जाओ रानी याद रखेंगे...

जयपूरच्या राजवाड्याच्या मुख्य प्रांगणात राजस्थानी अचकन, चुडीदार आणि पगडी अशा पारंपरिक पोशाखातील राजपुत्रांच्या सोबत आम्ही जमलो होतो.
queen elizabeth
queen elizabethsakal
Summary

जयपूरच्या राजवाड्याच्या मुख्य प्रांगणात राजस्थानी अचकन, चुडीदार आणि पगडी अशा पारंपरिक पोशाखातील राजपुत्रांच्या सोबत आम्ही जमलो होतो.

ती पस्तीस वर्षांची होती आणि मी पंधरा. दिवस खडतर होता. भर उन्हाचा आणि धुळीतला अजमेरपासूनचा प्रवास. आदल्या रात्री जॅकने शाळेच्या मॉनिटरना सांगितलं होतं, राणी एलिझाबेथ भारत दौऱ्यात जयपूरला भेट देणार आहेत आणि महाराजांनी त्यांच्या शाही स्वागतासाठी आम्हा मुलांना आमंत्रित केलेलं आहे. हे मात्र त्याने सांगितलं नव्हतं की, ‘ इंग्लंडची’ भारतातील प्रतिष्ठा वाढण्यासाठी दीर्घकाळ आणि अमूल्य योगदान दिल्याबद्दल ‘ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’ हा किताब देऊन त्याला सन्मानित केलं जाणार आहे.

जयपूरच्या राजवाड्याच्या मुख्य प्रांगणात राजस्थानी अचकन, चुडीदार आणि पगडी अशा पारंपरिक पोशाखातील राजपुत्रांच्या सोबत आम्ही जमलो होतो. फार वेळ वाट पाहावी लागली नाही, कारण तुतारीच्या आवाजानं राणीच्या आगमनाची वार्ता कळली.

राणीला पाठीवरून आणणारा हत्ती ऐटीत चालत आला आणि माहुताच्या इशाऱ्यानुसार पुढचे पाय वाकवून गुडघ्यावर बसला. राणी खाली उतरताच राजस्थानच्या अभिजनांनी तिचं स्वागत केलं आणि उपस्थित निमंत्रितांच्या जवळून कधी स्मितहास्य करत, कधी मान डोलावत आणि क्वचित एखादा शब्द उच्चारत ती पुढे जाऊ लागली. माझ्या जवळून जाताना तिने माझ्याकडे पाहिलं आणि स्मित केलं. मागे उभा असलेला तिचा सहायक काहीतरी कुजबुजला आणि ती म्हणाली, ‘‘ओह, आय सी. असं का?’’ आणि पुढे निघून गेली आणि मनात ठेवून गेली स्मितहास्य करणाऱ्या एका सुंदर स्त्रीची आठवण. ती आठवण होती तशी अजूनही आहे.

जॅक गिब्सनच्या डायरीतील नोंद

१.२.६१. मेयो कॉलेज.

रविवार, १५ जानेवारी रोजी राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांनी जयपूरला भेट दिली. महाराजांनी मॉनिटर्ससह मला त्यांच्या स्वागत समारंभासाठी आमंत्रित केलं होतं. शाही प्रांगणात राणीचं हत्तीवरून आगमन होईल असं सांगण्यात आलं होतं. अजमेरच्या वाटेत एक गाव लागलं. दुपारनंतर राणी त्या गावाला भेट देणार होती. परंतु रस्त्याच्या दुतर्फा पिवळ्या आणि लाल रंगाच्या पोशाखातले गावकरी आधीपासून उभे होते. रंगीबेरंगी फुलांचे ताटवेच वाटत होते ते. आम्ही सोबत आणलेलं जेवण उरकलं आणि राजवाड्याकडे निघालो.

