के दिल अभी भरा नही

देव आनंदचा ‘हम दोनो’ हा माझा अतिशय आवडता सिनेमा आहे. त्यातली देव आनंदची दुहेरी भूमिका मी पाहिलेल्या अनेक दुहेरी भूमिकांमधली सर्वोत्कृष्ट अशी मी मानतो.
Dev Anand and Sadhana
Dev Anand and SadhanaSakal

देव आनंदचा ‘हम दोनो’ हा माझा अतिशय आवडता सिनेमा आहे. त्यातली देव आनंदची दुहेरी भूमिका मी पाहिलेल्या अनेक दुहेरी भूमिकांमधली सर्वोत्कृष्ट अशी मी मानतो. त्याचं संगीत हे जयदेवच्या कारकीर्दीतलं सर्वोत्कृष्ट संगीत आहे. पण, त्याचबरोबर हिंदी सिनेमातल्या संगीताच्या महानतेच्या मोजपट्टीत त्याचा क्रमांक फार वरचा लागेल आणि गीत लेखनाच्या बाबतीत साहिरने त्यातलं काव्य फार वरच्या स्तरावर विराजमान करून ठेवलंय.

दिग्दर्शक म्हणून क्रेडिट अमरजितला दिलं गेलं असलं, तरी त्या सिनेमाचं दिग्दर्शन विजय आनंदने केलंय, त्याची पटकथा विजय आनंदची आहे. केवळ अप्रतिम हे विशेषण त्याच्या दिग्दर्शनाचं कौतुक करू शकत नाही. अमरजितच्या मैत्रीखातर त्याला ‘ब्रेक’ देण्यासाठी त्याचं नाव दिलं गेलं. हा नवकेतनचा १९६१ चा चित्रपट, त्याला युद्धविषयक चित्रपट म्हणता येणार नाही; पण कथेला पार्श्वभूमी दुसऱ्या महायुद्धातल्या ब्रह्मदेशाच्या युद्धाची आहे. कहाणी थोडक्यात सांगतो.

देव आनंद श्रीमंत साधनाच्या प्रेमात असतो आणि अर्थात ती त्याच्या. देव आनंदला नोकरी नसल्यामुळे साधनाचे वडील त्याचा अपमान करतात. तो आर्मीत जातो. तो कॅप्टन होतो. तो युद्धभूमीवर जातो, तिथं त्याला त्याच्यासारखा दिसणारा मेजर भेटतो. दोघे एका शहरातले. युद्धात मेजर मरतो. ती बातमी घेऊन कॅप्टन मेजरच्या घरी जातो. त्याच्या घरच्यांना वाटतं मेजरच आलाय. मग कौटुंबिक समज-गैरसमज आणि शेवटी सर्व गुंतागुंत संपून गोड शेवट.

देव आनंदच्या दोन नायिका या चित्रपटात आहेत. एक साधना, दुसरी नंदा. नंदाच्या ऐवजी मीनाकुमारी हिला घ्यावं, असं अगदी विजय आनंदचंही मत होतं; पण ‘ कालाबाजार’ चित्रपटात देव आनंदच्या बहिणीची भूमिका नंदाने केली. तिने देव आनंदला सांगितलं, मला तुझी नायिका व्हायचंय. देव आनंदने तिला शब्द दिला, तो त्याने ‘हम दोनो’त पाळला. तिला पाहताना, इथं मीनाकुमारीच हवी होती, असं कुठंही वाटलं नाही.

किंबहुना एकदा ‘अल्ला तेरो नाम’ गाण्याच्या शूटिंगच्या वेळी बर्मनदा सेटवर गेले, त्यांनी नंदाला अभिनय करताना पाहिलं आणि विचारलं, ‘‘लता, तुझी नातेवाईक लागते का?’ नंदा म्हणाली, ‘नाही; पण असं का विचारलं?’ ते म्हणाले, ‘‘तू अभिनय करताना प्रत्यक्ष लता गाते आहे असं मला वाटलं.’ साधनाने कॅप्टन आनंदची प्रेयसी म्हणून फार चांगलं काम केलं. गंभीर प्रसंगात तिचा चेहेरा तिचं दुःख, तिची घुसमट, तिचा संशय सर्वच बोलून दाखवत होता.

