६ टक्के पॉझिटीव्ह निघाली आणि ही आकडेवारी समाजातील लोकांपेक्षा फार वेगळी नव्हती. हा सर्व्हे देखील हेच दाखवतो की लक्षणविरहित कोरोना संक्रमण (asymptomatic covid infections) शाळेंमध्ये समाजापेक्षा जास्त होत नाही. म्हणजे शाळा ह्या सुपरस्प्रेडर म्हणून काम करत नाहीत असा ब्रिटनचा अनुभव आहे. अमेरिकेत आता मोठ्यांचं तसेच अठरा वर्षाखालील (१२+) मुलांचं लसीकरण बरंच झालंय. तिथे ५० टक्के लोकांचं पूर्ण लसीकरण, ७० टक्के लोकांना एक डोस तर १२ वर्षावरील मुलांना ६० टक्के पूर्ण तर ७० टक्के मुलांना एक डोस झालाय. ज्या राज्यांमध्ये लसीकरण कमी आहे तिथे आता डेल्टामुळे कोविडचे आकडे वाढले आहेत. अमेरिकेत सुरुवातीपासून एकूण सव्वा सहा लाख लोक करोनामुळे मृत्यू पावले आहेत. यात फक्त ३५० च्या जवळपास अठरा वर्षाखालील मुलं आहेत. ह्यातील बहुतांश मुलं वेगवेगळ्या गंभीर आजारांनी ग्रस्त होते, त्यामुळे त्यांना धोका जास्त झाला होता.

डेल्टाच्या आगमनानं अमेरिकेत मुलांच्या संक्रमणाचं प्रमाण काहीस वाढलंय. आकड्यांमध्ये सांगायचं झालं तर पूर्वी १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १४.३ टक्के एवढे मुलांचे प्रमाण होते, आता ते प्रमाण १५ टक्के एवढे झालेय. सद्यस्थितीला दवाखान्यात दाखल होणाऱ्या एकूण कोरोना केसेसचा २.४ टक्के एवढी १८ वर्षाखालील मुलं आहेत. यामुळे मुलांसाठीच्या हॉस्पिटल्सला कोरोनाचं काम वाढलय. बारा वर्षाखालील मुलांना देखील लसीकरण परवानगी देण्यात यावी अशी मागणी अमेरिकेत जोर धरते आहे. याखेरीज, नव्याने सुरु होणाऱ्या शैक्षणिक सत्रात मुलांनी शाळेत मास्क लावावेत किंवा नाही यावर देखील बराच वाद आणि राजकारण तिथे सुरु झालंय.भारतातील दुसरी लाट डेल्टा व्हेरियंटमुळे आली होती. मुंबईत महापालिकेच्या दवाखान्यात मुलांचा सिरोसर्व्हे जून जुलै च्या आसपास करण्यात आला होता. यात ५० टक्के मुलं हे आधीच कोरोना संक्रमित झालेले होते असे आढळून आले. म्हणजे या मुलांना कोरोनामुळे आजारपण आलेलं नव्हतं, यातल्या बहुतांश मुलांना कोरोनाची काहीच लक्षणं आली नसावीत, आणि पालकांना देखील मुलांच्या संक्रमणाबद्दल माहिती नसावी. पिंपरी चिंचवड मनपा चा सिरोसर्व्हे ह्यापेक्षा जास्त मुलांमध्ये अँटीबॉडी दाखवतोय (जून-जुलै २०२१). ह्या सर्व्हेप्रमाणे जवळ जवळ ७० टक्के मुलांना कोरोना संक्रमण होऊन गेलंय. ही मुलं कुठेच ऍडमिट झाली नाहीत आणि त्यांना संक्रमण कळले देखील नाही.

भारतात या वर्षाच्या सुरुवातीपासूनच डेल्टा व्हेरियंटच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता, त्यात प्रचंड जीवित हानी झाली. लोकांना हॉस्पिटल बेड, अतिदक्षता विभागाची केअर न मिळाल्याने अनेक लोक मृत्युमुखी पडले, पण एवढा विध्वंस करून देखील डेल्टा व्हेरियंटला भारतीय मुलांनी अजिबात थारा दिला नव्हता. मुलांमध्ये मृत्यू तर दूरच पण गंभीर करोना देखील फारसा कुठे झाल्याचं चित्र दिसलं नाही की नोंद झाली नाही. इंडोनेशिया मध्ये कुठले तरी असे घटक आहेत की जे मुलांमध्ये डेल्टाचं गांभीर्य वाढवताहेत आणि आपल्या सुदैवाने ते घटक भारतात आणि जगात इतरत्र नसावेत. अमेरिकेत ज्या डेल्टा मुळे सध्या दवाखान्यात ऍडमिट होण्याचं प्रमाण वाढलंय त्याच डेल्टाच्या दुसऱ्या लाटेत भारतीय मुलं सुरक्षित राहिली आहेत, संक्रमित होऊन देखील आजारी पडलेली नाहीत हे आपल्याकडील सर्व्हे वरून सिद्ध झालेलं आहे. याखेरीज, महाराष्ट्रात शासनाने ८-१० वीचे वर्ग ग्रामीण भागात सुरु झालेले आहेत आणि गेल्या दीड ते दोन महिन्यात कुठूनही शाळेतून सुपरस्प्रेड झाल्याचं एकही उदाहरण समोर आलेलं नाही.