शाही पाहुण्यांच्या आगमनाची आम्ही वाट पाहत होतो. राणीला खाली उतरता यावं म्हणून हत्तीने गुडघे टेकले, तेव्हा तिने अंबारीला घट्ट धरलं होतं. स्वागताच्या ठिकाणी येताच मी राणीशी संवाद साधला आणि इतर मुलांशी आपली ओळख करून देऊ का असं विचारलं...

...आणि आता राणी हयात नाही

अकरा वर्षांपूर्वी - फेब्रुवारी १९५२च्या सुरुवातीला - राजकुमारी एलिझाबेथने पती फिलिपसोबत केनियाच्या तत्कालीन ब्रिटिश वसाहतीचा दौरा केला. तीन खोल्यांच्या हॉटेल ‘ट्रीटॉप्स’वर ते दोघे राहिले. एका विशाल वृक्षाच्या उंच फांद्यांवर ते हॉटेल उभारलेलं होतं. जंगली प्राण्यांची पाणी पिण्याची जागा जवळ. सभोवतीच्या अरण्यात हत्ती, बिबटे आणि इतर प्राण्यांची वस्ती होती. खरंतर, ती जागा राहण्यासाठी सुरक्षित नव्हती. म्हणून त्या शाही जोडप्याच्या सुरक्षिततेसाठी भारतातील नरभक्षक वाघांच्या शिकारीसाठी प्रसिद्ध असलेल्या जिम कॉर्बेट यांना हॉटेल मालकाने नेमलेलं होतं. कॉर्बेटने रात्रभर जागता पहारा दिला. पण तसं काही घडलं नाही. मात्र, त्या रात्री दूर दहा हजार किलोमीटरवर लंडनमध्ये खूप महत्त्वाची घटना घडली - एलिझाबेथचे वडील, किंग जॉर्ज सहावे यांचं निधन झालं. मृत्यूची माहिती ताबडतोब कळवण्याची कोणतीही सोय तेव्हाच्या संप्रेषण यंत्रणेत उपलब्ध नव्हती. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की, एक तरुण मुलगी संध्याकाळी राजकुमारीच्या रूपात झाडावर चढली आणि दुसऱ्‍या दिवशी सकाळी राणीच्या रूपात खाली उतरली.

राणी एलिझाबेथ द्वितीयच्या कारकीर्दीचं मूल्यमापन करताना ‘एका युगाचा अंत’ हा शब्दप्रयोग भाष्यकारांकडून वारंवार केला जाईल. एका गोष्टीवर तर बहुतेकांचं एकमत होईल. ती म्हणजे, राणीची आपल्या कर्तव्याप्रती असलेली अतूट बांधिलकी आणि ती निभावण्याची अथकपणे बजावलेली कामगिरी. यासाठी तिच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला जाईल; पण राणीच्या मृत्यूने झालेल्या हानीचं दुःख करत असताना आपण तिच्या युगाचं उदात्तीकरण करण्याची चूक करता कामा नये.

एका पातळीवर विचार करता ती एक अभिजात राणी होती. परंतु दुसऱ्या पातळीवर, वयाच्या १८ व्या वर्षी, वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन वाहन देखभालीच्या कामासाठी लेबर एक्स्चेंज कार्यालयात तिने आपलं नाव नोंदवलं आणि ब्रिटिश सैन्याच्या महिला शाखेत हट्टाने भरती होऊन कॅप्टनपद मिळवलं. ८ मे, १९४५ रोजी युरोपातलं युद्ध संपलं आणि त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले. बकिंगहॅम पॅलेसकडे जाणाऱ्या मॉलमध्ये अलोट गर्दी जमली. राजवाड्याच्या बाल्कनीतून राजा-राणीने लोकांना अभिवादन केलं. त्या आनंदोत्सवात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी राजकुमारी एलिझाबेथ गणवेश घालून हळूच गर्दीत शिरली. नंतर १९८५ मध्ये बीबीसीशी बोलताना तिने सांगितलं की, ‘आपण ओळखले जाऊ अशी मला फार भीती वाटली होती. म्हणून मी गणवेशाची टोपी डोक्यावरून अगदी खालीपर्यंत ओढली. युद्धापासून सुटका झाल्याच्या आनंदाच्या भरात एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चाललेल्या अनोळखी लोकांच्या त्या रांगा मला अजून आठवतात... निःसंदेहपणे ती माझ्या आयुष्यातल्या सर्वांत संस्मरणीय रात्रींपैकी एक होती.’ राणी हे सांगायला विसरली की, सर्वसामान्य लोकांच्या लक्षात न येता त्यांच्यात मिसळण्याचा तो तिच्या आयुष्यातला पहिला आणि एकमेव प्रसंग होता... आणि आता राणी हयात नाही.

