socrates
socratessakal

कोल्हापुरातील सॉक्रेटिस!

साठ वर्षांपूर्वी मी माझे गुरू, मार्गदर्शक आणि पालक असलेल्या दीक्षितगुरुजींना वचन दिलं होतं: ‘नोकरीतून निवृत्त झालो की पुन्हा सॉक्रेटिस वाचेन.’ दिलेला शब्द पाळू शकलो नाही याचं दुःख मनात सलत होतं.
Summary

साठ वर्षांपूर्वी मी माझे गुरू, मार्गदर्शक आणि पालक असलेल्या दीक्षितगुरुजींना वचन दिलं होतं: ‘नोकरीतून निवृत्त झालो की पुन्हा सॉक्रेटिस वाचेन.’ दिलेला शब्द पाळू शकलो नाही याचं दुःख मनात सलत होतं.

साठ वर्षांपूर्वी मी माझे गुरू, मार्गदर्शक आणि पालक असलेल्या दीक्षितगुरुजींना वचन दिलं होतं: ‘नोकरीतून निवृत्त झालो की पुन्हा सॉक्रेटिस वाचेन.’ दिलेला शब्द पाळू शकलो नाही याचं दुःख मनात सलत होतं. तसं ते वचन ‘विचित्र’ होतं, म्हणून  ‘सॉक्रेटिस कशाला वाचायला पाहिजे’  मी त्यांना विचारलं होतं. त्यांचं उत्तर गूढ होतं: ‘यशवंत, तुझी काळजी वाटते. तुझ्या स्वभावात अनेक गुणांचं मिश्रण आहे. मूळ पिंड शिक्षकाचा असूनही तू सार्वजनिक सेवेची निवड केली आहेस. काही काळ तीत तुला जोम येईल. कदाचित ते मानवेलही; परंतु आज ना उद्या तुझ्यातल्या तत्त्वचिंतकाच्या अस्वस्थतेमुळे, यशाच्या परंपरागत प्रतीकांचा तुला उबग येईल आणि अनुभवाच्या आधारावर जीवन समजून घेण्याचा तू प्रयत्न करशील. अर्थात्, प्रत्यक्षात ते घडेल की नाही किंवा कधी घडेल किंवा त्या वेळी कोणते प्रश्न तुला सतावतील हे कुणीच सांगू शकणार नाही; पण लक्षात ठेव, ते घडेल तेव्हा स्वतःत डोकावून पाहा, मनन कर आणि पुन्हा एकदा सॉक्रेटिस वाच.’

दीक्षित हे शिक्षक होते, ज्योतिषी नव्हते; पण आज अभ्यासिकेत बसून मी एक अशी जटील समस्या सोडवण्याची खटपट करत होतो, जी कदाचित  सॉक्रेटिसला - तत्त्वज्ञानाच्या बापालाही -  अवघड वाटली असती. बऱ्याच वर्षांपूर्वी माझा जिवलग मित्र सचिन याला असाध्य आजार जडला असल्याचं निदान झालं. त्यानं ती बातमी पत्नीपासून आणि सहकाऱ्यांपासून लपवून ठेवली. काहीही झालं तरी त्याच्या बायकोला - सरूला - ही गोष्ट कळता कामा नये या अटीवर त्यानं ती मला सांगितली. तो म्हणाला : ‘हे बघ, आम्हाला मूलबाळ नाही. माझ्याशिवाय तिचं कुणी नाही; तिचा स्वभाव बघता, माझ्या रोगाविषयी तिला समजलं तर ती मोडून पडेल.’

सुरुवातीला त्याला आनंदी ठेवण्याचा माझ्या परीनं मी प्रयत्न केला; पण काळ उलटू लागला तसं वहिनींसमोर नाटक करणं मला जड जाऊ लागलं आणि त्याच्या घरी जायचं टाळून मी त्याला ऑफिसातच  भेटू लागलो. एकदा असाच तो एकटा बसला होता - जणू माझी वाट बघत.

‘बस,’ तो म्हणाला.

