
मुंबईच्या शिवडी बंदरापासून येत्या दोनच वर्षांत खाडीवरून पूल होणार आहे आणि त्यामुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर दीड तासावर येईल, असं अंदाज वर्तवला जातोय.
चल रे भोपळ्या...
- डॉ. उदय कुलकर्णी udayskulkarni2@gmail.com
मुंबईच्या शिवडी बंदरापासून येत्या दोनच वर्षांत खाडीवरून पूल होणार आहे आणि त्यामुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर दीड तासावर येईल, असं अंदाज वर्तवला जातोय. शिवाय, बोर घाटात नवा पर्यायी मार्ग होऊन सध्या होत असलेली वाहतूक कोंडीही होणार नाही असं सांगितलं जातंय. काही वर्षांपूर्वी तर हा प्रवास हायपरलूपमुळे वीस मिनिटांतच कापता येईल अशीही सुरस आणि चमत्कारिक बातमी आली होती. एकंदर, मुंबई-पुणे प्रवासाला ‘अच्छे दिन’ येत आहेत.
पूर्वी प्रवास किती अवघड होता याचा आपल्याला हळूहळू विसर पडू लागला आहे. हजारो वर्षं मानवाच्या ज्ञात इतिहासाकडे पाहता, गेल्या दोन-तीनशे वर्षांतील प्रगती खरोखरच अभूतपूर्व आहे.
पूर्वी काशीयात्रेला दक्षिणेतून कोणी गेलं, तर परत येईल याची खात्री नसे. पानिपतच्या युद्धभूमीवरून जलद जासूदांबरोबर पाठवलेली पत्रंही १० ते १५ दिवसांनी पोचत. रॉबर्ट क्लाइव्हचं जहाज तर इंग्लंडहून निघाल्यावर, अनेक कारणांमुळे, मद्रासला तब्बल एका वर्षाने पोचलं.
आता तंत्रज्ञानाची प्रगती इतकी झाली आहे की, चंद्रावर आठ दिवसांत यान पोचतं. तेव्हा, जेमतेम २३० वर्षांपूर्वी मुंबईहून पुण्याला यायलाही आठ दिवस लागत होते, ही आश्चर्य वाटण्यासारखीच गोष्ट आहे. हा तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा एक मापदंड म्हणता येईल.
सांगायचा मुद्दा असा, १७९२ मध्ये जूनच्या २५ तारखेला, पोटापाण्यासाठी भारतात आलेल्या जेम्स वेल्स नामक ४५ वर्षीय स्कॉट चित्रकाराने मुंबईहून पुण्याला येण्यासाठी प्रवास सुरू केला. मुंबईच्या माझगावहून एका बोटीने खाडी पार करून पनवेलला जाण्यास तो निघाला. मुंबईतील एका वर्षाच्या वास्तव्यात त्याच्या अनेक ओळखी झाल्या होत्या, त्यांत पेशवेदरबारी असलेला इंग्रज वकील सर चार्ल्स मॅलेट हाही होता. हिंदुस्थानात त्यावेळच्या सर्वांत मोठ्या राज्याचा केंद्रबिंदू पुणे हेच होतं. तिथे चित्रं काढून पैसे मिळतील असा सल्ला मॅलेटने त्याला दिला आणि त्याच्या राहण्याची जबाबदारीही स्वीकारली.
२५ जूनला दुपारी वेल्स पनवेलला पोचला आणि तिथून तेवीस हमाल पंच्याऐंशी रुपये मोबदला ठरवून, आपलं सामान त्यांच्याकडे देऊन, स्वतः पालखीत बसून भरपावसात प्रवास सुरू केला. पाऊस आणि चिखलातून मार्ग क्रमत, ओढे-नाले पार करीत, ही मंडळी चौक नाक्याला सायंकाळी पोचली. तिथं नांगरणीची कामं सुरू झाली होती. याशिवाय, रस्त्याकडेला पडलेल्या अनेक म्हशींच्या मृत धडांवर बरीच गिधाडं आपलं उदरभरण करताना त्याला दिसली. रात्री आपल्या यजमानांच्या मोठ्या आवाजात केलेल्या प्रार्थनेमुळे वेल्सला बराच वेळ झोपही लागली नाही.
तरी सकाळी लवकर निघून वेल्स आपल्या लवाजम्यासकट खोपोलीला पोचला. खोपोलीजवळ महादेवाचं एक भव्य देऊळ वेल्सने पाहिलं, जे नाना फडणीसांच्या वडिलांनी बांधलं होतं. तेथील नदीवरील कोरीवकाम पाहून तो प्रभावित झाला. त्याशेजारी पाणी साठवण्यासाठी मोठं टाकं आहे त्याचं वर्णनही त्याने केलं आहे. गाव मात्र वेल्सला अगदीच सामान्य वाटलं.
