
खेलंदाजी
पुजारा ही एक वृत्ती आहे. ते फक्त एका व्यक्तीचं नाव नाही. निधड्या छातीनं वेगवान आणि उसळता चेंडू अंगावर घेणाऱ्या वृत्तीला पुजारा म्हणतात. ‘मेरी विकेट नही दूॅंगा’ हे लढाऊ वृत्तीनं बोलणाऱ्या बॅटला पुजारा म्हणतात. एखाद्या लढवय्याप्रमाणे छातीवर चेंडू घेणाऱ्या वृत्तीला पुजारा म्हणतात.
पुजारा ही एक वृत्ती आहे. ते फक्त एका व्यक्तीचं नाव नाही. निधड्या छातीनं वेगवान आणि उसळता चेंडू अंगावर घेणाऱ्या वृत्तीला पुजारा म्हणतात. ‘मेरी विकेट नही दूॅंगा’ हे लढाऊ वृत्तीनं बोलणाऱ्या बॅटला पुजारा म्हणतात. एखाद्या लढवय्याप्रमाणे छातीवर चेंडू घेणाऱ्या वृत्तीला पुजारा म्हणतात.
क्रिकेटच्या इतिहासात अशा अनेक ‘पुजारां’नी लाल चेंडूबरोबरचं युद्ध लढलं आहे.अगदी सर डॉन ब्रॅडमन यांनासुद्धा या अग्निदिव्यातून जावं लागलंय. कारण, कर्णाच्या वासवी शक्तीप्रमाणे हा घटोत्कच आवरण्यासाठी शरीरवेधी गोलंदाजीचं अस्त्र वापरावं लागलं होतं.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
आजच्या पिढीच्या कानावरून हनीफ महंमद हे नाव कदाचित गेलं असेल. ‘लिटिल मास्टर’ पहिल्यांदा त्याला म्हटलं गेलं होतं, मग सुनील गावसकरला आणि नंतर सचिन तेंडुलकरला. या हनीफनं सन १९५८ मध्ये वेस्ट इंडीजमध्ये ३३७ धावा केल्या. त्या करताना त्यानं तीन दिवस फलंदाजी करून सामना वाचवला.
वेस्ट इंडीजमध्ये तेव्हां रॉय गिलख्रिस्ट हा वेगवान गोलंदाज होता. पॉली उम्रीगर यांनी मला एकदा सांगितलं होतं : ‘‘गिलख्रिस्ट हा काही वेळा साईट स्क्रीनकडून स्टार्ट घ्यायचा. तो वेगवान होता. वेडा होता. फलंदाजाला जखमी करण्यात त्याला असुरी आनंद मिळायचा. त्या वेळच्या नोबॉल-नियमामुळे तो १८ यार्डांवरून चेंडू टाकायचा. बंपर वगैरेवर निर्बंध नव्हते. हेल्मेट, चेस्ट पॅड, थाय पॅड वगैरे गोष्टी फलंदाजाच्या स्वप्नातसुद्धा नव्हत्या...’’
मी एकदा त्यांना विचारलं होतं : ‘‘तीन दिवस फलंदाजी करताना शरीराची काय अवस्था होते?’’
ते हसून म्हणाले : ‘‘मी मैदानावरून पॅव्हेलियनमध्ये आलो की मसाजटेबलवर झोपायचो. मसाज झाला की हॉटेलवर जाऊन थेट झोपणं. जेवण बेडवर. सकाळी पुन्हा थोडा मसाज...मग मैदान.’’
अंगावर काळ्या-निळ्या डागांची मेडल्स घेऊन मैदानावरून परतायचं. ही ती वृत्ती, तिला आजची पिढी ‘पुजारावृत्ती’ म्हणते. भारतात ही वृत्ती जोपासणारी शाळा फार जुनी आहे. विजय मर्चंट हे या शाळेचे पहिले स्कॉलर! मग विजय हजारे, विजय मांजरेकर, चंदू बोर्डे, सुनील गावसकर, राहुल द्रविड वगैरे मंडळींनी या शाळेचं नाव उज्ज्वल केलं. दर्जाचा विचार केला तर या सगळ्यांच्या तुलनेत पुजारा हा काही स्कॉलर नव्हे.