‘काय सांगतोय ते नीट ऐक; पण, ‘हे दोघातच राहील,’ असा शब्द दे आधी.’

त्याला शब्द द्यायला मी तयार नव्हतो; पण शेवटी हरलो.

सुरुवातीला ती नेहमीसारखी ‘फिल्मी’ कथा वाटली: विद्यापीठातून नुकत्याच बाहेर पडलेल्या एका तरुणाची आसामधल्या चहाच्या मळ्यात असिस्टंट मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली होती. तिथं पार्टीत मृणालिनीला - एका बड्या अधिकाऱ्याच्या मुलीला - तो भेटला.  मात्र, पुढं जे घडलं ते नेहमीसारखं आकर्षण, प्रेम किंवा नुसती ओढ नव्हती. ती भावना इतकी मूलभूत होती की, पुढं काय होणार, हे पार्टी संपायच्या आतच दोघांनाही कळून चुकलं.

आठवडाभरात ते प्रेमी बनले... वर्षभरात ती गरोदर राहिली. तिच्याशी लग्न करण्याची अनुमती मागण्यासाठी तो तिच्या आई-वडिलांकडे गेला; पण त्यांनी त्याला हाकलून लावलं आणि ‘पुन्हा कधीही तिच्या वाटेला जाऊ नकोस’ अशी धमकी दिली.  मृणालिनीनं मात्र वेगळीच शक्कल लढवली. आपण गरोदर आहोत हे सांगितलं तर आई-वडील नमतील हे गृहीत धरून तिनं आपली ‘अवघडलेली स्थिती’ उघड केली; पण तिची गतही त्याच्यासारखीच झाली. एका आठवड्यात तिला अज्ञात स्थळी धाडण्यात आलं आणि खोटा आरोप लादून सचिनला नोकरीवरून काढलं गेलं. डॉक्टरांच्या मदतीनं नव्हे, तर वैद्यलोकांकडून अवैधरीत्या गर्भपात घडवला जायचा अशा काळातली ही गोष्ट. जेव्हा स्त्रिया सक्षम झालेल्या नव्हत्या आणि माणसाची योग्यता त्याच्या पात्रतेवरून नव्हे तर, तो कोणत्या कुळातला आहे यावर मोजली जात असे असा तो काळ होता.

सचिन घरी परतला. आपलं दु:ख आतल्या आत दाबून एका प्रतिष्ठित परदेशी कंपनीत रुजू झाला. नंतर कुटुंबाच्या दबावामुळं त्यानं लग्न केलं. उपजत गुण आणि कठोर मेहनतीच्या जोरावर तो वरच्या पायऱ्या चढत गेला.

अखेर, तो कंपनीचा चेअरमन होणार...त्याच आसपासच्या काळात साध्या रुटीन चेकअपमधून त्याला अचानकपणे त्याच्या संभाव्य मृत्यूची बातमी समजली. धक्का बसला;  पण निदान स्पष्ट होतं. तळहाताच्या रेषेवर नव्हे तर, पारदर्शी पडद्यावर टाचलेल्या एक्स-रेवर ते निदान दिसत होतं.

‘ऑपरेशन करून काही होईल का?’  त्यानं विचारलं.

‘ऑपरेट करता येईल,’ डॉक्टर म्हणाले.

‘पण तसं केलं तर तीनेक महिन्यांत जाल तुम्ही,’

‘आणि नाही केलं तर?’

‘थोडे जास्त जगाल; पण काहीसा अधिक वेदनादायक मृत्यू होईल.’

‘किती जास्त जगेन?’

‘सहा महिने. फार तर बारा.’

