चेहरा आणि सीमा नसलेलं युद्ध! (डॉ. यशवंत थोरात)

चेहरा आणि सीमा नसलेलं युद्ध! (डॉ. यशवंत थोरात)

मी नातवंडांना सांगू लागलो ः ‘‘ ‘दहशतवादी कृत्यांत सामील असलेले सगळेजण धार्मिक दहशतवादी असतात,’ हा माध्यमांनी करून दिलेला गैरसमज नागरिकांनी प्रथम पुसून टाकला पाहिजे. नंतर ‘अत्यंत धोकादायक आणि कमी धोकादायक’ अशा विचारसरणींचं वर्गीकरण केलं पाहिजे. दहशतवादाशी लढताना न्याय्य कारणांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. गरिबी आणि आर्थिक नाकारलेपणा हे दहशतवादामागचं कारण नाही; पण सततचा अपमान आणि उदासीनता हे मोठं कारण नक्की आहे...’’

‘‘ओ  ळखा बरं, काय बातमी असेल?’’ उषानं कोडं घातल्यासारखा मला प्रश्न केला. - माझ्या उत्तराची वाटही न पाहता ती म्हणाली ः ‘‘मी आत्ताच आभाशी बोलले. राघव आणि यामिनी आपल्याकडं महिनाभर राहायला येणार आहेत. आभा आणि दर्शक स्पेनला जाणार आहेत समुद्रसहलीसाठी. मुलं आपल्याकडं येतील. किती मजा येईल! आपण असं करू या... तुम्ही माझ्या खोलीत या आणि त्या दोघांना तुमची खोली देऊ या...’’ उषानं सगळं ठरवूनच टाकलं होतं.
माझी खोली त्या मुलांना देण्याच्या विचारानंच माझ्या अंगावर काटा उभा राहिला.
राघव आणि यामिनी ही माझी नातवंडं म्हणजे अतिशय खोडकर अशी मुलं!पत्नी उषा या सगळ्या त्रासाचं मूळ आणि या दोन्ही नातवंडांची रोल मॉडेल ! आणि मी त्यांना अर्थपुरवठा करणारं एटीएम!
दुपारच्या विमानानं मुलं आली. विमानतळावरून त्यांना घरी आणताना मी गमतीनं विचारलं ः
‘‘तुमचे आई-वडील कुठं हरवले?’’
‘‘आबा, काहीही बोलू नका, आम्ही आता काही लहान राहिलेलो नाहीत,’’ यामिनी म्हणाली. घरात गेल्या गेल्या त्यांच्या आजीबरोबरच्या गप्पा सुरू झाल्या. महिनाभरात सहलीसाठी कुठं कुठं जायचं, घरी पक्वान्नं काय काय करायची आणि शॉपिंग करायला कुठं कुठं जायचं याचे बेत रचले गेले. माझ्या डोळ्यांपुढं माझा बॅंक बॅलन्स अत्यवस्थ अवस्थेत रुग्णवाहिकेतून अतिदक्षता विभागाकडं नेला जात असल्याचं चित्र तरळू लागलं!
आठवडाभर मुलांना अमर्याद स्वातंत्र्य उपभोगू दिल्यानंतर उषा मला व्हरांड्यात गाठून म्हणाली ः ‘‘मुलं आल्यापासून तुम्ही त्यांच्या हिताची एकही गोष्ट केलेली नाही म्हणजे काय!’’  
मी विचारलं ः ‘‘म्हणजे?’’ ‘‘सुट्टीत त्यांना काही गृहपाठ वगैरे दिलाय का, याची साधी चौकशीदेखील तुम्ही केली नाही. चला, आता तरी त्यांना काही अभ्यास दिलाय का ते पाहा आणि त्यांना मदत करा. मुलांना आज कोंबडी-वडा खायचाय आणि मी त्याची तयारी करतेय,’’ असं म्हणत उषा स्वयंपाकघरात निघून गेली.
यामिनी आणि राघव माझ्यापुढं आले.
‘‘तुम्हाला काही गृहपाठ किंवा प्रोजेक्‍ट वगैरे दिला नाही का?’’ मी विचारलं.
‘‘खूप दिलाय; पण तुमच्याबरोबर तो पूर्ण केला तर मजा येईल,’’ राघव म्हणाला.
‘‘तो तुमचा तुम्हीच का नाही पूर्ण करत?’’ मी म्हणालो. ‘‘हा प्रश्न तुम्ही आजीला का विचारत नाही?’’ यामिनी म्हणाली. शरण जाण्याशिवाय माझ्यापुढं दुसरा मार्ग नव्हता.
***

