यशस्वी हिरो पण...

प्रदीपकुमारला परमेश्वराने पृथ्वीवर पाठवताना, छोट्या कोथिंबिरीच्या पिशवीत मावेल एवढा अभिनय दिला, तरी लोकप्रिय गाण्यांचं गाठोडं मात्र अर्जुनाच्या भात्यासारखं अक्षय दिलं.
Actor Pradeepkumar
Actor Pradeepkumarsakal
Summary

प्रदीपकुमारला परमेश्वराने पृथ्वीवर पाठवताना, छोट्या कोथिंबिरीच्या पिशवीत मावेल एवढा अभिनय दिला, तरी लोकप्रिय गाण्यांचं गाठोडं मात्र अर्जुनाच्या भात्यासारखं अक्षय दिलं.

प्रदीपकुमारला परमेश्वराने पृथ्वीवर पाठवताना, छोट्या कोथिंबिरीच्या पिशवीत मावेल एवढा अभिनय दिला, तरी लोकप्रिय गाण्यांचं गाठोडं मात्र अर्जुनाच्या भात्यासारखं अक्षय दिलं. इतकी गोड गाणी त्याने पडद्यावर गायली की, त्याच्या रक्तातली साखर वाढली असेल तर आश्चर्य वाटायला नको. रक्तातली साखर वाढण्याचं आणखीन एक कारण म्हणजे, ती गोड गाणी अत्यंत गोड आणि सौंदर्यशाली नायिकांबरोबर त्याने गायली. त्यांची नावं तरी पाहा - मीनाकुमारी, मधुबाला, बीना राय, वैजयंतीमाला, माला सिन्हा वगैरे वगैरे ! त्याने प्रचंड यशसुद्धा पाहिलं आणि मग तेवढंच अपयशसुद्धा. त्याचं कौतुक झालं आणि त्याची निर्भर्त्सनासुद्धा झाली. ‘मी प्रदीपकुमारचा सॉलिड फॅन होतो’ असं सांगणारा एकही शौकीन मला आजपर्यंत भेटला नाही. पण, त्याचा अभ्यास करताना मला असं जाणवलं की त्यालाही फॅन होते. लोकांना हापूस आंबा आवडतो म्हणून जांभूळ कोणाला आवडतच नाही असं नाही.

प्रदीपकुमारचे वडील सत्येंद्रनाथ बटकल हे जिल्हा न्यायाधीश होते. त्यांच्या घराण्यात अनेक आयएएस ऑफिसर होते. वडिलांची इच्छा होती की प्रदीपकुमारने वकील व्हावं; पण चित्रकला आणि शिल्पकला हे प्रदीपकुमारचे आवडते विषय. प्रदीपकुमारची शरीरयष्टी आणि चेहरा कुठल्याही शिल्पकाराला शिल्पकलेचा विषय वाटू शकला असता. कदाचित देवाने त्याला न दिलेले एखाद - दोन भाव शिल्पकाराला त्याच्या चेहऱ्यावर दाखवता आले असते. प्रदीपकुमारला स्वतःला वकील व्हायचं नव्हतं, त्याला अभिनेता व्हायचं होतं. तो अभिनेता झाला नाही; पण तो हिरो मात्र नक्की झाला.

प्रदीपकुमारने कॉलेज संपल्यावर कलकत्त्याच्या अरोरा स्टुडिओमध्ये असिस्टंट कॅमेरामन म्हणून काम केलं. त्याला तिथलं वातावरण आवडलं नाही. मग त्याने कलकत्त्याच्या ग्रेट ईस्टर्न हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलं. त्याच सुमारास कलकत्त्याच्या हौशी ग्रुपच्या नाटकात काम करायला सुरुवात केली. एका नाटकाला बंगालमधले विख्यात दिग्दर्शक देवकी बोस आले होते. प्रदीपकुमारने त्यांना सांगितलं, ‘मला तुमचा साहाय्यक दिग्दर्शक करा.’ त्यांनी प्रदीपकुमारला सांगितलं, ‘तू अभिनय कर, तुला तिथे वाव मिळेल.’ प्रदीपकुमारला आपल्यावर लादणारा खरा गुन्हेगार कोण आहे, ते तुम्हाला कळलं असेल. मुख्य म्हणजे, प्रदीपकुमारने त्यांचा सल्ला अत्यंत गंभीरपणे घेतला. बंगालीमधले ‘विष्णुप्रिया’, ‘स्वामी’सारखे न्यू थिएटर्सचे त्याचे चित्रपट लोकप्रिय झाल्यावर त्याला हिंदी चित्रपटांतून आमंत्रण आलं.

