एकटं की एकाकी? (डॉ. वैशाली देशमुख)

डॉ. वैशाली देशमुख vrdesh06@gmail.com
रविवार, 24 जून 2018

कितीही नकोसा वाटला, तरी हा एकांत फायदेशीर असतो. तो काही प्रमाणात आवश्‍यकही असतो. एकांतात आपली कल्पनाशक्ती भराऱ्या मारते, तिला बहर येतो. एकटं असताना आपला आपल्याशी एक छान संवाद चालू असतो. एकाकीपणा मात्र वेगळा. त्याचे परिणाम भयंकर होतात. काही जण त्यात तसेच खोलखोल जात राहून नैराश्‍याला बळी पडतात, किंवा छोट्या छोट्या आव्हानांना, तणावांना बेधडकपणे तोंड न देता असहायपणे त्याला शरण जातात. काही वेळा या एकाकीपणावर त्यांनी शोधलेले उपाय म्हणजे "रोग परवडला, पण इलाज नको' अशा स्वरूपाचे असतात.

कितीही नकोसा वाटला, तरी हा एकांत फायदेशीर असतो. तो काही प्रमाणात आवश्‍यकही असतो. एकांतात आपली कल्पनाशक्ती भराऱ्या मारते, तिला बहर येतो. एकटं असताना आपला आपल्याशी एक छान संवाद चालू असतो. एकाकीपणा मात्र वेगळा. त्याचे परिणाम भयंकर होतात. काही जण त्यात तसेच खोलखोल जात राहून नैराश्‍याला बळी पडतात, किंवा छोट्या छोट्या आव्हानांना, तणावांना बेधडकपणे तोंड न देता असहायपणे त्याला शरण जातात. काही वेळा या एकाकीपणावर त्यांनी शोधलेले उपाय म्हणजे "रोग परवडला, पण इलाज नको' अशा स्वरूपाचे असतात.

गेल्या काही दिवसांत काही लौकीकरीत्या यशस्वी व्यक्तींनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचून आपण सगळेच हादरून गेलो. वरवर बघायला गेलं तर त्यांना काही कमी नव्हतं. त्यामुळे त्यांचं हे कृत्य अनाकलनीय वाटणारं होतं. माणसांच्या सतत गराड्यात असणाऱ्या, प्रसिद्धीच्या वलयात वावरणाऱ्या या व्यक्ती आतून एकाकी, निराश होत्या की काय? माणसांत असूनही एकट्या होत्या की काय? माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला गटात राहायला आवडतं. समूहानं राहता यावं म्हणून तो कुटुंब तयार करतो, नाती बाळगतो, समाजव्यवस्था टिकवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, हा समाज काही एखाद्या डबक्‍यासारखा साचून राहिलेला नाही, तो बदलता, प्रवाही आहे. काळाबरोबर त्याचे घटक, त्याची रचना बदलणारच. त्यानुसार आजचं कुटुंब हळूहळू आकुंचित होत चाललंय. आता त्यात फक्त दोन, तीन किंवा चार सदस्य असतात. हे बरोबर आहे की चूक? सांगणं अवघड आहे; पण काहीही असलं तरी अशी वस्तुस्थिती आहे, हे सत्य आहे.

छोट्या झालेल्या कुटुंबाचा सगळ्यात जास्त जाणवणारा परिणाम आहे एकाकीपणा! का होत असतील आजची मुलं एकाकी? खरं तर ती सतत कशात न कशात गुंतलेली असतात. त्यांच्यासाठी भरपूर ऍक्‍टिविटीज उपलब्ध असतात. कितीतरी गॅजेट्‌स, असंख्य खेळ, शाळेचं होमवर्क, कला, स्पर्धा... मॉल, मल्टिप्लेक्‍स, करमणुकीची पार्क्‍स, ट्रिप्स, शिबिरं असे किती तरी पर्याय असतात; पण तरीही मुलं "बोअर' होतात.
याउलट काही मुलं मात्र एकलकोंड्या खेळत रमतात. ती मजेत असतात, त्यांच्या त्यांच्या तंद्रीत असतात. आपलं आपण काही तरी करत राहतात. पुस्तकं वाचतात, गाणी ऐकतात, विज्ञानाचे प्रयोग करतात, चित्रं काढतात.... आणि हे सगळं करताना ती आनंदात असतात. ती मुळीच एकाकी नसतात. याचा अर्थ एकाकीपणा म्हणजे नुसतं एकटं असणं नव्हे किंवा माणूसघाणेपणाही नव्हे, तर मनातून एकटं वाटणं. एकटं राहण्याचा निर्णय स्वत:हून घेतलेला असतो, तेव्हा तो सकारात्मक असतो; पण मनाविरुद्ध आणि अधिक काळापर्यंत लांबलेला एकटेपणा नकारात्मकतेच्या दिशेनं झुकायला वेळ लागत नाही. नवीन गाव, नवीन शाळा असे काही बदल म्हणा किंवा इतरांच्यात मिसळायची फारशी संधी न मिळालेली मुलं म्हणा किंवा नव्यानं होस्टेलवर राहायला गेलेली मुलं म्हणा, ती मिटून जाऊ शकतात. अर्थात एकाच परिस्थितीला सामोरी जाणारी सगळी मुलं तशीच वागतील असं नाही. कारण एकाकीपणा ही एक मानसिक स्थिती असते. समोरची परिस्थिती हाताळण्याची प्रत्येकाची क्षमता निराळी!

