ड्रग्जची साखळी पुणे ते कुवेत...

पुणे पोलिसांनी धडाकेबाज ‘न भूतो...’ कारवाई करीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला.
mephedrone seized
mephedrone seizedsakal

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यात महाराष्ट्र राज्य ड्रग्जमुक्त करण्याची घोषणा केली होती. पुणे पोलिसांनी धडाकेबाज ‘न भूतो...’ कारवाई करीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत साडेतीन हजार कोटी रुपये किमतीचा १७६० किलो मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. पुणे पोलिसांची ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. तरुण पिढीचं भविष्य अंधारात लोटणाऱ्या ड्रग्ज माफियांवर आता कायद्याचा जरब बसविण्याची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेलं पुणे शहर सध्या अमली पदार्थाच्या तस्करीमुळे चर्चेत आलंय. अमली पदार्थाच्या प्रकरणातील मास्टर माइंड सॅम ऊर्फ संदीप धुनिया मूळचा बिहारमधील. तो इंग्लंडचा रहिवासी आहे. तो सध्या कुवेतमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. धुनिया आणि ब्राऊन या दोघांचा शोध घेण्यासाठी ‘इंटरपोल’ची मदत घेतली जाणार आहे. त्याच्याविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटिस बजावली आहे.

या प्रकरणात यापूर्वी पुण्यातील वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने, अजय अमरनाथ करोसिया, हैदर नूर शेख, भीमाजी परशुराम साबळे, डोंबिवलीतील युवराज बब्रुवान भुजबळ, नवी दिल्लीतील दिवेश चिरंजीव भुतिया, संदीप राजपाल कुमार, संदीप हनुमानसिंग यादव आणि सांगलीतील आयुब अकबरशाह मकानदार पोलिसांच्या ताब्यात आहेत.

अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आणि बाळगणाऱ्यांशी संपर्क तसेच पेडलर्सशी व्हॉट्सअप चॅटिंग केल्याच्या संशयावरून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (एनसीबी) कारवाई केली होती. देशभरात त्याची मोठी चर्चा झाली. दुसरीकडं पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रांजणगाव एमआयडीसी आणि खेड तालुक्यात किलोंनी नव्हे तर चक्क क्विंटलनी ‘एमडी’चं उत्पादन करणारे कारखाने सुरू असल्याचं उघड झालंय. पुणे ग्रामीण पोलिसांसह आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांना आता याकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं लागेल.

‘डीआरआय’ अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं २०१६ मध्ये धुनियाकडून दीडशे किलो ‘एमडी’ जप्त केले होते. या प्रकरणात ‘डीआरआय’ने या गुन्ह्यातील आरोपी विपिन कुमार आणि सांगलीतील आयुब मकानदारला पुण्यातून अटक केली होती. हे तिघे येरवडा कारागृहात असताना त्यांची आरोपी वैभव माने आणि हैदर शेखशी ओळख झाली. विपिन कुमार सध्या येरवडा कारागृहात आहे. धुनिया जामिनावर बाहेर आहे.

त्यानं कुरकुंभ एमआयडीसीत ‘अर्थकेम लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीतील केमिकल तज्ज्ञ युवराज भुजबळला ‘एमडी’ बनवण्याचं काम सोपवलं होतं. धुनियानं देशातील काही केमिकल कंपन्यांना ड्रग्ज बनविण्याचं काम दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळं काही केमिकल कंपन्या आणि लॅबोरेटरीज पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत. संदीप धुनिया ३० जानेवारीला नेपाळमधील काठमांडूमार्गे कुवेतमध्ये पळाला.

पुणे पोलिसांनी दिल्लीत हस्तगत केलेले ‘एमडी’ नेपाळमार्गे लंडनला पाठवण्यात येणार होतं. परंतु पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकानं १९ फेब्रुवारीला मध्यरात्री सोमवार पेठ परिसरात छापा टाकला. पोलिसांनी एका मोटारीतून आरोपी वैभव माने आणि अजय करोसिया यांच्याकडून एक कोटींचं पाचशे ग्रॅम ‘एमडी’ हस्तगत केलं.

