प्राजक्ताचं झाड (डॉ. उमेश जगदाळे)

dr umesh jagdale
dr umesh jagdale

परसदारातलं प्राजक्ताचं झाड आता मोठं झालं होतं. त्याच्या फुलांचा दरवळ सर्वदूर पसरला होता. बहरलेला प्राजक्त पाहून अनुजाला खूप आनंद झाला. निर्मळ हातांनी रुजवलेलं रोप कसं प्रसन्नपणे फुलून येतं आणि अनेक पिढ्यांना सुगंधित करतं...

माझ्या यजमानांची बदली झाली आणि आम्ही मोठ्या शहरातून सारंगपूर नावाच्या छोट्या गावात राहायला आलो. सारंगपूर तसं बरं गाव होतं. आम्हाला चिंता होती ती फक्त आमच्या एकुलत्या एका मुलीच्या म्हणजे अनुजाच्या शाळेची. अनुजा आता साडेतीन वर्षांची झाली होती. तिला शाळेत घालायचं होतं. त्या गावात एक चांगली शाळा असल्याचं चौकशीअंती समजलं आणि आमची चिंता मिटली. दुसऱ्याच दिवशी आम्ही शाळेत दाखल झालो.

"गुड मॉर्रनिंग म्याडम' अशा "फर्राटेदार' इंग्लिश शुभेच्छांनी आमचं त्या शाळेत स्वागत झालं. शाळेचा तो पहिलाच दिवस होता. अनुजाच्या प्रवेशाची धावपळ आवरून आम्ही तिला वर्गात सोडण्यासाठी आलो तर दारातच हात जोडून उभ्या असलेल्या लक्ष्मीबाईनं तिच्या फर्राटेदार इंग्लिशमध्ये आमचं असं स्वागत केलं. इंग्लिश माध्यमाच्या शाळेत ही बाई कशी काय असं क्षणभर वाटून गेलं. मात्र, तिच्या चेहऱ्यावरचं निर्मळ स्मितहास्य तिच्या उच्चारांमधली त्रुटी जाणवू देत नव्हतं.
लक्ष्मीबाई त्या शाळेत अनेक वर्षांपासून आया म्हणून काम करत होती. लहान मुलांना सांभाळण्याबरोबरच तिला इतर अनेक कामं करावी लागत. वर्ग झाडण्यापासून वर्गांभोवतीचं गवत काढण्यापर्यंतची कामं आणि टीचर्सपासून गेटवरच्या वॉचमनपर्यंत सर्वजण सांगतील ती कामं ती करत राहायची. पन्नाशीत आलेल्या लक्ष्मीबाईची उमेद वाखाणण्यासारखी होती. कितीही दमछाक झाली तरी ती कामाला मागं हटायची नाही. विशेषतः जून महिन्यात शाळा सुरू होताना तिची चांगलीच धांदल उडायची. शाळेचं तोंड पहिल्यांदाच पाहणाऱ्या पोरांची तोंडं पाहण्यासारखी झालेली असायची. नवीन वातावरणात ती पोरं पालकांना बिलगूनच असायची. पालकांनी त्यांना वर्गात आणताच सर्व पोरं बिथरून जायची. कसंबसं त्यांना त्यांच्या जागेवर बसवलं तरी कुठल्याशा संकटाची चाहूल लागल्यागत ती एकमेकांकडं सैरभैर होऊन पाहत राहायची. थोड्याच वेळात पालकांना सूचना मिळायची आणि मग दबक्‍या पावलांनी पालकांनी वर्ग सोडताच ज्वालामुखी फुटल्यासारखा एकच गदारोळ उसळायचा. काही मुलं जागेवरच भोकाड पसरायची. काही सुटून-निसटून वर्गाबाहेर पळू लागायची. त्यांना ओढून वर्गात आणेपर्यंत वर्गातली दुसरी कुमक वर्गाबाहेर धावायची. त्यांना वर्गात आणून दार लावलं तरी अभेद्य किल्ल्याच्या दारावर धडक मारण्यासाठी सारंच सैन्य चाल करून यायचं. एकटी लक्ष्मीबाई खिंड लढवू लागायची. दरम्यान, सैन्यातले एकेक "शिलेदार' जोरदार हल्ला चढवत तिला ओरबाडायचे, बोचकारायचे, कचकचून चावायचे, अगदी लत्ताप्रहारसुद्धा करायचे. हे सारे वार झेलत ती समर्थपणे खिंड लढवायची. दिवसभर चालणाऱ्या या रणधुमाळीला ती धीरानं तोंड द्यायची. ...शाळेचा पहिला दिवस मोठ्या धामधुमीत पार पडायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नव्या उमेदीनं लक्ष्मीबाई वर्गाच्या दाराशी हात जोडून "गुड मॉर्रनिंग सर्रर, गुड मॉर्रनिंग म्याडम' म्हणत उभी राहिलेली दिसायची.

