रहे ना रहे हम

‘जो बात तुझ में है, तेरी तसवीर में नहीं’ हे ‘ताजमहाल’ चित्रपटातील गाणं ऐका. व्हिडिओ पाहत असाल आणि प्रदीप कुमारला टाळायचं असेल तर डोळे मिटा.
Musician Roshan
Musician Roshansakal

‘जो बात तुझ में है, तेरी तसवीर में नहीं’ हे ‘ताजमहाल’ चित्रपटातील गाणं ऐका. व्हिडिओ पाहत असाल आणि प्रदीप कुमारला टाळायचं असेल तर डोळे मिटा. कानात कुणीतरी गोड मध ओततोय अशी तुमची भावना होईल. संगीतकार रोशनच्या संगीताचं वर्णन एका वाक्यात करायचं झालं, तर मधाच्या पोळ्याशी करता येईल. त्याच्या संगीतातून गोड मधाळ गाणी मधासारखी टपकत राहत. त्याच्या संगीताच्या कारकीर्दीचे दोन भाग होतात. एक १९४९ ते १९६० दुसरा १९६० ते १९६८.

पहिल्या भागात त्याने अवीट गोडीची गाणी दिली. त्यासाठी भारतीय संगीताच्या रागदारीचा वापर त्यानी केला. लतादीदींच्या वरच्या पट्टीतल्या आवाजाचा वापर करण्याचा मोह सर्वांना झाला. रोशनने तो टाळला. सी. रामचंद्र यांची मेलडी, आणि ओ. पी. नय्यर ह्यांच्या ऱ्हिदमचा त्याच्यावर प्रभाव होता.

पण कारकीर्दीच्या पहिल्या भागात त्याला व्यावसायिक यश मिळालं नाही. १९६० साली ‘बरसात की रात’ आला आणि त्याच्या भाग्याचे दरवाजे उघडले. १९६० ते ६८ च्या दरम्यान त्याचे सिनेमा हिट झाले, आणि काही वेळा सिनेमा अयशस्वी ठरला पण त्याचं संगीत गाजलं.

रोशनचा जन्म आता पाकिस्तानात असलेल्या गुजराँवाला इथं झाला. तारीख होती १४ जुलै १९१७. त्याचं खरं नाव रोशनलाल नागरथ. लहानपणी तो आपल्याप्रमाणे शाळेत गेला; पण शाळेच्या बाकाचा उपयोग त्यानं तबला वाजवायला केला. गणिताऐवजी त्याला गाण्यात रस होता. त्याचं कुटुंब तसं सधन होतं. त्याच्या वडिलांचा बांधकामाचा व्यवसाय होता. त्यांनी रोशनला त्याची आवड लक्षात घेऊन संगीताचं शिक्षण दिलं.

रोशनने आठव्या वर्षी संगीताचं ज्ञान मनोहर बर्वेंकडून घेतलं. नंतर लखनौच्या भातखंडे विद्यालयात पंडित रात रांजणकर यांच्याकडे पुढचे धडे गिरवले. (रोशनची ओळख नव्या पिढीला सांगायची झाली तर अभिनेता राकेश रोशन आणि संगीतकार राजेश रोशन ही त्याची मुलं ) त्यांनी त्याचा मित्र ख्वाजा खुर्शीद अन्वरने त्याला दिल्ली आकाशवाणीमध्ये ‘इस्राज’ हे वाद्य वाजवण्याची नोकरी दिली.

अनिल विश्वास यांना त्याच्यात गुणवत्ता दिसली. रोशनला सांगितलं, ‘मुंबईत जा, तुझ्या गुणवत्तेला चित्रपटसृष्टी न्याय देऊ शकेल.’ तुमच्याकडे कितीही गुणवत्ता असली, तरी नशिबाचा एक धक्का तुम्हाला कारकीर्दीच्या रस्त्यावर आणायला लागतो. हा धक्का त्याला किदार शर्मा यांनी दिला. किदार शर्मा यांनी असे धक्के अनेकांना दिले. नावं ऐकायची आहेत?