सगळे प्रवासाने दमले होते तरी २८ जूनला सकाळी वेल्स बोरघाट चढू लागला. ‘वाट बिकट, खूप दमवणारी, अतिशय वाईट’ असं वर्णन त्या घाटरस्त्याचं त्यानं आपल्या दैनंदिनीत केलेलं आढळतं. सायंकाळपर्यंत सर्व मंडळी घाटमाथ्यावरील खंडाळा गावी पोचले. तिथून सर्व पर्वतरांगा हिरव्यागार, मेघ त्यावर विसावलेले, दर्याकडे कोसळणारे असंख्य धबधबे, असं निसर्गाचं प्रदर्शन पाहून वेल्सला रम्य आणि अलौकिक वाटलं. पट्कन त्या दृश्याची काही रेखाचित्रं त्याने आपल्या दैनंदिनीत काढून घेतली. खंडाळ्याला बराच पाऊस होता, त्यामुळे तिथं फार वेळ न थांबता, प्रातःकाळीच वेल्स पुढे चालू लागला. लोहगड किल्ल्याच्या पाठीमागून रस्ता होता. मध्येच इंद्रायणी नदी लागली, तिला पूर आला होता, त्यामुळे ऐलतिरीच मुक्काम करावा लागला. रात्री पाऊस कमी झाला, पूर ओसरला आणि दुसऱ्या दिवशी सर्व मंडळी नदी पार करून आंबेगावी पोचली.
तिथं थांबून, तुंग आणि तिकोना किल्ल्याजवळून वेल्स दोण गावाला पोचला आणि तिथल्या देवळात मुक्काम केला. हल्ली पवना धरण झाल्यापासून पुण्याकडे येण्याचा हा रस्ता बंद झाला आहे.
३० जूनला पुण्याजवळ वाकड इथं वेल्स पोचला. प्रवासाचा हा सहावा दिवस ! इथून पुण्यात चार्ल्स मॅलेटचा संगमावरचा बंगला केवळ आठ मैल. पण वाकडला आडवी आली ती, पूर आलेली मुळा नदी. ‘मराठा साम्राज्याचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या पुण्याच्या इतक्या जवळ नदीवर ना पूल, ना नदी ओलांडायला नावा’, हे पाहून वेल्स चकित झाला. पण इतर कुठंही न पाहिलेली अशी नदी ओलांडण्याची पद्धत त्याला इथं पाहायला मिळाली.
आपल्या दैनंदिनीत वेल्स लिहितो, ‘नदीकाठी मोठ्या संख्येने वाळलेले भोपळे रचलेले होते. येथील लोक या भोपळ्यांना एका जाळीत बांधत आणि अशा अनेक जाळ्यांना दोरखंडाने एकत्र बांधून तराफे तयार करीत. या तराफ्यावर एखाद दुसरा माणूस बसू शके. दुसऱ्या तराफ्यावर सामान लादलं जाई. मग तराफे नदीत सोडले जात आणि अनेक माणसं त्याभोवती नदीच्या पाण्यात उतरत आणि पोहत त्या तराफ्याला पैलतीराकडे घेऊन जात. नदीच्या प्रवाहामुळे तराफे पुढे कुठंतरी किनारा गाठत असत. वास्तविक अनेक एकांडे प्रवासी स्वतःच्याच पोटाला भोपळा बांधून नदीपार पोहत जातानाही दिसले.’
वेल्सबरोबर त्याचा सहयोगी चित्रकार मेबोन होता आणि त्यानं या दृश्याचं एक चित्र काढलं, जे आजही उपलब्ध आहे; आणि ज्यामुळे नदी पार करण्याचा हा प्रकार आपल्या नजरेसमोर पुन्हा जिवंत होऊन उभा राहू शकतो. अर्थात, नदी ओलांडण्याची ही पद्धत धोकादायकच होती आणि त्यामुळे १७९३ पासून यावर बंदी घालण्यात आली.
लहानपणच्या एका गोष्टीतली एक म्हातारी माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली. अरण्यातून सुरक्षित प्रवास करण्यासाठी तिने एका मोठ्या भोपळ्याचा वापर केला होता, ही गोष्ट सर्वांनाच ठाऊक आहे. पण इथं तर भोपळ्यावर बसून नदी ओलांडण्याचा प्रकार एका अस्सल ऐतिहासिक दैनंदिनीतच दिलेला आहे ! कोण जाणे, ते तराफे नदीपार नेताना भोवती पोहणारी माणसं ‘चल रे भोपळ्या...’ अशा आरोळ्या तर देत नसतील?
(सदराचे लेखक शल्यचिकित्सक असून, अठराव्या शतकातील मराठेशाहीच्या इतिहासावर त्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत.)
Web Title: Dr Uday Kulkarni Writes Pune Mumbai Distance Bridge Traffic
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..