निर्मितीचा हात ‘देवा’चा!

कपिलची कारकीर्द मी जवळून पाहिली आहे. त्याच्यात घडत गेलेले बदल मी जवळून अनुभवले आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं गहिवरलेला कपिल पहायला मिळाला.
Cricket Worldcup 1983
Cricket Worldcup 1983Sakal
Summary

कपिलची कारकीर्द मी जवळून पाहिली आहे. त्याच्यात घडत गेलेले बदल मी जवळून अनुभवले आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं गहिवरलेला कपिल पहायला मिळाला.

विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या १९८३ च्या स्पर्धेवरील ‘८३’ चित्रपटानं कपिलदेवला पुन्हा एकदा हिरो केलंय. आजच्या पिढीलाही त्याचं मोठेपण जाणवलं असावं. १९७० नंतर मीं पाहिलेल्या भारतीय क्रिकेटपटुंमधला सर्वात नैसर्गिक क्रिकेटपटू. इतर पिग्मी नव्हते, पण तो गलिव्हर. आजच्या पिढीला हेही लक्षात आलं असेल की तेव्हा, ना कोच होते, ना सपोर्ट स्टाफ, ना आजचं विज्ञान. पण कपिल कधीही देवाने वर दिल्याप्रमाणे फिट असायचा. १९८४ मध्ये एक बेजबाबदार फटका मारला म्हणून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आणि त्याला एका कसोटी सामन्याला मुकावं लागलं. ते न घडतं तर त्याच्या नावावर सलग शंभर कसोटी सामने खेळल्याची नोंद झाली असती.

कपिलची कारकीर्द मी जवळून पाहिली आहे. त्याच्यात घडत गेलेले बदल मी जवळून अनुभवले आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं गहिवरलेला कपिल पहायला मिळाला. विजयाच्या इतरांच्या वाट्याबद्दल सांगताना तो कुटुंब प्रमुख वाटला. कपिल-संदीप, कपिल-सुनील हे वाद मी माझ्या ‘षटकार’च्या दिवसात जवळून पाहिलेले आहेत. पण काळ, वय आणि प्रगल्भता, मैत्रीत साचलेले बर्फ तोडते आणि मैत्रीचं पाणी पुन्हा झुळझुळू वहायला लागतं. ते वहायला लागलंय.

मला आठवतंय, त्या विश्‍वकरंडकाच्या वेळी कपिल एकदा सुनिलला म्हणाला, ‘it is high time you score runs’ सुनीलसकट आम्ही सर्व चिडलो होतो. सुनिलचा असा अपमान करायचा? नंतर कळलं की कपिलला ‘high time’ चा अर्थच माहित नव्हता. पण मला आजही आठवतंय त्या १७५ च्यावेळी थकलेल्या आणि मैदानावर बसलेल्या कपिलला त्याची गरज ओळखून धावत जाऊन सुनिलनं पाणी आणून दिलं होतं. ‘कपिल पुराण काळात जन्माला आला असता तरं...’ अशी कथा नक्की तयार झाली असती.

चंदीगड नावाच्या शहरांत देशप्रेम आझाद नावाच्या एका क्रिकेट कोचनं मोठी तपश्र्चर्या केली.

त्यामुळं देव प्रसन्न झाला. त्याला म्हणाला, ‘वर माग’

आझादनं सांगितलं, ‘मला असा शिष्य दे, जो, या देशात वेगवान गोलंदाजीची परंपरा निर्माण करेल’

देव म्हणाला, ‘कपिल नावाचा मुलगा इथल्या निखंज कुटुंबात जन्माला येईल.तो भाग्य बदलेल’

देवानं कपिलला पृथ्वीवर पाठवताना, गुणवत्तेचं गाठोडं एव्हढं भरलं की त्याला न्याय देणं एका जन्मात कठीण होतं. त्यानं गुणवत्तेच्या तुलनेत धावा काढणं पुढच्या जन्मासाठी ठेवलंय

मी एकदा त्याला विचारलं, ‘तू काढल्या त्यापेक्षा कितीतरी धावा जास्त काढू शकला असतास, असं तुला वाटतं नाही का?’

तो हसत म्हणाला, ‘प्रत्येक कसोटीत, प्रत्येक डावात किमान २५ षटकं टाकून आणि मग शतक ठोकायला किती एनर्जी उरते ते सांग,’ ते खरंय. तरी त्यानं खालच्या क्रमांकावर येऊन ५२४८ धावा केल्या. त्यात ८ शतकं आणि २७ अर्धशतकं आहेत. अरे हो आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. साधारण १९७९ ते १९८९ पर्यन्त भारतीय गोलंदाजीचा गोवर्धन त्यानंच उचलला होता.