पुजाराचं तंत्र यांच्याइतकं साजूक तुपातलं नाही. पुजारा हा घासू विद्यार्थी. रात्रीचा दिवस करणारा; पण पाय रोवून फलंदाजी करण्यात, शरीराला ढाल बनवण्यात कुठंही कमी नाही. अशी वृत्ती जोपासणारे अंशुमन गायकवाड, मोहिंदर अमरनाथ हेही होते. अगदी हनुमंत विहारी आणि आश्विननंही तीच वृत्ती दाखवली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या काळात आपल्याकडे आक्रमक फलंदाजांची शाळासुद्धा होती. सी. के. नायडू, मुश्ताक अली, उम्रीगर, पतौडी, वाडेकर, इंजिनिअर, अझरुद्दीन वगैरे हे त्या शाळेचे विद्यार्थी. मात्र, ते घेत असलेल्या जोखमीमुळे त्यांच्या फलंदाजीत सातत्य नव्हतं. सातत्य आणि आक्रमकता यांची सांगड पहिल्यांदा गुंडाप्पा विश्वनाथनं घातली. अतिशय आक्रमक फलंदाजी करून पंचावन्नच्या आसपास कसोटीसरासरी ठेवण्याची किमया सचिन तेंडुलकरनं दाखवली. आणि इथं नवीन शाळेची स्थापना झाली : सचिन तेंडुलकर स्कूल.
त्याच सुमारास वन डे क्रिकेट वाढलं. मग टी-२० क्रिकेट आलं...आणि शाळेची भरभराट झाली. या शाळेचे स्कॉलर विद्यार्थी म्हणजे, लक्ष्मण, सेहवाग, विराट. गिल त्याच अभ्यासक्रमात शिकतोय; पण अजून प्रायमरीत आहे.
त्यानंतर पाय रोवून केलेली फलंदाजी मागं पडली. परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
उदाहरण देतो.
हनीफची कहाणी मी वर सांगितलीच.
सन २००१ मध्ये कोलकत्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली अशीच परिस्थिती होती; पण हनीफनं जे केलं होतं त्याच्या नेमकं विरुद्ध असं इथं लक्ष्मणनं केलं. आग विझविण्यासाठी त्यानं पाणी वापरलं नाही. आगीचं उत्तर अधिक प्रखर आगीनं दिलं. द्रविडनं एका बाजूला थोडी ‘हनीफगिरी’ केली. ही आधुनिक स्टाईल आहे. ती मॅच आपण केवळ वाचवलीच नाही; तर चक्क जिंकलीही.
सन २००८ मध्ये इंग्लंडनं पावणेचारशेचं आव्हान दिल्यावर भारतीय संघ विजयासाठी गेला. लक्ष्मणच्या भूमिकेत सेहवाग होता. सचिननं आक्रमकता आणि बचाव यांचा सुंदर मेळ घातला आणि आपण मॅच जिंकलो. तोच प्रयत्न आपण सिडनीला केला; पण जिंकणं कठीण आहे हे ज्या वेळी लक्षात आलं त्या वेळी आपण ‘हनीफगिरी’ करून मॅच वाचवली; पण संधी मिळाल्यावर ब्रिस्बेनला आपण जिंकलो.
अशा वेळीसुद्धा कुणी तरी दीपस्तंभ व्हावं लागतं. ते पुजारानं केलं. आजच्या काळातही खेळपट्टी बेड अँड ब्रेकफास्टसाठी बुक करणारा फलंदाज लागतोच लागतो.
एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते. उसळते चेंडू खेळायचं पूर्वीच्या फलंदाजांचं तंत्र जास्त चांगलं होतं. हेल्मेट आणि इतर कवचकुंडलंं नसल्यामुळे उसळते चेंडू नीट सोडण्याची त्यांना गरजच होती. त्यामुळे त्यांचं ते तंत्र घोटलं गेलं. आता हेल्मेट आल्यामुळे फलंदाज जरा जास्त सेफ आणि बिनधास्त झाले आहेत. आज जे फटके डिविलियर्स खेळतो ते तसे खेळणं हेल्मेटशिवाय कठीण होतं.
उसळता चेंडू सोडून देणारा गावसकरसारखा फलंदाज मी पाहिला नाही. चेंडूला त्यानं शरीरापासून परस्त्रीसारखं दूर ठेवलं. फक्त एखाद्-दोन वेळा चेंडूनं त्याच्या शरीराचं निसटतं चुंबन घेतलंय.
पुजारानं अंगावर चेंडू घेतले म्हणून त्याच्या फलंदाजीची किंमत कमी होत नाही. हेल्मेटसह अनेक फलंदाज पळताना मी पाहिले आहेत. वेगवान शरीरवेधी गोलंदाजी खेळायला जिगर लागते. चेंडूचा मार सहन करायला जिगर लागते. आगीतून चालताना संयम दाखवताना जिगर लागते. त्या जिगरचं नाव पुजारा आहे.
(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)
Edited By - Prashant Patil