लक्षद्वीपची बुडणारी बेटं... (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

लक्षद्वीपची बुडणारी बेटं... (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

लक्षद्वीप द्वीपसमूहातल्या एकूण ३६ बेटांपैकी ‘पाराळी १’ हे प्रवाळबेट नष्ट होण्याच्या व बुडू लागल्याच्या खुणा सन १९६८ ते २००३ या काळातच दिसू लागल्या होत्या. हे बेट आता नकाशावरून नाहीसं झाल्याची बातमी या महिन्याच्या सुरवातीला आली. जागतिक तापमानवृद्धीमुळं वाढणारी समुद्रपातळी हेच या घटनेमागचं एकमेव कारण आहे. बंगाराम या कंकणाकृती प्रवाळबेटांत ‘पाराळी २’, ‘पाराळी ३’ आणि ‘थिंनाकारा’ अशी आणखी तीन बेटं असून, त्यांचीही झीज सुरूच आहे. त्यामुळं यापुढं ‘लक्षद्वीप द्वीपसमूहात एकूण छत्तीस बेटं नसून, एकतीसच बेटं आहेत,’ असं  म्हणण्याची वेळ आपल्यावर नजीकच्या काळात येणार आहे.

ल   क्षद्वीप द्वीपसमूहातलं ‘पाराळी १’ हे माणसांची  वस्ती नसलेलं प्रवाळबेट (Coral Island) समुद्रानं गिळंकृत केल्याची बातमी ही समुद्राच्या वाढणाऱ्या पातळीमुळं येऊ घातलेल्या एका मोठ्या संकटाची नांदी आहे, असं म्हणायला हरकत नाही! लक्षद्वीप द्वीपसमूहातल्या बंगाराम या कंकणाकृती प्रवाळबेटाचा (Atoll ) भाग असलेलं हे बेट नकाशावरून नाहीसं झाल्याची बातमी या महिन्याच्या सुरवातीला सात सप्टेंबर रोजी आली आणि या व अशा अनेक द्वीपसमूहातल्या सखल बेटांच्या भवितव्याविषयी आता किती जागरूक राहायला हवं आहे, त्याचाही अंदाज येऊ लागला.

सन १९६८ पर्यंत ०.०३२ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेलं हे बेट त्यानंतर हळूहळू चारही बाजूंनी होणाऱ्या झिजेमुळं आता पाण्यात पूर्णपणे बुडालं आहे. त्याच्या आजूबाजूची आणखी चार बेटंही झपाट्यानं बुडत असल्याचे संकेत मिळत आहेत. लक्षद्वीप द्वीपसमूहातली बेटं जैवविविधतेनं समृद्ध आहेत; पण अजूनही ती आपल्याला पूर्णपणे कळलेली नाहीत. वाढत्या समुद्रपातळीमुळं होत असलेल्या
किनाऱ्यांच्या झिजेमुळं ती वेगानं संकटग्रस्त बनत आहेत. उपग्रह-प्रतिमांच्या अभ्यासातून ही बाब अगदी ठळकपणानं समोर आली आहे.

डॉ. आर . एम . हिदायतुल्ला हे माणसांची वस्ती नसलेल्या लक्षद्वीप द्वीपसमूहातल्या बेटांचा व त्यांवरच्या जैवविविधतेचा अभ्यास अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या निरीक्षणानुसार, सन १९६८ ते २००३ या काळातच ‘पाराळी १’ हे प्रवाळबेट नष्ट होण्याच्या व बुडू लागल्याच्या खुणा दिसू लागल्या होत्या. जागतिक तापमानवृद्धीमुळं वाढणारी समुद्रपातळी हेच या घटनेमागचं एकमेव कारण आहे. बंगाराम या कंकणाकृती प्रवाळबेटांत ‘पाराळी २’, ‘पाराळी ३’ आणि ‘थिंनाकारा’ अशी आणखी तीन बेटं असून, त्यांचीही झीज सुरूच आहे. त्यामुळं यापुढं ‘लक्षद्वीप द्वीपसमूहात एकूण छत्तीस बेटं नसून, एकतीसच बेटं आहेत,’ असं  म्हणण्याची वेळ आपल्यावर नजीकच्या काळात येणार आहे.

अरबी समुद्रात, भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यापासून ४०० किलोमीटर दूर असलेल्या लक्षद्वीप द्वीपसमूहात एकंदर ३६ प्रवाळबेटांपैकी ११ बेटांवर माणसांची वस्ती आहे.१५ बेटांवर वस्ती नाही. पाच बेटं आधीपासूनच पाण्याखाली आहेत आणि पाच बेटं इतर बेटांशी संलग्न आहेत. या बेटांच्या आजूबाजूच्या समुद्रतळाच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे, की इथं पाण्यात बुडालेल्या प्रवाळभित्ती (Coral reefs) आहेत. एका उथळ तळ्याच्या (Lagoon-लगून) आजूबाजूला असलेली सखल (Low ) बेटांची ही एक साखळीच आहे. ही बेटं ३२ चौरस किलोमीटरच्या परिसरात विखुरलेली आहेत. या प्रवाळबेटांत आढळून येणारी विविधता ही केवळ अचंबित करणारीच आहे. प्रत्येक बेट हे त्यावरील वनस्पती, अवसाद किंवा गाळ, प्रवाळ, मत्स्यजीवन, लगून या सगळ्यांच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. लक्षद्वीप द्वीपसमूहातली ही बेटं त्यांच्या विशिष्ट भूरूपिकीमुळं (Geomorphology ), भूशास्त्रीय रचनेमुळं, जैवविविधतेमुळं आणि त्यांच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळं अद्वितीय अशी निसर्गलेणी बनलेली आहेत. प्रत्येक बेट हे देवदुर्लभ सौंदर्यानं परिपूर्ण आहे. प्रत्येक बेटाचं निसर्गसौंदर्य हे शब्दात वर्णनही करता येणार नाही इतकं विलक्षण आहे. प्रवाळ आणि केवळ प्रवाळ यांनीच बनलेली, सदैव अस्थिर...आणि कल्पेनी बेटासारखी बेटं तर वीस-वीस मीटर उंचीच्या माडांनी झाकून गेलेली! या बेटांवरचं पर्यावरण संवेदनशील असून, भरपूर पाऊस पडत असूनही शुद्ध गोड्या पाण्याचा तुटवडा ही एक इथली मोठी समस्या आहे.  