परवा कुठेतरी सुनिलला कपिल बरोबर हार्दिक पंड्याची तुलना करायला सांगितली. सुनील चिडला. मला कुणी असं सांगितलं असतं तर, मी माझे केस उपटले असते किंवा त्याचे तरी. बंगल्याला संगमरवर लावल्यानं ताजमहाल नाही होत. इंग्लंडचा ट्रेव्हर बेली म्हणायचा,‘महान अष्टपैलू खेळाडू कोण? जो फक्त गोलंदाज म्हणून किंवा फक्त फलंदाज म्हणून संघात बसू शकतो.’ कपिल फलंदाज म्हणून संघात बसला असता. अगदी कुठल्याही फॉरमॅट मध्ये. टी-२० तर तो शहेनशाह असता. जेव्हा गरज पडली, तेव्हा तो मोठ्या खेळी, विजयी खेळी लिलया खेळून गेला. त्याच्या नाबाद १७५ च वर्णन करायला मला कालिदासाकडून कर्जावर उपमा घ्याव्या लागतील. त्याआधीची गोष्ट आहे. भारतात इंग्लंड विरुद्ध मालिका होती. बॉथम श्रेष्ठ की कपिल वाद जोरात होता. मॅन ऑफ सिरिजच्या शर्यतीत बॉथम पुढे होता. शेवटी कानपूरला कपिलला त्याला मागं टाकायला शतक हवं होतं. ठोकलं की त्यानं. नंतर भारतीय संघ इंग्लंडला गेला. पुनः मॅन ऑफ सिरीज कपिल झाला. वर इंग्लंडच्या जिम लेकरने अवॉर्ड देताना सांगितलं, ‘बॉथमनं कपिलपेक्षा जास्त धावा काढल्या. पण कपिलला ज्या गोलंदाजीला तोंड द्यावं लागलं ती बॉथमने खेळलेल्या गोलंदाजीपेक्षा खूप श्रेष्ठ होती. कपिलने संपूर्ण मालिकेत चांगली गोलंदाजी केली. त्याला जास्त विकेट्स मिळाल्या नाहीत हा दोष त्याचा नाही. काही वेळा दैवाने आणि काहीवेळा क्षेत्ररक्षकाने दगा दिला.’

कपिल फक्त फलंदाज म्हणून खेळला असता तर मोठा फलंदाज झाला असता. इतकं टॅलेंट त्याच्याकडे होतं. म्हणून सुनील त्याला अधून मधून डिवचायचा. एकदा डिवचल्यावर त्यानं मुंबईत भिंगरी विकेटवर पाकिस्तान विरुद्ध केलेली खेळी मला आठवते.

त्याने पॉपिंग क्रिजचं बंधन झुगारलं आणि फिरणाऱ्या चेंडूला असा भिडला जणू तो चर्चगेट स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर फलंदाजी करतोय. सोपं नव्हतं. एक चेंडू चुकला, खेळ खलास. चेंडू हातभर वळत होता. त्याने विकेट एका फालतू चेंडूवर दिली. पण मॅच विंनिंग खेळी खेळला. त्यामुळंच टायगर पतोडी एकदा म्हणाला होता, ‘‘ त्याने फालतू चेंडूवर विकेट देण्याआधी, त्याला विकेट घेण्यासाठी काय परिश्रम पडतात हे आठवावं " त्याच्या गोलंदाजी एव्हढा आनंद त्याच्या फलंदाजीने मला दिलाय. त्याचे लॉर्डसवरचे हेमिंग्जला मारलेले चार षटकार मी कसे विसरीन? चोवीस धावा फॉलो ऑन टाळायल्या हव्या होत्या. तो पहिले दोन बॉल चक्क बचावात्मक खेळला. आणि उरलेल्या चार चेंडूवर चार षटकार ठोकले. केव्हढा आत्मविश्वास !

प्रेसबॉक्समध्ये माझ्या बाजूला बॉयकॉट उभा होता. तिसऱ्या षटकारच्या वेळी तो मला म्हणाला, ‘इतक्या लांब मारायला मला दोनदा मारावं लागलं असतं’ पण कपिलचं ऐतिहासिक कार्य वेगवान गोलंदाज म्हणूनच आहे. त्याने वेगवान गोलंदाजीची परंपरा इथे रुजवली. नाहीतर आधी काय होतं आपल्याकडे? एखादा दत्तू फडकर किंवा रमाकांत देसाई यायचा आणि मग पुन्हा सामसूम. नव्या चेंडूची तर आपण थट्टाच उडवायचो. त्या चेंडूची लकाकी घालवण्यासाठी वाडेकर, कधी पतौडी, कधी कुंदरन, यांचा वापर केला जायचा. कपिलने प्रथमच भारतीय युवकांना एक स्वप्न दिलं, ‘तुम्ही वेगवान गोलंदाज होऊ शकता.’ मग श्रीनाथ आला, मग प्रसाद आला मग इतर आले. आता तर वेगवान गोलंदाज रांगेत उभे आहेत, भारतीय संघात शिरण्यासाठी.

