रहम, मालिक; रहम...

साठ वर्षांपूर्वी ‘मेयो’तून पास झाल्यानंतर मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात मला मनाविरुद्ध विज्ञान शाखेत घालण्यात आलं.
Church
ChurchSakal
Summary

साठ वर्षांपूर्वी ‘मेयो’तून पास झाल्यानंतर मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात मला मनाविरुद्ध विज्ञान शाखेत घालण्यात आलं.

साठ वर्षांपूर्वी ‘मेयो’तून पास झाल्यानंतर मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात मला मनाविरुद्ध विज्ञान शाखेत घालण्यात आलं. विज्ञानाचं आणि आपलं जमणार नाही, एवढं फक्त त्या वाया घालवलेल्या वर्षानं मला शिकवलं. असो. मात्र, तिथली एक आठवण आजही तशीच्या तशी उरात घर करून आहे.

तिचं नाव एलिझाबेथ डॅनियल्स होतं.

गैरसमज नको. ही एका म्हाताऱ्याची तरुणपणातली प्रेमकथा नव्हे. आमचे रोल नंबर मागोमाग असल्यामुळं आम्ही जवळ आलो होतो. आधी लॅबमधल्या प्रॅक्टिकल्सच्या निमित्तानं आणि नंतर मित्र म्हणून. एकत्र हॉकी खेळायचो, डबा खायचो आणि एकाच बसनं घरी जायचो. सतत एकत्र दिसायचो हे खरं; पण आमचं प्रेमबीम नव्हतं. मित्र होतो. आजकाल असं नातं आढळतं की नाही काय माहीत.

तिचे वडील नौदलात अधिकारी होते. आई गृहिणी होती. बेथ बुद्धीनं तल्लख होती. तिला अणुशास्त्रज्ञ व्हायचं होतं. खूप अभ्यास करायची आणि मोकळ्या वेळात दिव्यांग मुलांच्या शाळेत शिकवायची. अतिशय धर्मनिष्ठ ख्रिश्चन होती ती. तिच्याबरोबर मी चर्चमध्ये गेलो की तिची भक्ती आणि श्रद्धा पाहून थक्क व्हायचो.

अभ्यासाच्या बाबतीत आमची भूमिका दिवस आणि रात्र इतकी भिन्न होती. तिला विद्यापीठात पहिला नंबर मिळवायचा होता आणि माझा कार्यक्रम सपशेल नापास होण्याचा होता. कारण, कला शाखेत जाण्याचा तो एकमेव मार्ग उरला होता. माझा तर्क आणि मार्ग चुकीचा आहे हे पटवून देण्याचा ती नेहमी प्रयत्न करायची आणि विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळ्या व्याख्यानांना मला आग्रहानं घेऊन जायची.

एकदा डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तावर एका परदेशी प्राध्यापकाचं व्याख्यान होतं. त्या व्याखानाला गेलो नसतो तर फार बरं झालं असतं. त्यापेक्षा पिक्चरला किंवा ‘ताज’च्या मागचे ‘बडे मियाँ के कबाब’ खायला जाण्यासाठी तिचं मन वळवलं असतं तर बरं झालं असतं; पण आम्ही व्याख्यानालाच गेलो. कदाचित नियतीच्या मनातच तसं असावं.

सभागृहात नीरव शांतता होती. वक्ते बोलायला उभे राहिले. व्याख्यानाला सुरुवात झाली की डुलकी काढण्याचा माझा बेत होता; पण विषयाची मांडणी इतकी प्रभावी होती की नकळत मी गुंगून गेलो. मात्र, बसनं घरी परत जाताना ती शांत बसून होती.

दुसऱ्या दिवशी ती दिसली नाही. नेहमीच्या सगळ्या ठिकाणी शोधलं; पण व्यर्थ. काही दिवसांसाठी ती बोरिवलीला बहिणीकडं गेलीय, असं तिच्या आईनं संध्याकाळी सांगितलं. आठवडा गेला. पुढचा मंगळवार आला तरी तिचा पत्ता नाही. काळजी वाटायला लागली. कॉलेजला दांडी मारणं तिच्या स्वभावात नव्हतं. शेवटी, शुक्रवारी मलबार हिल गार्डनमध्ये एकटीच बाकड्यावर बसून समुद्राकडे पाहत असलेली ती दिसली. मी रागानं तिच्यावर खेकसणार इतक्यात तिच्या डोळ्यांकडे नजर गेली. ते रिकामे होते किंवा शब्दांपलीकडचं खूप काही त्यांत भरलेलं होतं. मी घाबरलो.

‘काय झालंय, बेथ?’

‘काही नाही,’ तिनं उत्तर दिलं.

‘चल, चहा घेऊ,’ मी म्हणालो.

‘नको. मला वसईला नेशील?’

आम्ही गेलो. चर्चच्या बाहेर मी बाईक लावली. तिचे काका तिथले पाद्री होते. थोड्या वेळात ती त्यांच्याबरोबर बाहेर आली. आमची ओळख झाली.

त्यानंतर ती एक विचित्र वाक्य म्हणाली : ‘यशवंत, आमचं बोलणं चालू असताना तू साक्षीला राहा.’