१९४७ मध्ये, २१ वर्षीय राजकुमारी एलिझाबेथने दक्षिण आफ्रिकेच्या शाही दौऱ्यात एक भाषण केलं होतं. पुढे ते पुनःपुन्हा उद्धृत केलं गेलं. त्यात तिने असं वचन दिलं होतं, की ‘तुम्हा सर्वांसमोर मी जाहीर करते की माझं संपूर्ण आयुष्य, मग ते मोठं असो की छोटं, मी तुमच्या सेवेसाठी अर्पण करीन. पण, जोवर तुम्ही माझ्यासोबत येणार नाही, तोवर माझा हा निर्धार कडेपर्यंत नेण्याचं बळ मला मिळणार नाही.’ हे भाषण भविष्याचा जाहीरनामा होता. असं म्हटलं जातं की, ज्या भावूकतेने तिने ते केलं, त्यामुळे लाखो कंठ दाटून आले.

१९५३ मध्ये तिचा राज्याभिषेक झाला. त्याच दिवशी शेर्पा तेनसिंग आणि न्यूझीलंडचे एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्टचं शिखर सर केल्याची बातमी ‘लंडन टाइम्स’ने पहिल्या पानावर दिली आणि तो राणीच्या कारकीर्दीसाठी ‘शुभ शकुन’ असल्याचं म्हटलं. बातमीला साम्राज्यवादाची छटा होती. पण घडलं मात्र उलट. राणी एलिझाबेथ कधीही सम्राज्ञी होऊ शकली नाही, कारण १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्यानं तिचं ते पद संपुष्टात आणलं, तरीपण एकेकाळच्या राजेशाहीची ती वारस जरूर होती. राष्ट्रकुल संघाचं प्रमुखपद धारण करून पूर्वीच्या राजेशाहीचा तो आभासही तिने निर्माण केला.

पुढे वर्षं उलटत गेली, तशी राणी एलिझाबेथ ब्रिटिश साम्राज्याच्या अस्ताची साक्षीदार बनली. जवळपास संपूर्ण ब्रिटिश साम्राज्य स्वतंत्र राज्यांमध्ये विसर्जित होत गेलं आणि एकेकाळी जगाचं नेतृत्व करणारा तिचा देश शेवटी अॅटलांटिकमधील एक बेट बनून गेला. मात्र, ते दुःख तिने कधी दिसू दिलं नाही. जगाने पाहिलं; एका अननुभवी राजकन्येचं परिपक्व आणि अनुभवी राणीत झालेलं ते रूपांतर. सतत प्रसिद्धीच्या झोतात आणि सार्वजनिक आकर्षणाच्या केंद्रस्थानी राहूनही तिने कधीही पक्षपाती राजकारणात स्वतःला गुंतू दिलं नाही आणि लोकांशी किंवा लोकांसमोर बोलताना योग्य तेच बोलण्याची आणि शालीनतेची मर्यादा तिने नेहमी पाळली.

