क्रिकेट असं खेळलं जायचं...

गोगुमल किशनचंद आणि डॉन ब्रॅडमन.
गोगुमल किशनचंद आणि डॉन ब्रॅडमन.

मी आता सांगणार आहे तसं चित्रं तुम्ही तुमच्या डोळ्यांसमोर आणू शकता का?
कमिन्स गोलंदाजी टाकतोय. पृथ्वी शॉ खेळतोय. (पृथ्वी शॉला आता हे नुसतं स्वप्नसुद्धा आनंद देऊन जाईल!), त्याची बॅट गलीकडून मोठी बॅकलिफ्ट घेऊन येते आणि स्लिपमधून ऑस्ट्रेलियाचा स्मिथ काळजीनं त्याला म्हणतोय : ‘‘वत्सा, बॅट-पॅडमध्ये गॅप राहतेय. तुझी बॅकलिफ्ट सरळ आणण्याचा प्रयत्न कर. नाहीतर बोल्ड होशील.’’
किंवा शुभमन गिल ९८ वर खेळतोय, दोन धावांसाठी आतुर झालाय. त्या धडपडीत चुका करतोय आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मागून म्हणतोय : ‘‘मुला, घाई करू नकोस. थोडं धीरानं घे. तुझं शतक पूर्ण होईल. शतकाच्या दारात आहेस, ती मेहनत फुकट घालवू नकोस.’’

असं नुसतं स्वप्न पडणं म्हणजे अंबानींना ‘उडपी’त जेवल्याचं स्वप्न पडल्यासारखं आहे; पण एकेकाळी अशा घटना घडत असत.  कारण, तो क्रिकेटसंस्कृतीचा भाग होता.
सन १९४६ मध्ये इंग्लंड इथं भारताचा एक खंदा फलंदाज रुसी मोदी फलंदाजी करत होता. 
ऑफ ड्राईव्ह मारताना त्याचा चेंडू दोनदा वर गेला. स्लिपमध्ये इंग्लंडचा वॉली हॅमंड हा व्यावसायिक-खेळाडू उभा होता. त्यानं स्लिपमधून रुसी मोदीचे कान उपटले. तो म्हणाला : ‘‘वाकून खेळ राजा, वाकून खेळ.’’ 
रुसीनं आज्ञा पाळली. पुढचे दोन कव्हर ड्राईव्हज्‌ जमिनीलगत गेले. लगेच हॅमंड म्हणाला : ‘‘ड्राईव्हज् हे असे मारले पाहिजेत.’’ 
त्या दोन ड्राईव्हज्‌नं हॅमंडच्या पाठीवर दोन वळ उठले नाहीत...पण त्याच्यातला वडीलधारा क्रिकेटपटू जागा झाला आणि एका तरुण खेळाडूला मोलाचा सल्ला मिळाला.
असाच एक किस्सा मला आपल्या माधव आपटे यांनी सांगितला होता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वेस्ट इंडीजमध्ये ते त्यांच्या पहिल्यावहिल्या कसोटीशतकाच्या उंबरठ्यावर होते. साहजिकच उंबरठ्यावरचं माप ओलांडून शतकाच्या घरात जायची त्यांना घाई होती. ते टेन्स होते आणि उतावळेसुद्धा. 

एकदोनदा फटका चुकल्यावर स्लिपमधून सर फ्रॅंक वॉरेलनं आपटे यांना सांगितलं : ‘‘घाई करू नकोस मुला, तुझं शतक होईल. थोडं डोकं शांत ठेव आणि त्या दोन धावांसाठी योग्य संधीची वाट बघ. माणूस प्रत्येक डावात शतकाच्या उंबरठ्यावर नसतो.’’ 

नंतर आपटे यांनी शांतपणे शतक पूर्ण केलं. समजा, आपटे यांनी स्लिपमध्ये वॉरेलकडे झेल दिला असता तर तो त्यानं काय सोडला असता काय? मुळीच नाही. त्यानं त्याचं कर्तव्य संघासाठी केलं असतं; पण एका तरुण फलंदाजाचं पहिलंवहिलं शतक चुकलं म्हणून त्याच्या मनाला लागलंसुद्धा असतं. कसोटीमधलं  आपटे यांचं ते एकमेव शतक ठरलं.

