Actors
ActorsSakal

ना हिंदकेसरी, ना अभिनयसम्राट...

हिंदी सिनेमामध्ये काही हिरोंना चॉकलेट हिरो म्हटलं जातं. गुगलवर जर तुम्ही गेलात, तर ‘चॉकलेट हिरो’ची व्याख्या ‘बॉईज लुक असलेला आणि मुलींना आकर्षित करणारं स्मित असलेला माणूस’ अशी सापडेल.
Summary

हिंदी सिनेमामध्ये काही हिरोंना चॉकलेट हिरो म्हटलं जातं. गुगलवर जर तुम्ही गेलात, तर ‘चॉकलेट हिरो’ची व्याख्या ‘बॉईज लुक असलेला आणि मुलींना आकर्षित करणारं स्मित असलेला माणूस’ अशी सापडेल.

हिंदी सिनेमामध्ये काही हिरोंना चॉकलेट हिरो म्हटलं जातं. गुगलवर जर तुम्ही गेलात, तर ‘चॉकलेट हिरो’ची व्याख्या ‘बॉईज लुक असलेला आणि मुलींना आकर्षित करणारं स्मित असलेला माणूस’ अशी सापडेल. मुली चॉकलेटकडे आकर्षित व्हाव्यात तशा त्याच्याकडे आकर्षित होतात, म्हणून तो चॉकलेट बॉय. अर्थात, हिंदी सिनेमामध्ये हा शब्द मी प्रथम देवानंदसाठी वापरलेला ऐकला; मग शम्मी कपूर, विश्वजित, जितेंद्र वगैरेंसाठी. यात कुठेतरी रोमान्सचासुद्धा म्हणजे रोमँटिक प्रतिमेचाही भाग असावा. तर, या नामावलीतला एक म्हणजे जॉय मुखर्जी.

जॉय तोंडात सोन्याचा आणि सिनेमाचा चमचा घेऊन जन्माला आला. एकेकाळी चित्रपटसृष्टीमध्ये प्रचंड दादागिरी करणाऱ्या शशधर मुखर्जींचा हा मुलगा. शशधर मुखर्जींनी एकेकाळी बॉम्बे टॉकीज, फिल्मीस्तान आणि फिल्मालय या तीन फिल्म कंपन्यांमध्ये मालकी हक्क गाजवला. ओ. पी. नय्यरसारखा अहंकारी माणूससुद्धा शशधर मुखर्जींकडून कुठलं गाणं चालेल, याचा सल्ला घ्यायचा. अशोककुमार आणि किशोरकुमार हे त्याचे सख्खे मामा. त्याला हिंदी सिनेमात हिरो होण्यासाठी एका पैशाचेसुद्धा कष्ट उपसावे लागले नाहीत. त्याला फक्त अभिनयाचे कष्ट उपसावे लागले आणि ते त्याला प्रचंड जड गेले. अभिनयाची देणगी त्याच्या मामांकडे असली तरी जॉयला ती देवाने दिली नव्हती.

नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या शास्त्रज्ञाचा मुलगासुद्धा नोबेल पारितोषिक मिळवतो असं नाही, किंवा क्रिकेटमध्ये मोठ्या क्रिकेटपटूचा मुलगा मोठा क्रिकेटपटू होतोच असं नाही. गुणवत्ता जीन्समधून येतेच असं नाही. तीच गोष्ट चित्रपटात आहे. सगळं काही त्याच्यासमोर ताटात वाढून ठेवलं होतं. कुठल्याही स्टुडिओमध्ये त्याला काम मागायला जायची गरज नव्हती. फक्त जेवण्याची तसदी घ्यायची होती.

अगदी जेवण भरवायलाही माणसं होती; पण त्याला त्या जेवणात रसच नव्हता. कॉलेजमध्ये असताना त्याला व्यायामाची आणि कुस्तीची आवड होती. दिलीप कुमार म्हणतो, ‘‘जॉय आणि त्याचा भाऊ शोमू यांच्यासाठी त्यांच्या वडिलांनी घरी आखाडा तयार करून ठेवला होता, त्यांना शिकवण्यासाठी शिक्षकही होता.’’ जॉय मुखर्जी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकत होता, त्या वेळी जॉयला वडिलांनी विचारलं,‘‘सिनेमात काम करतोस का?’’ आणि जॉयने चक्क ‘नाही’ म्हटलं. त्याने वडिलांना सांगितलं, ‘‘मला सिनेमात काम करण्यात रस नाही.’’ मग वडिलांनी त्याला विचारलं, ‘‘मी महिन्याला तुला किती पॉकेटमनी देतो?’’ जॉय म्हणाला, ‘‘पंधरा रुपये.’’ त्याचे वडील म्हणाले, ‘‘मी तुला महिन्याला दोनशे रुपये पॉकेटमनी दिला तर काम करशील?’’ जॉय वडिलांना म्हणाला ‘‘२०० रुपये? मी त्यासाठी भांडीपण घासीन.’’ आणि मग घरच्या ‘हम हिंदुस्तानी या सिनेमात त्याने दुसऱ्या हिरोची भूमिका केली. त्याची नायिका होती चक्क हेलन. त्याची नायिका म्हणजे पॉकेटमनीबरोबर रसगुल्ल्याचा डबा.