राघवनंच सुरवात केली. ‘‘आबाजी, तुम्ही दहशतवादी पाहिलाय का?’’
‘‘होय. मी दोन टेररिस्ट बघितलेत,’’ मी म्हणालो, ‘‘एक तू आणि दुसरी तुझी बहीण!’’
‘‘खूप विनोदी...आबाजी! पण गंभीरपणे सांगा ना...भैयाला ‘टेररिस्ट’ या विषयावर असाईनमेंट दिली गेलीय,’’ यामिनी म्हणाली.
मी सांगू लागलो ः ‘‘खूप वर्षांपूर्वी मी ‘नाबार्ड’मध्ये असताना मला ऑफिसच्या कामासाठी एकदा काश्‍मीरला जावं लागलं होतं. मी जनरल थोरात यांचा मुलगा असल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांना समजलं, तेव्हा लष्कराच्या मेसमध्ये मला एका सायंकाळी चहापानासाठी बोलावण्यात आलं. ती लष्करी छावणी शहरापासून थोडी दूर होती. आम्ही तिथं पोचलो तेव्हा चलबिचल चाललेली होती. मी चौकशी केली तेव्हा कळलं की लष्कराच्या एका टेहळणीपथकानं आदल्या रात्री दोन दहशतवाद्यांना पकडून आणलं होतं. त्यांना स्थानिक प्रशासनाकडं सोपवण्याच्या आधी त्यांची चौकशी सुरू होती. तोपर्यंत मी दहशतवाद्याला असं समोरासमोर कधीच बघितलेलं नव्हतं. तिथल्या कमांडिंग ऑफिसरनं मला बघण्याची संधी दिली.’’
‘‘ते चिडलेले किंवा घाबरलेले दिसत होते का?’’ राघवनं विचारलं.
‘‘नाही, उलट ते कमालीचे शांत होते. इतके की तुम्ही त्यांच्या बाजूनं गेलात तर तुमच्याकडं पुन्हा वळून बघणारही नाहीत. मात्र, दोघांनाही केस कापण्याची, दाढी करण्याची आणि स्वच्छ आंघोळ करण्याची खरी गरज होती!’’ मी म्हणालो.
‘‘माणूस दहशतवादी का होतो?’’ राघवनं विचारलं. ‘‘त्यासाठी ‘दहशतवाद म्हणजे काय,’ हे आधी समजून घेतलं पाहिजे. दहशतवाद म्हणजे अनधिकारानं हिंसाचाराचा वापर करून लोकांमध्ये भय निर्माण करणं...’’ मी सांगितलं. ‘‘पण कशासाठी?’’ यामिनीनं विचारलं.