‘म्हणजे काय?’ असं मी तिला विचारणार इतक्यात तीच म्हणाली : ‘‘काका, बायबल म्हणजे साक्षात देवाच्या मुखातून निघालेले शब्द ना? पाद्री म्हणून विचार करा आणि उत्तर द्या.’

‘अर्थात्,’ ते म्हणाले. त्यावर न्यायालयात युक्तिवाद करावा अशा आविर्भावात ती उद्गारली : ‘‘तसं असेल तर या विश्वाची निर्मिती बायबलच्या पहिल्या खंडात - ‘जेनेसिस’मध्ये - जसं सांगितलंय तशीच झाली याविषयी तुम्ही खात्री द्याल?’’

‘हो,’’ थोडंसं कचरत त्यांनी उत्तर दिलं.

‘खरंच खात्री आहे तुम्हाला?’ तिनं पुन्हा विचारलं.

‘हो, आहे,’ ते म्हणाले.

त्यानंतर तिनं बॉम्ब टाकला.

‘तसं असेल तर विज्ञान खोटं बोलतंय किंवा बायबल देवाच्या मुखातून आलेलं नाही. नाहीतर जगात देवच नसेल. नेमकं काय?’

असं म्हणून ती तिथंच कोसळली.

त्यानंतर बराच काळ ती आजारी होती. मला परीक्षेत पासच व्हायचं नव्हतं, त्यामुळं जास्तीत जास्त वेळ तिच्याबरोबर राहण्या-बोलण्याचा मी प्रयत्न केला...पण एकतर्फी. तिच्या सगळ्या टेस्ट्स नॉर्मल होत्या, तरी ती आजारी होती. शरीरानं आणि मनानं थकून गेली होती. कधी कधी असं वाटायचं की अगदी मरणाला शिवून ती परत आलीय. हळूहळू आपल्या भोवतालाबद्दलचा तिचा रस कमी झाला. डौल निघून गेला. लहरीनुसार ती कधी शांत, तर कधी चिडचिडी होत गेली. बोलता बोलता बऱ्याचदा दूरच्या कुठल्या तरी जगात ती हरवून जायची. आपल्या आजाराविषयी ती कधी बोलली नाही; पण मला ठाऊक होतं की, विज्ञानाची तल्लख विद्यार्थिनी आणि श्रद्धाळू ख्रिश्चन अशा दोन रूपांचं तिच्या मनात युद्ध चाललं होतं. त्या एकाच प्रश्नानं तिच्यात जिवंतपण येत होतं :‘एकतर विज्ञान खोटं बोलतंय किंवा बायबल देवाच्या मुखातून आलेलं नसणार. नाहीतर जगात देवच नसेल. नेमकं काय?’

बहुतेक वेळा आम्ही डार्विनबद्दलच बोलायचो. दुसऱ्या कोणत्याही विचाराकडे तिचं मन मी वळवू शकलो नाही.

मानवी विचारांवर चार्ल्स डार्विनइतका प्रभाव दुसऱ्या कुणी क्वचितच टाकला असेल. सन १८५९ ला प्रसिद्ध झालेल्या त्याच्या पुस्तकामुळे धार्मिक आणि वैज्ञानिक विश्व पार ढवळून निघालं. त्याच्या निष्कर्षांना बळकटी देणारे पुरावे विसाव्या शतकातल्या डीएनएच्या अभ्यासातून पुढं आले. तरीदेखील श्रद्धाळू माणसांच्या मनाचं समाधान होऊ शकलं नाही.

डार्विननं पक्षी, वनस्पती आणि जीवाश्मांचा बारकाईनं अभ्यास केला. आपल्या निरीक्षणांचा अन्वयार्थ लावत असताना त्याच्या लक्षात आलं की, साऱ्या धरतीवरच्या प्रजातींमध्ये स्थानिक वातावरणानुसार भेद आहे तसंच साम्यही आहे. यामुळे त्याची अशी धारणा झाली की, सर्व प्रजातींचे पूर्वज एकच असून ‘नैसर्गिक निवडी’च्या तत्त्वानुसार त्या पुढं टिकून राहिल्या आहेत. जे जीव - वनस्पती, प्राणी आणि मानव - भोवतालच्या पर्यावरणाशी जुळवून घेऊ शकले ते जास्त काळ टिकले. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत एका प्रजातीतून दुसरी प्रजाती निर्माण होणं ही गोष्ट मात्र धर्मशास्त्रातील विश्वनिर्मितीच्या वर्णनाशी विसंगत होती. विशेषकरून ख्रिश्चन आणि इस्लामी धर्मशास्त्रांशी.

उत्क्रांती-प्रक्रियेतील ‘नैसर्गिक निवड’ या डार्विनच्या संकल्पनेमुळे विश्वनिर्मितीत गृहीत धरलेली ईश्वराची भूमिकाच निकालात निघाली. मानवेतर प्रजातींपासून मानवाची निर्मिती झाली असल्याच्या डार्विनच्या सिद्धान्तामुळे ‘देवानं आपल्यासारख्याच रूपात मानवाला निर्माण केलं,’ या बायबलमधील दाव्याविषयीदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं. निसर्गात सातत्यानं चालू असलेल्या ‘अस्तित्वाच्या लढाई’वर त्यानं अधिक भर दिल्यामुळे ‘परमदयाळू परमेश्वरानं विश्व निर्माण केलं,’ ही श्रद्धा डळमळीत झाली.

