हौशी खेळातील व्यावसायिक दमछाक!

आ. श्री. केतकर
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

बदलत्या काळानुसार क्रीडा क्षेत्रालाही व्यावसायिक स्वरूप आले. अनेक खेळांच्या व्यावसायिक साखळी स्पर्धा सुरू झाल्या. त्यामुळे खेळाडूंच्या हाती पैसा पडू लागला आणि प्रेक्षक केवळ मनोरंजनासाठी सामन्यांना येऊ लागले; पण सामन्यांच्या अतिरेकामुळे खेळाडूंवर ताण येतो, तसेच खेळाचा दर्जाही घसरू शकतो, याचा विचार कोणी करायचा?

क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यावर म्हटले होते, की आता पाठोपाठ एवढे सामने आयोजित केले जात आहेत, की आम्हाला विमानातून उतरल्यावर लगेच सामना खेळण्यासाठी जावे लागेल. त्याने सहज म्हणून सांगितलेले हे वास्तव गंभीरपणे विचार करावा, असे आहे. याचे कारण खेळाडूही माणसेच आहेत, हे आयोजक विसरले आहेत की काय, असे वाटण्याजोगी स्थिती आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इतिहासात खेळ प्राचीन काळापासून असल्याच्या नोंदी आहेत. पण ते प्रामुख्याने केवळ आनंद लुटण्यासाठी खेळले जात. विविध स्पर्धा होत असल्या, तरी स्पर्धा हेच खेळाडूंचे जीवन बनलेले नव्हते. ही परिस्थिती ग्रीकांनी ऑलिंपिक सुरू केले, तेव्हापासून कुबर्टिनने आधुनिक ऑलिंपिक १८९६मध्ये सुरू केले, तोपर्यंत कायम होती. खेळ आणि खेळाडूंचे आकर्षण सर्वांना नेहमीच वाटते. त्यामुळे क्रीडा स्पर्धांना प्रेक्षकांची उणीव नसे.

खेळातील बारकावे, कौशल्य, डावपेचांचा नीटपणे मागोवा घेणारे जाणकार प्रेक्षक खेळाडूंना उत्तेजन देत. हे सारे हौसेपोटी असे. खेळाडूंना आपापले व्यवसाय, कामे असत. स्पर्धांआधी काही काळ ते सराव करीत. साराच प्रकार हसत-खेळत होई. आधुनिक ऑलिंपकला प्रारंभ झाल्यावर मात्र थोड्या काळातच त्यात बदल होऊ लागला. ऑलिंपिक केवळ हौशी खेळाडूंसाठी होते. खेळासाठी जे पैसे वा अन्य मोबदला घेत असतील, त्यांना ऑलिंपिकमध्ये मज्जाव होता. त्यांच्या वेगळ्या व्यावसायिक स्पर्धा असत. ऑलिंपिक विजेत्यांना पदके दिली जात. रोख रक्कम मिळत नसे. नंतर अशा खेळाडूंचा गौरव म्हणून ती मिळू लागली. यशाचा संबंध देशाभिमानाशी जोडला जाऊ लागला. विजेत्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या, नोकऱ्या दिल्या जाऊ लागल्या. तेथपासूनच खेळांचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले.

उदंड जाहले सामने...
औद्योगिक क्रांतीनंतर कामगारवर्ग निर्माण झाला. दिवसभराच्या श्रमानंतर त्यांना मनोरंजनासाठी खेळांचा आधार वाटू लागला. ज्यांना खेळता येत नसे, ते प्रेक्षकांची भूमिका पार पाडत, खेळाडूंना उत्तेजन देत. त्यामुळे विजेत्यांचे महत्त्व वाढू लागले. कौतुक म्हणून त्यांना पैसे देण्यात येऊ लागले. काही जण  केवळ खेळावर पैसे मिळवू लागले. नोकऱ्याही मिळू लागल्या. अशांना व्यावसायिक खेळाडू म्हटले जाऊ लागले. त्यांना ऑलिंपिक व इतर महत्त्वाच्या (विम्बल्डनसारख्या) स्पर्धांमध्ये प्रवेशबंदी होती.

त्यामुळे खेळाडूंचे दोन गट पडले आणि हौशी नि व्यावसायिक, अशा वेगळ्या स्पर्धा होऊ लागल्या. अर्थात दोहोंमध्ये तुलना अटळ होती. त्यात बऱ्याचदा व्यावसायिक खेळाडूंचे वर्चस्व स्पष्ट दिसत होते. असे असले, तरी अनेक हौशी खेळाडू व्यावसायिकांएवढेच गुणवान होते. महंमद अली हा आधी ऑलिंपिक विजेता होता, नंतर व्यावसायिक बॉक्‍सिंगमध्येही त्याने दीर्घकाळ वर्चस्व गाजवले. रॉड लेव्हरही तसाच. त्याने लागोपाठ ग्रॅंड स्लॅम मालिकेतील चारही टेनिस स्पर्धा जिंकल्या (ग्रॅंड स्लॅम केले). नंतर तो व्यावसायिक बनला आणि तेथेही वरचढ ठरला. व्यावसायिक खेळाडूंसाठी या स्पर्धा पुन्हा खुल्या झाल्यावर, त्याने पुन्हा ‘ग्रॅंड स्लॅम’ केले.

