कवट्या बोलतात माझ्याशी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dwarkanath Sanjhgiri writes about Premnath Hindi film industry

राज कपूरला प्रेमनाथ त्याच्या ‘आग’ या सिनेमासाठी हवा होता. प्रेमनाथचे वडील इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस होते.

कवट्या बोलतात माझ्याशी...

राज कपूरला प्रेमनाथ त्याच्या ‘आग’ या सिनेमासाठी हवा होता. प्रेमनाथचे वडील इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस होते. त्यांना मुलाने सिनेमात काम करणं आवडत नव्हतं. त्यांना समजावून सांगण्यासाठी राज कपूर त्यांच्या घरी गेला.

तिथे पांढऱ्या शुभ्र वस्त्रात एक सुंदर मुलगी सतार वाजवत होती. समोर तबला होता. राज कपूर थेट तबल्यावर साथ देत बसला. ती प्रेमनाथची बहीण होती. कृष्णा नावं तिचं. राज कपूर तिथल्या तिथे तिच्या प्रेमात पडला. प्रेमनाथ त्याचा मेव्हणा झाला.

‘विक्षिप्त’ हा शब्द चपखल लागू होणाऱ्या काही व्यक्ती हिंदी चित्रपटसृष्टीत होत्या त्यातली एक म्हणजे प्रेमनाथ. एकेकाळचा हिंदी सिनेमातला हिरो आणि मग अत्यंत गाजलेला खलनायक. प्रेमनाथबद्दल मी एकच सांगेन मला हिरो म्हणून तो कधी आवडला नाही.

मी बरसात पहिला. बादल, आराम, आन पाहिला. पण देव, दिलीप, राज सारखा मनात रुळला नाही. तरीही पन्नासच्या दशकामध्ये सुरुवातीच्या काळात तो खूप लोकप्रिय होता. म्हणजे असं म्हणतात की राजकपूर, दिलीपकुमार आणि देवानंद पेक्षा तो जास्त पैसे घेत असे, असं मी एका ठिकाणी वाचलं, पण माझा विश्वास बसत नाही.

पण त्याचे हिरो म्हणून सिनेमा होते ते पुढे फारसे चालले नाहीत आणि त्यानंतर तो थेट गाजला तो खलनायक म्हणून. तिथे मात्र त्याने उत्तम अभिनय केला. कुणी असे म्हणतात की त्याच्यावर मुली प्रचंड लट्टू होत्या. त्याला पाहिल्यानंतर त्याला स्पर्श करायला जायच्या. खरं सांगू का मला प्रेमनाथ कधीही हँडसम वाटला नाही.

कुणाच्या रूपावरून बोलणं शिष्टसंमत नसतं कारण शेवटी रूप हे परमेश्वराने दिलेलं असतं पण सिनेमात काम करणाऱ्या नट नटी यांचा त्या बाबतीत अपवाद करावाच लागतो कारण तिथं चांगला चेहरा असणं ही हिरो किंवा हिरॉईनसाठी महत्त्वाची गोष्ट असते. त्याच्या चेहऱ्याचं वर्णन एकदा माझ्या काकीने सुंदर केलं होतं ती म्हणाली होती "काय तो प्रेमनाथ लोकांना आवडतो?

काय त्याचा चेहरा? मेदुवड्यासारखा आहे आणि मेदुवड्याच भोक म्हणजे त्याच तोंड." त्याच्या चेहऱ्याला एक विशिष्ट आकार नव्हता, जसा मेदुवड्याला नसतो. पण त्याच्यात काहीतरी वेगळं होत हे निश्चित. नाही तर एकाच वेळी मधुबाला आणि बीना राय या दोन अप्सरा, त्याच्यावर एकाच वेळी प्रेम करत बसल्या नसत्या.

‘बादल’ सिनेमाच्यावेळी प्रेमनाथ मधुबालाच्या प्रेमात पडला आणि औरत सिनेमाच्यावेळी बिना रायच्या. मधुबाला आणि त्याचं लग्न होऊ शकलं नाही. कारण अर्थात एक हिंदू आणि एक मुस्लिम वगैरे. एक कथा अशीही सांगितली जाते की मधुबाला त्याला घेऊन हाजी मलंगला मन्नत मागायला घेऊन गेली. तिथून परतताना तिने प्रेमनाथला विचारलं, " तू काय मागितलं?"

तो म्हणाला, " माझ्यावर दोन सुंदरी मरतात, मी कुणाशी लग्न करावं हा पेच सोडव." मधुबाला दुःखी झाली आणि चिडली. मग त्यानं बिना रायशी लग्न केलं. उद्ध्वस्त झालेली मधुबाला मग दिलीपकुमारच्या प्रेमात पडली. बीना रायशी लग्न केलं तरी मधुबाला प्रेमनाथच्या मनातून गेली नव्हती.

दिलीपकुमारने मधुबलाशी लग्न केलं नाही म्हणून प्रेमनाथ ‘दिलीप द donkey’ नावाचा सिनेमा काढायला निघाला होता. पण जेंव्हा मधुबाला गंभीर आजारी पडली, तेंव्हा प्रेमनाथ तिच्याकडे गेला आणि तिच्या उशीखाली त्याने एक लाखाचा चेक ठेवला. लक्षात घ्या १९६० या वर्षातले ते एक लाख होते. वर म्हणाला, " मी लग्न केलं असतं तर मीच खर्च केला असता ना?