राज कपूर, मधुबाला, गीता बाली, माला सिन्हा वगैरे वगैरे. किदार शर्मांनी रोशनला हा धक्का दादर स्टेशनवर मारला. रोशन बायकोबरोबर गाडीची वाट पाहत होता. शर्मा तिथे होते. दोघांत सहज बोलणं झालं. शर्मा यांनी त्याला दुसऱ्या दिवशी स्टुडिओत बोलावलं. त्याला ‘नेकी और बदी’ हा सिनेमा दिला.

हा सिनेमा आधी संगीतासाठी स्नेहल भाटकर यांच्याकडे होता. त्यांनी भाटकर यांना विनंती केली. ‘मला हा सिनेमा रोशन यांना द्यायची परवानगी द्या.’ मोठ्या मनाच्या भाटकर यांनी हो म्हटलं. आणि रोशनला तो सिनेमा मिळाला.

पण एका धक्क्यात काम झालं नाही. हा सिनेमा पडला. तरी शर्मांनी त्याला पुढचा ‘बावरे नैन’ दिला.वितरक चिडले. त्यांनी सांगितलं संगीतकार बदला नाहीतर पैसे परत द्या. शर्मा यांनी पैसे परत दिले. तो चित्रपट तुफान गाजला. ‘बावरे नैन’ मधील मुकेशची गाणी जास्त गाजली.

उदा.‘तेरी दुनियामें दिल लगता नहीं’ किंवा, ‘खयालोंमें किसीके', हे मुकेशचं गीता दत्तबरोबरचं द्वंद्वगीत. त्यानंतर ‘मल्हार' आला. तो मुकेश निर्माता असलेला सिनेमा. त्याचं संगीत गाजलं. त्या नंतर रोशननी पुन्हा कधी मागे वळून पहिलं नाही. १९६० पर्यंत तो कधी रांगत,तर कधी चालत गेला. पुढे धावला पण रस्ता सुटला नाही. रोशन हा अत्यंत हळवा माणूस होता. पहिला चित्रपट अयशस्वी ठरल्यावर तो जीव द्यायला गेला होता. अनिल विश्वास त्याचा मित्र, गाइड, फिलॉसॉफर...

एकदा अनिलदा ‘आरजू'' चित्रपटातलं एक गाणं रेकॉर्ड करत होते. गाणं होतं, ‘कहाँ तक हम उठाये गम’ रेकॉर्डिंग सुरू असताना त्यांना मागून रडण्याचा आवाज आला. त्यांनी मागे वळून पाहिलं तर रोशन हमसून हमसून रडत होता. अनिलदांना धक्का बसला.

त्यांनी रोशनला विचारलं, ‘काय झालं’ रोशन आपलं डोकं अनिलदा यांच्या मांडीवर ठेवून म्हणाला, ‘मी संगीतकार व्हायच्या अजिबात लायकीचा नाही. अशा ट्यून मी कधी तयार करू शकणार नाही.’ त्याला एक कानफटात देऊन अनिलदा यांनी भानावर आणलं, आणि म्हणाले, ‘अशी वृत्ती ठेवून तू या चित्रपटसृष्टीत कसा तरणार? तुला तुझ्या कर्तृत्वावर आणि गुणवत्तेवर विश्वास हवा.’

रोशनकडे प्रचंड गुणवत्ता होती. पण हृदय सशाचं होतं. अनिलदा यांचा त्याच्यावर एवढा प्रभाव होता, की काही वेळा फोन करून विचारी, ‘या अंतऱ्यावर मी अडकलो आहे. काय करू?’