सरूला धक्का बसू नये म्हणून त्यानं ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली; परंतु खरं कारण वेगळंच होतं. मृत्यूच्या त्या बातमीमुळं त्याच्या भूतकाळाचं कुलूपबंद दार खाडकन् उघडलं गेलं होतं! आसामच्या आठवणी, मृणालिनी आणि त्या दोघांच्या सहवासातले ते उत्कट क्षण दाटून आले आणि तिला पुन्हा शोधण्याची इच्छा त्याच्या मनात उफाळून आली. मृत्यूला सामोरं जाताना त्याला पुन्हा एकदा तिला भेटावंसं वाटत होतं. अर्थात्, तो मूर्खपणा आहे याची त्याला जाणीव होती; पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

नंतरच्या आठवड्यात तो गुवाहाटीला पोहोचला. मधल्या वर्षांत तिचा ठावठिकाणा सांगणाऱ्या वाटा पुसल्या गेल्या होत्या; कोलकात्याच्या झोपडीवजा नगरांकडे जाणारा एक बारीकसा रस्ता सोडून. त्यानं खासगी शोधकर्ते कामाला लावले आणि ती युक्ती कामी आली. पंधरा दिवसानंतर त्याला कळलं की तिच्यासारखी दिसणारी एक स्त्री - कडव्या डाव्या विचारांची - सत्तरच्या दशकात तिथं काही काळ राहिली होती; पण आणीबाणीच्या काळात तिला अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं होतं आणि तिचा छळ करून तिला सोडून देण्यात आलेलं होतं. बस्स. तेवढाच काय तो तिचा मागमूस...

पण त्याचं मन मानायला तयार नव्हतं. तो परत कोलकत्याला गेला आणि स्वतःच तो भाग धुंडाळू लागला. तीन दिवसांनंतर त्यानं शोध थांबवला.

हॉटेलवर परतत असताना रस्त्याकडेच्या टपरीवर चहा घेण्यासाठी तो थांबला. चहावाल्याशी सहज बोलल्यावर त्यानं जवळच्या प्राथमिक शाळेचा पत्ता सांगितला. तिथं चौकशी केली तर काही तरी सुगावा लागेल आणि शोध घेण्यास मदत होईल असं कळलं.

थकल्या पावलांनी तो तडक शाळेच्या आवारात पोहोचला. हेडमास्तरांच्या ऑफिसचं दार ठोठावलं आणि ज्या भूतकाळाचा तो शोध घेत होता त्यातच त्यानं पुन्हा प्रवेश केला. ओळख पटण्याची गरजच नव्हती. दोघं काहीच बोलले नाहीत; पण त्यांना कळून चुकलं की ज्या जादूई जगातून त्यांना हाकलून देण्यात आलं होतं त्यात ते पुन्हा आलेत.

‘मी मरणार आहे,’ तो म्हणाला.

‘मी तर कधीच मेलेय,’ ती उत्तरली.

अजून बोलण्यासारखं काहीच नव्हतं. त्याक्षणी त्याला जाणवलं की तो आता सरूकडे परत जाऊ शकणार नाही.

सचिनच्या या कहाणीचा काय अर्थ लावावा हे मला कळत नव्हतं. बराच वेळ आम्ही दोघंही शांत होतो.

‘सरूकडे परत जाणार नाहीस म्हणजे  काय?’  मी विचारलं.

‘अरे,  तुला दिसत नाही का? मी जायचं म्हटलं तरी आता तिच्याकडे परत जाऊ शकत नाही,’ सचिन उद्गारला.

मृणालिनी आणि माझी ताटातूट झाल्यावर आम्ही मेल्यात जमा होतो. फक्त घरच्यांच्या दबावामुळे मी सरूशी लग्न केलं. तिच्यासोबतचं माझं आयुष्य खरं नव्हतं. आता निदान मृत्यू समोर दिसत असताना आयुष्यातले शेवटचे काही महिने मृणालिनीसोबत खरं आयुष्य जगण्यात वावगं काय आहे?

रागाच्या भरात मी बोलून गेलो : ‘कोणत्या ‘खऱ्या’बद्दल बोलतोयस तू? पूर्वी तुझं एका मुलीवर प्रेम होतं, कबूल. कदाचित फार उत्कट प्रेम होतं हेदेखील मान्य; पण वस्तुस्थिती ही आहे की तुझं ते प्रेम खरोखरच ‘खरं’ असतं तर तू सरूशी लग्न केलंच नसतंस... बरं, ते काहीही असो. आता सरूला हे सगळं तू कसं समजावून सांगणार आहेस?’