‘‘एखादी विशिष्ट गोष्ट मिळवण्यासाठी किंवा एखादी विशिष्ट कारवाई रोखण्यासाठी,’’ मी सांगितलं, ‘‘टेरर हा शब्द लॅटिनमधून आला आहे. मूळ लॅटिन शब्द टेर एरे असा आहे. ‘दुसऱ्याला घाबरवणं’ असा त्याचा अर्थ. थोड्याफार फरकानं सगळेच संघटित समाज दहशतीचा अवलंब करत असतात. बलशाली लोक गरिबांना धाक दाखवून किंवा बाहुबलानं त्यांना हव्या त्या सुखसोई मिळवत असतात. त्याच वेळी गरीब दुसऱ्या बाजूनं या अन्यायाच्या विरोधात बंड करून किंवा दहशतीनं या जुलमाला उत्तर देत असतात. इतिहासात अनंतकाळापासून ही साखळी सुरूच आहे.’’
‘‘विशिष्ट धर्माचेच लोक दहशतवादी असतात का?’’ यामिनीनं विचारलं.
‘‘मुळीच नाही. हा तुझा प्रश्न मूर्खपणाचा आहे आणि तुला तो शोभत नाही,’’ मी म्हणालो, ‘‘दहशतवादावर कोणत्याही एका धर्माची ‘मक्तेदारी’ नाही. दहशतवादी हे सगळ्या धर्मांतून आणि सगळ्या भौगोलिक प्रदेशांतून आलेले आहेत. वैचारिक शुद्धतेच्या नावाखाली वावरणाऱ्या दहशतवाद्यांनी इसवीसनाच्या पहिल्या शतकात ज्युडेआवरील रोमन आधिपत्याला विरोध केला. याशिवाय, अकराव्या शतकातले दहशतवादी शिया निझारी यांनी - ज्यांना ‘असॅसिन’ या नावानं ओळखलं जाई- राजकीय हत्या हेच आपलं मुख्य उद्दिष्ट असं ठरवलं आणि दोन खलिफा, अनेक वजीर , सुलतान आणि महत्त्वाच्या राजकीय नेत्यांची हत्या केली. बोहेमियामधले टॅबोरिटीज्‌ आणि अना बाप्टिस्ट हे पंधराव्या आणि  सोळाव्या शतकातले दहशतवादी आपल्याला विसरता येणार नाहीत. गंमत अशी आहे की हे सगळे दहशतवादी ‘आपण परमेश्वराच्या प्रेरणेअंतर्गत हत्या केली’ असं सांगत! जसं धर्माचं आहे तसंच भौगोलिक प्रदेशांचंही आहे. मेसोपोटेमिया आणि असीरिया ही राज्यं हिंसाचारावर आधारित होती. मंगोल लोकांनी तर क्रूरतेचा उच्चांक गाठला होता. ‘ते आले’ अशी अफवा जरी उठली तरी शहरंच्या शहरं ओस पडत असत किंवा बिनशर्त शरणागती पत्करत असत. ज्या मध्य पूर्वेनं (पश्‍चिम आशिया) असॅसिन्सना जन्म दिला, तो प्रदेश आजही ‘दहशतवाद्यांचा अड्डा’ म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर इस्राईलनं दहशतवाद्यांचेच मार्ग वापरून मध्य पूर्वेवर वर्चस्व मिळवलं. आज पॅलेस्टाईन इस्राईलबाबत दहशतवादाचा वापर करतो. मध्य आशिया अनेक शतकं भटक्‍या टोळ्यांच्या दहशतवादाखाली भरडला जात होता. चेंगीझ खान आणि तैमूर यांचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहेच.  एकोणिसाव्या शतकात रशिया दहशतवादी कारवायांचं केंद्र बनला. दहशतवादासाठी कुख्यात बनलेल्या गुलगच्या वेठबिगारी छावण्यांचा त्यात समावेश होता. युरोपातही इटलीमधली ‘रेड ब्रिगेड’ किंवा जर्मनीतली ‘रेड आर्मी’ यांसारखे अनेक वैचारिक गट कार्यरत होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेत निर्नायकीचा पुरस्कार करणाऱ्या दहशतवाद्यांनी आपली एक वेगळीच ओळख उभी केली होती. उजव्या विचारसरणीच्या कु-क्‍लक्‍स क्‍लानसारख्या संघटनांनी ओक्‍लहोमा शहरावरील बॉम्बिंगसारखे केलेले प्रकार आजतागायत सुरू आहेत. आफ्रिकेच्या सहारा वाळवंटातला भूभाग अनेक वर्षं दहशतवादी कारवायांपासून दूर होता. तिथंही आता लष्कर, दहशतवादी आणि अन्य सशस्त्र टोळ्यांकडून दहशतवादी कारवाया सुरू आहेत. काँगोमधल्या संघर्षात ३० लाख लोकांचा बळी गेला आहे, ज्यात बहुतांश सामान्य नागरिक होते. अंतर्गत आणि सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाशी लढण्यात भारताची शक्ती, पैसा आणि वेळ खर्च होत आहे. सन १९७९ मध्ये इराणच्या शिया मूलतत्त्ववाद्यांचा दहशतवाद उफाळून आला होता. त्याच वर्षी अमेरिका, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्या मदतीनं वाढलेल्या दहशतवादातून सुन्नी मूलतत्त्ववाद्यांचा उदय झाला. रशियानं तिथून माघार घेतल्यानंतर हे दहशतवादी अमेरिकेवर उलटले. यातूनच  ‘९/११’ चा हल्ला झाला. त्यामुळं अमेरिकेनं अफगाणिस्तानातल्या तालिबान राजवटीला आणि अल्‌ कायदा संघटनेला धडा शिकवण्याचं ठरवलं.

