Education 4.0 : शिक्षण ४.०

शिक्षण आणि तंत्रज्ञान अधिकाधिक एकात्म होत जाण्याचं नवं स्थित्यंतर उद्याच्या शिक्षणक्षितिजावर दिसू लागलं आहे. त्याला ‘शिक्षण ४.०’ अशी संज्ञा वापरली जात आहे.
Education 4.0
Education 4.0sakal

Education 4.0 : गेल्या अडीच शतकांच्या तुलनेत गेल्या अडीच दशकांमध्ये झालेली तंत्रज्ञानातली प्रगती अचंबित करणारी आहे. त्यामुळे, आजच्या चर्चेचा रोख शिक्षणाच्या प्रयोजनाबद्दल आहेच; शिवाय तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेबद्दलही आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञान अधिकाधिक एकात्म होत जाण्याचं नवं स्थित्यंतर उद्याच्या शिक्षणक्षितिजावर दिसू लागलं आहे. त्याला ‘शिक्षण ४.०’ अशी संज्ञा वापरली जात आहे.

‘भविष्यात रोबोट्स शिक्षण देतील...क्लासरूम वगैरेंची गरज संपून जाईल...’ किंवा ‘येणाऱ्या काळात ‘एआय’ शिक्षणव्यवस्था ताब्यात घेतील. म्हणजे असं की, एआय शिकवायला सुरुवात करेल...’ अशा आशयाची विधानं अधूनमधून कानावर पडतात.

‘माणसानं आतापर्यंत मिळवलेलं सारं ज्ञान ‘एआय’ला दिलं तर पुढच्या काळात हेच तंत्रज्ञान शिकवायला लागेल...शिकवायला माणसांची गरजच लागणार नाही,’ असा हा प्रवाह असतो. ‘सगळं ‘एआय’ला शिकवून ठेवलं तर पुढच्या काळात माणसाला शिकण्याची गरज कशासाठी उरेल?’ असं टोक गाठणारीही एक चर्चा असते.

शिक्षण म्हणजे काय, शिकायचं म्हणजे नेमकं काय करायचं आणि शिकून काय करायचं हे तीन प्रमुख प्रश्न सातत्यानं मूलभूत शिक्षणात चर्चेत असतात. खरं तर, या प्रश्नांनीच शिक्षणाची गती कायम ठेवली. प्रत्येक पिढीनं, प्रत्येक शतकानं आणि प्रत्येक बदलानं या प्रश्नांचा शोध घेतला. हा शोध घेण्यामागं जिज्ञासा असते. कुतूहल असतं. नावीन्याचा शोध घेण्याची आस असते.

नातं : शिक्षणाचं, तंत्रज्ञानाचं

आर्यभट्ट, कोपर्निकस, पास्कल, न्यूटन, जगदीशचंद्र बोस, आईनस्टाईन ते परवा चांद्रयान यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणाऱ्या वैज्ञानिकांपर्यंत साऱ्यांचं योगदान शिक्षणाच्या प्रवाहात असतं. ‘गणित सोडवणं’ ही आर्यभट्टाची शिक्षणाची व्याख्या असू शकते आणि ‘चंद्रावर यान उतरवणं’ ही भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या संशोधकांची.

त्या शिक्षणासाठी त्यांनी योग्य त्या पद्धती निवडल्या. शिकत राहिले. शिकून समाजासाठी योगदान देत राहिले. न्यूटन असो किंवा आईनस्टाईन, आजचं विज्ञान-तंत्रज्ञान आणि संशोधन या साऱ्या इतिहासाच्या खांद्यावर उभं आहे.

आजच्या शिक्षणात तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर होतोय असं भासत असलं तरी, मुळात शिक्षण आणि तंत्रज्ञान एकच आहे हे लक्षात घ्यावं लागतं. इजिप्तमधले अचाट पिरॅमिड्स म्हणजे भूगर्भशास्त्र, पर्यावरणशास्त्र, खनिजशास्त्र, वास्तुशास्त्र यांचा अभ्यास करून निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाचं उदाहरण. फार दूर जायला नको; आपल्याही आसपासच्या कित्येक प्राचीन मंदिरांची रचना ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास करून बनवल्याचं दिसतं.