पन्नासच्या दशकात शेवटी त्याचे चित्रपट चालले नाहीत. त्याने स्वतः काढलेले चित्रपट पडले. तो आधी निराश झाला आणि मग त्याच मानसिक संतुलन बिघडलं. मग त्याने जे काही केलं ते वेडेपणा किंवा विक्षिप्तपण या सदराखाली येतं.

तो काही वर्ष डोंगरात, वनात, हिमालयात फिरला. साधूचे भगवे कपडे घालायला त्याने सुरवात केली. गळ्यात विविध माळा आल्या. त्याला नावडणाऱ्या मंडळींना तो म्युन्सिपाल्टी असं संबोधत गेला. एक पत्रकार त्याची मुलाखत घ्यायला त्याच्या घरी गेला. प्रेमनाथ त्याला म्हणाला, " माझ्या भ्रमंतीत मला ५०० वर्ष जगणारे साधू भेटले.

त्यांच्यातला सर्वात तरुण १२५ वर्षाचा होता. त्याने मला सांगितलं तू खलनायक म्हणून मोठं पुनरागमन करशील. मला मिळालेल्या ज्ञानावर मी पुस्तक लिहिली. ती वाच पुस्तकं. पूर्वीचे सर्व तत्त्वज्ञ, द्रष्टे विसरून जाशील" मग आत जाऊन त्याने दोन कवट्या आणल्या आणि म्हणाला ‘‘ या माझ्याशी बोलतात.’’ तो पत्रकार स्वतःचे कपडे फाडत कसा बाहेर पडला नाही मला आश्चर्य वाटत.

न्यूटन त्याच्याबरोबर राहिला असता तर नक्की वेडा झाला असता. एक गोष्ट त्याच्या त्या साधूची खरी ठरली. विजय आनंदने त्याला ‘जॉनी मेरा नाम’मध्ये खलनायक केला आणि त्याच नशीब बदलून टाकलं. त्याच्या खलनायकी भूमिका एवढ्या चालल्या की तो वीस लाख रुपये मानधन घ्यायला लागला आणि वेडेपणा सुध्धा वाढला.

चार चार साधू, हार्मोनियम, घेऊन तो फिरायला लागला. एका पत्रकाराने लिहिलं आहे. हे सर्वजण ‘ढोंगी’ सिनेमाच्या शूटिंगसाठी पाचगणीला चालले होते. थंडी होती, सर्व स्वेटरमध्ये हा फक्त सहा साधू बरोबर उघड्या मर्सिडीज मध्ये उघडा बसला होता. दर दहा मिनिटांनी एका कोंबडीची मान पिळून बाहेर फेकायचा. देवासाठी दिलेला बळी आहे म्हणे हा.

तो फक्त त्याच्या बहिणीला कृष्णा कपूरला घाबरत असे. एका पार्टीत तो एका निर्मात्याच्या टकलावर तबला वाजवत होता. इतक्यात कृष्णा आली. तिने डोळे वटारले लगेच तो जेवला आणि निघताना त्याने त्या निर्मात्याला सांगितलं," पुढचा तबला, पुढच्या पार्टीत" बरसात नंतर त्याच आणि राज कपूरचं जमलं नाही. त्याने त्याला थेट बॉबीत घेतलं.

आणि प्रेमनाथने त्याला कमी छळले नाही. बॉबी सिनेमाच्या वेळी त्याला शॉट समजवायला एक माणूस गेला तेंव्हा त्याने काय केलं असेल? नळाखाली उघडाबंब बसला. समोर मद्याची बाटली. ते पित त्याने सांगितलं, ‘‘ऐकवा’’. ‘बॉबी’ सिनेमाच्या वेळी तो डबिंग करत होता. पाण्यात गटांगळ्या खाताना त्याला हाका मारायच्या होत्या.

त्याने राज कपूरच्या साहाय्यक दिग्दर्शकाला काय सांगितलं असेल. मला तो शॉटच्या वेळचा ड्रेस हवा आणि डबिंग स्टुडिओत पाणी भर. त्या शॉटमध्ये गेल्याशिवाय तो परिणाम येणार नाही. सर्व वेडे झाले. राज कपूरने सहाय्यक माणसाला सांगितलं तूच सांभाळ याला. इंडस्ट्रीत त्याचं देव आनंद, विजय आनंद, सुनील दत्त, सुभाष घई यांच्याबरोबर जमलं. बाकी त्याच्या भाषेत सर्व म्युन्सिपालटी.

कधी कधी त्याच्यातला चांगुलपणा अचानक बाहेर यायचा. एकदा त्याची गाडी सिग्नलला थांबली. सिग्नलजवळ भीक मागणाऱ्या एका मुलाने त्याला ओळखलं. त्याने काय केलं असेल? त्याने तिथल्या १००, १२५ लोकांना प्रत्येकी १०० रुपये वाटले. तो गेला तेंव्हा डब्बु कपूर म्हणाला, " नीट खात्री करून घ्या. नाहीतर त्याच हे नवं वेड असेल" पण तो उठला नाही...

टॅग्स :moviedramaartist