‘‘सध्याचा दहशतवाद जुन्या दहशतवादाहून वेगळा आहे का,’’ असं राघवनं विचारलं.
‘‘हो,’’ मी म्हणालो, ‘‘जरी दहशतवादी गट त्या त्या काळातल्या राजकीय स्थितीमुळं निर्माण होत असले तरी आणि त्यातच वाढत असले तरी दहशतवाद हा पुनःपुन्हा नवीन रूपानं निर्माण होत असतो. सध्याच्या काळात राष्ट्रीय किंवा वैचारिक दहशतवादापेक्षा धार्मिक दहशतवादाचीच चर्चा जास्त होत आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, सध्याचा दहशतवाद हा तळातून वर आलेला आहे; पण खरं पाहता ‘सर्वशक्तिमान’ असणाऱ्या सरकारांकडूनच अधिक माणसं मारली गेलेली आहेत. दुसऱ्या महायुद्धात पाश्‍चात्य लोकशाही देशांत शत्रुराष्ट्राच्या सरकारला शरण येण्यासाठी केल्या जाणाऱ्या नागरी वस्तीवरील बॉम्बफेकीचं समर्थन व्हायला लागलं. ड्रेस्डेनवरील बॉम्बफेक किंवा हिरोशिमा-नागासाकीवरील अणुबॉम्ब यामागचं तत्त्वज्ञानही हेच होते.
‘‘हे किती भयानक आहे,’’ यामिनी म्हणाली.