आपल्या देशाच्या पंतप्रधानांबद्दल राणीला खरोखर काय वाटत होतं याबद्दल चकार शब्दही कधी बाहेर आला नसला, तरी श्रीमती थॅचरशी तिचं फारसं जमत नसावं असा एक कयास आहे. त्यासंबंधी बऱ्याच गोष्टी काल्पनिक असल्या तरी काही बाबतीत विश्वास ठेवायला जागा आहे. अशीच एक गोष्ट म्हणजे, कार्यक्रमात संघर्ष टाळण्यासाठी पंतप्रधानांनी राणीला विचारलं म्हणे की, कोणते कपडे परिधान करू? तेव्हा राणीने अतिशय थंडपणे उत्तर दिलं की, इतर लोक काय परिधान करतात याकडे राणी लक्ष देत नाही.तिने अनेक भूमिका निभावल्या - आणि सर्व अदबशीरपणे. पण इतिहास तिला एका गोष्टीसाठी नक्कीच लक्षात ठेवेल आणि ती म्हणजे ब्रिटन आणि त्याच्या अमलाखालील पूर्वीच्या वसाहतींची राष्ट्रकुल संघटना. १९५२ मध्ये जेव्हा ती राणी बनली, तेव्हा त्या वसाहती तिच्या साम्राज्याच्या भाग होत्या आणि तिच्याच कारकीर्दीत त्यांची स्वयंशासित राष्ट्रं बनली. हे संक्रमण राणीने अशा तऱ्हेने स्वीकारलं की, त्यामुळे राष्ट्रकुल संघ पूर्वीपेक्षा अधिक विश्वासार्ह बनला. ही नाण्याची एक बाजू झाली. दुसरी बाजू म्हणजे राष्ट्रकुल संघाची प्रमुख म्हणून तिचं असणं आणि तिने जपलेली सभ्य प्रतिमा यामुळे ब्रिटनला अनेक दशकांच्या हिंसक घडामोडी धुऊन काढणं आणि निर्वसाहतीकरणाचा रक्तलांछित इतिहास धूसर करणं सोपं गेलं. खरंतर, त्या प्रक्रियेच्या व्यापकतेचं आणि परिणामांचं पुरेसं मूल्यमापन अजून इतिहासाकडून व्हायचं बाकी आहे.

सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान जॅन स्मट्स यांनी ‘गोऱ्या लोकांच्या’ वसाहतींचा संघ - अर्थात, राष्ट्रकुल संघ - स्थापण्याची कल्पना मांडली. १९४९ मध्ये त्याची पुनर्रचना करून नव्याने स्वतंत्र झालेल्या आशियायी देशांनाही त्यात सामावून घेण्यात आलं. राष्ट्रकुल संघाच्या नेत्यांच्या परिषदेतील छायाचित्रात डझनभर बिनगोऱ्या पंतप्रधानांच्या मधोमध गोरी राणी बसलेली दिसते. हे चित्र दिमाखदार दिसतं; पण त्यामागची हिंसा मात्र त्या छायाचित्रात दिसत नाही. १९४८ मध्ये मलायाच्या वासाहतिक गव्हर्नरने कम्युनिस्ट गनिमांशी लढण्यासाठी आणीबाणी घोषित केली आणि ब्रिटिश सैन्याने बंडखोरीविरोधी रणनीती वापरली. नंतर व्हिएतनाममध्ये अमेरिकेने त्याच नीतीचा अधिक खुबीने वापर केला. १९५२ मध्ये केनियाच्या गव्हर्नरने ‘माऊ माऊ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या वसाहतविरोधी चळवळीला दडपण्यासाठी आणीबाणी लागू केली, तेव्हा ब्रिटिशांनी हजारो केनियन लोकांना ताब्यात घेऊन क्रूर आणि पद्धतशीरपणे त्यांचा छळ केला. १९५५ मध्ये सायप्रस आणि एडन, येमेनमध्ये १९६३ मध्ये, ब्रिटिश गव्हर्नरांनी वसाहतविरोधी हल्ले थोपवण्यासाठी आणीबाणी घोषित केली आणि तिथल्या नागरिकांचा छळ केला; पण नियती किती विचित्र असते पाहा. दरम्यान आयर्लंडमधील संकटांमुळे आणीबाणीचं गतिशास्त्र इंग्लंडपर्यंत आलं आणि कर्म सिद्धांतानुसार आयरिश रिपब्लिकन सैन्याने १९७९ मध्ये राणीचे नातलग आणि भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड लुई माउंटबॅटन यांची हत्या केली.