इंग्लंडमध्ये क्रिकेट जंटलमन (हौशी) आणि प्लेअर्स (व्यावसायिक) असे विभागले गेले होते. दीर्घकाळ इंग्लिश संघाचे नेतृत्व हौशी खेळाडूकडेच असे. तेथे व्यावसायिक क्रिकेट लीगच आहे. त्यात परदेशी खेळाडूंनाही स्थान असते, जसे आता ‘आयपीएल’मध्ये आहे.

खेळाडूंवरही वाढता ताण 
भारताने १९७५ मध्ये जागतिक हॉकी स्पर्धा जिंकली. त्यानंतर त्या खेळाडूंवर बक्षिसांची खैरात झाली. पण त्यामुळे त्यांचे लक्ष खेळाकडे राहिले नसावे अशी शंका निर्माण झाली. कारण नंतरच्या काळात हॉकीत भारताची अधोगती झाली. कृत्रिम हिरवळीची मैदाने हे त्याचे एकमेव कारण नाही. याउलट क्रिकेटचा जागतिक करंडक आपण जिंकल्यावर क्रिकेटवेडच देशाला लागले. आधी मर्यादित षटकांचे सामने आले. नंतर एकदिवसीय, ‘ट्‌वेंटी- २०’ विजेतेपदानंतर त्या सामन्यांनी कहर केला. एकदिवसीय सामन्यांमुळे कसोटीची लोकप्रियता कमी झाली. अपवाद ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचा. मग ते एकदिवसाचे सामनेही मोठे वाटू लागले आणि वीस षटकांच्या सामन्यांची लाटच आली. पाठोपाठ ‘आयपीएल’ सुरू झाली आणि खेळ पूर्णतः धंदाच बनला. प्रत्येक संघाचे मालक ज्यांना खेळात फारसा रस नसे, त्यांच्या तालावर खेळाडूंना नाचावे लागले. आता सामन्यांबरोबर अन्य कार्यक्रमातही त्यांना उपस्थित राहावे लागते. या स्पर्धेच्या यशानंतर अन्य संघटकही त्याच मार्गाने गेले. अनेक खेळांच्या व्यावसायिक साखळी स्पर्धा सुरू झाल्या. खेळाडूंच्या हाती पैसा पडू लागला. प्रेक्षक केवळ मनोरंजनासाठी येऊ लागले.

खरे तर यात वाईट काहीच नाही. काळ बदलत आहे. जगभर हेच चालले आहे. ॲथलेटिक्‍स, जलतरण, जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धा वाढताहेत. टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिसमध्येही खेळ वेगवान व्हावा, म्हणून नियमांमध्ये बदल केले गेले. त्याची दुसरी बाजू म्हणजे या खेळातील खेळाडूंना मानांकन टिकवण्यासाठी वर्षभरात ठराविक स्पर्धा खेळाव्या लागतात. अगदी अव्वल खेळाडूंनाही त्याचा ताण जाणवू लागतो. पण मोठ्या स्पर्धांत थेट प्रवेश मिळवण्यासाठी खेळावे तर लागतेच. त्यामुळे त्यांच्या दुखापतींचे प्रमाण वाढताना दिसते. आयोजकांनाही हे जाणवते, कारण हे खेळाडू नसले तर प्रेक्षक कमी येतात. पण अद्यापही यातून मार्ग निघालेला नाही. असे का होते? आपल्याला दिसते की काही खेळाडू काही काळच प्राण पणाला लावून खेळ करतात, कमाई करतात, पण नंतर त्यांचा जोर ओसरतो. ते बाजूला पडतात. असे का होते हे खरे तर क्रीडावैद्यांनी शोधायला हवे. मिळालेल्या पैशाने ते तृप्त असतात की अतिश्रमाने त्यांची कुवत नष्ट होते? यावर इलाज काय? काही काळ दूर राहण्याची कल्पना खेळाडू करू शकत नाहीत. पैसा मिळत असला, तरी खेळाची हौस कायम असते. त्यामुळे संघात स्थान टिकवायचे तर खेळावेच लागते. नवा कोणी येऊन चांगली कामगिरी करून गेला तर आपले काय, असा प्रश्न पडतो. म्हणून कितीही ताण पडला तरी ते खेळतच राहतात. स्पर्धांची संख्या तर वाढतेच आहे. अशा परिस्थितीत नक्की काय करायचे असा प्रश्न खेळाडूंना पडत असेल. कुणी त्याचे उत्तर देईल काय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article a s ketkar