‘‘मी थोडा गोंधळलोय, आबाजी,’’ राघव म्हणाला ः ‘‘भारताचा इतिहास वाचत असताना, ब्रिटिशांनी देशभक्‍तांचा उल्लेखही दहशतवादी असा केलेला मला वाचायला मिळाला; परंतु माझ्या मते, स्वातंत्र्यलढ्यासाठी जे जे लढले ते ते देशभक्तच होते.’’
‘‘तुझं अगदी बरोबर आहे,’’ मी म्हणालो, ‘‘लेनिनच्या बाबतीतही असंच घडलं होतं. १९१७ पूर्वी त्याच्यावर तो दहशतवादी असल्याचा ठपका मारण्यात आला होता; पण १९१७ नंतर तो रशियन लोकांचा हीरो बनला. इस्राईलचे माजी पंतप्रधान मेनाहेम बेगीन हे ‘आजचा दहशतवादी, उद्याचा राष्ट्रप्रमुख’ बनल्याचं उदाहरण आहे. याचं कारण म्हणजे, पाश्‍चात्यांच्या विचारसरणीनुसार, सरकारकडून केला जाणारा हिंसाचार हा हिंसाचार मानला जात नाही; पण ज्यांच्यावर सरकारी हिंसेचा प्रयोग केला जातो, त्यांनाही कधी कधी तसंच उत्तर देणं भाग पडतं. दहशतवाद्यांच्या अनेक मुलाखतींमधून हेच पुढं आलं आहे, की बऱ्याच वेळा त्यांच्या दहशतवादाचं कारण त्यांनी अनुभवलेली परिस्थिती हेच असतं. उदाहरणार्थ ः विसाव्या शतकातल्या आशियाई आणि आफ्रिकी देशांच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या संघर्षाला वसाहतवाद्यांनी दहशतवाद ठरवलं; पण इतिहासकारांनी तसं म्हटलं नाही. इतिहासकारांनी त्याकडं सकारात्मकतेनं पाहिलं. कारण, त्यांनी दडपल्या गेलेल्यांच्या मुक्ततेसाठी संघर्ष केला होता. भारत, अल्जीरिया किंवा इंडोचायनामधले ते दहशतवादी हे खरे हीरो होते. यातलं वास्तव हे आहे की, पीडितांना सबलांविरुद्ध लढण्यासाठी जेव्हा दुसरं कुठलंही शस्त्र नसेल, तर अखेरचा उपाय म्हणून त्यांना दहशतवादाशिवाय पर्याय राहत नाही.’’
‘‘दहशतवादी हुकूमशहांवर हल्ले का करत नाहीत?’’ यामिनीनं विचारलं.
‘‘हुकूमशाही असलेल्या देशांतलं प्रशासन खूप कडक असतं किंवा तिथं दहशतवाद्यांना पकडून त्यांना तत्परतेनं शिक्षा दिली जाते, हे याचं कारण नाही. त्याचं कारण म्हणजे, अठराव्या शतकापासून सरकार उदार मतवादी लोकशाहीकडं झुकायला सुरवात झाली. खुली माध्यमं हे या व्यवस्थेचं वैशिष्ट्य होतं. परिणामी, जिथं प्रसारमाध्यमं खुली आहेत, तिथं दहशतवादी हल्ल्यांची खूप चर्चा होते आणि भय पसरतं. तिथल्यापेक्षा जिथं प्रसारमाध्यमांवर सरकारचं नियंत्रण असतं तिथं हिंसाचार कमी होतो असं नाही; पण त्याची चर्चा आणि प्रचार होऊ दिला जात नाही,’’ मी म्हणालो.
‘‘मला या विषयाचा आणखी खोलात जाऊन अभ्यास करायचा आहे, मला याचा तपशील कुठं मिळेल?’’ राघवनं विचारलं.

मी म्हणालो, ‘‘दुर्दैवानं दहशतवादाचा असा तपशील मिळणं कठीण असतं. दहशतवादावरच्या आंतरराष्ट्रीय समितीनं अशी माहिती एकत्र करून उपलब्ध करून दिली आहे. आश्‍चर्य म्हणजे, दहशतवादी गट त्यांच्या त्यांच्या विचारसरणीनुसार आणि ‘कौशल्या’नुसार शस्त्रं वापरतात. काहीजण बॉम्बस्फोटांचं किंवा बेछूट गोळीबाराचं तंत्र अवलंबतात, तर काहीजण अपहरणाचे आणि ओलिसनाट्याचे प्रयोग रंगवतात. जे वैचारिकतेनं प्रेरित (हमास) असतात, जे धार्मिक दहशतवादी (अल्‌ कायदा) असतात किंवा एखाद्या नेत्याच्या व्यक्तिगत प्रभावानं प्रेरित होतात फक्त तेच आत्मघाती पद्धतीचा मार्ग अवलंबतात.’’