बिचारा जॉय मुखर्जी, त्याला व्हायचं होतं वेटलिफ्टर किंवा कुस्तीपटू. मस्त हिंदकेसरी झाला असता किंवा ऑलिम्पिकमध्ये एखादं मेडल मिळवलं असतं; पण गेला सिनेमाच्या खोट्या दुनियेत; जिथे नायक नायिकेबरोबर गाणी म्हणता म्हणता परीक्षेत पाहिला येतो, जन्मतःच तो रफीचा गळा घेऊन येतो, पियानो लीलया वाजवतो. साहिरची काव्यप्रतिभा त्याच्याकडे असते. खेळात मेडल मिळवतो आणि अनेक गुंडांची आरामात कणीक तिंबतो. कुणी सांगावं, एखादं खरं मेडल त्याने मिरवलं असतं; पण आयुष्य असं कधी बदलतं, कसं बदलतं ते सांगता येत नाही.

दारा सिंग पाहा ना, कुस्तींच्या आखाड्यात अक्रम, किंग काँगसारख्या मल्लांच्या खांद्याला खांदा लावून लढत होता. बघता बघता त्याचा खांदा सिनेमाच्या पडद्यावर मुमताजच्या खांद्याला भिडला. जॉय मुखर्जीला वडिलांचं पुत्रप्रेम नडलं. राजकारणात ते नडताना आपण बघतोच आहोत. सिनेमात ते बऱ्याच जणांना नडतं. कारण, कॅमेरा कधी खोटं बोलत नाही, तो सत्य बोलतो आणि ते सत्य माणसाला जमिनीवर आणतं.

राजेंद्रकुमार, राजकुमार यांची मुलं किंवा सुनील दत्तचा भाऊ सोम दत्त आज कुठे आहेत? त्यांचे नातेवाईक सोडून कुणाला माहीत नाहीत. जॉय मुखर्जी निदान दहा वर्षं तरी यशस्वी हिरो झाला. मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे तो यशस्वी चॉकलेट हिरो झाला. देवानंद हा ओरिजिनल चॉकलेट हिरो, तो म्हणजे अस्सल कॅडबरी मिल्क चॉकलेट होतं. शम्मी कपूर आला आणि त्याने या चॉकलेट हिरोच्या प्रतिभेत थोडा बदल केला. तोसुद्धा कॅडबरी चॉकलेट होता; पण फ्रूट अँड नट्स मिसळलेलं हे कॅडबरी चॉकलेट. राजेश खन्ना आणि ऋषी कपूर यांनी वेगळ्या प्रकारे ते चवदार केलं. विश्वजित आणि जितेंद्र या रावळगाव टॉफीज. काही अनिल धवन, विवेक मुशरनसारखे हिरो होते, ते म्हणजे जिरा गोळ्या. मग जॉय कुठं बसतो? मला वाटतं तो रावळगाव टॉफीच्या व्याख्येत बसतो. त्याची उंची, शरीरयष्टी चांगली होती. दिलीपकुमार जॉयला लहानपणापासून पाहत होता. तो म्हणतो, ‘‘दिसण्यावर जॉय मुखर्जी खूप मेहनत घ्यायचा.’’

जॉय मुखर्जी स्वतः मान्य करतो की, त्याच्यावर दिलीपकुमार, राज कपूर, देवानंदचा प्रभाव होता; पण दिलीपकुमार आणि राज कपूर त्याला पचणारे नव्हते. त्याच्या अभिनयाच्या सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात दिलीपकुमार, राज कपूरच्या पंचतारांकित हॉटेलात जेवणं कठीण होतं. त्याने देवानंदचा केसांचा फुगा आणि स्टाइल उचलल्या आणि जसजशी शम्मी कपूर स्टाइल लोकप्रिय व्हायला लागली, तसतशी त्याने ‘लव्ह इन टोकियो’, ‘शागीर्द’मध्ये त्यावर गुजराण सुरू केली.

जॉय मुखर्जी हा प्रामाणिक, उत्तम वाचन असलेला माणूस होता, त्याला ओशो, जे. कृष्णमूर्तीसारख्यांच्या फिलॉसॉफीत रस होता. विवेकानंद जवळपास त्याने पूर्ण वाचले होते. स्वतःच्या अभिनयाच्या गुणवत्तेबद्दल त्याच्या खोट्या कल्पना नव्हत्या. ‘बहु-बेटी’ हा हिंदी सिनेमा ‘कन्यादान’ या मराठी चित्रपटावरून घेतलेला होता. त्यातल्या गंभीर भूमिकेत प्रेक्षकांनी त्याला स्वीकारलं नाही, हे त्याने प्रामाणिकपणे कबूल केलं. त्याने एकदा स्वतः म्हटलं होतं, ‘‘मी फार्म्युला चित्रपटात अगदी फिट्ट बसायचो. गाण्यांची रेलचेल, हलकेफुलके विनोद, थोड्या इमोशन्स, थोडी मारामारी हे सगळं लोकांना आवडायचं.’’ खरंय त्याचं म्हणणं.