प्रदीपकुमार मुंबईत आला, त्या वेळेला तो चर्चगेटला फिरदोस नावाच्या गेस्ट हाउसमध्ये राहत होता. बंगाली माणूस मराठी माणसासारखा नाही. मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला आपला स्पर्धक समजतो. बंगाली माणूस दुसऱ्या बंगाली माणसाला मदत करतो. शशधर मुखर्जींनी त्याला आपला शिष्य केलं. १९५२ मध्ये त्याने त्याला गीता बालीसमोर ‘आनंद मठ’ मध्ये भूमिका दिली. मुखर्जींना शिल्पकलेची आवड असावी, कारण त्यांनी प्रदीपकुमारला संधी तर दिलीच, वर भारत भूषणला त्या सिनेमात घेतलं. दोन असामान्य शिल्पं एकाच सिनेमात घेण्यासाठी नक्कीच शिल्पकलेचं ज्ञान असलं पाहिजे. प्रदीपकुमार नशीबवान होता. त्याला मिळालेले पहिले चित्रपट म्हणजे ‘आनंद मठ’, ‘अनारकली’ आणि नागीन. तिन्ही सुपरडुपर हीट सिनेमे; पण त्यांचा प्रदीपकुमारशी फारसा संबंध नाही. ‘अनारकली’ चालला तो सी. रामचंद्र आणि लता मंगेशकर यांच्यामुळे. बीना राय त्यात खरंच लावण्यवती दिसते. नंतर आला नागीन. ती ‘नागीन’ची बीन, हेमंत कुमारचं संगीत, लतादीदींची गाणी आणि कोवळी वैजयंतीमाला सिनेमात असल्यामुळे प्रदीपकुमारला आपण न रडता स्वीकारलं; फुलाबरोबर देठ किंवा आंब्याबरोबर बाठा स्वीकारतो तसं. राज कपूरने त्याला ‘जागते रहो’त घेतलं आणि शांताराम ह्यांनी ‘सुबह का तारा’मध्ये.

‘अनारकली’मध्ये प्रदीपकुमारने सलीम म्हणजे जहाँगीरची भूमिका केली आणि तिथून त्याने स्वर्गस्थ राजांना पडद्यावर आणलं. मग राम सोडला नाही, अर्जुन सोडला नाही आणि इतिहास जरी म्हणत असला की, मोगलाईचा ऱ्हास हा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सुरू झाला, तरी स्वर्गस्थ मुघल राजे म्हणतात की, प्रदीपकुमारने सलीम साकारल्यापासून त्यांचा खरा ऱ्हास सुरू झाला. प्रदीपकुमारने पुन्हा १९५४ मध्ये ‘आदिल ए जहाँगीर’ सिनेमात जहाँगीरची भूमिका केली. १९६७ मध्ये नूरजहाँ या चित्रपटात तो पुन्हा सलीम म्हणजे जहाँगीर झाला. त्यानंतर सलीमने अल्लाकडे स्वर्गात साकडं घातलं. ‘मला जन्नत मिळाली नाही तरी चालेल; पण या प्रदीपकुमारला चाप लावला पाहिजे.’

अल्लाने प्रदीपकुमारला दृष्टांत दिला की नाही मला ठाऊक नाही; पण त्याने नंतर सलीमला सोडलं आणि त्याच्या मुलाची म्हणजे शहाजहाँची भूमिका केली. मुख्य म्हणजे, या वर सांगितलेल्या सर्व सिनेमांमध्ये गाणी तुफान सुंदर होती, गोड होती. ‘ताजमहाल’चं रोशनच संगीत म्हणजे टप टप पडणारं मधाचं पोळं होतं. मग ‘ताजमहाल’मधलं ‘पाव छु लेने दो’ किंवा ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ हे गाणं असो. शेक्सपिअरच्या नाटकात काम करणाऱ्या एका नटीने असं म्हटलं की, शेक्सपिअरच्या नाटकात काम करणं खूप श्रमाचं असतं, कारण राजा सोडला तर कुणालाच बसायला मिळत नाही.