सुमारे तीसेक वर्षांपूर्वी लक्ष्मीबाई या शाळेत आया म्हणून रुजू झाली. तेंव्हा तिचं नुकतंच लग्न झालेलं होतं. संसाराला हातभार म्हणून धुण्याभांड्यापेक्षा तिला हे काम करणं जास्त आवडून गेलं. इतकी वर्षं निरागस मुलांच्या सानिध्यात राहिल्यामुळं तिच्यातलं 'आया'पण कधी गळून पडलं आणि 'आई'पण कसं उमलून आलं ते तिचं तिलाही कळालं नाही. इतक्‍या वर्षांत अनेक मुलांना तिनं लहानाचं मोठं होताना पाहिलं होतं. हातामध्ये मिळणाऱ्या पगारापलीकडे जाऊन ममतेच्या वात्सल्यसुखात ती रमून गेली होती. आयुष्याकडून यापेक्षा फार वेगळ्या अशा तिच्या काही अपेक्षा नव्हत्या. लक्ष्मीबाईने आपल्याच पाल्याकडे "खास' लक्ष द्यावं म्हणून काही व्यवहारी पालकांनी देऊ केलेली "बक्षिशी'देखील ती नम्रतेनं नाकारायची. उत्पन्न बेताचंच असलं तरीही जीवनमूल्यांची श्रीमंती तिनं ढळू दिली नव्हती. अर्थात, "मूल्य', "मोल' अशा न कळणाऱ्या गोष्टींत गुरफटून न जाता ती साधेपणानं प्रवाही जीवन जगत असायची.

पालकसभेच्या वेळीसुद्धा तिची मोठीच लगबग असायची. तिची कामं आवरून ती जमेल तसं पालकांना भेटायची. शाळेच्या गेटपासून मीटिंग हॉलपर्यंत जिथं जिथं पालक भेटतील तिथं तिथं तिच्या खास शैलीत "गुड मॉर्रनिंग', "गुड आफ्टर्रनून" असं म्हणत ती त्यांचं स्वागत करायची, विचारपूस करायची. साधे पालक, मध्यम पालक, "भारीतले' पालक अशा पालकांच्याही विविध प्रजातींचे विविध अनुभव तिच्या गाठीशी होते. "चिरीमिरी देऊ करणारे' ते नुसतेच "खुशामती, गोड बोलणारे' आणि "कुत्सितपणे बघणारे' ते "ढुंकूनही न पाहणारे' अशा सर्वच पालकांपासून योग्य अंतरावर लक्ष्मीबाई हात जोडून उभी असायची...सर्वांकडंच समन्यायी नम्रतेनं पाहत. आणि हे "समन्यायी' वगैरे अगदी अजाणतेपणातून घडायचं. कधी कधी वाटायचं, किती बरं झालं ती "फार' सुजाण नव्हती ते! ... तिच्याकडं निर्मळ, निकोप नजरेनं पाहू शकणाऱ्या पालकांनाच केवळ तिच्यातला आल्हाद अनुभवता यायचा. अनुजाला तर तिचा लळाच लागला होता. शाळेच्या त्या पहिल्या दिवसापासून ते दहावीच्या निरोपसमारंभापर्यंत लक्ष्मीबाईचे अनेक अनुभव आणि किस्से अनुजा आम्हाला घरी आल्यावर सांगत असे.
एकदा अनुजाच्या वर्गातली मुलं गार्डनमध्ये खेळत असताना तिथं एक साप निघाला होता. अनुजा ज्या घसरगुंडीवरून खाली येत होती तिच्याच पायथ्याशी तो साप होता. लक्ष्मीबाईचं सापाकडं लक्ष गेलं; पण तोपर्यंत अनुजा घसरगुंडीवरून खाली येऊ लागली होती. विजेच्या चपळाईनं लक्ष्मीबाई घसरगुंडीकडं धावली आणि खाली येत असलेल्या अनुजाला पट्‌कन उचलून तिनं बाजूला नेलं आणि इतर सर्व मुलांना तिनं ओरडून सावध केलं. वॉचमन अंकलना बोलावून तो साप पकडला आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

