
स्वातंत्र्याचा विजयोत्सव आणि फाळणीच्या जखमा अशा परिस्थितीत, स्थलांतरं, स्थित्यंतरं असा संभ्रमाचा, संघर्षाचा काळ अनुभवत भारतीय चित्रपटसृष्टीच्या क्षितिजावर एकेक तारा उदयास येत होता. कुणी स्वर, कुणी लेखणी, कुणी स्वप्नं, तर कुणी अपार वेदना घेऊन मुंबईची वाट धरत होता. भारतीय संगीत, कला, अभिनय, साहित्य, काव्य यांचं एक सुंदर चित्र रजतपटावर उमटत होतं. सिनेमाचं रूपदर्पण हजारो प्रतिबिंबांनी जणू भरून गेलं होतं... ‘लारालप्पा, लारालप्पा’च्या खेळकर गाण्यातून रावीचा प्रवाह हलकेच अरबी समुद्रात मिसळत होता...