गणेशभक्तीचा समयोचित अन्वय

book review
book review

सर्वच देवदेवतांविषयी भारतीय जनमानसात पूज्य भक्तिभाव असला, तरी गणपतीविषयी प्रत्येकाच्या मनात काहीसा वेगळा, संवेदनशील श्रद्धाभाव आहे. अग्रपूजेचा मानही श्रीगणेशाला आहे. विशेषत: आपल्या महाराष्ट्रात, मराठी माणसाच्या मनात गणपतीविषयी विशेष श्रद्धाभाव आहे. गणपती उत्सव हे मराठी मातीचं वैशिष्ट्य आहे. जनमानसातला श्रीगणेशाविषयीचा श्रद्धाभाव माहीत असल्यामुळंच गणेश संकल्पनेचा समयोचित अन्वय लावून, अन्य माहितीची जोड देऊन "जय देवा जय देवा गजानना, आता व्हा प्रसन्न' हे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी लिहिलं आहे. स्वतंत्र दृष्टिकोनातून केलेलं विवेचन आणि पूरक माहिती असे पुस्तकाचे आशयाच्या दृष्टीनं दोन विभाग आहेत. गणेश संकल्पनेचा समयोचित अन्वय लावून लेखकानं विश्‍लेषण केलं आहे. विश्‍लेषण आणि माहिती यांचा सुयोग्य मेळ डॉ. तांबे यांनी पुस्तकात साधला आहे.

आजचं वर्तमान जीवन संगणकयुगाचं जीवन आहे. संगणकाच्या परिभाषेचा उपयोग करून डॉ. तांबे यांनी श्रीगणेश या देवसंकल्पनेचं स्वरूप, सामर्थ्य आणि महत्त्व स्पष्ट केलं आहे. संगणकाची गणपतीशी किंवा मानवी मेंदूशी तुलना करण्याचा लेखकाचा हेतू नाही. परंतु, आजचं युग संगणकाचं आहे. भौतिक विकासासाठी संगणकविद्येची आज गरज आहे. त्याप्रमाणंच जीवनात सुख, समृद्धी, यश, मन:शांती मिळविण्यासाठी श्रीगणेश देवतेची उपासना आवश्‍यक आहे, हे पटवून देण्यासाठी संगणकाचा दृष्टांत लेखकानं योजला आहे, श्रीगणेशाचं सामर्थ्य स्पष्ट केलं आहे. हेच या पुस्तकाचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे. गणपती अथर्वशीर्षातल्या प्रत्येक श्‍लोकाचा अर्थ आणि गूढार्थही उलगडण्यात आला आहे. फलश्रुतीचंही विवेचन आहे. या विवेचनात काही ठिकाणी महत्त्वाचं स्पष्टीकरण लेखकानं केलं आहे. उदाहरणार्थ, दर महिन्यात विनायकी आणि संकष्टी अशा दोन चतुर्थी येतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राचा 4/15 भाग कमी होऊन 11/15 भाग प्रकाशित असतो; तर विनायकी चतुर्थीला बरोबर उलट 4/15 भाग अंधारात असतो. माणसाच्या मनावर चंद्राचा प्रभाव असतो, म्हणून विनायकी चतुर्थीपेक्षा संकष्टी चतुर्थीला जास्त महत्त्व आहे, अशी महत्त्वाची माहिती डॉ. तांबे देतात. तीन टोकं असणाऱ्या थंड प्रकृतीच्या दुर्वांचं महत्त्वही त्यांनी सांगितलं आहे. अथर्वशीर्षाचा पाठ म्हणताना लाह्यांची आहुती देण्याचं महत्त्व फलश्रुतीत स्पष्ट करण्यात आलं आहे. या ठिकाणी लाह्यांचं हवन का करायचं, यामागची शास्त्रीय भूमिका लेखकानं स्पष्ट केली आहे. "लाह्या पूर्ण कोरड्या असतात. त्यांच्यात पाण्याचा अंश नसतो. ज्वलनाला वेळ लागत नाही म्हणून लाह्या आणि तूप यांचं हवन करायचं,' असं ते सांगतात. मूळ अर्थ, गूढार्थ आणि प्रसंगी शास्त्रीय तत्त्वाचं स्पष्टीकरण यांचा मेळ विवेचनात आहे. पुस्तकातला हा महत्त्वाचा भाग वाचनीय आहे.

