
काही अपवाद सोडले तर रफी सर्व संगीतकारांचा लाडका होता... नौशादपासून सी. अर्जुनपर्यंत! नौशाद, ओपीनंतर आणखी दोन महान संगीतकारांनी रफीचा सुंदर उपयोग करून घेतला. १९४७ मध्ये ‘दो भाई’ हा बर्मनदांचा तिसरा सिनेमा होता. त्यात गीताची दोन गाणी तुफान गाजली. एक, ‘मेरा सुंदर सपना बीत गया’ आणि दुसरं ‘एक दिन हमको याद करोगे’.
त्या सिनेमात रफीलाही त्यांनी एक गाणं दिलं होतं, ते होतं, ‘दुनियामे मेरे आज अंधेराही अंधेरा’. १९४६ ते ७६ या ३० वर्षांत रफी, बर्मनदांच्या चित्रपटांत ४५ सोलो आणि ४३ द्वंद्वगीतं गायला. बर्मनदांच्या ९० चित्रपटांत त्यांनी रफीला जवळजवळ चित्रपटामागे एक गाणं दिलं. त्याच बर्मनदांनी किशोर कुमारला ५६ सोलो आणि ५६ द्वंद्वगीतं दिली. म्हणजे रफीपेक्षा जास्त.
तरी बर्मनदा म्हटल्यावर फक्त किशोर आठवतो का? नाही. रफीसुद्धा तेवढाच आठवतो. कारण बर्मनदांना कुठलं गाणं कोणाला द्यावं ह्याची प्रचंड जाण होती.
एक उदाहरण देतो - ‘तीन देवीयाँ’ या सिनेमामध्ये त्यांनी किशोरला तीन गाणी दिली. पण ‘कही बेखयाल होकर, यूही छू लिया किसीने’ ही गझल मात्र त्यांनी रफीला दिली किंवा ‘ऐसे तो ना देखो’ हे नशिलं गाणं. कारण ही गाणी रफी जास्त चांगल्याप्रकारे गाऊ शकेल याची त्यांना खात्री होती. बर्मनदांचा रफी हा नौशाद, ओपी किंवा शंकर जयकिशनएवढाच झपाटून टाकणारा आहे.
‘तेरे मेरे सपने’ घ्या किंवा ‘अकेला हू मैं इस दुनिया में’ किंवा ‘दिन ढल जाये’ किंवा ‘हम बेखुदी मे तुम’ हे रफी गाताना देव आनंदच गातोय असं वाटत राहतं. तसा किशोर कुमारचा आवाज देव आनंदसाठी अधिक जवळचा, तरी रफीने देव आनंदची गाणी अशी गायली आहेत की रेडियोवर गाणं लागलं तरी डोळ्यांसमोर देव आनंद येतो. मग तुम्ही सिनेमा पाहिलेला असो किंवा नसो. रफीची ही अजब किमया आहे.
रफी गाताना तो नट तुम्हाला दिसतो. म्हणूनच शंकर जयकिशन यांनी देव आनंदला आवाज देताना रफीचा वापर जास्त केलाय, तलतला एखाददुसरं दिलंय. उदा. - ‘ तुम तो दिलकी तार छेडकर’ वगैरे; पण देव आनंदसाठी त्यांचा रफी हाच प्रमुख गायक आहे. मग ते गाणं ‘कल की दौलत आज की खुशीया’ असो, किंवा ‘धीरे धीरे चल चांद गगनमे’.
बर्मनदांचा ‘प्यासा’मधला रफी तर वेगळाच होता. त्याचं कुठलंही गाणं पहा. ‘जिन्हे नाझ है हिंद पर वो कहॉ है’ ही बदनाम वस्तीची व्यथा असो, किंवा शेवटचं ‘ये महलों ये तख्तों ये ताजोंकी दुनिया’ साहिरचे शब्द या क्रांतीच्या ठिणग्या आहेत आणि या ठिणग्या अधिक प्रज्वलित केल्यात रफीच्या आवाजाने. रफी याने गायलेला प्रत्येक शब्द अंगावर येतो.
