नीरोचं फिडेल मधुर की कर्णकटू?

नीरोचं फिडेल मधुर की कर्णकटू?

आपल्या देशात कोरोनाचा अडथळा दोन गोष्टींना येत नाही. एक, निवडणूक. दुसरी, आयपीएल. निवडणूक हा माझा लिहिण्याचा विषय नाही. आयपीएल हा नक्की आहे.

आयपीएल हा सध्या जागतिक क्रिकेटचा मुकुटमणी आहे. परवा माझा लाडका डेव्हिड गॉवरसुद्धा म्हणाला : ‘इंग्लिश क्रिकेटबोर्ड जागं झालं आणि आयपीएलला खेळाडूंना जाण्यासाठी परवानगी द्यायला लागलं.’ हे एकंदरीत बरं झालं. इंग्लिश खेळाडू पांढऱ्या चेंडूच्या खेळातलं त्यांचं कौशल्य अधिक सक्षम करू शकले. बेरस्ट्रोचं उदाहरण तर आता जगापुढं आहेच. हा मुकुटमणी आपल्या हक्काचा असला तरी तो आता जगाला प्यारा आहे. 

ज्या काळात कोरोनाची लाट ओसरत होती तेव्हा रणजी ट्रॉफी रद्द झाली. किती कंठ ओरडले? फार कुजबुजसुद्धा झाली नाही. टाकलेल्या बायकोला कोण विचारतं? रणजी ट्रॉफी देशभर पसरली असल्यामुळे आणि खेळाडूंची संख्या खूप असल्यामुळे तिला ‘बबल’च्या गणितात बसवणं कठीणच आहे; पण ती जर सोन्याचे दाणे देत असती ना, तर कठीण गणितही रँग्लर आणून सोडवलं गेलं असतं. 

आयपीएल ही सर्वांना हवी आहे. कारण, ती एक इंडस्ट्री आहे. आयपीएल नावाचा केकचा तुकडा सर्वच जण खातात. क्रिकेट नियामक मंडळ खातं. खेळाडू, सपोर्ट स्टाफ, परदेशी खेळाडू, १९ वर्षांखालील खेळाडू खातात. चॅनेल, समालोचक, हॉटेल-इंडस्ट्रीही खूश असते. अगदी मालकांपर्यंत सर्वांना हा केक मिळतो. प्रेक्षक प्रत्यक्ष केक खात नाहीत; पण त्यांनाही केकची चव घेतल्याचा व्हर्च्युअल आनंद मिळतो.
 
आयपीएलचं बिझनेस मॉडेल मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो. खेळाडूंना किती पैसे मिळतात ते मी सांगायची गरज नाही. ते तुम्हाला ठाऊकच आहे. विचार करा ना, विराट कोहली परवाच ओरडत होता की, ‘बबलमध्ये आमचा जीव घुसमटतो.’ मात्र, तरीही सहा महिन्यांत तो दुसरी आयपीएल खेळायला तयार आहे. त्यांचं म्हणणं होतं की, आंतरराष्ट्रीय इतर जे दौरे आहेत ते कोरोनाचा विचार करून कमी करावेत. आयपीएलमध्ये बदल व्हावा असं त्याला अजिबात वाटत नाही. आणि ते साहजिकच आहे. तो काही संत नाहीये. आपण विराट असतो तरी आपणही हाच विचार केला असता. 

तर सांगत काय होतो...हां,  चॅनेल आणि टायटल स्पॉन्सरशिपमधून जे पैसे येतात ते ६०/४० असे मंडळ आणि संघमालक यांच्यात वाटले जातात. मंडळालाही खर्च असतो आणि संघमालकालाही असतो. मी अगदी खोलात जात नाही; पण मी तुम्हाला एवढचं सांगतो की, १४० ते १५० कोटी गुंतवलेल्या संघमालकांना सर्वसाधारणपणे ७० ते ८०  कोटींचा फायदा विविध मार्गांनी दोन महिन्यांत होतो. म्हणजे खेळाडूंना चांगल्यापैकी पैसे मिळतात. बोर्डाला मिळतात. संघमालकांना मिळतात. कॉमेंटेटर्सना मिळतात. मग कोरोनाच्या ‘यत्किंचित’ कारणासाठी अशी स्पर्धा कशी रद्द होऊ शकेल? बरं, या वेळी ती पुढं ढकलणंही त्रासाचं आहे. कारण, मग आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये बरेच बदल करावे लागतील. 