‘मी तसा प्रयत्नच करणार नाही,’ तो म्हणाला : ‘माझ्यात तेवढी हिंमत नाही; पण माझ्याजवळची पै न् पै मी तिच्या नावे केली आहे आणि, माझ्या मृत्युपत्राचा अंमलदार म्हणून तुला नेमलंय.’

‘शक्य नाही,’’ मी म्हणालो : ‘गड्या, तुझी लढाई तू लढ; पण मित्र म्हणून तुला फुकटचा सल्ला देतो...पैशाच्या बदल्यात सरूला विकत घेण्याचा प्रयत्न करू नकोस. प्रेमबीम माहीत नाही; पण आसाममध्ये तुझ्या आयुष्यात जे घडलं ते ठाऊक असूनही मृणालिनी गेली तीस वर्षं तुझी खंबीर आणि एकनिष्ठ साथीदार म्हणून राहिलीय. आणि, त्याच्या बदल्यात  काही नाणी देऊन तू भित्र्यासारखा तिच्यापासून दूर जायला बघतोयस?’

थोबाडीत मारल्यासारखी त्याची स्थिती झाली. तो मान खाली घालून बसला. पुन्हा वर मान करून जेव्हा त्यानं माझ्याकडे पाहिलं तेव्हा त्याचे गालांवर अश्रू ओघळले होते. त्याच्या डोळ्यांत इतकी  खोलवरची भावना दिसत होती की मी भांबावून गेलो. माझे हात त्यानं हातात घेतले आणि त्याच्या डोळ्यांना लावले.  

‘निघतो’ म्हणून तो माझ्या आयुष्यातून कुठं तरी दूर निघून गेला. खरं तर, सर्वांच्याच आयुष्यातून.

मी माझ्या लायब्ररीत बसलो होतो तेव्हा दीक्षितगुरुजी आत आले.खोलीभर नजर फिरवली आणि म्हणाले : ‘‘यशवंत, संतापलेला दिसतोयस.”

‘हो,’ मी उत्तर दिलं.

‘सचिन ज्या मार्गानं गेला तो नैतिकदृष्ट्या अक्षम्य आहे. त्याचा मित्र असल्याची मला लाज वाटते.’

गुरुजी हसले आणि म्हणाले : ‘‘याचा अर्थ, तुझ्या मते तो संधिसाधू होता. सरूशी त्यानं केलेला विवाह ही नुसती सोय होती आणि त्याचं शेवटचं कृत्य म्हणजे, आयुष्याचे दिवे मालवण्यापूर्वी मौजमजा करण्याची अखेरची धडपड. दुसऱ्या बाजूनं विचार केला तर शक्यता अशीही आहे की, कोणत्या तरी अनियंत्रित शक्तीच्या तावडीत सापडलेला तो बिचारा असहाय जीव होता?’

‘अजिबात नाही,” मी म्हणालो : ‘‘तो सरळसरळ नैतिक अपराधी होता...बाकी काही नाही.’

‘यशवंत, आयुष्य इतकं काळं आणि पांढरं असतं याबद्दल तुला खात्री आहे का?’

‘मला सांग, माणसाच्या हातून घडणाऱ्या साऱ्या कृती योग्य किंवा अयोग्य ठरवता येतील अशी कुठली एकच एक कसोटी आहे? सभोवतीचे सामाजिक संदर्भ आणि परिस्थिती यांचा नैतिकतेवर काहीच प्रभाव पडत नाही का? आपल्या उपाशी कुटुंबाचं पोट भरावं म्हणून चतकोर भाकरी चोरणारा गरीब आणि वैयक्तिक स्वार्थापोटी जनतेचा पैसा खिशात कोंबणारा अधिकारी यांना एकाच मापानं मोजून चालेल का? पाप-पुण्य ही काळ्या दगडावरची रेघ आहे की नैतिक कृती, हे आपण तिच्याकडे कसं बघतो यावर अवलंबून आहे...