अशा गहन गोष्टींवर बेथ विचार करत बसायची आणि माझ्याशीदेखील चर्चा करायची. एके दिवशी ती जरा कमी निराश आणि अधिक जागरूक दिसत असताना मी तिच्या लक्षात आणून दिलं की, लाखो ख्रिश्चनांनी ‘डार्विन’ वाचला असून त्यांच्या प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपाच्या आहेत. काहींना वाटतं की विज्ञानानं उत्क्रांती चुकीच्या रीतीनं घेतली आहे. काहींचं म्हणणं आहे की पेशींच्या अंतर्गत असलेली जीवनाची जटील रचना एखाद्या अतिनैसर्गिक शक्तीशिवाय उलगडता येत नाही. काहींचा दावा आहे की विज्ञान आणि धर्म हे जीवनातल्या वेगवेगळ्या प्रश्नांना भिडतात आणि म्हणून धर्मनिष्ठांनी ईश्वराची संकल्पना - जसं सूर्यकेंद्री ग्रहमालेचं अस्तित्व कोपर्निकसनं सिद्ध केल्यानंतर घडलं होतं - तशी प्रसंगानुरूप बदलण्याची गरज आहे.

आमची ही बौद्धिक चर्चा म्हणजे तिच्या मनातल्या खळबळीवरचं आवरण आहे याची मला कल्पना नव्हती. ईश्वर आहे की नाही हाच तिचा एकमेव प्रश्न होता. तो असेल तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर आपण जगलो काय नि मेलो काय...दोन्ही सारखंच. तिच्यासाठी मधला मार्ग नव्हता. ईश्वर असेल तर सारं आहे; नाहीतर काहीच नाही.

जसा काळ लोटला तसं मला जाणवलं की ती आतून हळूहळू संपत चालली होती. हिवाळ्यातल्या एका संध्याकाळी उशी उराशी घेऊन ती बेडवर पडलेली होती. माझा हात हातात घेत ती म्हणाली : ‘‘यू नो, यशवंत, यू आर माय बेस्टेस्ट फ्रेंड.’’

तिच्या पापणीवरचा अश्रू खाली टपकायच्या आत मी म्हणालो : ‘‘शहाणी हो जरा. ‘बेस्टेस्ट’ हा शब्द इंग्लिशमध्ये नाहीचंय.’’

‘आहे,’ ती म्हणाली: ‘तुला तो माहीत नाहीय एवढंच.’

पांघरुणाच्या आत हात घालून तिनं एक पाकीट बाहेर काढलं आणि माझ्या हातात देत म्हणाली : ‘‘हे तुझ्यासाठी. नंतर उघड.’’

डोळे भरून तिचे आले होते...अश्रू मात्र माझ्या डोळ्यांतून ओघळले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ती पंख्याला लटकत असलेली दिसली.

काही दिवसांनंतर तिनं दिलेलं पाकीट मी उघडलं. आत काय असणार ठाऊक होतं. संदेश मात्र माहीत नव्हता. तिनं लिहिलं होतं:

‘बेस्टेस्ट मित्रा,

दुःख करू नकोस. आयुष्यात पुढं जात असताना न उलगडलेल्या गुंत्याच्या बाबतीत धीर धर. न सुटलेल्या प्रश्नांवर प्रेम करायला शीक; पण जोवर उत्तरांचे परिणाम सहन करण्याची ताकद अंगी येत नाही तोवर शोधण्याची घाई करू नकोस. माझ्या मनात असाच एक प्रश्न होता; पण उत्तर शोधण्याचा अतिखटाटोप करण्याच्या नादात मी फसले. तो प्रश्न तुझ्यावर सोपवून मी जातेय. जे मला सापडलं नाही ते एक दिवस तुला नकळत सापडेल याची मला खात्री आहे. जेव्हा ते घडेल, तेव्हा माझी आठवण काढ.

- बेथ

पुष्कळ वर्षं लोटली. ती म्हणाली होती त्याचंच प्रत्यंतर एके दिवशी ध्यान करत असताना मला आलं...पान फांदीपासून सुटून अलगद खाली यावं तसं ते उत्तर माझ्या आत अलगद उतरलं:

ईका बात अखम की, कहत-सुनन की नाही

जो जाने सो कहे नही, जो कहे, सो जाने नाही

गोष्ट अनुभवण्याची आहे; ऐकण्या-बोलण्याची नाही. ज्याला ती उमगते तो बोलत नाही; आणि जो बोलतो, त्याला ती समजलेली नसते.

शांतता आत असते. बेथनं आंतर्विश्वाची खिडकी उघडली असती तर..

तिची आठवण आली. यात एकच हुंकार... ‘रहम, मालिक; रहम...’

(अनुवाद : डॉ. रघुनाथ कडाकणे)

(raghunathkadakane@gmail.com)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com