इथली सगळी बेटं कमी उंचीची, समुद्रसपाटीपासून केवळ एक ते दोन मीटर उंच असून, त्यांवर डोंगर, पर्वत अशी भूरूपं नाहीत. काही बेटांवर वाळूच्या उंच टेकड्या आणि थोड्या उंचीवर पुळणी आहेत. या पुळणींवर तुटलेल्या प्रवाळांच्या भरड पदार्थांचं संचयन आढळून येतं. पूर्वेकडून येणारी वादळं आणि मॉन्सूनमध्ये नैॡत्येकडून येणाऱ्या लाटा यांमुळं या बेटांची मोठी नासधूस व झीज होते. त्यामुळं प्रवाळांचे लहान लहान तुकडे वेगवेगळ्या लगूनमध्ये पडून काही लगून गाळानं भरूनही जाऊ लागले आहेत. भरपूर जैवविविधता असलेली ही प्रवाळबेटं सागरी पर्यावरणातल्या बदलांसंदर्भात खूपच संवेदनशील आहेत. समुद्रपातळीतल्या थोड्याशा बदलानंही ती नष्ट होऊ शकतात.

मिनीकॉय, कल्पेनी, कदमत, किस्तन व चेटलत ही इथली कंकणाकृती प्रवाळबेटं आहेत. बंगाराम बेटांचा समूह लगूनच्या मध्ये तयार झाला आहे. इथल्या सगळ्याच प्रवाळांच्या वाढीत समुद्रपातळीतल्या बदलानुसार अनेक बदल झाल्याचं दिसून आलं आहे. प्रवाळ हे मूलतः उथळ पाण्यात वाढतात; त्यामुळं समुद्रपातळीतल्या थोड्याशा वाढीनंही ते नष्ट होतात. १५ हजार वर्षांपूर्वी या भागात समुद्रपातळी आजच्यापेक्षा १२० मीटरनं खाली होती.  सात हजार वर्षांपूर्वी ती २० मीटर इतकीच खाली होती. समुद्रपातळी खाली जाण्याची किंवा वर येण्याची क्रिया खूपच संथ गतीनं झाली असेल. अन्यथा इतक्‍या मोठ्या प्रमाणावर प्रवाळबेटं तयार होऊ शकली नसती किंवा शिल्लक राहू शकली नसती.

सध्याची प्रवाळ व प्रवाळभित्तींची वाढ गेल्या ५०० वर्षांतच झाली. आता मात्र जागतिक हवामानबदलांमुळं समुद्रपातळी वाढत असून त्याचे परिणाम यानिमित्तानं वेगानं दृश्‍यरूप घेऊ लागले आहेत.

ही सागरी बेटं आज वाढत्या समुद्रपातळीच्या सावटाखाली आपलं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करत आहेत. या बेटांचा जो ऱ्हास सुरू आहे आणि भविष्यात या बेटांना ज्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे, त्याची आज अनेकांना फारच कमी माहिती  आहे. समुद्रपातळीत एक मीटरनंही होणारी वाढ या कमी उंचीच्या प्रवाळबेटांना गिळंकृत करणार असल्याचं भाकीत अनेक सागरशास्त्रज्ञांनी व हवामानतज्ज्ञांनी यापूर्वीच केलं आहे.    

भविष्यातल्या संकटाची चाहूल तर आता लागलेलीच आहे. वाढणाऱ्या समुद्रपातळीमुळं अशा बेटांना पुढच्या काळात कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल, हे कळण्यासाठी व हीच बेटं सर्वप्रथम या संकटाला कशी बळी पडणार आहेत, हे समजण्यासाठी लक्षद्वीप द्वीपसमूहातल्या सगळ्याच बेटांचा अभ्यास नव्यानं हाती घेण्याची मोठी गरज आता निर्माण झाली आहे. माणसांची वस्ती असलेल्या बेटांचा विचार तर प्राधान्यानं होणं आवश्‍यक आहे.

सागरपातळी वाढण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेवर आपलं काही नियंत्रण नाही हे खरं आहे; पण अशा बेटांवर खारफुटीची जंगलं वाढवून भविष्यात होणाऱ्या समुद्राच्या आक्रमणाचा जोर कमी करता येईल. ही बेटं  वाचवण्याचा सध्या हाच एक पर्याय आपल्यासमोर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com