शंकर जयकिशन याने रफीला ‘बरसात’मध्ये फक्त एकच गाणं दिलं, कारण राज कपूर नेहमीच मुकेशचा आवाज घ्यायचा. ‘बरसात’मध्ये हे गाणं बॅकग्राउंडला ठेवलं आहे. ते गाणं होतं, ‘मैं जिंदगी मे हरदम रोताही रहा हूँ’. ‘सीमा’ चित्रपट येईपर्यंत रफी शंकर जयकिशनकडे जास्त गायला नाही.
अर्थात, ‘हलाकू’मधलं रफीचं, ‘आजा के इंतजार में’ कोण विसरेल? प्रेयसीची वाट पाहताना किती वेळा म्हटलंय मी. किंवा ‘श्री ४२०’मध्ये ‘रमय्या वस्तावय्या’ या गाण्यात रफीचा वापर त्यांनी करून घेतला. पण, ज्या सिनेमात राज कपूर हिरो नव्हता, त्या चित्रपटात शंकर जयकिशनने रफीचा आवाज भरपूर वापरला आणि शम्मी कपूर लोकप्रिय हिरो झाल्यावर शंकर जयकिशन एखादा किरकोळ अपवाद वगळता फक्त रफीला शम्मीसाठी वापरला आणि देव आनंदप्रमाणे रफी शम्मीसाठी गाताना डोळे मिटले की डोळ्यांसमोर शम्मीच यायचा.
रफी-शम्मीच्या गाण्याचे कितीतरी किस्से आहेत. तुम्ही ‘किस किस, किस को प्यार करू’ हे गाणं ऐकलं आहे? या गाण्याचं रेकॉर्डिंग एकदा झालं होतं; पण रफीला ते पसंत पडलेलं नव्हतं. त्याने शंकरला सांगितलं, ‘आपण पुन्हा रेकॉर्डिंग करू; पण त्यासाठी मला सुंदर मुलींचा ताफा स्टुडिओत हवा आहे.’ शंकर बुचकळ्यात पडला, कारण रफी हा रंगेल वृत्तीचा कधीही नव्हता, तो पापभिरू होता. पण शंकरने निर्माता प्रमोद चक्रवर्तीला सांगितलं आणि त्यांनी सुंदर मुलींचा ताफा स्टुडिओत उभा केला.
मग रफीने सांगितलं, ‘गाण्याचं रेकॉर्डिंग करताना त्यांना माझ्यासमोर उभं करा; पण त्यांनी माझ्याकडे पाहायचं नाही.’ हे सर्व रफीच्या मनासारखं झाल्यावर रफी गायला लागला, ‘किस किस, किस को प्यार करू, कैसे प्यार करू, ये भी है, वो भी है,’ वगैरे. हे गाणं शम्मी कपूर गातोय असं त्यामुळेच वाटतं.
आणखी एक किस्सा सांगतो. गाणं आहे, ‘दिल के झरोखे में तुझ को बिठाकर’ या गाण्याची चाल जयकिशनने बांधली; पण पियानो स्वतः शंकरने वाजवला. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी जयकिशनने रफिला सांगितलं की, ‘दिल के झरोखे में तुझ को बिठाकर’ हे धृपद गाताना जर तू न थांबता, श्वास न घेता गायलंस, तर गाणं अधिक उठून येईल.
रफीने तसं केल. रेकॉर्डिंगनंतर रफी जयकिशनला म्हणाला, ‘बाबा रे असली गाणी गायला मला लावू नकोस, तू तर माझा श्वास बंद केला होतास. मी अशी दहा गाणी गायली तर अकरावं गाणं गायला मी जिवंत नसेन.’