शिवाय कितीही नकोसा वाटला, तरी हा एकांत तसा फायदेशीर आहे. इतकंच नव्हे तर तो काही प्रमाणात आवश्‍यक आहे. बाथटबमध्ये आरामात डुंबत असतानाच आर्किमिडीजला त्याचा तो "युरेका' क्षण सापडला असं म्हणतात. न्यूटन असाच निवांत, काही न करता झाडाखाली बसला असेल. स्वत:च्या तंद्रीत असताना त्यानं ते झाडावरून पडणारं सफरचंद पाहिलं असेल, त्याच्या डोक्‍यात विचारचक्रं फिरायला लागली असतील आणि मग कुठं तो गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला असेल! एकांतात आपली कल्पनाशक्ती भराऱ्या मारते, तिला बहर येतो. बहुतेक सारं लिखाण, थोर कलाकृती शांत-निवांत असतानाच घडतात हातून. आणखी एक, एकटं असताना आपला आपल्याशी एक छान संवाद चालू असतो. आपण जेव्हा कुठल्याही दबावाखाली नसतो, तेव्हाच स्वत:चं मतही नि:पक्षपातीपणे बनवता येतं. मित्र-मैत्रिणींच्या दबावाखाली आंधळेपणानं वाट्टेल ते करायला तयार असलेली तरुणाई पाहताना हे प्रकर्षानं जाणवतं.

एकाकीपणा, नैराश्‍य या आधुनिक जीवनशैलीनं आपल्याला दिलेल्या "देणग्या' आहेत. नैराश्‍यावर आपण आता थोडं तरी बोलायला लागलोय; पण एकाकीपणाचं काय? जेव्हा हे नैराश्‍य घेरून टाकतं, मन उभारी धरू शकत नाही, अशा वेळी फक्त कुणाशीतरी बोलल्यानंसुद्धा यातून सहीसलामत सुटता येतं. आत्महत्याविषयक हेल्पलाईन्स याच सत्यावर आधारलेल्या असतात. एकाकी व्यक्ती मात्र या सगळ्या आधाराला मुकते. काही अभ्यासांमधून असे निष्कर्ष निघालेत, की आजचा माणूस अधिकाधिक आत्मकेंद्री होत चाललाय. आपलं खरं/आभासी दु:ख कुरवाळत बसायची त्याला सवय लागलीय. आपण सुखी होण्यासाठी आपला भोवताल सुखी असायला हवा आणि आपले त्याच्याशी घट्ट ऋणानुबंध जुळवून ठेवायला हवेत, हे तो विसरत चाललाय. तशी विचारप्रक्रिया आपल्या मुलांपर्यंतही संक्रमित होत नाहीय. "मी', "माझे मार्क्‍स", "माझ्या अचिव्हमेंट्‌स', "माझं भविष्य' यापलीकडे काही जग असतं हे आजच्या मुलांच्या गावीही नसतं.