सर्वोत्कृष्ट भूमिका अर्थात देव आनंदची होती. देव आनंदने दुहेरी भूमिका केली. एक - कॅप्टन आनंद आणि दुसरी - मेजर वर्मा. मी पाहिलेल्या अनेक दुहेरी भूमिकांमध्ये ही भूमिका मला सर्वोत्कृष्ट भूमिका वाटते. देव आनंदने नेहमीच स्वतःला त्याच्या स्टाइलच्या सोनेरी पिंजऱ्यात कोंडून घेतलं.

तो पिंजरा नक्की सोनेरी होता, त्याचा फायदा त्याला झाला. कारण, त्याची स्टाइल कुणीही त्याच्या प्रेमात पडावं अशी होती; पण त्यामुळे त्याच्यातल्या अभिनय गुणांना नेहमीच वाव मिळाला नाही. पण, त्याने काही वेळा थोड्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्यानंतर एक गोष्ट जाणवली की, देव आनंदमध्ये एक चांगला अभिनेता होता, तो महान नसेल; पण चांगला नक्की होता.

दुर्दैवानं स्वतःच्या गोंडस प्रतिमेच्या प्रेमात पडून त्याने त्याच्यातल्या अभिनेत्याला दाबून टाकलं. मी या भूमिकेला सर्वोत्कृष्ट दुहेरी भूमिका म्हणतो, कारण सर्वसाधारणपणे दुहेरी भूमिका विशेषतः हिंदी सिनेमात ठराविक साच्याची असते. एक चांगला, दुसरा वाईट. एक बावळट, दुसरा स्मार्ट, अंगात थोडा मवालीपणा असणारा.

इथं दोन्ही भूमिका या आर्मीतल्या माणसांच्या; पण दोघांत एक मूलभूत फरक आहे. कॅप्टन आनंद हा आर्मीत प्रेयसीच्या वडिलांनी नोकरी नाही म्हणून अपमान केल्यामुळे जातो, तर दुसरा मेजर वर्मा आईच्या पोटातून जन्माला येतानाच आर्मीत जायचं ही महत्त्वाकांक्षा घेऊन येतो, त्यामुळे तो पूर्ण फौजी असतो. तो त्याच्या खासगी आयुष्यातही फौजीसारखाच वागतो; आणि या दोघांमधला फरक देव आनंदने फार सुंदररीत्या दाखवला.

मेजर वर्मा या भूमिकेतील त्याचं बोलणं, त्याचं चिरूट ओढणं, त्याचे हावभाव, त्याचं चालणं... या सर्वच गोष्टी पाहताना आपण एक खराखुरा फौजी पाहतोय असं वाटतं; आणि देव आनंद त्या फौजीच्या एकंदर रुबाबात वावरतोसुद्धा. असा की, त्याचा जन्मच आर्मीत गेला आहे असं वाटतं. म्हणून मला त्याची ही दुहेरी भूमिका सर्वांत चांगली वाटते. हा सिनेमा युद्धाच्या पार्श्वभूमीवर असला, तरी त्यातलं संगीत नुसतं कर्णमधुर नाहीये, तर ते चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातं.

अनिल विश्वास या महान संगीतकाराला सुंदर आणि गोड चाली पटापट सुचत; पण तो म्हणतो, ‘‘मी जन्मभर प्रयत्न केला असता, तरी ‘अल्लाह तेरो नाम ईश्वर तेरो नाम’सारखी चाल मला सुचली नसती.’’ या सिनेमात लतादीदींचं आणखी एक भजन आहे, ते आहे ‘प्रभू तेरो नाम’. तेही खूप सुंदर आहे.