पण या वेळी एक गोष्ट पुन्हा जाणवायला लागलीय की, हा बबल वाटतो तेवढा सुरक्षित नाही. कोरोनाचा व्हायरस चोरवाटेनं शिरतो. एकामागोमाग एक असे कधी खेळाडू, कधी मैदानावरचे माळी, कधी सपोर्ट स्टाफ, कधी आणखी कुणी हे पॉझिटिव्ह होताहेत. खूप काळजी घेतली जाते; पण एक मानवी चूक आख्ख्या समूहाला पॉझिटिव्ह करू शकते. त्यामुळे आयपीएलपुढं हे मोठं आव्हानच राहणार आहे, विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी आयपीएल खेळताना. त्यांना कदाचित शहरं बदलावी लागतील; पण काही विशिष्ट शहरं सोडली तर ती सतत बदलता येत नाहीत. कारण, आयपीएल भरवण्याची तयारीही लागते ना. तिथं इन्फ्रास्ट्रक्चर असावं लागतं. मिझोराममध्ये कोरोनाचे रुग्ण नाहीत म्हणून काही थेट तिथं जाऊन आयपीएल खेळवता येत नाही. मूलभूत सोई कुठून आणायच्या हा प्रश्न असतो. अर्थात्, आयपीएल खेळावं की खेळू नये याकडे पाहण्याच्या दोन बाजू आहेत.

एक म्हणजे, कोरोनामुळे इतर सर्व गोष्टी पुढं ढकलल्या गेलेल्या आहेत. म्हणजे क्रिकेट जर सोडलं तर इतर खेळांतल्या स्पर्धासुद्धा बऱ्याचशा पुढं ढकलल्या गेलेल्या आहेत किंवा अडगळीत पडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं काय करायचं हा प्रश्न आहे. ऐन उमेदीच्या काळात ते अंधारात चाचपडताहेत. छोटे दुकानमालक, छोटी रेस्टॉरंट्स, गाडीवर खाद्यपदार्थ वगैरे विकणारे, स्टॉल्स, हातावर पोट असणारी इतर मंडळी यांना कुठलाही ‘बबल’ नाहीये. आर्थिक आणि वैद्यकीय सुरक्षितताही त्यांना नाही. अनेकांसाठी प्रत्येक येणारा दिवस हे एक जगण्याचं आव्हान आहे. अशा वेळी आयपीएलचा उत्सव भरवणं, अगदी प्रेक्षकांशिवाय का होईना, हे नैतिकदृष्ट्या किती योग्य आहे? रोम जळताना फिडेल वाजवणाऱ्या नीरोची ही वृत्ती नाही का? एक संवेदनक्षम मन असा विचार करू शकतं.पण जर भावना बाजूला ठेवल्या तर त्याला एक 

दुसरी बाजूसुद्धा आहे. 
एक मोठा समाज सध्या मानसिक तणावातून जातोय. विशेषतः तरुण आणि मध्यमवयीन पिढी. आर्थिक मंदी नव्या पिढीला जाणवतेय. कारण, कुणाच्या नोकऱ्या गेल्यात, कुणाचे पगार कमी झालेत, कुणाला सातत्यानं घरी बसून काम करावं लागतंय. ही पिढी आमच्या पिढीप्रमाणे ‘सातच्या आत घरात’ हे सूत्र मानणारी नाही. तिचा संचार एरवी मुक्त असतो. कधी हॉटेल, कधी बार, कधी डिस्को, कधी करमणुकीचे इतर कार्यक्रम यात ती मश्गुल असते. आज तीसुद्धा गुदमरत आहे. तिला घरात करमणूक हवीय आणि ती करमणूक आपल्या देशात क्रिकेट पुरवतं. 

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

म्हणजे आता हे कसं झालंय की, पूर्वी आपण अमिताभच्या सिनेमाला जायचो...का जायचो? तर त्याच्या सिनेमातल्या तीन तासांत अमिताभ जेव्हा अन्यायाविरुद्ध लढायचा तेव्हा आपणच अमिताभ व्हायचो आणि आपणच त्या अन्यायाशी लढायचो, ज्या अन्यायाशी आपल्याला एरवी लढणं कठीण असायचं. ते तीन तास संपले की आपल्याला जाणवायची ती आपली असहाय्यता. आणि पुन्हा ती असहाय्यता घालवण्यासाठी आपण पुन्हा अमिताभचा  सिनेमा पाहायचो. 

आयपीएलचं क्रिकेट हे सद्य परिस्थितीत अगदी तसंच आहे. आयपीएल तीन तासांत आपलं जे आजूबाजूचं दुःख आहे ना, ते दुःख आपल्याला विसरायला लावणारं आहे. कदाचित ते कमी करणारं आहे. आयपीएल हे पेनकिलर आहे, जे पुढं पावणेदोन महिने रोज संध्याकाळी आपल्याला दिलं जाईल...आणि जे जळणारं रोम आहे त्याचा विसर पाडायला लावेल. त्यामुळे आयपीएल नावाच्या नीरोच्या फिडेलकडे कसं पाहायचं हा ज्याच्या त्याच्या विचाराचा  भाग आहे. 
तुम्हाला त्या फिडेलचे स्वर मधुर वाटतात की कर्णकटू....हे तुम्ही ठरवा!

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com