dr virendra tatake
dr virendra tatake

महत्त्व परकी गंगाजळीचं (डॉ. वीरेंद्र ताटके)

फॉरेक्‍स रिझर्व्ह म्हणजे परकी गंगाजळी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचं असते. प्रत्येक अर्थव्यवस्थेतल्या प्रमुख बॅंकेकडं हा परकी चलनसाठा असतो. परकी गंगाजळीमुळं देशातल्या प्रमुख बॅंकेला आणि पर्यायानं संपूर्ण अर्थव्यवस्थेला एक प्रकारचा आत्मविश्‍वास मिळतो, जागतिक स्तरावर एक प्रकारचा दबदबा निर्माण होतो. या गंगाजळीमुळं नक्की काय होतं, आर्थिक आरिष्टात तिचा कसा उपयोग होतो आदी गोष्टींची माहिती.

साठवून ठेवलेलं धन म्हणजे गंगाजळी! असं म्हणतात, की आपल्याकडचं हे धन वाढत जावं म्हणजे आपली समाजातली एकूण पत वाढते. खरं तर "गंगाजळी' या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे पवित्र गंगा नदीचं पाणी जे आपण आपल्या घरात सुरक्षितपणे एका विशिष्ट प्रकारच्या भांड्यात ठेवतो. रोजच्या वापरात ते पाणी वापरू नये, तर केवळ अत्यावश्‍यक वेळीच त्याचा वापर केला जावा, असा संकेत आहे. याच अर्थानं परकी गंगाजळी (फॉरेक्‍स रिझर्व्ह) म्हणजे सुरक्षित ठेवायचं परकी धन- जे अगदी अत्यावश्‍यक वेळी वापरलं जातं.
कोणत्याही देशाचं आर्थिक सामर्थ्य अधोरेखित करणारा महत्त्वाचा घटक म्हणून त्या देशाकडं असलेली परकी गंगाजळी अर्थात त्या देशाकडच्या परकी चलनाच्या एकूण साठ्याकडं पहिलं जातं.

जगातल्या इतर देशांशी आयात-निर्यात, कर्जं, गुंतवणूक यांसारखे कोणतेही संबंध न ठेवता, केवळ स्वतःच्या देशातलंच मनुष्यबळ आणि भांडवल यांचाच उपयोग करणाऱ्या बंदिस्त अर्थव्यवस्थेला कदाचित या परकी गंगाजळीचं फारसं महत्त्व नसतं; परंतु आजच्या जागतिकीकरणाच्या काळात अशा बंदिस्त अर्थव्यवस्थेचा फारसा टिकाव लागणं अवघड आहे. त्यामुळंच जगातल्या प्रत्येक अर्थव्यवस्थेतेसाठी परकी गंगाजळीचं महत्त्व असतं. प्रत्येक अर्थव्यवस्थेतल्या प्रमुख बॅंकेकडं हा परकी चलनसाठा अर्थात गंगाजळी असते. या परकी गंगाजळीचे महत्त्व अर्थव्यवस्थेसाठी खूप असतं. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाढत्या परकी गंगाजळीमुळं देशातल्या प्रमुख बॅंकेला आणि पर्यायानं संपूर्ण अर्थव्यवस्थेला एक प्रकारचा आत्मविश्वास मिळतो. वाढत्या परकी चलनसाठ्यामुळं त्या देशाचा जागतिक स्तरावर एक प्रकारचा दबदबा निर्माण होतो. याबरोबरच देशाच्या चलनाचा विनिमय दर मजबूत ठेवण्यासाठी या परकी गंगाजळीचा उपयोग होतो. नैसर्गिक आपत्ती, युद्ध यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत देशाची प्रमुख बॅंक त्या परकी गंगाजळीचा उपयोग करू शकते. परकी गुंतवणूकदारांचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा विश्वास वाढवण्यासाठीदेखील या परकी गंगाजळीचा उपयोग होतो. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येक देशाला त्यांनी इतर देशांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अशा गंगाजळीची आवश्‍यकता असते. याशिवाय इतर देशांतून आयात केलेल्या वस्तू-सेवांची रक्कम देण्यासाठीसुद्धा त्याचा वापर होतो.

परकी गंगाजळ किती असावी?
एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे एखाद्या देशाकडं परकी गंगाजळ किती असावी, याविषयी काही मार्गदर्शक तत्त्वं आहेत का? याविषयी काही काटेकोर नियम नसले, तरी प्रत्येक देशाकडं कमीत कमी पुढच्या सहा महिन्यांत होणाऱ्या आयातीच्या रकमेएवढी परकी गंगाजळ असावी, असा संकेत असतो. तसंच पुढच्या वर्षभरातल्या चालू खात्यावरची अंदाजे तूट आणि इतर देशांकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांची परतफेड करण्याएवढी रक्कम परकी गंगाजळीच्या स्वरूपात असणे अपेक्षित असते. या पातळीत खूप मोठी घट झाली, तर देशापुढं आर्थिक संकट उभं राहू शकतं.
उदाहरणार्थ वर्ष 2015 मध्ये ग्रीस देशाची अर्थव्यवस्था गंगाजळीची पातळी कमी झाल्यानं पूर्णपणे कोलमडून गेली होती. इतर देशांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणंसुद्धा त्यांना शक्‍य होत नव्हते. त्यावेळी ग्रीसमधील आर्थिक स्थिती एवढी गंभीर झाली होती, की देशातल्या बॅंका आणि शेअर बाजारसुद्धा बंद ठेवण्याची नामुष्की त्या देशावर ओढवली होती. या निमित्तानं परकी गंगाजळीविषयी ग्रीसकडून इतर देशांनी धडाच घेतला, असं म्हणता येईल.

