समकालीन जर्मन नाटकं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drama

गद्य, पद्य व नाट्य या तीन प्रमुख साहित्यप्रकारांतील नाटक हा साहित्यप्रकार रंगभूमीवर सादर केल्यावरच खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला जातो.

समकालीन जर्मन नाटकं

- डॉ. सुनंदा महाजन mahajan.sunanda@gmail.com

एलफ्रिडे येलिनेक या नोबेल पुरस्कारप्राप्त ऑस्ट्रियन-जर्मन लेखिकेनं म्हटलं आहे की, ‘जर आपल्या आजूबाजूला घडणारंच नाटकातून दिसत असेल तर नाटक बघायला कशाला जायचं?’ आपल्या प्रत्येक नाटकातून तिनं स्वतःच्या या उद्‌गाराशी प्रामाणिक राहत लेखन केलं आहे. उदाहरणार्थ : आपल्या ‘स्पोर्टस् प्ले’ या नाटकातून तिनं व्यावसायिक खेळांच्या स्पर्धांच्या विरोधात अत्यंत टोकाची भूमिका घेतली आहे. दोन देशांत होणाऱ्या युद्धाहून या स्पर्धा वेगळ्या नाहीत, असंच तिचं मत आहे. खेळाडूंचं लहानपणापासून होणारं एक प्रकारचं शारीरिक शोषण, अशा विविध स्पर्धांमध्ये ओतला जाणारा भरमसाठ पैसा, खेळांमध्ये होणारे जीवघेणे अपघात, त्यात भरडले जाणारे पालक, स्पर्धा बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये उफाळून येणारा राष्ट्रवाद या सगळ्यांचं ती युद्धाच्या प्रतिमा वापरतच सादरीकरण करते. सन १९९८ मध्ये लिहिलेल्या आणि तितक्‍याच भन्नाट पद्धतीनं सादर झालेल्या या नाटकानं जर्मनभाषक देशांतील रंगभूमीवर मोठीच खळबळ उडवून दिली होती.

जर्मन रंगभूमीवर सध्या कोणत्या प्रकारची नाटकं सादर होतात? या लेखातून त्या समकालीन जर्मन नाटकांची तोंडओळख करून घेऊ या...

गद्य, पद्य व नाट्य या तीन प्रमुख साहित्यप्रकारांतील नाटक हा साहित्यप्रकार रंगभूमीवर सादर केल्यावरच खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला जातो. कथा-कादंबरीतून एक घडून गेलेली गोष्ट वाचकाला कळते, कवितेतून भावना, विचार, संवेदना, अंतरंगातील खळबळ थेट वाचकाच्या मनाचा ठाव घेते, तर नाटक हे प्रेक्षकाच्या जणू डोळ्यासमोर घडतं. म्हणजे, ते घडून गेल्यावर नव्हे तर, घडत असताना ते तो पाहतो. गद्य साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील ‘भूतकाळ’, तर नाटकाच्या संहितेचं वैशिष्ट्य असतं ‘वर्तमानकाळ’. नाटकाची गोष्ट व्यक्तिरेखांच्या, म्हणजेच पात्रांच्या, संवादातून पुढं जाते. (दोन बाजूंमधील) संघर्ष हा तर नाटकाचा आत्मा असतो, हा संघर्ष अगदी टिपेला, कळसाला पोहोचतो आणि मग शोकात्म अथवा दोन बाजूंचा समेट होत सुखात्म म्हणावा असा शेवट होतो. अशा मांडणीसाठी चांगल्या नाटककाराला रंगभूमीची जाण, भान असणं महत्त्वाचं असतं. आता ही मांडणी झाली पारंपरिक नाटकांची. आजच्या जर्मनभाषक रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटकांवर, त्यांच्या संहितांवर नजर टाकली तर अशा मांडणीला छेद देणारी नाटकंच तिथं सादर होताना दिसतात.

रोलाँ शिमेलफेनिग या नाटककारानं काही वर्षांत बरीच नाटकं लिहिली, त्यातली काही खूपच गाजली आहेत. त्यानं आजच्या काळातील अनेक विषय हाताळले आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा, स्त्री-पुरुष नात्यातील गुंतागुंत, स्थलांतरितांबरोबरचं एकत्र जगणं, पौराणिक कथांमधून केलेलं वर्तमानाचं विश्‍लेषण असे विषय मांडताना त्यांची सरिअल् पद्धतीनं केलेली हाताळणी लक्षवेधक ठरते.

‘हिवाळ्यातील सगळ्यात लहान दिवस’ या नाटकात नवरा-बायको-मुलगी अशा एका कुटुंबात बायकोची आई तिच्या नव्यानं झालेल्या मित्राला घरी घेऊन मोठ्या मुक्कामाला येते. आई-मुलीच्या आधीच तणावपूर्ण असलेल्या नात्यात ताण वाढतो. नवीन आलेला पाहुणा मात्र सुंदर पियानोवादनानं, चांगल्या दिसण्यानं, गोड वागण्यानं चांगलीच भुरळ पाडतो.

यजमान हा लेखक असतो आणि त्यानं हिटलरच्या कालखंडावर अनेक पुस्तकं लिहिलेली असतात, त्याला पाहुण्याच्या वागण्यात ‘काहीतरी बरोबर नाही,’ हे दिसत राहतं. सुखासीन आयुष्य जगणारी माणसं आतून पोकळ आहेत, एखादी ठोस राजकीय भूमिका घेऊन प्रत्यक्ष कृतीची वेळ येते तेव्हा भीतीमुळे त्यांच्या हातून काहीच घडत नाही, हे नाटककारानं यात मांडलं आहे.