तो हॉलिवूड स्टार ‘रॉक हडसन’सारखा होता. आता सलमान खान आणि इतर नटमंडळी ऊठसूट बनियन काढतात. त्या काळात धर्मेंद्र सोडला तर शर्ट काढण्यासारखी छाती फक्त जॉय मुखर्जीची होती. उत्तम संगीतकार आणि रफीची गाणी यांचा त्याच्या कारकीर्दीच्या यशात मोठ्ठा वाटा होता. ऐन भरातला ओ. पी. नय्यर, बर्मनदा, शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या गाण्यांवर त्याला सुंदर सुंदर नायिकांबरोबर बागडायला मिळालं. ओ. पी. नय्यरने तर अख्खा खजिना त्याच्यासाठी रिता केला. ‘एक मुसाफिर एक हसीना’, ‘हमसाया’, ‘फिर वही दिल लाया हूँ’... वगैरे वगैरे.

ओ.पी. हा गर्विष्ठ माणूस. त्याच्या ‘नया दौर’मधल्या गाण्यांना प्रचंड यश मिळालं. एका पार्टीत दिलीपकुमारला कुणीतरी म्हटलं, गाणी खूप गाजली, तेव्हा दिलीपकुमार ओ.पी.ला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला, ‘‘मी गाण्यांवर चांगला नाचलो म्हणून गाणी गाजली.’’ ओ.पी.ला शंभर इंगळ्या डसल्या. ‘फिर वही दिल लाया हूँ’ नंतर एका पार्टीत ओ.पी.चं त्यातल्या गाण्याबद्दल कुणीतरी कौतुक केलं, त्या वेळी कर्मधर्मसंयोगाने दिलीपकुमार तिथे होता. ओ.पी. त्याला ऐकू जाईल एवढ्या आवाजात म्हणाला, ‘‘मेरे गानेपे बंदर भी नाचते है.’’

रफीच्या आवाजात गाताना पडद्यावर त्याचा रोमान्स सुरू होता वैजयंतीमाला, आशा पारेख, सायराबानो, साधना, शर्मिला टागोर, माला सिन्हा वगैरे नायिकांबरोबर. थोडक्यात, अखिल भारतीय मिठाई दुकानाच्या गल्ल्यावर तो बसला होता. या नायिकांच्या मते तो मुलींमध्ये प्रचंड लोकप्रिय होता. त्या नायिकांचं त्याच्याबद्दलचं मत चांगलं होतं. ‘इशारा’ सिनेमात, त्यावेळच्या ‘कम सप्टेंबर’ सिनेमाच्या संगीतावर तो आणि वैजयंतीमाला दोघंही नाचले. वैजयंतीमाला म्हणते, ‘‘त्याने फार चांगल्या स्टेप्स घेतल्या.’’ मला तो काहीवेळा गरिबांचा देवानंद आणि शम्मी कपूर वाटायचा; पण साठच्या दशकात तो हिरो म्हणून संपत गेला. त्याला राजेश खन्ना, शशी कपूर वगैरे नव्या हिरोंच्या स्पर्धेत टिकणं जमलं नाही.

त्यात ओ.पी., शंकर जयकिशन संपले. त्याने ‘हमसाया’ नावाचा सिनेमा काढला आणि दिग्दर्शित केला. माला सिन्हा म्हणते, ‘‘त्याने त्यात चांगलं दिग्दर्शन केलं, त्यात त्याची दुहेरी भूमिका होती; पण सिनेमा पडला.’’ तो म्हणाला होता, ‘मग आयुष्यात एक असा टप्पा आला की, मी नियतीच्या हातातलं खेळणं बनलो. स्वप्नवत आयुष्य जादूची कांडी फिरावी तसं नाहीसं झालं. स्तुतिपाठक गेले, चित्रपट गेले. विवेकानंदांच्या साहित्याचं वाचन उपयोगी पडलं.’ त्याचा तोंडावर ताबा नव्हता. अनेक व्याधी झाल्या आणि त्यांनी त्याला आपल्यातून नेलं. तो ना हिंदकेसरी झाला, ना अभिनयसम्राट. आपल्या मर्यादेत जगला आणि काही काळ आपल्याला जॉय देऊन गेला.

(लेखक चित्रपट व क्रीडाक्षेत्राचे अभ्यासक आहेत. या दोन विषयांवर त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com