त्यानंतरच्या प्रकरणात पूजाविधी आवाहन आणि विसर्जन यांविषयी विवेचन येतं. उपासनेसाठी पार्थिव मूर्ती घडवणं, त्यानंतर देवतेला आवाहन करून प्राणप्रतिष्ठा करणं, श्रद्धेनं पूजा, उपासना करून झाल्यावर अक्षता टाकून "पुनरागमनायच' म्हणून पार्थिक मूर्तीचं विसर्जन करणं, यामध्येच मूर्तिपूजेचं मर्म आहे- म्हणून पार्थिव मूर्ती मातीची किंवा शाडूची असावी म्हणजे पाण्यात विसर्जन करता येईल, हे लेखक सांगतात. गणेशपूजेतच नव्हे, तर सर्वच देवतांच्या पूजेत फुलांबरोबर पत्रीचाही समावेश आहे. यामागं शास्त्रीय तत्त्व आहेच. औषधी गुणधर्म नाहीत, अशी एकही वनस्पती नाही. हे ज्ञान ऋषी, मुनींनी मिळवलं होतं. फुलांच्या, बहराच्या काळात औषधी गुणधर्म जास्त असतात. त्याचा माणसाला उपयोग व्हावा. वृक्षवल्लींशी माणसाचा संपर्क यावा, हाच यामागचा हेतू. "श्रीगणेशाचे वनस्पती प्रेम' आणि "पत्री नव्हे आरोग्याची खात्री' या दोन प्रकरणांत वनस्पतींचं, पत्रीचं आरोग्य दृष्टीनं असणारं महत्त्व लेखकानं स्पष्ट केलं आहे.

देवतांची उपासना पूजा वैयक्तिक कौटुंबिक स्तरावर होत असतेच; परंतु सामाजिक बांधणीसाठी, सामाजिक आरोग्यासाठी गणेशोत्सव आजही महत्त्वाचा असल्याचं मत डॉ. तांबे व्यक्त करतात. अष्टविनायकांचं महत्त्व ओळखूनच त्यांच्याविषयीच्या कथांचाही समावेश डॉ. तांबे यांनी पुस्तकात केला आहे. माणसाच्या स्वभावात गुणांबरोबर काही दोष असतात. काम, क्रोध, मत्सर आदी अवगुणांच्या रूपानं एक एक असुर म्हणजे राक्षस निर्माण झाला. त्या राक्षसांचा नाश करण्यासाठी गणपतीनं प्रत्येक वेळी नवीन अवतार घेतला. मत्सरासुरासाठी वक्रतुंड, मदासुरासाठी एकदंत आदी रूपं गणपतीनं धारण करून अवगुणरूपी असुरांचा नाश केला. त्यातून तयार झालेल्या आठ रूपांची आठ मंदिरं म्हणजेच मोरगाव, लेण्याद्री, थेऊर इत्यादी ठिकाणी असणारे अष्टविनायक होत. या आठ कथा सांगून अवतार कथांचा उपसंहार लेखकानं केला आहे.

अध्यात्माच्या तात्त्विक विचारांचं अधिष्ठान डॉ. बालाजी तांबे यांच्या सर्वच लेखनाला आहे, तसंच प्रस्तुत पुस्तकालाही आहे. अतिशय मनापासून, श्रद्धेनं केलेलं लेखन डॉ. तांबे यांनी श्रीगणेशालाच अर्पण केलं आहे. समयोचित ज्ञान संकल्पनेचा आधार घेत गणेशरूपांचं, सामर्थ्याचं स्वरूप स्पष्ट करणं, हेच या विवेचनाचं वेगळेपण आहे. गणेशभक्तांबरोबर अन्य जिज्ञासूंसाठीही हे पुस्तक उपयुक्त आहे.

पुस्तकाचं नाव : जय देवा गजानना, आता व्हा प्रसन्न (श्रीगणपत्यथर्वशीर्षाच्या गूढार्थासह)
लेखक : श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे
प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे (020-24405678, 8888849050)
पृष्ठं : 142, मूल्य : 100 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com