‘‘आबाजी, दहशतवाद रोखण्यासाठी एक नागरिक म्हणून मी आणि यामिनी काय प्रयत्न करू शकतो?’’ राघवनं विचारलं.
मी म्हणालो ः ‘‘ ‘दहशतवादी कृत्यांत सामील असलेले सगळेजण धार्मिक दहशतवादी असतात,’ हा माध्यमांनी करून दिलेला गैरसमज नागरिकांनी प्रथम पुसून टाकला पाहिजे. नंतर ‘अत्यंत धोकादायक आणि कमी धोकादायक’ अशा विचारसरणींचं वर्गीकरण केलं पाहिजे. दहशतवादाशी लढताना आपण न्याय्य कारणांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. गरिबी आणि आर्थिक नाकारलेपणा हे दहशतवादामागचं कारण नाही; पण सततचा अपमान आणि उदासीनता हे मोठं कारण नक्की आहे. त्यामुळं सर्वच देशांनी दहशतवाद्यांच्या न्याय्य तक्रारींचं निराकरण केलं पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे, दहशतवाद्यांचा इतिहास सांगतो, की अनेक वेळा दहशतवाद्यांना सरकारनंच उभं केलेलं असतं. उदाहरणार्थ ः अमेरिकेनं धार्मिक दहशतवाद्यांचा उपयोग अफगाणिस्तानात घुसलेल्या रशियाच्या विरोधात केला किंवा काही काळासाठी अराफत आणि पीएलओ यांच्या विरोधासाठी इस्राईलनं ‘हमास’चा वापर केला. अमेरिकेनं ‘मुजाहिदीन’ला दिलेल्या पाठिंब्यातून ओसामा बिन लादेन आणि तालिबान निर्माण झाले.

पाचवी गोष्ट म्हणजे, संवादात प्रचंड शक्ती असते आणि इतरांना सातत्यानं वाईट भूमिकेतून पाहण्यामुळं फक्त कटुता आणि हिंसा निर्माण होते. त्यामुळं जेव्हा जेव्हा शक्‍य आहे, तेव्हा तेव्हा आपण विद्वेष पसरवण्याचं टाळावं. सहावी गोष्ट म्हणजे, पैसा हाच कोणत्याही संघटनेचा मुख्य आधार असतो. एका अभ्यासातून असं लक्षात आलं आहे, की दहशतवादी गटांना पैसा पुरवण्याची एक विशिष्ट पद्धत असते. शस्त्रास्त्र आणि अमली द्रव्याच्या चोरट्या वाहतुकीतून हा पैसा जमा होतो. या मार्गानं पैसा आणून नंतर तो कायदेशीरपणे गुंतवला जातो. दहशतवाद रोखायचा असेल तर हे ‘मनी-लाँडरिंग’ थांबवण्यासाठी राजकीय नेतृत्वानं जागतिक जनमत तयार केलं पाहिजे. कोणताही देश एकट्याच्या बळावर आंतरराष्ट्रीय दहशतवाद चालवू शकत नाही. याबाबत सर्वच देशांनी एकत्र आललं पाहिजे. शिवाय, दहशतवादी बनून आपण राजकीय दहशतवाद थांबवू शकत नाही.’’

मी बोलत असताना उषा आत येऊन म्हणाली ः ‘‘मुलांनो, कोंबडी-वडा तयार आहे.’’ ं बोलणं पूर्ण करण्याच्या आधीच ‘दोन्ही दहशतवादी’ स्वयंपाकघराकडं पळाले!
उषा म्हणाली ः ‘‘यशवंत, मुलांचा विचार तू थोडा तरी करायला हवा होतास! तू किती बोलतोस...गेला तासभर मी सलगपणे तुझा आवाज ऐकत आहे.’’
‘‘अरे, पण तूच तर मला सांगितलं होतंस की...’’ मी बचावाचा प्रयत्न केला. त्यावर एखाद्या सर्जनच्या कौशल्यानं माझं वाक्‍य कापत उषा म्हणाली ः ‘‘त्यांचा छळ कर असं मी तुला सांगितलं होतं का? काहीतरीच! बरं ते जाऊ दे, आता आधी मुलांना पोटभर जेवण करू देत. मी तुला नंतर वाढीन!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com