त्याला देवाने उत्कृष्ट अशी साईड ऑन ऍक्शन दिली. त्यामुळे त्याच्या नैसर्गिकरित्या सुंदर असलेल्या शरीरावर ताण मुळातच कमी पडला. वर त्या ऍक्शनमुळे त्याला लाखमोलाचा आऊटस्विंगर मिळाला. त्याने वेगवान गोलंदाजीची इतर आयुधं मग हळूहळू जमवली. तो इंग्लंडमध्ये इनस्विंगर शिकला. त्याचा इनस्विंगर हा इम्रानच्या इनस्विंगरप्रमाणे दरोडेखोरासारखा आत घुसत नसायचा. पण तो विकेट मिळवून द्यायचा. मात्र त्याचे आऊटस्विंगर एवढे मोठे असत की, एकदा टोनी लुईस सुद्धा म्हणाला की, ‘‘अरे याचे आऊटस्विंगर तर डेनिस लिली एवढे मोठे असतात.’’

१९८६ च्या इंग्लंडमधल्या भारतीय दौऱ्यावर मला त्याचा नॉर्दम्प्टनशायर विरुद्धचा स्पेल अजूनही आठवतोय. त्यावेळेला त्याचे आऊटस्विंगर्सचं वळण हे मलिंगाच्या केसाच्या वळणापेक्षाही जास्त वाकडं होतं. मग त्याने यॉर्कर आपल्या भात्यात टाकला आणि बंपर. पण बंपर त्याने फार काळजीपूर्वक वापरला. आणि जेव्हा वापरला तेव्हा ग्रिनीज, बॉर्डर सारखे फलंदाज सुद्धा हलायचे. उगाच नाही किंम ह्यूज म्हणतो की, ‘‘कपिलचा बाउन्सर हा अत्यंत ऑकवर्ड असायचा.’’

मी त्या काळामध्ये कपिलची वेगवेगळी रूपं पाहिलेली आहेत. मला आठवतंय वासू परांजपेने मला एक किस्सा सांगितला होता. कपिल सीसीआयच्या टीममधून नैरोबीला गेला होता. एकदा तिथे मॅच खेळताना राजसिंगने कपिलला सांगितलं की, ‘तू डोक्यावर टोपी घालत जा’. त्याच्याकडे टोपी नव्हती. त्याने एकनाथ सोलकरकडे टोपी मागितली. एकनाथ सोलकरकडे इंडिया कॅप होती. कपिल बिचारा चंदीगडवरून आलेला. त्याला फारसे क्रिकेटचे शिष्टाचार, नैतिकता माहित नव्हती. त्याने एकनाथ सोलकरकडे कॅप मागितली. एकनाथ सोलकरने त्याला दिमाखात सांगितलं, ‘अरे ही इंडिया कॅप अशी मागायची नसते. ही इंडिया कॅप मिळवायची असते आणि मग घालायची असते.’ आणि त्यानंतर वर्षा, दोन वर्षातच कपिल टेस्ट मॅच खेळला. पण एकनाथ सोलकरनं सांगितलेली गोष्ट तो विसरला नव्हता. त्याला ती गोष्ट कुठेतरी नक्कीच लागली होती. मुंबईत ज्यावेळेला मॅच होती, तेव्हा त्याने एकनाथ सोलकरला गाठलं आणि विचारलं, ‘आता मी माझी कॅप घालू शकतो ना? ही मी कमावलेली आहे.’

कपिलने नुसती कॅप कमावली नाही तर त्या कॅपवर अनंत प्रकारचे तुरे एकामागोमाग एक कमावले. तो चंदीगडवरून आलेला, फारसं मोठं शिक्षण नसलेला आणि त्यामुळे त्याला क्रिकेटच्या इतिहासाची काहीही फारशी माहिती नव्हती. त्याला नीट इंग्लिशही यायचं नाही. तो इंग्लिशच्या चुका करायचा आणि त्यातून काही मंडळी त्याची चेष्टाही करायची. त्यातून वाद निर्माण व्हायचे. मला आठवतंय तो जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेला होता,तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये बऱ्याचशा मैदानावर व्हिक्टर ट्रम्परचे फोटो आहेत, रुबाबात स्टेप आऊट होऊन चेंडू मारण्याच्या ॲक्शनमध्ये. तिथं कपिलने विचारलं की, ‘हा एवढा कोण आहे मोठा? की याचे सगळीकडे फोटो आहेत.’ कारण त्याला व्हिक्टर ट्रम्पर माहित नव्हता. काही खेळाडू हसले, पण नंतर कपिलनं दाखवून दिलं की, क्रिकेटचा इतिहास त्याला माहीत नसेल पण इतिहास घडवण्याची ताकद मात्र त्याच्या बाहूंमध्ये आणि त्याच्या हातात आहे.