परकी गंगाजळी आणि अर्थव्यवस्था
ग्रीस देशाच्या अर्थव्यवस्थेचा थोडा खोलात जाऊन अभ्यास केल्यास लक्षात येतं, की अर्थव्यवस्थेची तब्येत बिघडत चालल्याची लक्षणं अनेक वर्षं दिसत असतात. हा आजार मुख्यतः आर्थिक गाफीलपणामुळं व्हायला सुरवात होते. देशातल्या कारखानदारीकडं फारसं लक्ष दिलं जात नाही, उत्पादकता कमी होते, निर्यातीकडं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. या सर्वांचं पर्यवसान परकी गंगाजळी कमी होण्यात आणि आर्थिक स्थिती कोलमडण्यात होतं. म्हणूनच देशातल्या परकी गंगाजळीचा साठा वाढण्यासाठी उत्पादकता वाढली पाहिजे, निर्यात वाढली पाहिजे आणि आयात कमी झाली पाहिजे. अजून थोडं खोलात जाऊन अभ्यास केल्यास परकी गंगाजळीत वाढ होणाऱ्या घटकांचा विचार करायला हवा. उदाहरणार्थ, या गंगाजळीमध्ये मोठा वाटा परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कर्जरोखे आणि शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीचा असेल, तर ही वाढ कधीही कमी होऊ शकते, हे लक्षात ठेवून गाफील राहू नये. कारण जागतिक पातळीवर आर्थिक किंवा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला, की हे गुंतवणूकदार झटकन आपली गुंतवणूक काढून घेऊ शकतात आणि इतर सुरक्षित पर्यायांकडं धाव घेऊ शकतात. म्हणूनच परकी गंगाजळीत वाढ होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे निर्यातीत दीर्घकालीन वाढ होणं. अर्थात हे साध्य करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याची गरज असते. देशातल्या उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच निर्यातीसाठी नव्या बाजारपेठा शोधणं, नवीन देशातल्या बाजारपेठा निर्यातीसाठी खुल्या करण्यासाठी आवश्‍यक तो राजकीय प्रभाव वापरणं आवश्‍यक असतं.
परकी गंगाजळीच्या पातळीबाबतीत आपल्या देशाचा विचार केल्यास अनेक चढ-उतार दिसून येतात. काही वेळेस तर अगदी भयावह स्थिती निर्माण झाली होती. उदाहरणार्थ, वर्ष 1991 मध्ये आपल्या देशाकडं आयातीच्या दृष्टिकोनातून केवळ 45 दिवसांचा परकी चलनाचा साठा शिल्लक होता आणि यातून निर्माण झालेला आर्थिक पेचप्रसंग सोडवण्यासाठी आपल्याकडचं सोनं गहाण ठेवावं लागलं होतं. यामुळंच त्या वेळच्या सरकारने आर्थिक सुधारणा हाती घेतली होती- ज्याचे सकारात्मक परिणाम त्यानंतरच्या दशकात दिसून आले होते. सद्यःस्थितीत परकी गंगाजळीची पातळी चारशे अब्ज डॉलरच्या आसपास घुटमळत आहे. ही गंगाजळी साधारणतः एक वर्षाच्या आयातीला पुरेल एवढी आहे. हा साठा समाधानकारक दिसत असला, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगानं होणाऱ्या घडामोडींमुळं ही समाधानकारक स्थिती बिघडू नये यासाठी योग्य दिशेनं प्रयत्न केले पाहिजेत. थोडक्‍यात निर्यातीच्या वाढीवर भर दिला पाहिजे आणि आयात नियंत्रणात ठेवली पाहिजे. याचा परिणाम रुपयाच्या दरावरसुद्धा होतो- कारण देशाकडून होणारी आयात वाढली, तर त्याचा मोबदला देण्यासाठी डॉलरची मागणी वाढते. त्यासाठी रुपयाची विक्री करावी लागते. यामुळं रुपयाचं मूल्य घसरतं. याउलट निर्यात वाढली, तर भारताला रुपये देण्यासाठी अन्य देशांकडून रुपयाला मागणी वाढते आणि त्याचा परिणाम रुपयावर होऊन रुपयाची स्थिती मजबूत होते.

थोडक्‍यात मुबलक परकी गंगाजळी हे चांगल्या अर्थव्यवस्थेचं कारण आहे आणि परिणामदेखील आहे. ज्या देशाकडं मुबलक परकी गंगाजळी असते, तो देश अर्थव्यवस्थेची मजबूत बांधणी करू शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून त्या देशाकडचा परकी गंगाजळीचा साठा अजून वाढतो. यातच परकी गंगाजळीचं महत्त्व सामावलेलं आहे.

परकी गंगाजळीचं महत्त्व
- देशातल्या चलनाचा विनिमय दर अनुकूल ठेवणं
- देशावरच्या आर्थिक संकटाची शक्‍यता कमी करणं
- देशावर आर्थिक आरिष्ट आल्यास पैशांची तरलता अबाधित ठेवणं
- परकी गुंतवणूकदारांचा आपल्या देशावरचा विश्वास वाढवणं
- परकी कर्जाची परतफेड वेळेत करणं
- देशातल्या योग्य औद्योगिक क्षेत्राची प्रगती करण्यासाठी पतपुरवठा करणं
- आर्थिक सुरक्षितता मिळवण्याबरोबर चांगला परतावा मिळवणं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com