एका कार्यक्रमात काही टीनएजर्सशी बोलत होते. "आजकाल कुणाशीही समोरासमोर बोलायचं म्हणजे आमच्या अंगावर काटा येतो,' असं ती मुलं सांगत होती. कारण सवय झालेली असते सोशल मीडियावर बिनचेहऱ्याचा संवाद करण्याची. त्याचा परिणाम असा होतो, की या संवेदनशील वयात त्यातले काही जण अधिकाधिक एकाकी होतात, त्यांच्या कोशात जातात. वरवर गप्पिष्ट वाटणारी मुलंही आतून एकाकी असू शकतात आणि त्याचे परिणाम किती भयंकर होतात! काही जण त्यात तसेच खोलखोल जात राहून नैराश्‍याला बळी पडतात, किंवा छोट्या छोट्या आव्हानांना, तणावांना बेधडकपणे तोंड न देता असहायपणे त्याला शरण जातात. काही वेळा या एकाकीपणावर त्यांनी शोधलेले उपाय म्हणजे "रोग परवडला, पण इलाज नको' अशा स्वरूपाचे असतात. कुणी तरी सहानुभूती दाखवली, की त्यालाच प्रेम समजणं, ड्रग्जच्या धुंदीत उतारा शोधणं, सोशल मीडियाच्या आभासी जगालाच खरं मानायला लागणं, जगण्यातला रस संपणं असे त्यातले काही नको ते उपाय!

आपली मुलं एकाकी होऊ नयेत असं वाटतंय? मग त्यांना काही जीवनकौशल्यं शिकवायला लागतील आपल्याला ः एंपथी किंवा आस्था, इतरांशी संवाद साधण्याची कला, नाती जपण्यातलं गुपित, स्वत:च्या क्षमता जोखण्याचं कसब, ताणतणावांना तोंड देण्याची धमक आणि समस्या सक्षमपणे हाताळण्याचं कौशल्य! कुठल्याही घटनेचा दुसऱ्यांच्या बाजूनं विचार करणं, कल्पक पर्याय शोधणं, आपल्या चुका ओळखून त्या दुरुस्त करणं हे सगळं मुलं जेव्हा करतात, तेव्हा त्यांना दोस्त मिळण्याची शक्‍यता वाढते. शिवाय स्वत:च्या पलीकडे जाऊन विचार करायला, इतरांच्या दु:खाचा आवाका जाणून घ्यायलाही त्यांना शिकवायला लागेल. कसं बरं हे करता येईल? त्यांचं सामाजिक भान जागृत केलं तर होऊ शकेल का हे? की गोष्टींच्या माध्यमातून करता येईल? पालकांच्या उदाहरणातूनही मुलं ही कौशल्यं आत्मसात करू शकतील. इतरांमध्ये मिसळण्याची संधी मुलांना देणे, त्यांच्या सामाजिकीकरणात हातभार लावणे, ही आणखी एक गोष्ट. अशा मुलांना एकट्यानं खेळण्याच्या खेळांपेक्षा गटांमध्ये खेळण्याचे खेळ प्राधान्यानं द्यायला हवेत. उदा. स्विमिंगपेक्षा व्हॉलीबॉल, कबड्डी, खोखो.

कुठं तरी मी वाचलं, की आपल्याला आनंद देण्याची शक्ती पंचमहाभूतांमध्ये आहे. पृथ्वी, आप, तेज, जल, वायू आणि आकाश या गोष्टी मनाला उभारी देतात, निर्भेळ, नैसर्गिक आनंद देतात. उन्हाच्या कवडशात नाचणारे धुळीचे जादुई कण निरखताना मुलांचा चेहरा किती समाधानी दिसतो! मुलं जेव्हा मातीत खेळतात, पावसात भिजतात, उन्हात बागडतात, तेव्हा ती एकटी कुठं असतात? ती हा निर्भेळ आनंद उपभोगत असतात! मुलांना तंत्रज्ञानाच्या मायाजालात गुरफटून न देता त्यापलीकडच्या जगात असलेल्या गमतीजमतींची ओळख करून देणं आणि त्यांचा आनंद घेण्याची सवय लावणं ही गोष्ट मुद्दामहून, कृत्रिमपणे लावायला लागतेय ही खेदाची; पण सत्य गोष्ट आहे. या आठवड्यात "आय-पाल' (i-Pal) नावाच्या रोबोची एक बातमी आली होती! हा एक साधारण पाच वर्षांच्या मुलाएवढा दिसणारा यंत्रमानव मुलांना सोबती म्हणून तयार केला गेलाय. तो एखाद्या मित्रासारखा मुलांशी खेळतो, गप्पा मारतो, त्यांना मदत करतो. आजच्या एकाकीपणाला तंत्रज्ञान जबाबदार आहे असं आपण म्हणतोय आणि शेवटी त्या तंत्रज्ञानाचाच त्यावर मत करण्यासाठी उपयोग करून घेतोय! केवढा हा विरोधाभास!

आपल्या मुलांना एकांताचा आनंद उपभोगता आला पाहिजे आणि समूहामधली गंमतही! मात्र, एकटं असलं तरी आपलं मूल एकाकी नाही ना हे पाहायला हवं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr vaishali deshmukh write article in saptarang