अशाच एका प्रसंगात गॅदरिंगच्या वेळी राजाचं पात्र करणाऱ्या मुलाची ड्रेपरी ऐनवेळी कुठंतरी हरवली. सर्वत्र शोधूनसुद्धा न सापडल्यामुळं तो मुलगा साध्याच कपड्यात स्टेजवर आला. इतर सर्व पात्रं आपापल्या ड्रेपरीमध्ये नटलेली आणि राजा बाकी कंगाल! सगळे हसू लागले. इतक्‍यात त्या मुलाच्या आईनं स्टेजकडं धाव घेतली आणि स्वतःजवळच्या बॅगमध्ये सुरक्षितपणे कोंबून ठेवलेला राजाचा वेश त्या मुलाला दिला. इतकंच नव्हे तर, सर्व प्रेक्षकांसमोर स्टेजवरच तिनं खस्सकन्‌ त्याचे कपडे ओढून काढले आणि सर्वत्र सन्नाटा पसरला. तो राजा आधीच कंगाल दिसत होता आणि आता तर त्याचं डिपॉझीटच जप्त झालं होतं...तेही सर्वांसमोर...मात्र, प्रेक्षकांना काही उमगण्याच्या आत प्रसंगावधान दाखवत लक्ष्मीआँटीनं पडदा ओढला आणि राजाची इज्जत राखली गेली. त्या मुलाच्या आईला भान नसलं तरी शाळेच्या आयाला प्रसंगावधान असल्यामुळंच त्या नाटकाचा प्रयोग ठीकठाक पार पडला.

लक्ष्मीबाईच्या अशा अनेक आठवणी सोबत घेऊन अनुजा चांगल्या मार्कांनी दहावी पास झाली. निरोपसमारंभाच्या वेळी शाळेचे प्रिन्सिपॉल आणि टीचर्स यांच्यासोबतच लक्ष्मीआँटीच्या आठवणी सांगताना अनुजाचा बांध फुटला. अनुजाबरोबर सर्वचजण रडत होते.

जीवनात थांबता येत नाही. ...अनुजानं शाळेचा निरोप घेतला. लक्ष्मीबाईंचं गाव जवळच होतं. तिथं खास त्यांच्या घरी जाऊन आम्ही सर्व कुटुंबीय त्यांना भेटलो. आम्हाला सर्वांना अनपेक्षितपणे घरी आलेलं पाहून लक्ष्मीबाईसुद्धा भारावून गेल्या होत्या ...निरोप घेताना लक्ष्मीआँटीनं अनुजाला रिकाम्या हाती कसं पाठवायचं, असा विचार करून तिला प्राजक्ताचं एक रोप भेट दिलं आणि आशीर्वाद दिला ः "तू मोठी हो आणि हे झाडपण मोठं कर. पुन्हा मला भेटायला येशील तेव्हा या झाडाची फुलं घेऊन ये.'
लक्ष्मीबाईंचा निरोप घेऊन आम्ही परत फिरलो. अनुजानं परसदारात ते रोप लावलं. तो प्राजक्त दिवसागणिक बहरूदेखील लागला.

