क्षण एक पुरे भाग्याचा!

Lala Amarnath and Jasu Patel
Lala Amarnath and Jasu Patel

काही वेळा सद्‌भाग्य दरवाजाबाहेर चोरपावलांनी येऊन कधी उभं राहतं हे आपल्याला कळतंच नाही. दरवाजा उघडला की सुखद धक्का बसतो. आपण कुण्या सचिन कुलकर्णीची वाट बघत असतो आणि दरवाजात सचिन तेंडुलकर हसत उभा असतो. 

थंगरासू नटराजनकडे पाहा. वय वर्षं २९. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपदार्पणाचं वय उलटलेलं. लग्नाच्या भाषेत सांगायचं तर प्रौढ कुमार. तरीही चार महिन्यांच्या आत त्याचं आयुष्य धडाधड बदलत गेलं. आधी त्यानं आयपीएल मोसम गाजवला. यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून त्याचं कौतुक झालं. २६ ऑक्टोबरला नेट गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी त्याची निवड झाली. तेवढ्यात त्या दौऱ्यावर जाणाऱ्या टी-२० च्या भारतीय संघातून दुखापतीमुळे वरुण चक्रवर्तीला बाहेर पडावं लागलं. त्याची जागा नटराजननं घेतली. त्यामुळे तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. नवदीप सैनीच्या पाठीच्या दुखण्यानं नटराजनला वन डेमध्ये संधी दिली आणि नंतर भारतीय ड्रेसिंग रूमचं कॅज्युएल्टी वॉर्डात रूपांतर झाल्यावर तो ब्रिस्बेनला भारतीय संघासाठी कसोटी सामनासुद्धा खेळला. यॉर्कर किंगनं शतकवीर लॅब्युशानची विकेट चक्क आखूड टप्प्याच्या चेंडूवर घेतली. 

सर्वकाही स्वप्नवत्. 
घडतं असं क्रिकेटमध्ये कधी कधी. असे कितीतरी किस्से मला ठाऊक आहेत. त्यातला एक सांगतो.  सन १९५९ ची गोष्ट आहे. रिची बॅनोचा ऑस्ट्रेलियन संघ भारतात आला होता. मालिकेतली पहिली कसोटी ऑस्ट्रेलियानं एक डाव आणि १२७ धावांनी जिंकली. दुसरी कसोटी होती कानपूरला. ती खेळपट्टी नव्यानं तयार केली गेली. त्या वेळी निवड समितीचे अध्यक्ष होते लाला अमरनाथ. कुशाग्र बुद्धीचे क्रिकेटपटू. भारताला ऑफ स्पिनची गरज होती म्हणून त्यांनी जसू पटेलची निवड केली. 

बरं, जसू पटेल काय करत होता तेव्हा? तो चक्क ३५ वर्षांचा होता. निवृत्तीचे विचार त्याच्या डोक्यात घोळत होते. तो घरी पहाटेच्या स्वप्नात होता. स्वप्नात बहुधा मधुबाला आली असावी! त्या काळी भारतातल्या निम्म्या पुरुषांच्या स्वप्नात मधुबाला यायची. ज्यांच्या स्वप्नात यायची नाही, ते खोटं बोलत आहेत असं मानलं जायचं किंवा त्यांच्याकडे संशयानं पाहिलं जायचं. 

जसू पटेलला घरच्या मधुबालानं स्वप्नातून उठवलं आणि सांगितलं, ‘तुझी भारतीय संघात कानपूर कसोटीसाठी निवड झालीय.’ त्यानं डोळे चोळले. कदाचित, साक्षात मधुबाला घरी आली असती तरी त्यानं एकवेळ विश्वास ठेवला असता; पण त्याची कसोटी संघात निवड झालीय या गोष्टीवर त्याचा विश्वास काही लवकर बसेना. 