मी अवाक् झालो. गुरुजींच्या तोंडचे ते शब्द ऐकून माझा माझ्या कानांवरच विश्वास बसत नव्हता. नैतिकता ही ‘वैयक्तिक बाब’ नसून उथळ गोष्टींच्या पलीकडे असलेल्या शाश्वत मूल्यांचा शोध आहे यावर नेहमीच त्यांनी भर दिला होता. आणि तेच गुरुजी आता उघडउघड म्हणत होते की, एका दृष्टीनं सचिनची कृती समर्थनीय होती.

‘गुरुजी, तुम्ही सचिनच्या वागण्याला पाठिंबा देताय?’ मी विचारलं.

‘नाही,’ ते म्हणाले. 

‘मी माझ्या शिष्याला नैतिकदृष्ट्या योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्यासाठी विचारप्रवृत्त करतोय...’

रात्री बराच वेळ आम्ही चर्चा केली, त्यांचा विद्यार्थी असताना जशी करायचो तशी. माझी भूमिका रेटण्यासाठी मी युक्तिवाद करत राहिलो आणि सॉक्रेटिसच्या पद्धतीनं ते माझ्या उणिवा दाखवत राहिले. हळूहळू त्यांनी मला अशा टप्प्यावर आणलं की, एका गृहीतकावर आमची तात्पुरती सहमती झाली: ‘आपल्या कोणत्याही विचारानं, शब्दानं किंवा कृतीनं दुसऱ्या व्यक्तीला इजा पोहोचणार असेल तर ती गोष्ट अनैतिक होय.’

आता या व्याख्येनुसार, अपराध सिद्धच होता आणि सरूला जाऊन ते सांगणं माझं काम होतं.

‘जा. खुशाल सांग,’ दीक्षितगुरुजी म्हणाले : ‘तुला शुभेच्छा; पण तू तिला काय सांगणार?’

‘अर्थात्, सत्यच...दुसरं काय?’ मी उत्तरलो.  

‘अगदी बरोबर’ ते म्हणाले : ‘पण तुझ्या सांगण्यामुळे तिला दुःख  होणार नाही का? आणि तस झालं तर तुझ्या हातून घडलेली ती कृती नैतिक ठरेल?’

अचानक मला कळून चुकलं की कुणाला दुःख देणं हे निश्चितच अयोग्य असलं आणि खरं बोलणं निःसंशय योग्य असलं तरी प्रत्येक वेळी ते तसंच असेल असं नाही. योग्यायोग्याच्या अनंत अर्थच्छटा समजून घेणं म्हणजेच आयुष्य. कदाचित्, त्यामुळेच एक कवी म्हणतो :      

फरिश्तें गर मुबत्ले-इम्तिहाँ हो, तो चीख उठ्ठें

ये इन्साँ है जो देता जा रहा है इम्तिहाँ अपना

(देवदूत मानवी अग्निपरीक्षा देऊ लागले तर ते वेदनेने आक्रोशातील...

क्लेश सोसत जीवनातील कठीण प्रसंगांना धीरानं सामोरं जाण्याची क्षमता फक्त माणसातच आहे.)      

गुरुजी, माझं मन गोंधळून गेलंय. तुम्ही माझे गुरू आहात. तुम्हीच माझ्यावर कृपा करा आणि सांगा, मी काय करू?’

‘सॉक्रेटिसचा सल्ला घे आणि मग गीता वाच, माझ्या अर्जुना,'

असं म्हणून ते पुस्तकांत अदृश्य  झाले!

(सदराचे लेखक ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ, तसंच अर्थशास्त्र-इतिहास-राजकीय घडामोडी या विषयांचे अभ्यासक-संशोधक आहेत.)

(अनुवाद : डॉ. रघुनाथ कडाकणे)

(raghunathkadakane@gmail.com)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com