असं असलं तरी यापैकी कोणतीही घटना एक वस्तुस्थिती झाकोळू शकत नाही - राष्ट्रकुल संघाची प्रमुख म्हणून आपली भूमिका आणि कर्तव्याच्या बाबतीत राणी एलिझाबेथ अतिशय गंभीर होती. संकुचित राजकीय गरजांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रकुल संघाच्या हितसंबंधांना समर्थन देण्यासाठी तिने आपल्या मंत्र्यांशी संघर्षदेखील केला. उदाहरणार्थ, १९६०च्या दशकात तिने राष्ट्रकुल संघ दिवस बहुधर्मीय बनवला आणि वर्णद्वेषी दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीत कठोर भूमिका घेण्याला प्रोत्साहन दिलं. आता राष्ट्रकुल संघात वंशपरंपरागत राजेशाहीही संपली पाहिजे. जरी राष्ट्रकुल नेत्यांनी २०१८ मध्ये राणीची ‘प्रामाणिक इच्छा’ पूर्ण करण्यासाठी प्रिन्स चार्ल्सना राष्ट्रकुल संघाचे पुढील प्रमुख म्हणून मान्यता दिली असली, तरी ही भूमिका वंशपरंपरागत नाही यावरही त्यांनी जोर दिला. आता नव्या राजाने स्वतःहून माघार घेतली तर ते योग्य होईल, जेणेकरून राष्ट्रकुल संघाचं प्रमुखपद आशिया किंवा आफ्रिकेतील योग्य देशाकडे जाऊ शकेल.

राणीची अंत्ययात्रा पाहात असताना मनात प्रश्न येतो की, इतिहास कशाप्रकारे तिची आठवण ठेवेल आणि लहानपणीची अर्धवट लक्षात ठेवलेली एक कविता मनात तरळते :

तेरा स्मारक तू ही होगी,

तू खुद अमिट निशानी थी....

ता. क. मुंबई १७ सप्टेंबर २०२२.

उशीर झालाय. कोल्हापूरला निघण्यासाठी मला लवकर उठायचं आहे. माझी मुलगी आभाला भेटायला मी आलो होतो. कामानिमित्त ती लंडनहून न्यूयॉर्कला चाललीय. २००७ मध्ये महाराज चार्ल्स तिसरे आणि ब्रिटिश आशियायी व्यावसायिक नेत्यांच्या एका गटाने मिळून स्थापन केलेल्या ‘ब्रिटिश आशियायी ट्रस्ट’ची ती संस्थापक सदस्य आहे. दक्षिण आशियातील बेसुमार गरिबी, असमानता आणि अन्यायाचा सामना करण्यासाठी हा ट्रस्ट स्थापला गेला आहे. निरोप देताना ती मला म्हणाली, ‘तुम्हाला माहितंय बाबा, हा ट्रस्ट राजाने ‘प्रिन्स’ असताना सुरू केला होता. आता त्यातून जर तो पायउतार झाला, तर सर्वांना त्याची उणीव भासत राहील.’ ‘ते का बरं?’ मी विचारलं. ‘विश्वास ठेवा, न ठेवा, एका राजापेक्षा तो मनाने खरा ‘सामाजिक कार्यकर्ता’ आहे.’

अनुवाद : डॉ. रघुनाथ कडाकणे

(raghunathkadakane@gmail.com)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com