तपासात हैदर शेखकडून अडीच कोटींचं ‘एमडी’ जप्त केलं. त्यानंतर परिसरात गोदामात छापेमारी केली. तेथून शंभर कोटींचं ‘एमडी’ जप्त केलं. कोणाला संशय येऊ नये, यासाठी गोदामातील मिठाच्या पोत्यांमध्ये ‘एमडी’ लपवण्याची शक्कल गुन्हेगारांनी लढवली होती. परंतु पोलिसांनी तस्करांचे मनसुबे उधळून लावले. त्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती वाढतच गेली.

दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील कारखान्यात ‘एमडी’चं उत्पादन घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या कारखान्यातून मुंबई, पश्चिम बंगाल आणि नेपाळमार्गे लंडन तर सांगलीतून गोव्यामध्ये अमली पदार्थाची तस्करी सुरू होती. पुणे शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील पब्ज, तारांकित हॉटेल्स आणि फार्म हाउसवर होणाऱ्या पार्ट्यांमध्ये ‘एमडी’ आणि इतर ड्रग्जचा पुरवठा केला जातो. त्यामुळे मोठ्या ड्रग्ज डिलर्सकडून छोट्या ड्रग्ज विक्रेत्यांना होणाऱ्या पुरवठ्याकडेही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.

पुण्याचे नवीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पुणे शहर ड्रग्जमुक्त करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर काही दिवसांतच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं यापूर्वी अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्याविरुद्ध कारवाई केली होती. त्या वेळी पुणे, नाशिक आणि मुंबई कनेक्शन समोर आले होते. मुंबई पोलिसांनी नाशिकमधील ‘एमडी’चा कारखाना उद्ध्वस्त केला होता.

एरवी रस्त्याच्या कडेला एखाद्याला अंडा भुर्जीची गाडी किंवा भाजीपाला विक्रीचं दुकान चालवायचं म्हटलं, तरी बराच आटापिटा करावा लागतो. परंतु पुण्याच्या ग्रामीण भागात अमली पदार्थाचे ‘उद्योग’ सुरू असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ (एमआयडीसी), अन्न व औषध प्रशासन (एफडीए), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि स्थानिक पोलिसांचं त्याकडे दुर्लक्ष झाले की काय, असा प्रश्न पडला आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मागील सुमारे दोन वर्षांपासून ड्रग्ज दिल्लीतून फूड पॅकेट्समधून कुरियरद्वारे विमानानं लंडनला पाठविण्यात येत होतं. त्यामुळं विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनाही चकवा देत तस्करी सुरू असल्याची बाब समोर आली आहे. या ड्रग्ज प्रकरणाचं कनेक्शन शोधण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड (एनसीबी) अशा राष्ट्रीय तपास यंत्रणांसह राज्य दहशतवादविरोधी (एटीएस) पथकही सहभागी झाले आहे.

एक ग्रॅम ‘एमडी’ २० हजार रुपयांना

आंतरराष्ट्रीय बाजारात एक ग्रॅम ‘एमडी’ची किंमत २० हजार रुपये इतकी आहे. तर एका किलो ‘एमडी’ची किंमत दोन कोटी रुपये इतकी आहे.

अमली पदार्थविरोधी कायदा (एनडीपीएस ॲक्ट)

या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपींविरुद्ध एनडीपीएस ॲक्टमधील कलम ८ (क), कलम २२ (क), कलम २९ अनुसार अमली पदार्थाचे उत्पादन, साठवणूक, खरेदी-विक्री, निर्यात करणे, चिथावणी देणे, कट रचणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. या कायद्यात कठोर कारावास, दंड आणि जन्मठेप अशा शिक्षेची तरतूद आहे. ड्रग माफियांकडून तरुण पिढीला लक्ष्य केले जात आहे. अशा ड्रग्ज माफियांवर आता कायद्याचा जरब बसविण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com