पंतने घेतला वसा सोडू नये...

द्वारकानाथ संझगिरी dsanzgiri@hotmail.com
Sunday, 14 February 2021

खेलंदाजी
हृद्रोगतज्ज्ञाकडे गेल्यावर तो रुग्णांना नेहमी सांगतो : ‘तेलकट खाऊ नका. सिगरेट बंद. अमुक बंद, तमुक बंद...’
त्यात यापुढं एक भर पडू शकते...‘रिषभ पंतची फलंदाजी पाहू नका. तुमच्यासाठी ती हानिकारक आहे.’

हृद्रोगतज्ज्ञाकडे गेल्यावर तो रुग्णांना नेहमी सांगतो : ‘तेलकट खाऊ नका. सिगरेट बंद. अमुक बंद, तमुक बंद...’
त्यात यापुढं एक भर पडू शकते...‘रिषभ पंतची फलंदाजी पाहू नका. तुमच्यासाठी ती हानिकारक आहे.’
त्याची फलंदाजी म्हणजे डोळे दिपवणारी रोषणाई सुरू असते आणि खाडकन् फ्यूज जातो. ते नैराश्य पचवायची ताकत तुमच्या हृदयात हवी.
पंत फलंदाजी करताना फलंदाज बाद होतो हे त्याला माहीत नसावं असं वाटतं.

चेन्नई कसोटीची भारताची पहिली इनिंग आठवा. समोरच्या संघानं पावणेसहाशे धावा केल्या आहेत. आपले चार बळी गेले आहेत. धावफलक अजून ८० च्या आत रेंगाळतो आहे, याचा दबाव कुठं त्याच्यावर जाणवला? त्याची सुरुवात पाहून त्यानं धावफलक वाचलेला नसावा असं वाटलं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चेन्नईला, पहिल्या डावात त्याच्या ऑफ स्टंपबाहेर जो पॅच होता, त्यात चेंडू टाकण्यासाठी डावखुऱ्या फिरकी लीचकडे कर्णधार रूटनं चेंडू दिला. रूटची अपेक्षा, पंतच्या मुसक्या बांधल्या जातील. यानं त्यालाच फेकून दिलं. नाक शिंकरून टिश्यू डस्टबिनमध्ये फेकावा तसं.

मला एक जुना प्रसंग आठवला. चेन्नईलाच मॅच होती. समोर इंग्लंडचा संघ होता. दुसऱ्या डावात जिंकण्यासाठी भारताला फक्त ८० धावा हव्या होत्या. तरी विकेट्स गमावून भारतीय संघ तिथवर पोहोचायला धापा टाकत होता. सलीम दुराणीनं गिफोर्ड नावाच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाला पुढं जात दोन उत्तुंग षटकार मारले. टार्गेट जवळ आलं. भारतानं मॅच जिंकली. त्यानंतर काही वर्षांनी सलीम माझा मित्र झाल्यावर मी त्याला बावळटपणे विचारलं : ‘‘सलीमभाई, डर नही लगा?’’
तो म्हणाला :‘‘मुझे उस में डर पैदा करना था. उसे दिखाना था बॉस कौन है.’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंतनं नेमकं तेच केलं. सीमारेषेवर क्षेत्ररक्षक ठेवूनही त्यानं त्यांच्या डोक्यावरून फटके मारले. हा जाणीवपूर्वक दाखवलेला उद्दामपणा होता.

पुन्हा एक जुना किस्सा आठवला. सर डॉन ब्रॅडमनचा. एकदा विनू मंकडनं ब्रॅडमनला मिड ऑन ठेवला. ब्रॅडमननं त्याच्या डोक्यावरून त्याला मारलं. त्यानं त्याला थोडं मागं सरकवलं. त्यानं त्याच्या डोक्यावरून चेंडू मारला. मंकडनं त्याला सीमारेषेवर ठेवलं. त्यानं प्रेक्षकांत मारलं. त्यानं बॅटनं दाखवून दिलं, त्यापलीकडे क्षेत्ररक्षक ठेवता येत नाही. मंकड हा ऑल टाईम ग्रेट फिरकी गोलंदाज होता. मी चुकूनही ब्रॅडमनची आणि पंतची तुलना करत नाही. प्रवृत्तीबद्दल बोलतोय.
प्रवृत्ती मात्र तीच!