शाळा सुरु न केल्यास मोठे नुकसान

मग असे असताना आपल्याकडे शाळा सुरु होऊ नयेत असे टास्क फोर्सने का म्हटले आहे? कोविड टास्क फोर्सचा तिसऱ्या लाटेतील मुलांबद्दलची डेल्टाच्या धोक्याची ही भीती अवास्तव आहे असे आजिबात नाही. परंतु तिसऱ्या लाटेची वाट पाहून पुढील निर्णय घेणे हे प्रॅक्टिकल वाटत नाही. कारण तिसरी लाट ही केव्हा येईल, किती मोठी येईल आणि त्यात मुलांना धोका होईलच याबाबत निश्चितपणे सांगणे आज अवघड आहे.

सद्यस्थितीला कोविड संक्रमण समाजात खूप कमी झालेले असताना शाळा सुरु न केल्यास मुलाचं हे शैक्षणिक वर्ष हमखास वाया जाणार आणि तिसरी लाट संपेपर्यंत २०२२ चा पूर्वार्ध देखील हातातून जाणार (तिसरी लाट तेवढी लांबल्यास!). मुलांचं लसीकरण नसल्याने शाळा सुरु करण्यास विलंब केल्यास पुढचे अनेक वर्ष आपल्याला शाळा सुरु करता येणार नाहीत. कारण आज देखील आपले १० टक्के लोकच संपूर्ण लसीकरण झालेल्या गटात मोडतात, मुलांचा लसीकरणाचा नंबर लागेपर्यंत खूप वेळ लागेल ह्यात शंका नाही. ऑनलाईन शिक्षण हे प्रॅक्टिकल मार्ग नाही. हा गरीब, ग्रामीण आणि मध्यमवर्गीयांसाठी संपूर्णपणे फसलेला प्रकार आहे असाच बहुतांश लोकांचा, शाळांचा अनुभव आहे.

शाळेतील लांबलेल्या अनुपस्थितीत मुलांचं प्रचंड शैक्षणिक, मानसिक, शारीरिक नुकसान झालेलं आहे आणि प्रत्यक्ष शिक्षण जेवढं लांबेल तेवढं हे नुकसान जास्त होईल. जगभरातून मुलांना शारीरिक आणि मानसिक समस्या वाढल्या असल्याचे संशोधनं प्रकाशित व्हायला सुरु झालेले आहेत. हॉंगकॉंग मधील मुलांमध्ये स्क्रीनच्या अति वापरामुळे कोरोना काळात चष्मे वाढलेत. कोरोनामुळे मुलांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हानी किती झालीय हे येणाऱ्या काही वर्षात आणि दशकात दिसून येईल आणि तो वैद्यकीय शास्त्राचा एक अभ्यासाचा विषय ठरणार आहे. याउलट, धोक्याची भीती बाळगून मुलांना शाळेपासून आणि शिक्षणापासून वंचित ठेवल्यास त्यातून होणाऱ्या संभाव्य फायद्याची शक्यता फार नाही हेच जागतिक आणि आपल्या स्थानिक अनुभवावरून सांगता येईल.

शाळा सुरु करताना मुलांना एक किंवा दोन दिवसा आड शाळेत बोलवून, वर्गात अंतर ठेऊन व योग्य ती काळजी घेऊन सुरवात केल्यास युरोप व ब्रिटनसारखं आपल्या मुलांनाही सुरक्षित राहून शिक्षण देता येईल. काही मुलं ज्यांना कोविड मुळे अधिकचा धोका (at risk category) असतो अशांचा विचार वेगळा करावा लागेल. शाळा सुरु असताना मुलांना किंवा घरात कुणाला कोरोनासारखी लक्षणं आल्यास मुलांना घरी ठेवणे, एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या संपर्कातील मुलांना घरी पाठवणे, एखाद्या परिसरात कोरोना वाढल्यास जास्तीची खबरदारी घेणे अशा अनेक गोष्टी कराव्या लागतील. याशिवाय, मुलांचं लसीकरण जे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं आता सिद्ध झालंय त्यासाठी आपल्या सरकारांना युद्धपातळीवर तयारी करावी लागेल.

शाळांना कोरोनासोबत जगावं लागणार!

आता जवळजवळ दोन वर्ष होत आलीत तरी कोरोना गेलेला नाही, हे अपेक्षेप्रमाणेचं आहे (चीनमध्ये ऑक्टोबर २०१९ ला कोरोना सुरु झाला). आणि कोरोना कदाचित येणाऱ्या १-२ वर्षातही पूर्णपणे नियंत्रणात आलेला नसेल. त्याचे वेगवेगळे व्हेरियंट येत राहणार, अजून काही लाटा देखील येऊ शकतात. त्यामुळे मुलांच्या शाळेसाठी कायमचा तोडगा काढणे आणि कोरोनासोबतच शाळांनी देखील जगायला शिकणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास आपली भावी पिढी केवळ शिक्षणालाच नव्हे तर सामाजिक, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला देखील हरवून बसेल. शिक्षणव्यवस्था देखिल कोलमडून जाईल. आणि ही अगदी रास्त शक्यता आहे.

(लेखक ‘डिपार्टमेंट ऑफ अनास्थेशिया अँड क्रिटिकल केअर ग्वेनेड हॉस्पिटल बॅंगर, नॉर्थ वेल्स, ब्रिटन इथं काम करतात)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com