सुरवातीला त्यानं अनिलदा यांच्या आवडत्या गायकांचा उपयोग केला. लता, मुकेश, तलत वगैरे. सुरवातीला रोशनने रफीला क्वचित गाणी दिली. ‘अनहोनी’ चित्रपटात त्यानी राज कपूरसाठी चक्क तलत वापरला आहे. आठवलं, पियानोवरचं गाणं? ‘मैं दिल हूँ एक अरमान भरा’ त्यातला पियानो फार सुंदर आहे.

सी. रामचंद्र आणि मदनमोहन यांच्या संगीताचा विचार लता मंगेशकरशिवाय करता येत नाही. रोशनचं अगदी तसं नाही. लता सोडून रोशनच्या संगीतात, मुकेश-रफीची खास गाणी आहेत. पण तरीही लताची गाणी हे सर्वांत मोठं वैभव आहे. लताच्या कारकीर्दीला २५ वर्ष पूर्ण झाल्यावर, तीने तिची आवडती १० गाणी काढली होती. त्यात रोशनचं ‘‘एरी मैं तो प्रेम दिवानी’’ हे मीराचं भजन होतं.

लता आणि रोशन यांचे सांगीतिक आणि वैयक्तिक संबंध घट्ट होते. ‘हमलोग’ या चित्रपटात लतादीदीनी रोशनकडे प्रथम गाणं म्हटलं.

ते होतं, ‘‘छन छन छन बाजे पायल मोरी’’ तिथून सुरू झालेली साथ १९६८ च्या ‘अनोखी रात’ पर्यंत टिकली. त्यांचं शेवटचं गाणं होतं, "महलो का राजा मिला" लता मंगेशकर यांच्या महालाचा राजा रोशन नसेल पण, सरदार नक्की होता. रोशनकडे रफीने ३०, आशाने ४७, मुकेशने २७ मिळून १०४ सोलो गाणी म्हटली आणि लतादीदीने एकट्यानी १०४ सोलो म्हटली आहेत.

१९५६ मध्ये लता मंगेशकरला ‘भैरवी’ हा सिनेमा काढायचा होता. तिने त्या सिनेमाचं संगीत रोशनकडे सोपवलं. ती कुणाकडेही सोपवू शकली असती. शंकर जयकिशन, नौशाद, मदन मोहन, सी रामचंद्र, बर्मन वगैरे... बरं रोशनने १९५६ पर्यंत हिट चित्रपट सुद्धा दिलेले नव्हते. पण तरीही आपला पहिला सिनेमा दीदींना रोशनला द्यावासा वाटला.

कदाचित रोशनने दीदींना आवाजाच्या खालच्या पट्टीत गाऊन घेतल्यामुळे, आणि त्यांच्या आवाजातून दुःखद आणि प्रेमभंगाच्या भावना समर्थपणे व्यक्त झाल्या होत्या. त्यांचं ‘अजी बस शुक्रियाँ’ चित्रपटातलं ‘सारी सारी रात तेरी याद सताये’ हे गाणं ज्यांनी प्रियकर किंवा प्रेयसीच्या आठवणीत रात्री जागवल्या आहेत, त्यांनी नक्कीच गुणगुणलं असेल. ते गाणं हृदयात खोल कुठे तरी जाऊन जखम करतं. पण त्यासाठी प्रेमात बुडून जायला हवं.

१९६० नंतर रोशन ह्यानी आपल्या संगीताचा ढंग बदलला. १९६० पर्यंत, त्यांच्या संगीतात सारंगी, सतार, तबला, बासरी, डफली यांचा वापर असे. ६० नंतर लताच्या वरच्या पट्टीचा आवाज वापरायला त्यांनी सुरवात केली. त्याचा वाद्यवृंद पश्चिमात्य व्हायला लागला. मूलभूत गोडवा टिकला, पण पाश्चिमात्य वाद्यांचा वापर वाढला.

‘बरसात की रात’मधलं, ‘‘ मुझे मिल गया, बहाना तेरी दिदका’’ गाणं ऐकताना कुठेतरी शंकर जयकिशनचा भास होतो.