रफीने अनेकांच्या कारकिर्दीला हातभार लावला. दिलीप कुमार, शंकर जयकिशन आणि मोहम्मद रफी नसता, तर राजेंद्र कुमारने पंजाबमध्ये ट्रक चालवला असता किंवा शेती केली असती, तो गरिबांचा दिलीपकुमार झाला आणि शंकर जयकिशनचं संगीत, रफीचा आवाज या जोरावर तो ज्युबिली कुमार म्हणून मिरवायला लागला. त्याचे २५-२६ चित्रपट सिल्व्हर ज्युबिली झाले. त्याला मिळालेली गाणी पाहून शम्मी कपूरसुद्धा हळहळला.
विशेषतः ‘तेरी प्यारी प्यारी सूरत को’ हे गाणं हसरतने राजेंद्र कुमार याला दिलं म्हणून शम्मी कपूर हसरत जयपुरीवर तर प्रचंड चिडला होता. ‘बहारों फूल बरसाओ’ असेल किंवा ‘तुम कमसीन हो नादां हो’ असेल किंवा ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर’ असेल... रफीने राजेंद्र कुमारच्या गळ्याला सोन्याचा गळा बनवलं.
मदन मोहन हा तसा पडेल चित्रपटांचा संगीतकार; पण त्याची गाणी इतकी चिरंजीव की अश्वत्थामा, मारुती, कृपाचार्य या चिरंजीवांच्या यादीत मदन मोहनची गाणी बसू शकतात. सुरुवातीच्या काळात मदन मोहन याने तलतच्या आवाजाचा जास्त उपयोग केला. उदाहरणार्थ - शबीस्थान आशियाना, मदहोश, देख कबीरा रोया... वगैरे; पण नंतर रफी हाच त्याचा प्रमुख गायक झाला.
‘आराधना’नंतर किशोर कुमारचा जमाना आला; पण मदन मोहनने रफीची साथ सोडली नाही. मग ते ‘हीर-रांझा’मधलं ‘ये दुनिया ये महफिल’ असो, किंवा ‘हस्ते जखम’मधलं ‘तुम जो मिल गये हो’ असो. ‘हीर-रांझा’मध्ये राजकुमार हा रोमँटिक हिरो होता. राजकुमार ह्याला रोमँटिक हिरो करणं म्हणजे कसाबला शांततेचे नोबेल प्राइज देण्यासारखं आहे.
चांगल्या गाण्याची त्यामुळे पडद्यावर खांडोळी झाली आणि ‘हस्ते जख्म’चा नायक होता नवीन निश्चल, जो अभिनयात शेवटपर्यंत नवीनच राहिला आणि त्याचा चेहरा निश्चल. गंमत अशी होती की रफीचा चेहरा प्रचंड बोलका होता, तो गाताना त्याच्या चेहऱ्यावरती उत्कृष्ट आणि त्या गाण्याच्या अर्थाला न्याय देणारे भाव दिसायचे; पण बऱ्याचदा त्याची गाणी गाणारे नट तसे हावभाव चेहऱ्यावर दाखवू शकत नव्हते. प्रदीप कुमार, भारत भूषण, महिपाल वगैरे अशी मोठी यादी आहे; पण ती गाणी गाजली. रफीच्या आवाजातून तो भाव व्यक्त व्हायचा.
मदन मोहन हा गझलसम्राट! काही गझल त्याने तलतकडून गाऊन घेतल्या; पण काही मोहम्मद रफीने गायल्या. त्यातली मला नेहमी सर्वोत्तम वाटते ती ‘गझल’ चित्रपटामधली ‘रंग और नूर की बारात किसे पेश करू’. त्याची ती शब्दफेक, त्याची ती सुरुवात, शेवटी आवाज वर चढवत नेणं... ते रफीनेच करावं.
रफीचा आवाज स्वर्गातल्या देवाला ऐकू येईल असा वर चढायचा. महेंद्र कपूरचाही वर चढायचा; पण रफीच्या आवाजातला गोडवा, त्याची जाण, त्याच्या आवाजाचे चढ-उतार, त्यातल्या भावनांचा आविष्कार अद्वितीय होता.