कुणी तरी लिहिलेलं सुंदर वाक्य सन १९७० च्या दशकात मी वाचलं होतं. त्या वेळी अस्सल साहसी आक्रमक फलंदाज कमी आणि नांगर टाकणारे, बचावात्मक जास्त होते. ते वाक्य असं होतं : A stroke maker may fail once. He may fail twice.  But he cannot fail always. And the success of the stroke maker is the greatness of the game.
सेहवाग, पंत यांसारखे फलंदाज पाहिले की त्या वाक्याची आठवण होते.

मला त्याची इंग्लंडमधली पाहिली कसोटीखेळी आठवते. फटके विसरल्यासारखा तो खेळला. प्रेस बॉक्समध्ये मला कळेना, की मी कारंजासारखा उसळणारा पंत पाहतोय की संयमी पाद्री?आणि दुसऱ्या डावात, सर्वच फटके एकाच क्षणात जगाला दाखवायच्या नादात तो फसला. नंतर ‘ओवल’वर शतक ठोकलं तेव्हा त्याला समतोल सापडलाय असं वाटलं. मग सन २०१८ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो चांगला खेळला. पुन्हा कुठंतरी हरवला...पण ऑस्ट्रेलियात या वेळी तो वेगळं, प्रगल्भ रूप घेऊन आला. त्यानं आक्रमणाचा वसा सोडला नाही; पण आक्रमण बेबंद नव्हतं. त्यात एक मेथड होती. चेन्नईलासुद्धा त्यानं पहिल्या डावात बेस आणि आर्चरच्या चांगल्या चेंडूला आदर दाखवला. आक्रमक फलंदाजाला कधीतरी बॅटची ढाल करावी लागते. विव्ह रिचर्डस् किंवा सोबर्सलाही ते चुकलं नाही; पण त्यांच्यासारख्या गुणवत्तेच्या आणि प्रवृत्तीच्या फलंदाजांवर अशी वेळ कमी येते.
तो आपल्याला सुंदर स्वप्नात घेऊन जातो आणि अचानक क्लायमॅक्सवर स्वप्न भंगलं की आपण निराशेनं म्हणतो :
‘कशाला हा फटका खेळायला गेला?’
आधी अशाच फटक्यांवर त्यानं धावा लुटलेल्या असतात. तेव्हा त्या लुटीच्या आनंदात आपणही सहभागी असतो. एक लक्षात ठेवायला हवं, की आगीशी खेळणारा माणूस कधीतरी भाजणारच. आगीशी खेळणं आपल्याला भावत असेल तर भाजणं स्वीकारलं पाहिजे.

पंतच्या फलंदाजीच्या तंत्रात अजून सुधारणेला वाव आहे; पण त्याच्या प्रवृत्तीत कुण्या कोचनं बदल करू नये. कारण, त्याच्याकडे मॅच फिरवायची ताकद आहे. जिमी अँडरसननं दुसऱ्या डावात दाखवून दिलं, की महान गोलंदाज त्याला कसा खेळवू शकतो आणि ‘मामा’ करू शकतो. तो नव्वदीत चार वेळा बाद झाला. मला वाईट वाटलं. त्यालाही ते चुकल्याचा आनंद होत नसतो ना? तो मोहात फसतो. नव्वदीत मेनका कशी टाळायची हे त्याचं त्याला उमगेल.

काही माणसं आपले पैसे बचतखात्यात ठेवतात. त्यांना जोखीम नको असते. पुजारा तसा फलंदाज आहे. पंत हा शेअर बाजारात खेळणारा फलंदाज आहे. त्यामुळे उसळणं, कोसळणं आलं; पण पंतला पाहून चेन्नईत पुजारालासुद्धा, शेअरमध्ये पैसे गुंतवावेत असं वाटलं. तो नेहमीपेक्षा जास्त आक्रमकपणे, फिरकी गोलंदाजांना पुढं जात खेळला. जयसूर्या, सेहवाग, गिलख्रिस्ट, लारा यांनी शेवटपर्यंत आपला नैसर्गिक खेळ बदलला नाही.
पंतनं त्याच मार्गावरून जावं. घेतला वसा सोडू नये.

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dwarkanath sanzgiri writes about rishabh panth