थोमास मेले हा नाटककार आधुनिक जीवनपद्धतीचं चिकित्सक विश्‍लेषण करताना दिसतो. सन २०२० मध्ये आलेलं त्याचं ‘जागा’ हे नाटक भाड्यानं घर घेऊ इच्छिणारे, सामायिक जागा शोधणारे विद्यार्थी, एजंट, आपलं घर भाड्यानं देऊ करणारे घरमालक अशा सगळ्या पात्रांचं आहे. त्यानं घर शोधणाऱ्या लोकांचा कोरस वापरला आहे. परवडणाऱ्या किमतीत चांगलं घर मिळणं दिवसेंदिवस कसं अवघड होत चाललं आहे हे तो या नाटकातून मांडतो, तर ‘बदली’ या त्याच्या नाटकात बायपोलर डिसऑर्डर या मनोविकारातून बऱ्या झालेल्या एका गुणी आणि उत्तम अशा शिक्षकाची गोष्ट तो सांगतो. या शिक्षकाला जेव्हा पदोन्नती मिळणार असते तेव्हा काही सहकारी त्याच्या मनोरुग्णतेच्या भूतकाळावर बोट ठेवतात. आधी त्याचं गुणगान गाणारे विद्यार्थी, पालक, सहकारी...सगळेच त्याच्या विरोधात जातात आणि त्यामुळे त्याचा मनोविकार पुन्हा जोरात उफाळून येतो. त्यातच त्याची बायकोही त्याला सोडून जाते. मनोरुग्णांच्या बाबतीत असंवेदनशील असणारा समाज आणि त्यामुळे त्यांची होणारी घुसमट मांडताना याही नाटकात शेवटी कोरसचा प्रभावशाली वापर नाटककारानं केल्याचं दिसतं.

रेने पोलेश या नाटककाराचा उल्लेख व्हायलाच हवा. स्वतःची नाटकं स्वतःच बसवणाऱ्या या लेखकानं १९९९ पासून आजपर्यंत सुमारे दोनशे नाटकं लिहिली आहेत, त्यातली बरीचशी सहकलाकारांबरोबर एकत्र बसून. नाटकासाठीचे अनेक पुरस्कारही त्याला मिळाले आहेत. ‘पोस्टड्रॅमॅटिकल थिएटर’ म्हणजे ‘प्रयोगाधिष्ठित नाटकं’ लिहिणाऱ्या पिढीचा हा महत्त्वाचा नाटककार आहे.

या नाटकांबरोबरच काही बालनाट्यांचा, किशोरवयीन प्रेक्षकांसाठीच्या नाटकांचा उल्लेख केला पाहिजे. सिमोन विंडिश आणि कलाकार मंडळी यांनी एकत्रितपणे लेखन केलेल्या ‘वेळ कसा जातो’ या नाटकात आठ वर्षांची एक छोटी मुलगी - क्‍लाउडिया - तिच्या वाढदिवसाचा सरप्राईज केक तयार होत असताना वाट पाहत असते तेव्हा काय काय करते, याची गोष्ट सांगितली आहे. आई-बाबा-आजी सगळे स्वयंपाकघराचं दार बंद करून केक करत असल्यानं क्‍लाउडिया एकटीच वाट पाहतेय, तिची कल्पनाशक्ती स्वैर धावतेय. या नाटकात क्‍लाउडियाची चार पात्रं आहेत, चौघी क्‍लाउडिया एकच आहेत; पण त्या एकमेकींत बोलतात, त्या बरोबरच असतात, कधी एका मोठ्या छिद्रातून उडी मारून भलत्याच काळात, वेगळ्याच जगात जातात, कधी तिथल्याच गालिच्याच्या चित्रात जातात, कधी बागेत, पाण्यात, चिखलात खेळतात, मुंग्यांशी, माशांशी बोलतात, काय वाट्टेल ते करतात...पण अखेरीस वाट पाहण्याचा ताण असह्य होऊन क्‍लाउडिया घड्याळ फोडते, वस्तूंची मोडतोड करते. शेवटी एकदाचा केक तयार होतो आणि वाट पाहणं संपतं आणि नाटकही. या नाटकात अर्थात बरीच गाणी आहेत.

‘आय लव्ह यू’ या क्रिस्तो सागरनं लिहिलेल्या नाटकात तेरा-चौदा वर्षांचे मुलगा-मुलगी त्यांना समजलेला प्रेमाचा अर्थ शोधत असतात. यात आई-वडील, आजी-आजोबा यांच्यातील प्रेम, भांडणं, एकत्र जगणं, घटस्फोट, लहानपणीच्या आठवणी यांतून ती दोघं प्रेम समजून घेण्याचा प्रयत्न करतात. नाटकात ही दोनच पात्रं आहेत. तीच वेगवेगळ्या भूमिका त्यांच्या दृष्टिकोनातून सादर करत जातात.

नाटकातील भाषेचं, शब्दांचं महत्त्व कमी होऊन त्याचं सादरीकरण केंद्रस्थानी आलेल्या जर्मन रंगभूमीच्या या कालखंडात, आजूबाजूला न दिसणाऱ्या गोष्टी दाखवण्याचं काम करणारी नाटकंच चालतात, हे मात्र ठळकपणे दिसून येतं.

(सदराच्या लेखिका जर्मन भाषेच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत, तसंच भाषांतरित साहित्याला वाहिलेल्या ‘केल्याने भाषांतर’ या त्रैमासिकाचं संपादन त्या करतात.)

Web Title: Dr Sunanda Mahajan Writes Contemporary German Dramas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :dramaGermanysaptarang