रोशनने आपला रस्ता या ‘बरसात की रात’ नंतर बदलला. त्यावेळी हिंदी चित्रपटात, दिलीप, राज, देव या तिघाचं राज्य होतं. त्याला दिलीप आणि देव कधी मिळाले नाहीत. राज कपूर दोनदा मिळाला पण पहिल्या ‘बावरे नैन’, ‘अनहोनी'' च्या वेळी तो तसा नवखा होता. राज बरोबर ‘दिलं ही तो है’ गाजला. १९५५ ते १९६० च्या काळात रोशनचे अनेक चित्रपट कोसळले. त्यामुळे त्याची गानरत्न बॉक्स ऑफिस नावाच्या सुंदरीच्या अंगावर कधी चमकली नाहीत.

ती दागिन्यांच्या पेटीत पडून राहिली. ६० नंतर, गानहिरे कसे चमकवायचे ते रोशनला कळलं. त्यानंतर रोशनला ते मोठ्या हीरोच्या मुकुटात कधी खोचावे लागले नाहीत. अशोककुमार, मीनाकुमारी वाटेला आले. पण अशोककुमार तेव्हा नायिकेसाठी बिजवर हीरो वाटायचा आणि मीनाकुमारी आईच्या भूमिकेसाठी. धर्मेंद्र नुकताच उभा राहत होता.

धर्मेंद्र उभा राहिला आम्ही नाही पाहिला म्हणायचा तो काळ होता. पण तरीही रोशनची गाणी गाजली.

असाच एक गानहिरा रोशनने प्रदीपकुमार, मीनाकुमारीला पेश केला. तो म्हणजे, ‘भिगी रात’ मधलं "दिल जो ना कह सका"

एक लता म्हणते, एक रफी.

तज्ज्ञ म्हणतात, लताचं गाणं जास्त चांगलं आहे. मला रफीचं आवडतं. दोन्ही गाण्यात भावना वेगळ्या आहेत. लताचं रोमँटिक आहे. ती गाताना भारतीय वाद्यांचा एक हलका ठेका सुरू असतो. पण त्याचवेळी पाश्चात्त्य वाद्यांचा लयबंध मागे असतो. रफीचं गाणं जोरकस वाटतं. त्यात प्रेमभंग झाल्याचं, फसवल्याचं दुःख आहे. असंच माझं एक लाडकं द्वंद्वगीत म्हणजे,

'बार बार तोहे क्या समझाये पायलकी झंकार" पुन्हा प्रदीपकुमार आणि मीनाकुमारी. गाण्यात मुखड्याला दोन ऱ्हिदम आहेत. सुरवात वरच्या पट्टीत, फोक शैलीत होते. रफी प्रश्न विचारतो, क्या? तिथे ऱ्हिदम सांधा बदलतो. खालच्या पट्टीत मीनाकुमारीच्या गळ्यातून लता अवतरते. सवाल-जवाब पद्धतीचं गाणं आहे. पण जो प्रश्न विचारतो तोच उत्तर देतो. मग तो प्रियकर असो किंवा प्रेयसी. शेवटी मीनाकुमारी विचारते, आणि त्याला उत्तर बासरीच्या गोड तुकड्याने दिलं जातं. खास वेगळा रोशन.

एकदा रोशन बर्मनदादांकडे घरी गेला आणि त्याने दादांना सांगितलं, ‘मला तुमचं ‘थंडी हवाये लहराके आये,’ हे गाणं प्रचंड आवडतं. मला ती चाल वापरायला परवानगी द्या.' दादांनी हो म्हटलं. त्याच चालीवर त्यांनी "रहे ना रहे हम" हे गाणं तयार केलं.

रोशनचं भाग्य बदललं. त्याच्या आयुष्यात सहिर लुधियानवी आल्यावर. त्याबाबत पुढील लेखात.

(पूर्वार्ध)

(लेखक क्रीडा व चित्रपट क्षेत्राचे अभ्यासक असून या दोन्ही विषयांवरची त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com