तलत, हेमंत कुमार, मुकेश, मन्ना डे वगैरेंच्या आवाजात एखादं खास वेगळेपण होतं. त्या प्रकारच्या वेगळ्या भावना व्यक्त करताना ते ‘बाप’ वाटत; पण अष्टपैलुत्वाचा विचार केला तर रफीला तोड नाही.
रफीला या इतर गायकांबद्दल प्रेम होतं, आदर होता. एकदा ओ.पी. नय्यरसमोर रफीने ‘पूछो ना कैसे मैने रैन बितायी’चे सूर छेडले. हे गाणं तसं मन्ना डेचं. ओपी त्याला म्हणाला, ‘‘अरे अख्खं गाणं गाऊन दाखव.’’ रफीने ध्रुपद म्हटलं आणि मग रफी म्हणाला, ‘‘मन्ना डेने जो आत्मा त्यात ओतलाय, तो ओतणं मला जमणार नाही. त्याच्या गाण्याला मी न्याय देऊ शकणार नाही. म्हणून मी इथंच थांबतो.’
‘आराधना’नंतर किशोरचा पुनर्जन्म झाला, त्यामुळे रफी काही काळ पिछाडीवर गेला. त्याला नर्व्हस ब्रेकडाउनसुद्धा झाला; पण किशोरबद्दल त्याला प्रचंड आदर होता आणि किशोरला रफीबद्दल. एकदा एक इसम किशोरला भेटायला आला, त्याच्या हातात रेडिओ होता, त्यावर रफीचं गाणं सुरू होतं. ते गाणं होतं, ‘आज पुरानी राहो से कोई मुझे आवाज न दे’.
किशोर कुमारच्या जवळ आल्यावर त्या इसमाने रेडिओ बंद केला. किशोरने त्याला सांगितलं, ‘‘आधी रेडिओ लाव.’’ आणि गाणं संपल्यावर तो म्हणाला, ‘‘ये कमाल सिर्फ रफीसाबही कर सकते है, उनके आगे हम सब बरसाती मेंढक है.’’ रफी गेल्यावर त्याच्या पार्थिवाचं दर्शन घेताना किशोर कुमार चार तास रफीचे पाय चेपत रडत होता.
तुम्हाला ‘हकिकत’ सिनेमातलं, ‘होके मजबूर मुझे, उसने भुलाया होगा’ हे गाणं आठवतं? हे गाणं तलत, रफी, मन्ना डे आणि भूपेंद्र गाणार होते. त्या वेळी एकाच माइकवर गावं लागे. रफी हा तलत, मन्ना डे, भूपेंद्रपेक्षा उंचीने कमी होता, त्यामुळे त्याला स्टुलावर उभं केलं होतं. गाणं रेकॉर्ड झाल्यावर भूपेंद्र म्हणाला, ‘‘आम्ही सर्व रफीपेक्षा उंचीने मोठे आहोत; पण त्याच्या आवाजाची उंची गगनभेदी आहे.’
रफीने आयुष्यात सर्वांना मदत केली.एकदा एक मुलगा रफीला भेटायला आला. रफी दिल्लीत होता. तो मुलगा रफीला म्हणाला, ‘‘मला फक्त गायकच नाही, तर संगीत दिग्दर्शक व्हायचंय. मला मार्ग दाखवाल का?’’ रफीने त्याला सांगितलं की, ‘‘तू आधी एखाद्या संगीतकाराकडे साहाय्यक म्हणून काम कर, अनुभव घे, गाण्याच्या नोटेशनचं ज्ञान घे. मी तुझ्या पाठीशी आहे.’
त्या मुलाचं नाव होतं रविशंकर शर्मा. पुढे तो संगीतकार रवी म्हणून सुप्रसिद्ध झाला. याच रफीच्या सल्ल्यानुसार पोस्टातली नोकरी सोडून रवी हेमंत कुमारकडे साहाय्यक राहिला, त्याला देवेंद्र गोयलने ‘वचन’ नावाचा सिनेमा दिला, त्यातलं पहिलं गाणं रफीने म्हटलं. ते होतं, ‘एक पैसा दे दे ओ जानेवाले बाबू’.