लता मंगेशकरनी जेव्हा लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये पहिल्यांदा कार्यक्रम केला, तेव्हा त्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी ‘अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम’ या गाण्याने केली होती. त्यातलं आणखी एक अफलातून सुंदर प्रेमगीत म्हणजे, ‘अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही’. रोमँटिक गाण्यांमधलं सर्वांत सुंदर गाणं असं शाहरुख खान म्हणतो आणि त्यावर मलासुद्धा मान डोलवाविशी वाटते.

आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला भेटल्यावर, परत निघताना प्रत्येकाच्या याच भावना असतात. परवाच मी ‘रॉकी और रानी’ हा सिनेमा पाहिला. त्यात या गाण्याचा फार सुंदर उपयोग केला आहे. ६०-६२ वर्षं होऊन गेली ह्या गाण्याला; पण आजच्या पिढीलासुद्धा आकर्षित करणारं हे गाणं आहे. साहिर छोट्या छोट्या ओळींतून किती सुंदर विचार मांडून जातो. ‘अल्लाह तेरो नाम’मध्ये तो म्हणतो,

‘ओ सारे जग के रखवाले,

निर्बल को बल देनेवाले,

बलवानों को दे दे ग्यान’

किती सुंदररीतीने त्याने देवाला सांगितलं की, ताकदवाल्यांना जरा अक्कल दे. ‘कभी खुद पे कभी हालात पे रोना आया’ या गाण्यातही तो सहजपणे सत्य सांगून जातो.

‘कौन रोता है किसी और के

खातिर ऐ दोस्त,

सब को अपनी ही किसी

बात पे रोना आया’

जयदेवना चाल पटकन सुचायची. कविता वाचता वाचता ते कवितेला चाल लावत. एकदा पाकिस्तानी शायर आदमची शायरी ते वाचत होते. तो शेर होता,

‘मै गर्दीशोंसे जाम लडाता चला गया,

हसता हसता पिलाता चला गया’

त्याच चालीवर मग साहिरने लिहिलं,

‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया’

देव आनंदला एका पाकिस्तानी कवीचं गाणं खूप आवडायचं.ते गाणं होतं, ‘अभी तो मै जवा हूँ’.

त्याने साहिरला सांगितलं, त्या मीटरवर गाणं लिहून दे; आणि त्याने लिहिलं, ‘अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही’. साहिर हा अत्यंत अहंकारी माणूस; पण देव आनंदचं त्याच्यावर प्रेम होतं आणि त्याचं देव आनंदवर. कारण असं कोणी सांगून गीत देणारा साहिर नव्हता; पण तरी देव आनंदसाठी हे गाणं त्या पाकिस्तानी गाण्याच्या मीटरवर त्याने लिहिलं.

‘प्यासा’नंतर साहिर आणि एसडी यांचे संबंध दुरावले; पण ‘हम दोनो’मध्ये जयदेवला संगीतकार म्हणून घेण्यात आलं. त्या वेळेला देव आनंद शैलेंद्र किंवा मजरूह सुलतानपुरीकडे न जाता ‘हम दोनो’ची गाणी त्याने साहिरला दिली आणि साहिरने त्याचं सोनं केलं.

पण या सिनेमाचं महत्त्व अभिनय, कथा, संगीत यापलीकडे आहे. दिल्लीतल्या दहावी इयत्तेतल्या पंधरा मुलांनी हा सिनेमा पाहिला आणि त्यांना तो इतका आवडला की, ती पंधराच्या पंधरा मुलं पुढे आर्मीत गेली आणि नंतर तिथून मोठ्या पदावरून ती निवृत्त झाली. देव आनंदच्या अभिनयाचा आणि सिनेमाचा त्यांच्यावर इतका मोठा परिणाम झाला. सिनेमाचं यश १५ खऱ्या आयुष्यातल्या हिरोंना तयार करणार असेल, तर त्याबद्दल आणखी काय बोलावं?

बस्स, इतकंच! के दिल अभी भरा नही!

(लेखक चित्रपट आणि क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक आहेत. त्यांची या विषयांवरची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com