
उषाकिरण आत्राम-ताराम- saptrang@esakal.com
पाऊस, वादळ, भूकंप, वणवे, नद्या-समुद्रांतील खळखळते प्रवाह, ढगांची गडगड, विजेचा कडकडाट, महाप्रलय, प्राणी-पक्षी, किडे, या सर्वांचे आवाज ऐकून प्रथम मानवाने तसेच आवाज काढले असतील. सूर, ताल, शब्द, वाक्ये, असा तो बोलू लागला असेल. पण पहिले शब्द निसर्गातले. गोंडी भाषेच्या संदर्भाने आपण एका उदाहरणापासूनच सुरुवात करूया. पावसाची चाहूल देणारा एक पक्षी म्हणतो, ‘पीर्र वान्ता पीर्र वान्ता’. ‘पाऊस येतो, पाऊस येतो’ या अर्थाने हे शब्द जसेच्या तसे गोंडीमध्ये आले आहेत. दुसरा पक्षी म्हणतो, ‘आको काको’. गोंडी मध्ये आईच्या वडिलांना म्हणतात ‘आको’, तर आईच्या आईला म्हणतात ‘काको’! प्राण्यापक्ष्यांचे असे किती तरी शब्द गोंडीमध्ये आहेत. म्हणूनच तिला निसर्गभाषा म्हणतात.