१९८१ मध्ये त्याच ऑस्ट्रेलियात मेलबर्नवर ऑस्ट्रेलियाला ८८ धावात गुंडाळलं. त्यावेळेला तो जखमी होता. तो पूर्ण फिट नव्हता. तरी देखील त्याने येऊन अप्रतिम गोलंदाजी टाकली. आणि भारताला जिंकून दिलं. ऑस्ट्रेलियाचा एक जुना माजी खेळाडू लिंडसे हॅसेट म्हणाला सुद्धा, ‘‘आज कपिल देव स्वर्गातून अवतरल्या सारखा आला.’’ त्याच दौऱ्यावर कपिल देवची गोलंदाजी पाहून ग्रेग चॅपेल म्हणाला होता, ‘‘हा कपिल देव एक गोलंदाज म्हणून आमच्या संघात सहज बसू शकतो.’’ आणि त्यावेळेला ऑस्ट्रेलियाकडे कोण होतं? लिली, पास्को, हॉग वगैरे मंडळी. अर्थात कपिल त्याच्या आधीच जागतिक दर्जाचा झाला.

कपिल जागतिक दर्जाचा वाटायला लागला जेव्हा पाकिस्तान विरुद्ध त्याने भारतामध्ये ३२ बळी घेतले. आणि भारताच्या विजयामध्ये फार मोलाचा हातभार लावला. ते ३२ बळी घेताना त्याने २८८ धावा सुद्धा केल्या होत्या. पण महत्त्वाचे होते ३२ बळी. कारण समोर जी फळी होती पाकिस्तानची, त्यात कोण होतं ? त्यात मजीद खान होता, झहीर अब्बास होता, त्यात असिफ इक्बाल होता, त्यामध्ये जावेद मियाँदाद होता. आणि या सगळ्या मंडळींनी दोन वर्ष आधी पाकिस्तानमध्ये भारतीय संघाची दाणादाण उडवली होती. कपिलने एकट्याने त्यांची धूळधाण उडवली.

१९९० नंतर कपिल देवचा वेग कमी झाला. पण त्याचा टप्पा कधी चुकला नाही. पुढं त्याला रिचर्ड हेडलीच्या विक्रमाची बरोबरी करताना कष्ट पडले. त्यावेळेला सर्वाधिक विकेटचा विक्रम रिचर्ड हेडलीकडे होता. कपिलनं बेंगलोरला त्या विक्रमाची बरोबरी केली. मला आजही आठवतंय त्यानंतर कपिलनं मला त्याचा एक शर्ट स्वाक्षरी करून दिला होता. आणि ज्यावेळेला तो विक्रम अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवरत्याने मोडला त्यावेळेला मी सचिन तेंडुलकरला सांगितलं होतं की, ‘एक स्टंप मॅच संपल्यानंतर माझ्यासाठी घेऊन ये.’ सचिनने आठवणीने तो स्टंप मला दिला. त्या स्टंपवर मी कपिल देवचा ऑटोग्राफ घेतला. मी काही, अशा वस्तू जमावणारा संग्राहक नाही. पण तरीही माझ्या छोट्याशा कलेक्शनमध्ये या दोन गोष्टी मला अत्यंत मौलिक वाटतात. असा हा कपिल देव.

त्याचे हात माणसासारखे होते. पण ते अचानक देवाचे व्हायचे. मग तो एक अप्रतिम स्पेल टाकून जायचा. कधी अप्रतिम मॅच जिंकून देणारी खेळी खेळायचा. कधी अप्रतिम कॅच घ्यायचा. जसा ८३ मध्ये त्यानं विश्‍वकरंडक घेतला होता. त्याने फक्त यष्टिरक्षण केलं नाही. पण तेही त्यानं प्रयत्न केला असता तर त्याला जमून गेलं असतं. इतका तो नैसर्गिक खेळाडू होता. ‘८३’ या चित्रपटाच्या निमित्ताने कपिलवर पुन्हा फोकस आला. त्याचे मोठेपण आणि त्याचे उत्तुंग निर्मितीचे सुंदर हात जगाला दिसले. खूप बरं वाटलं.

(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व साहित्यिक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com