रवीने आपल्या बंगल्याचं नाव ‘वचन’ ठेवलं. रफीवाचून रवीचं पान कधी हलत नसे. रफी गेल्यावर त्या बंगल्यात ज्या सोफ्यावर रफी तालमीसाठी बसायचा, ती जागा रवीने तशीच जतन करून ठेवली. तिथं तो कोणालाही बसू देत नसे. तिथं कोणी बसू नये म्हणून त्याने त्याची हार्मोनियम ठेवली. आणखीन काय काय सांगू?
बाबुल नावाचा एक संगीतकार एकदा रस्त्याने चालला होता. त्याला पाहून रफीने गाडी थांबवली, त्याला गाडीत घेतलं. कुठं जायचं विचारलं. त्यांनी रफीला आपली करुण कहाणी सांगितली. रफी नुकताच रेकॉर्डिंगहून येत होता. त्याच्याजवळ बिदागीचं पाकीट होतं. त्याने ते उचललं आणि बाबुलच्या खिशात ठेवलं आणि त्याला घरी सोडलं.
लक्ष्मीकांत प्यारेलाल संगीतकार झाले त्या वेळी रफीने चित्रपटसृष्टीत दोन दशकं पूर्ण केली होती; पण तरीही ‘पारसमणी’साठी रफी गायला आणि ‘दोस्ती’नंतर तर दोघांची दोस्ती घट्ट झाली. ‘चाहूंगा मै तुझे सांज सवेरे’ या गाण्याला रफीला तिसरं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. त्याला एकूण सहा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाली.
एकदा त्यांच्याच ‘मेरे हमदम मेरे दोस्त’मधलं ‘हुई शाम उनका खयाल आ गया’चं रेकॉर्डिंग झालं. सर्वांना रेकॉर्डिंग आवडलं; पण रफी काहीकाळ स्टुडिओत रेंगाळला आणि त्याने लक्ष्मीकांत प्यारेलालना विचारलं, पडद्यावर गाणं कोण म्हणणार आहे. त्यांनी सांगितलं, ‘‘धर्मेंद्र.’’ तो म्हणाला, ‘‘मला धर्मेंद्रच्या आवाजाशी जवळ जाणाऱ्या आवाजात गाऊ दे’’ आणि त्याने आणखी एक टेक घेतला.
त्या काळातल्या रोशन, चित्रगुप्त, जयदेव, खय्याम, उषा खन्नापासून रामलालपर्यंत सर्व संगीतकारांकडे तो गायला. रामलालची कहाणी तर रफीचं मोठं मन दाखवणारी आहे. त्याला शांताराम बापूंनी सांगितलं की तुझी गाणी मला ऐकवं, त्याने काही ऑर्केस्ट्रा गायक जमा केले आणि त्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली.
बापूंनी ती ऐकली आणि त्याला सांगितलं, मला अजिबात आवडली नाहीत. शेवटी त्यांनी रफीला विनंती केली. रफी केवढा मोठा गायक! देशातल्या सर्व पुरुष गायकांतला त्यावेळेला तो सर्वोत्कृष्ट होता; पण तो रामलालसाठी गायला. ती गाणी रामलालने शांताराम यांना ऐकवली आणि त्यांनी त्याला ‘सेहरा’ हा सिनेमा दिला.
रफीच्या विशाल हृदयाचे किती किस्से सांगावेत! मोठ्या हृदयाच्या रफीचं हृदय मात्र मधुमेहामुळे नाजूक होत होतं. वयाच्या ५६ व्या वर्षी ते बंद पडलं. जन्नत असेल तर रफी नक्की तिथं असेल; पण आपल्यासाठी इथं पृथ्वीवर तो जन्नत उभारून गेलाय.
(लेखक चित्रपट आणि क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक आहेत, त्यांची या विषयांवरची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.