तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता

श्रावणमास संपताच सणांचा श्रीगणेशाही गणेशोत्सवानेच होतो. त्यानंतर दिवाळीपर्यंत एकच जल्लोष, उत्साहवर्धक असं वातावरण शहरात निर्माण होतं.
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता
Summary

श्रावणमास संपताच सणांचा श्रीगणेशाही गणेशोत्सवानेच होतो. त्यानंतर दिवाळीपर्यंत एकच जल्लोष, उत्साहवर्धक असं वातावरण शहरात निर्माण होतं.

श्रावणमास संपताच सणांचा श्रीगणेशाही गणेशोत्सवानेच होतो. त्यानंतर दिवाळीपर्यंत एकच जल्लोष, उत्साहवर्धक असं वातावरण शहरात निर्माण होतं. ढोल-ताशांच्या गजरात श्रीगणेशांचं वाजतगाजत आगमन आणि प्रस्थानही होतं. या वर्षी तर कोरोनाच्या महासाथीनंतर येणाऱ्या या उत्सवात सर्वत्र उत्साहाचं वारं वाहू लागलं आहे. श्रीगणेश हे महाराष्ट्राचं लाडकं सर्वमान्य दैवत. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला नवीन स्वरूप दिलं आणि राष्ट्रभावनेविषयी उत्कटता निर्माण केली, तरी गणेशोत्सव महाराष्ट्रात पूर्वापार साजरा केल्याचे अनेक दाखले मिळतात.

श्रीगणेश जरी पुरातन दैवत असलं, तरी त्याचे गुण आणि कृती गेल्या दोन हजार वर्षांत बदललेली दिसते. विनायक हा विघ्नेश, म्हणजेच विघ्नांचा ईश असं मान्य केलं, तर या देवतेची उपेक्षा करणे म्हणजे विघ्नांनाच सामोरं जाणे असा एक अर्थ होतो. या उलट गणेशपूजनाने संतुष्ट केलेल्या गजाननाचं रूप विघ्नहर्ता म्हणून परिवर्तित होतं, असा समज आहे. यामुळेच प्रत्येक महत्त्वाच्या कार्याची श्रीगणेशापासून सुरुवात होते.

शिवभक्त रावण आणि कैलासनिवासी महादेव यांची कथा या विघ्नेशाचं रूप उत्तमरीत्या दाखवते. अनेक लेण्यांमध्ये दशानन कैलास पर्वतच उचलण्याच्या प्रयत्नात अनेक शिल्पांत दिसतो. कैकया नामक आपल्या मातेस मृत्तिकेच्या शिवलिंगाची पूजा करताना पाहून रावण तिला कैलास पर्वतच लंकेस घेऊन येतो असे सांगून कैलास पर्वताच्या पायथ्याशी येतो. बाहु भुजाबळे कैलास पर्वत हलवण्यास जेव्हा रावण सुरुवात करतो, तेव्हा पार्वती भयभीत होऊन शिवास म्हणते, ‘‘काय झाले कैलासवासी? बैसले तुम्ही स्वस्थ! करा प्रतिकार त्वरित ।’’ ईश्‍वर उत्तर देतो, ‘‘न करी चिंता मानसी, रावण माझा भक्त परियेसी, खेळतसे भक्तीने.’’ शेवटी पार्वतीच्या आग्रहावरून आपल्या वामहस्ताने कैलास पर्वतातळी शंकराने रावणाची दहा शिरे आणि भुजा दडपल्या. रावणाने सुटका मिळावी म्हणून गायन करून शिवस्तुती आरंभली आणि भोळा सदाशिव प्रसन्न झाला. कैलास नाही, पण आपलं आत्मलिंग त्याने रावणाला प्रदान केलं, ज्याने त्यास अमरत्व प्राप्त होणं शक्‍य झालं. शिवाय, तीन वर्षं या आत्मलिंगाचं पूजन केल्यास रावण स्वतःच ईश्‍वर होईल, असा वरही दिला. फक्त प्रवासात हे लिंग भूमीवर ठेवू नये, एवढीच अट होती.

देवलोकांत आकांत झाला. शेवटी नारायणाने गणेशास सांगितलं, ‘‘सदा रावण तुज उपेक्षितो. तेव्हा आता कपटरूपे कुब्जक होऊन रावणापासी जावे, ते लिंग घ्यावे आणि भूमीवर ठेवून द्यावे.’’ रावण लंकेकडे निघालाच होता. वाटेत विघ्न आणण्याचं काम गणेशाकडे सोपवलं होतं. दशानन सायंकाळी न चुकता संध्या करीत असे. तेव्हा आपलं चक्र सूर्याआड आणून विष्णूने सायंकाळचा समय निर्माण केला. नारदाने रावणाजवळ जाऊन ‘‘सूर्यास्त वेळ आहे जवळी. आता संध्या करणे आवश्‍यक आहे,’’ असं सूचित केलं.