प्रदीपकुमार इंग्लिश असता, तर त्याला नाटकात काम करणं फायदेशीर ठरलं असतं. कारण त्याने बऱ्याचदा राजाचीच भूमिका केली. एक मान्य करायला हवं की, त्याला राजाचं व्यक्तिमत्त्व होतं. चांगली उंची होती, रुंद खांदे होते, तलवारकट मिशी होती आणि त्याला इंग्लिशमध्ये पीचहनी कॉम्प्लेक्सन म्हणतात तसं कॉम्प्लेक्सन होतं. भव्य कपाळ, मागे जाणारे केस, त्यामुळे तो राजा शोभायाचा. तो श्रीमंत माणूस शोभला, फाटका गरीब नाही. तो जेवढा फायफाय सिगारेट ओढताना शोभायचा, तेवढाच तो राजा म्हणून हुक्का ओढताना शोभायचा. त्याला राजाचे कपडे शोभायचे. मी ऐतिहासिक सिनेमातला राजा म्हणून देव आनंद, राज कपूरला डोळ्यांसमोरसुद्धा आणू शकत नाही. देव आनंदचा एक प्रयत्न फसलाच. शम्मी कपूरने ‘राजकुमार’मध्ये राजकुमार रंगवलाय; पण तो ब्रिटिशांच्या काळातला, मोगलकालीन नाही.

दिलीप कुमारने ‘मुगल-ए-आझम’मध्ये सलीम केला; पण ‘मुगल-ए-आझम’ हा मला क्रमाने मधुबाला, पृथ्वीराज कपूर, लता आणि नौशाद यांचा सिनेमा वाटला. मग दिलीप कुमार येतो. प्रदीप कुमारला आणखी एका गोष्टीचं क्रेडिट द्यायला हवं, त्याचं उर्दू चांगलं होतं. सुरुवातीला तो हिंदी चित्रपटसृष्टीत आला, तेव्हा त्याच्या बंगाली उर्दूची चेष्टा होत असे. मग त्याने उर्दूचे अभ्यासक नियाज हैदर साहेबांची शिकवणी ठेवली. अनारकलीतल्या सलीमच्या भूमिकेसाठी शम्मी कपूर आणि श्याम या नटांनीसुद्धा ऑडिशन दिली होती; पण भूमिका प्रदीपकुमारला मिळाली, कारण त्याचं व्यक्तिमत्त्व आणि उर्दू. त्याने फक्त मुघल राजांची भूमिका केली असं नाही, इतर राजे, नवाबही त्याने त्याच्यापरीने रंगवले. ‘चित्रलेखा’ या गुप्तकालीन चित्रपटात त्याने सामंत ब्रिज गुप्ताची भूमिका केली आणि त्याच्या वाटेला हिंदी सिनेमातलं साहीरने लिहिलेलं सर्वोत्कृष्ट गीत आलं. ‘मन रे तू काहे ना धीर धरे’ फार सुंदर तत्त्वज्ञान या गाण्यात आहे.

फिल्म इंडस्ट्रीत प्रेमसंबंध तयार होणार हे हायड्रोजन, ऑक्सिजन एकत्र आल्यावर पाणी तयार होण्याएवढं नैसर्गिक आहे. प्रदीपकुमार तर म्हणायचा की रोमँटिक प्रसंगाचा हँगओव्हर बराच काळ राहतो. मीनाकुमारी आणि माला सिन्हात तो खूप गुंतला होता. मधुबालासुद्धा त्याच्या प्रेमात होती. हे माला सिन्हाला कळल्यावर केवळ मालकी हक्काच्या भावनेतून मालाने मधुबालाच्या थोबाडीत मारली. सिनेमातील अशोक कुमार, मीनाकुमारी आणि प्रदीप कुमार हा त्रिकोण १९५५ ते ६२-६३ पर्यंत सातत्याने पडद्यावर दिसायचा. प्रदीपकुमारच्या आईला एकदा स्वप्नात तो राजा हरिश्चंद्राच्या वेशात दिसला, त्यामुळे हिरो म्हणून त्याने ‘हरिश्चंद्र तारामती’ हा शेवटचा चित्रपट केला. प्रदीपकुमार राजासारखा राहिला; पण हे जग सोडताना मात्र तो दुःखी माणूस होता.

गाड्यांवर त्याने प्रचंड पैसे खर्च केले. १९६९ मध्ये त्याने चरित्र अभिनेता व्हायचं ठरवलं आणि मग सिनेमासृष्टीतून तो बाहेरच गेला. त्याची बायको गेल्यावर त्याच्या तीन मुली आणि मुलांनी त्याला सोडून दिलं. कलकत्त्यातल्या एका बिजनेसमनने त्याला राहायला एक फ्लॅट दिला आणि एक समीर नावाचा त्याचा चाहता, त्याने त्याचा शेवटचा आजार काढला. मुघलकालीन राजांच्या भूमिका करणारा हा राजबिंडा हिरो शेवटच्या मोगल राजा जफरसारखाच कफल्लक होऊन गेला.

(लेखक चित्रपट व क्रीडाक्षेत्राचे अभ्यासक आहेत. या दोन्ही विषयांवर त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com