याचा अर्थ असा नव्हे की शतकाच्या उंबरठ्यावर आलेला फलंदाजासाठी अत्यंत मोठ्या मनानं सरसकट मदत केली जायची. त्या काळातले सगळेच क्रिकेटपटू हे ‘कर्ण’, ‘राजा हरिश्र्चंद्र’ होते असंही नाही. त्या वेळी कर्णाची कवचकुंडलं कपटानं हिरावून नेणारे ‘इंद्र’सुद्धा होते, ‘शकुनी’ही होते, ‘जयद्रथ’ही होते. झोपलेल्याला कापणारे ‘अश्वत्थामा’- ‘कृपाचार्य’ही होते. मात्र, त्याचबरोबर मोठ्या मनाची माणसंसुद्धा होती. मॅच जिंकण्यासाठीच खेळायची असते; पण त्या जिंकण्यात शान होती. नव्वदीत कुठल्याही फलंदाजाला बाद करण्याची एक नामी संधी असते आणि ती साधण्यासाठी वेगवेगळे डावपेच लढवले जात असत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं ठोकणारा सचिन तेंडुलकरसुद्धा नव्वदीत...२७ वेळा बाद झालाय. इतकी शतकं ठोकल्यावरसुद्धा सर डॉन ब्रॅडमनला ९० ते १०० हा रस्ता घाटाचा वाटायचा.

ब्रॅडमननं पहिल्या दर्जाच्या क्रिकेटमध्ये १०० शतकं ठोकलीत. त्यातलं शंभरावं शतक त्यानं भारताविरुद्धच्या दौऱ्यातल्या एका सामन्यात ठोकलं. ब्रॅडमन ९९ वर असताना कर्णधार लाला अमरनाथनं काय केलं असेल? सीमारेषेवर फील्डिंग करणाऱ्या गोगुमल किशनचंदला त्यानं बोलावलं आणि त्याला ओव्हर टाकायला सांगितली. सर्वजण अवाक् झाले. 

कारण, किशनचंद हा काही गोलंदाज नव्हता. क्वचित्‌प्रसंगी तो कधीतरी लेगस्पिन टाकायचा. त्या दौऱ्यात तर त्यानं एकही चेंडू टाकलेला नव्हता. ब्रॅडमननं पहिले काही चेंडू इतक्या काळजीपूर्वक आणि संशयानं खेळून काढले की जणू काही प्रत्येक चेंडू हा विषाचा प्याला असावा! शेवटी, एका चेंडूत कमी विष दिसलं, त्या वेळी त्यानं तो चेंडू मिडऑनला ढकलून एक धाव काढून शतक पूर्ण केलं. लाला अमरनाथला ज्या वेळी विचारण्यात आलं, ‘तू किशनचंदला ते अष्टक का दिलंस?’ (त्या वेळी ऑस्ट्रेलियात आठ चेंडूंची ओव्हर होती) तर तो म्हणाला : ‘‘तो काय टाकतो हे मलाच ठाऊक नव्हतं, तर ब्रॅडमनला कुठून कळणार?’’ 

हा एक अफलातून डावपेच होता.
सोबर्सनं जेव्हा लेन हटनचा ३६४ धावांचा विक्रम मोडला तेव्हा हनीफ महंमदनं, सोबर्स ३६४ धावांवर असताना, चक्क डाव्या हातानं चेंडू टाकला. काहीतरी वेगळं करावं आणि त्याला गोंधळात टाकावं आणि त्याचा विक्रम होऊ नये हा त्यामागचा उद्देश. आपल्या विरुद्ध शतक व्हावं किंवा विक्रम व्हावा असं कुठल्याही संघाला अजिबात वाटत नसतं. ते त्या काळातसुद्धा वाटत नव्हतं. कारण, शेवटी मॅच ही जिंकण्यासाठी खेळायची असते; पण म्हणून प्रतिस्पर्ध्याला शत्रू कुणी मानलं नाही. त्याला प्रतिस्पर्धीच मानलं. 

क्रिकेट किती बदललं आहे ना आता! पण त्या वेळी हे क्रिकेट असंच खेळलं जायचं...

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com