त्या ठिकाणी बालब्रह्मचाऱ्याच्या रूपात श्रीगणेश रावणास दिसतो आणि लंकाधिपती मनुष्यरूप धारण करून त्या बालकास ‘‘मी संध्या करेपर्यंत हे लिंग धरावे, भूमीवर ठेवू नये,’’ अशी विनंती करतो. गणेश रावणाला सांगतो, ‘‘मी बालक, हे लिंग जड! जर मला पेललं नाही तर मी तीन वेळा तुम्हास हाक मारीन. न आल्यास मला ते भूमीवर ठेवावं लागेल.’’ जशी रावणाने संध्या आरंभली, तशी गणेशाने पहिली आरोळी दिली आणि लगेचच दुसऱ्या व तिसऱ्यांदा हाक मारून लिंग भूमीवर ठेवून दिलं. आपली संध्या झाल्यावर जेव्हा रावण ते लिंग उचलू लागला, तेव्हा ते त्यास अशक्‍य झालं. त्या लिंगाचं नाव गोकर्ण महाबळेश्‍वर पडलं. रावणाने श्रीगणेशाची केलेली उपेक्षा त्यास महागात पडली.

पुण्यनगरीमध्ये मातुःश्री जिजाऊंनी श्रीकसबा गणपतीचा जीर्णोद्धार करून स्वराज्याचा श्रीगणेशा केला. गणेशपूजन महाराष्ट्रात रूढ आहेच; पण कोकणात विशेष लोकप्रिय आहे. कदाचित गणेशाच्या मोदकाचा जन्मही कोकणातच झाला असावा. अठराव्या शतकात माधवराव पेशवे यांच्या काळात गणेशपूजन जनमान्य झालं. शनिवार वाड्याच्या गणेश महालात तर हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला. अशाच १७९२ सालच्या एका गणेशोत्सवाचं वर्णन जेम्स वेल्स या स्कॉट चित्रकाराने करून रेखाचित्रही काढलं आहे.

१७९२ च्या २४ ऑगस्टला वेल्स लिहितो, ‘‘आज गणेशोत्सवानिमित्त आम्हाला दरबारात येण्याचं आमंत्रण होतं. आम्हाला एका मोठ्या दालनात नेण्यात आलं. त्याच्या एका बाजूला एका देवळाच्या द्वाराचा देखावा तयार केला होता, त्यास अनेक दिवे लावले होते. आत ब्राह्मण पौरोहित्य करीत होते. दोन गृहस्थ दाराबाहेर लाल कापड पंख्यासारखं फिरवत कदाचित माश्‍या आत जाऊ देत नव्हते. अनेक ज्येष्ठ सरदार व मानकरी दरबारात हजर होते. त्यांची साधी पण देखणी वस्त्रं मला फार भावली. प्रत्येकाने आपल्या शिरावर निरनिराळ्या रंगाच्या पगड्या व फेटे धारण केले होते.’’

वेल्सने रेखाटलेल्या चित्रात गणेशमूर्तीसमोर अनेक फुलझाडं ठेवून एखादी बाग निर्माण केल्याचं लिहितो. गणेशमूर्तीसमोर सवाई माधवराव पेशवे, नाना फडणीस, इतर सरदार, इंग्रज अधिकारी व नोकरवर्ग होता. पटांगणात नृत्य चाललं होतं. शनिवार वाड्याशिवाय इतर सरदारांच्या वाड्यांतही गणेशपूजा होत असे आणि दुसरे दिवशी चार्ल्स मॅलेट आणि वेल्स हरिपंत फडके त्यांच्या वाड्यांतही गेले.

कधीकाळी इतिहासात या गणेशोत्सवात काही दुर्दैवी घटनाही घडल्या. काही दशकांपूर्वीचा किल्लारीचा भूकंप अनंतचतुर्दशीच्या गणेशविसर्जनानंतर होऊन मोठाच प्रलय झाला. १७७३ मध्ये ३० ऑगस्टला शनिवार वाड्यात गणेशोत्सव संपता संपता, भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला दुपारी गारदींनी गर्दी केली आणि नारायणराव पेशवे यांचा खून केला. पेशवे पळत आपले चुलते रघुनाथरावांच्या खोलीत पोचले. गारदी पाठलाग करीत होते. रघुनाथरावांचे पाय धरून, ‘‘दादासाहेब! वाचवावे, किल्ल्यावर घालावे, नाचण्यांची भाकर द्यावी,’ असं म्हणून गळामिठी घातली.

पुढील इतिहास आपण जाणतोच. संकटांचा परिहार व्हावा, विघ्नं दूर व्हावीत, याकरिता चतुर्थीची ही गणेशपूजा. विघ्नेश गणपतीचं विघ्नहर्त्यात परिवर्तन येथूनच सुरू होतं.

(सदराचे लेखक शल्यचिकित्सक असून अठराव्या शतकातील मराठेशाहीच्या इतिहासावर त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com