दरम्यान, अनुजा तिचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली आणि योगायोगानं लग्नानंतर तिकडंच नोकरी मिळाल्यानं अमेरिकेतच स्थिरस्थावर झाली. पुढं त्यांनी एका गोड मुलीला जन्म दिला. तिचं नाव ईशा ठेवलं. बघता बघता ईशा मोठी होऊ लागली. मात्र, अनुजा आणि तिचे यजमान दोघंही नोकरी करत असल्यानं त्यांनी ईशाला एका डे केअर सेंटरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. अनुजानं ईशाला त्या डे केअर सेंटरच्या गव्हर्नेसकडे सुपूर्द केलं आणि तत्क्षणी तिला तिच्या शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण झाली. समोरच्या गव्हर्नेसमध्ये तिला लक्ष्मीआँटी दिसू लागली... माणूस गाव सोडून दूर जातो तेव्हा त्याचा देश बदलतो, वेश बदलतो, भाषा बदलते, संस्कृती बदलते...मात्र बदलत नाहीत त्या भूमिका ...नव्या मुखवट्यांतही आपण जुनेच चेहरे शोधत राहतो. समोरच्या गव्हर्नेसमध्ये अनुजा अजूनही लक्ष्मीआँटीलाच शोधत होती.

त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर अनुजानं मला फोन करून हे सारं सांगितलं. "सुटीला इंडियात आल्यावर आपण शाळेत जाऊन लक्ष्मीआँटीला भेटू' असं ती म्हणाली. मात्र, लक्ष्मीआँटी रिटायर झाल्याचं मी तिला सांगितलं; पण तरीही लक्ष्मीबाईंच्या घरी जाऊन आपण त्यांना भेटायचं असं आमचं ठरलं.

दरम्यान, त्या वर्षाच्या शेवटी दोन महिन्यांची सुटी घेऊन अनुजा ईशाला घेऊन गावी आली. परसदारातलं प्राजक्ताचं झाड आता मोठं झालं होतं. त्याच्या फुलांचा दरवळ सर्वदूर पसरला होता. बहरलेला प्राजक्त पाहून अनुजाला खूप आनंद झाला. निर्मळ हातांनी रुजवलेलं रोप कसं प्रसन्नपणे फुलून येतं आणि अनेक पिढ्यांना सुगंधित करतं...

दुसऱ्या दिवशी सकाळी प्राजक्ताच्या फुलांची करंडी भरून घेऊन आम्ही लक्ष्मीबाईंना भेटायला त्यांच्या घरी गेलो. दारामध्ये जाताच "गुड मॉर्रर्निंग म्याडम' असा आवाज आला. उच्चारांमधला "फर्रराटा' तोच होता; पण आवाज मात्र वेगळा होता. आमच्यासमोर लक्ष्मीबाईंची मुलगी हात जोडून उभी होती. चेहरेपट्टीवरून आम्ही तिला ओळखलं. "लक्ष्मीआँटी आहेत घरात?' अनुजानं तिला विचारलं. यावर तिनं हसून स्वागत केलं आणि आत बोलावलं. आम्ही आत जाऊन तिथल्या खाटेवर बसलो.
'आई तुमची नेहमी आठवण काढायची...''
'आठवण काढायची? म्हणजे...लक्ष्मीआँटी...?''
'आई मागच्याच महिन्यात गेली...''
लक्ष्मीबाईंच्या मुलीनं जड आवाजात सांगितलं आणि ती आत निघून गेली ...
तिचे ते शब्द ऐकताच तिथं शांतता पसरली. आमचं बोलणंच बंद झालं. मग थोड्या वेळानं पुढं असणाऱ्या भिंतीकडं लक्ष गेलं. समोर लक्ष्मीबाईंचा हात जोडलेला, हसतमुख फोटो दिसत होता. अनुजाच्या डोळ्यातून घळघळा आसवं वाहू लागली. तिला लक्ष्मी आँटीनं शेवटच्या भेटीत दिलेला आशीर्वाद आठवला ः "तू मोठी हो आणि मी दिलेलं हे प्राजक्ताचं झाडपण मोठं कर. पुन्हा मला भेटायला येशील तेव्हा या झाडाची फुलं घेऊन ये...'
...अनुजाच्या मनाचा बांध फुटला. प्राजक्ताचं झाड आता मोठं झालं होतं. मात्र, ते रुजवणारे हात आता राहिले नव्हते...
अनुजा लक्ष्मीआँटींच्या फोटोजवळ गेली आणि सोबत आणलेली प्राजक्ताची फुलं तिनं त्यांच्या प्रतिमेला अर्पण केली...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com