पटियाला : स्वानंद, विमुक्त घराणं

सुंदर, मोहक स्वरांनी रागदरबार सजवला जातो अशा एका गायनशैलीला ‘पटियाला घराणं’ म्हणून ओळखलं जातं. ख्यालगायनातील प्रत्येक घराण्याचं मूळ शोधताना त्याचा संबंध ग्वाल्हेर घराण्याशी येऊन मिळतो.
bade ghulam ali khan
bade ghulam ali khansakal
Summary

सुंदर, मोहक स्वरांनी रागदरबार सजवला जातो अशा एका गायनशैलीला ‘पटियाला घराणं’ म्हणून ओळखलं जातं. ख्यालगायनातील प्रत्येक घराण्याचं मूळ शोधताना त्याचा संबंध ग्वाल्हेर घराण्याशी येऊन मिळतो.

- डॉ. विकास कशाळकर vikaskashalkar@gmail.com

सुंदर, मोहक स्वरांनी रागदरबार सजवला जातो अशा एका गायनशैलीला ‘पटियाला घराणं’ म्हणून ओळखलं जातं. ख्यालगायनातील प्रत्येक घराण्याचं मूळ शोधताना त्याचा संबंध ग्वाल्हेर घराण्याशी येऊन मिळतो. ‘अलिया-फतू’ नावानं प्रसिद्ध असलेल्या, जुगलगान करणाऱ्या या दोन तरुणांनी पटियाला गायकी सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय केली. त्यातील एक अली (अलिया) यांचे वडील कालेखान हे सारंगीवादक होते. सारंगीबरोबरच त्यांनी जयपूर दरबारातल्या उस्ताद बेहरामखाँ यांच्याकडे धृपदगायनाची तालीम घेतली व नंतर मुबारक अली आणि ग्वाल्हेरचे हदू खाँ यांच्याकडे ख्यालगायनाची तालीम घेतली. या सर्व गायकीचा प्रभाव या दोन्ही गायकांच्या गायकीवर होता. जयपूर इथं वास्तव्याला असलेले बेहरामखाँ पुढं पटियाला इथं गेले आणि धृपदाची उत्तम आलापी त्यांनी अली आणि फतू यांच्या गळ्यावर चढवली. त्याचा एक गमतीदार किस्सा असा सांगतात - हे दोघं गायक एकदा जयपूरला गायला गेले. दोघांची जुगलबंदी अतिशय रंगतदार होत असे.

जवळजवळ बारा वर्षं दोघांनी तनकारी अंगाचा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवान तानांचा, खूप रियाज केला होता. वाहत्या पाण्यासारखा त्यांचा गळा वेगवान गतीनं कसाही आणि कुठल्याही सप्तकात फिरायचा. जयपूरला त्यांची खूप वाहवा झाली. त्यांच्या अशा गाण्यामुळे त्यांना ‘जर्नेल’ आणि ‘कप्तान’ अशी नावं रसिकांनी दिली होती. जयपूरच्या मैफिलीत त्यांचं गाणं ऐकायला संस्थानचे धृपगायक विश्‍वंभरनाथ आले होते. गायकांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा दबदबा होता. दोघांचं गाणं ऐकल्यावर फारशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून ऐकायला मिळाली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी दोघंही त्यांना भेटायला घरी गेले. ‘तुमची खरी खरी प्रतिक्रिया सांगा,’ म्हटल्यावर त्यांनी एका शिष्याला आरसा आणायला सांगितला. तो त्यांच्या चेहऱ्यासमोर धरायला सांगितला आणि विचारलं, ‘कसा दिसतो तुमचा चेहरा?’ ते म्हणाले, ‘सुंदर दिसतो.’

मग त्यांनी आरसा जोरजोरानं हलवायला सांगितला.

‘आता कसा दिसतो चेहरा?’

‘पंडितजी, आरसा स्थिर नसेल तर त्यात चेहरा कसा दिसणार?’

ते दोघं म्हणाले.

