दिल्लीत महाराष्ट्र : भूतो भविष्यतिच!

दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमध्ये गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मराठेशाहीच्या उत्तुंग अशा काही घटनांचा उल्लेख झाला.
दिल्लीत महाराष्ट्र : भूतो भविष्यतिच!
Summary

दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमध्ये गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मराठेशाहीच्या उत्तुंग अशा काही घटनांचा उल्लेख झाला.

दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमध्ये गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मराठेशाहीच्या उत्तुंग अशा काही घटनांचा उल्लेख झाला. अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी, ‘बाजीराव पेशवाने १७३७ में इसी जमीनपर डेरा डाला और दिल्लीके शासन को चुनौती दी थी,’ असा उल्लेख केला. २८५ वर्षांपूर्वीच्या या घटनेने त्याकाळी सबंध हिंदुस्थानात खळबळ उडवून दिली होती. तब्बल १८० वर्षांनंतर मोगल राजवटीला प्रत्यक्ष राजधानीतच येऊन कोणी आव्हान दिलं होतं. या काळात अर्थातच दिल्ली ते कावेरी नदीच्या खोऱ्यापर्यंत एक बृहन्‌ महाराष्ट्र निर्माण झाला होतं. महाराष्ट्राचं तेज चहू दिशेला पसरलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं एक विराट रूप भारताच्या कानाकोपऱ्यांत पसरलं होतं.

या मराठेशाहीचा हा वटवृक्ष तब्बल दीडशे वर्षं हिंदुस्थानभर फोफावला. त्याची पाळंमुळं ग्वाल्हेर, इंदोरसारख्या गावी तर खोलवर गेली. मोगल हा वास्तविक मराठ्यांचा शत्रू! १७१९ मध्येच मराठा सैन्य दिल्लीत धडकलं होतं. त्यानंतर १७३७ मध्ये बाजीरावाची दिल्लीला धडक आणि त्यानंतर केवळ पंधरा वर्षांत दिल्लीपतीच्यावतीने मराठेशाहीशी, ‘आपल्या संरक्षणाची जबाबदारी तुम्हांवर सोपवतो,’ असा तह करण्याची वेळ पातशहावर आली.

मराठ्यांनी ही जबाबदारी पत्करली आणि आपलं संरक्षण खरंच फक्त मराठेच करू शकतात याची प्रचिती पातशहास लवकरच आली. अहमदशहा अब्दालीच्या १७५७ च्या हल्ल्यापाठोपाठ रघुनाथराव आणि मल्हारजी होळकरांनी दिल्ली ताब्यात घेऊन अटकेपार पेशावरपर्यंत जाऊन अंमल बसवला!

हा विशाल वटवृक्ष काही एका दिवसात उभा राहिला नाही. मातुःश्री जिजाऊंनी पेरलेलं बीज शिवरायांनी वृद्धिंगत केलं आणि काही दशकांत अनेक आव्हानांना सामोरं जात हे साम्राज्य उभं राहिलं. समाजाच्या प्रत्येक घटकाचा यात सहभाग होता. अठरापगड जाती एकत्र आणून केलेला हा अभूतपूर्व असा यशस्वी प्रयोग होता. जसं इतिहासात आपण पुढे सरकतो, तसा याचा वारंवार प्रत्यय आपल्याला येतो.

मराठ्यांविरोधात लढून कमकुवत झालेल्या मोगलांवर प्रथम नादीरशहाने व नंतर अब्दालीने हल्ले केले. तसंच हा दिल्लीपती मराठ्यांनी नेमलेल्या वजिराच्या ताटाखालचं मांजर झाला. अशा तऱ्हेने स्वतः दिल्लीच्या तख्तावर न बसता मराठ्यांनी मोगल पातशहाला आपलं कळसूत्री बाहुलं करून टाकलं. मराठा-मोगल पातशहाच्या संबंधांवर लख्ख प्रकाश टाकणारं एक फार्सी फर्मान शंभर वर्षांपूर्वी इतिहास संशोधक सरदार आबासाहेब मुजुमदारांनी शोधून काढलं होतं आणि त्याचा अनुवादही प्रकाशित केला. आलमगीर (द्वितीय) या पातशहाचा वजीर इमाद उल् मुल्कने इतका छळ केला, की मदतीकरिता पातशहाने नानासाहेब पेशव्यांचे दिवाण सदाशिवराव भाऊ यांना हे फर्मान पाठवलं. त्यातील काही अंश असे आहेत :

‘‘आमच्या शाश्‍वत राज्यरोहणाची प्रभात झाल्यापासून आजपावेतो इमाद अल्‌ मुल्क (ने) आमच्या समक्ष व अपरोक्ष निंद्य वर्तन केलं, हे सर्वांना माहीत असल्यामुळे त्याचा तपशील देण्याचं कारण नाही.

ज्यातील संपत्ती खाणीच्या आणि समुद्राच्या बरोबरीने होती, अशा आमच्या बादशाही मुलुखाची, मालाची व कारखान्यांची त्याने शक्‍य तेवढी लूट केली; असलं उद्धट वर्तन करून अब्दाली यास राजधानीत भीती दाखवून त्याच्याशी लढाई न करता आपलं स्वामित्व कबूल करविले. त्याने या वेळी विशेषतः अतिपवित्र व अतिश्रेष्ठ अशा आम्हास व आमच्या राजपुत्रास इतकं छळले की, आम्ही आमच्या जीवितास कंटाळलो. थोडक्‍यात सांगावयाचं म्हणजे, त्याच्या जाचणीचा सुरा आमच्या उरात भोसकला जाऊन तो आम्हास सर्वथैव असह्य झाला. अशा स्थितीत आमच्या पवित्रराज्यास टेकू देणारे उदारधी बाळाजी बाजीराव यांच्या आश्रयछत्राशिवाय आम्हास व आमचे परिवारास दुसरं साधन नाही. त्यांनी आमच्या तमाम मुलुखाचे मुखत्यार होऊन आपणास योग्य दिसेल त्या रीतीने आमचा तनखा कायम करावा व आपल्या आप्तांपैकी एखादा विश्‍वासू नोकर नेमावा. त्याने नेहमी आपल्या खड्या फौजेनिशी आमच्या खास हुजूरजवळ असावं. आपणास योग्य वाटेल त्यास वजिरी व मीरबक्षीगिरी द्यावी. शाहूराजांच्या वंशासही आपण उत्तम तऱ्हेने ठेवलं आहे. आम्हास खात्री आहे की, राज्याचा महत्त्वाचा कारभार अंमलात आणताना यापूर्वी शपथपूर्वक व राजीखुशीने झालेले आमचे कारनामे पाळण्यात येतील.’

पानिपत मोहिमेच्या पूर्वसंध्येस हे फर्मान पुण्यात येऊन पोचलं. यानंतर दिल्लीच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातून फौजा गेल्या आणि यातूनच १८०३ पर्यंत दिल्ली मराठेशाहीच्या प्रभावाखाली राहिली. ब्रिटिशांनी दिल्ली मराठ्यांशीच लढून घेतली.

सध्या महाराष्ट्राचा दिल्लीत प्रभाव बेताचाच आहे. कोण जाणे, भविष्यात परिस्थिती बदलेलही. जे भूतात झालं ते भविष्यातही होऊ शकतं, इतिहासाची हीच शिकवण आहे.

(सदराचे लेखक शल्यचिकित्सक असून, अठराव्या शतकाच्या इतिहासावर त्यांनी काही पुस्तकंही लिहिलेली आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com