मग तो कानपूरला गेला. भारतीय संघानं पहिल्याच दिवशी १६२ धावात राम म्हटलं. दुसऱ्या दिवशी लंचला ऑस्ट्रेलियाची धावसंख्या होती एक बाद १२८. ती पडलेली विकेटसुद्धा जसू पटेलनं काढली होती. लंचच्या वेळी लाला अमरनाथनं भारताचा कर्णधार गुलाबराय रामचंदला सांगितलं, ‘जसू पटेलचा एंड बदल. ज्या बाजूला डेव्हिडसन आणि मॅकिफच्या बूटमार्कचे खड्डे पडले होते ना, त्या बूटमार्क्समध्ये त्याला चेंडू टाकायला सांग.’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रामचंदला लाला अमरनाथचं म्हणणं ऐकावंच लागलं. लंचनंतर जसूचा एंड बदलला गेला आणि जसू पटेलचा पहिलाच चेंडू कॉलिन मॅक्डोनाल्डच्या बॅट आणि पॅडमधून स्टम्पवर गेला. हीरो खलनायकाच्या अड्ड्यावर घुमतो तसा. मग डावखुऱ्या नील हार्वेनं अर्धशतक पूर्ण केलं आणि ऑफ स्टम्प बाहेरचा चेंडू चक्क सोडला. तो थेट बाहेरून आतमध्ये स्टम्पवर घुसला आणि त्यानं यष्टीच्या कानाखाली आवाज काढला. म्हणजे अमरनाथचं जजमेंट किती योग्य होतं याची कल्पना येईल. त्यानंतर जसूनं ऑस्ट्रेलियाला २१९ धावांमध्ये खोलून टाकलं. जसू पटेलनं पहिल्या डावामध्ये ६९ धावांत नऊ बळी घेतले. दहावा का मिळाला नाही असा प्रश्न तुम्हाला पडला का? बहुधा ‘सद्‌भाग्य’ हे अजीर्ण होऊ नये म्हणून कडू गोळी बरोबर घेऊन येतं. ओ’नीलचा सोपा झेल बापू नाडकर्णींनी मिड विकेटला सोडला. नियतीनं त्या ओ’नीलची विकेट बोर्डेंच्या फुलटॉसवर लिहून ठेवली होती. म्हणून ती जसूला मिळाली नाही. थोडं आधी इंग्लंडच्या ऑफस्पिनर जिम लेकर यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध  एका डावात १० बळी घेतले होते. नशिबानं कंजूसपणा केला. 

दुसऱ्या डावात भारतानं ऑस्ट्रेलियापुढं २२५ धावांचं आव्हान जिंकण्यासाठी ठेवलं. दुसऱ्या डावात पॉली उम्रीगर आणि जसू पटेल यांनी ऑस्ट्रेलियन संघ १०५ धावांत वळकटी गुंडाळावा तसा गुंडाळला. जसू पटेलनं १२४ धावांमध्ये त्या कसोटीत १४ विकेट्स घेतल्या आणि भारतीय संघानं ती मॅच ११९ धावांनी जिंकली. भारताचा तो ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी विजय होता. शेक्सपीअरनं म्हटलंय, One crowded hour of glorious life is worth than an age without a name. अचानक दारात उभं राहिलेलं सद्‌भाग्य जसू पटेलला तो ‘क्राउडेड अवर’ देऊन गेलं. त्यानंतर तो मालिकेत आणखी दोन सामने खेळला. त्याला हार्वे, ओनीलनं धू धू धुतला आणि मग सगळंच संपलं. 

त्यानं अख्ख्या कसोटी कारकीर्दीत २९ बळी घेतले होते. त्यातले हे १४ एका मॅचमध्ये. म्हणजे त्याचा ‘क्राउडेड अवर’ किती मोठा होता याची कल्पना येईल. या परफॉर्मन्समुळे त्याला पद्मश्री मिळाली. विजय हजारे यांच्यानंतर पद्मश्री मिळवणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटपटू होता. क्रिकेटमध्ये कधी कुणाला जॅकपॉट लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आशा कधीही सोडू नये.

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com