विश्‍वंभरनाथांनी संगीतातील मूळ तत्त्व सांगितलं - स्वर स्थिर नसतील तर रागाचा चेहरा त्यात दिसेल कसा? कालच्या तुमच्या गाण्यात तानांची रेलचेल होती; पण रागरूप हरवलं होतं. आलापीत रागाच्या सुरांचे ‘दर्जे’ दिसतात. तानेत केवळ चमत्कृतीचं दर्शन होतं.’ अलीबक्ष यांना त्याची जाणीव झाली.

राग गाताना त्यातील स्वरस्थान व रागरूप यांचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. रागातली तनकारी त्याच्या कान आणि डोळ्यांपर्यंतच जाते. आलापी मात्र रागाच्या हृदयात शिरते. मंदिरात देवदर्शन घेताना कान आणि डोळे बंद करायचे असतात. मन आणि हृदय यांनी मिळून देवदर्शन घडत असतं. अलीबक्ष यांनी बेहराम खाँ यांच्याकडून तालीम घेतली. त्याचंच दर्शन त्यांचे सुपुत्र उस्ताद बडे गुलाम अली यांच्या गायकीतून घडते. पटियाला गायकीला सारंगीचा शृंगार आहे, धृपदाचा भारदस्तपणा आहे आणि लोकगीताची मधुरता आहे. तिन्ही सप्तकांत लीलया फिरणारा आवाज भारदस्त आलापीतून नाजूक कशिदाकारीमध्ये शिरताना इतका मुलायम होतो की मनाला गुदगुल्या होतात. तार सप्तकात अनेक गायकांचे आवाज चिरकतात; परंतु पटियाला घराण्यात तारसप्तकात स्वर्गीय सुरांचा आनंद मिळतो. ‘केदार’, ‘कामोद’, ‘यमन’, ‘मालकंस’,‘दरबारी’ हे या गायकीचे हक्काचे राग आहेत.

खटका, मुरकी, बहलावा असे सर्व स्वररंग बडे गुलाम अली खाँ आपल्या गाण्यात वापरायचे म्हणून त्यांनी बंदिशी ‘सबरंग’ या टोपणनावानं रचल्या. ‘का करूँ सजनी, आये ना बालम’ किंवा ‘याद पिया की आये’ या ठुमऱ्या ऐकताना एखादी विरहिणी नायिका प्रत्यक्ष आत्मकथन करते आहे असं जाणवतं.

ठुमरी गायनाला तसा ‘मिजाज’ असावा लागतो. बडे गुलाम अली खाँ हे संगीतात बुडालेले कलाकार होते. एकदा मुंबईहून कोलकत्याला जाताना त्यांनी हळू स्वरात सुरू केलेला राग भूपाली कोलकाता स्टेशन आल्यावरच संपला. स्वर लावताना आधी रागाची प्रकृती समजायला हवी, त्याप्रमाणे स्वरांचे ‘दर्जे’ निवडावे लागतात. ‘ललत’ रागात बढत करताना बढत कशी करायची यावर आधी शुद्ध मध्यम आणि नंतर तीव्र मध्यम हे ठरवावं लागतं. गळ्यात ‘तासीर’ निर्माण करावी लागते. पटियाला घराण्यात वेगवेगळ्या चित्र-विचित्र पलट्यांचा खूप समर्पक उपयोग दिसतो. ‘जमजमा’ हा आलाप/तानप्रकारात अत्यंत खुबीनं वापरतात. ‘गाऊ आनंदाचं गाणं’ हे या घराण्याचं ब्रीद आहे. मुळात बडे गुलाम अली खाँ यांची आलापी अतिसंथ नव्हती. वेगवेगळ्या स्वरांवरून घेतल्या जाणाऱ्या मिंडेतून स्वर विस्तार ही गायकी मुरक्‍या, हरकती यांत शिरून रागाचं सुंदर भरतकाम या गायकीत दिसतं.

आजकालच्या अनेक तरुण गायकांवर पटियाला गायकीचा फार मोठा प्रभाव दिसून येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com