या सगळ्यामागं शिक्षणाची एक व्यवस्था उभी होती. शिक्षणातून निर्माण झालेलं तंत्रज्ञान होतं आणि तंत्रज्ञानाचा वापर करून वृद्धिंगत केलेली शिक्षणव्यवस्था होती. इतिहास असं शिकवतो की, ही चक्राकार व्यवस्था शिक्षण-तंत्रज्ञानाच्या एकात्मतेतून निर्माण झाली. दोन्ही घटकांनी परस्परपूरक काम केलं. परिणामी, शिक्षण विस्तारत गेलं, तंत्रज्ञान सर्वव्यापी बनू लागलं.

नवं स्थित्यंतर क्षितिजावर

शिक्षण म्हटलं की फक्त वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार असतो असं मानता येत नाही. शिक्षणात भूतकाळाचाही विचार असतो. आपण काय शिकलो होतो हे समजल्याशिवाय, आपण काय शिकतो आहे आणि काय शिकणार आहोत, याचं आकलन होत नाही.

गेल्या अडीच शतकांमधल्या जागतिक शिक्षणव्यवस्थेवर युरोपीय प्रभाव आहे. हा प्रभाव नाकारणं अशक्य आहे. या प्रभावातून निर्माण झालेली सामाजिक, आर्थिक व्यवस्था आणि तिचे सकारात्मक-नकारात्मक परिणाम जगानं अनुभवले.

शिक्षणाचे टप्पे

औद्योगिक प्रगतीची स्थित्यंतरं तपासताना भविष्यकाळात ‘औद्योगिकीकरण ४.०’ असं म्हटलं जातं. यांत्रिकीकरणाचा पहिला टप्पा. त्यानंतर वीजवापरातून विस्तारलेल्या औद्योगिकीकरणाचा. गेल्या पाच दशकांमधला संगणकीकरणाचा तिसरा आणि येऊ घातलेला डिजिटल-फिजिकल एकत्रीकरणाचा असे चार टप्पे मानले जातात.

आजचा काळ चौथ्या टप्प्यात प्रवेशाचा आहे. आर्टिफिशिअल इंटेलजिन्स, मशिन लर्निंग, प्रेडिक्टिव्ह अॅनॅलिसिस, रोबोटिक्सच्या विकासाचा आहे. मानवी गरजांमधल्या बदलाचा हा काळ आहे. बदलत्या गरजांनुसार शिक्षण, बदलत्या शिक्षणानुसार तंत्रज्ञान अशी परस्परांशी संबंधित रचना पुन्हा एकदा गती घेत आहे. त्यामुळंच, औद्योगिकीकरणाचे जसे टप्पे पाहता येतात, तसे शिक्षणाचेही टप्पे पडतात.

समस्या सोडवणारं शिक्षण

प्राथमिक विकासाच्या पहिल्या शैक्षणिक टप्प्यात स्मरणशक्तीवर भर राहिला. हा दीर्घ कालखंड होता. दुसरा टप्पा संगणीकरणाद्वारे शिक्षणाचा आणि तिसरा, ज्यातून आपण आज जातो आहोत, तो टप्पा आहे ज्ञानाधारित शिक्षणाचा.

त्याच बळावर पुढच्या, चौथ्या टप्प्याचा विचार होतोय. हा टप्पा आहे नावीन्यपूर्णतेचा ध्यास घेतलेल्या शिक्षणाचा. पहिल्या तिन्ही टप्प्यांतल्या शिक्षणातून मानवानं विकासाची घेतलेली झेप डोळ्यांसमोर आहे.

या पार्श्वभूमीवर चौथ्या टप्प्याचा विकास कोणत्या दिशेनं जाईल हे पाहणं महत्त्वाचं. जागतिक आर्थिक मंचावर (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) ‘शिक्षण ४.०’ बद्दल चर्चा झाली, तेव्हा समस्या सोडवण्याला प्राधान्य देणारी, सामुदायिकतेवर आधारित आणि नवी कौशल्यं आत्मसात करणारी शिक्षणव्यवस्था अस्तित्वात येईल असा सूर होता. आगामी काळातल्या शिक्षणाची दिशा काय असेल हे यावरून समजतं आहे.

अपरिहार्य बदल

समस्या सोडवणारी शिक्षणव्यवस्था म्हणजे काय हा विचार यापुढच्या काळात अत्यावश्यक असेल. याचा अर्थ असा नव्हे की, आतापर्यंतच्या शिक्षणानं काहीच समस्या सोडवल्या नाहीत. काळ बदलत राहतो, तशा समस्याही बदलतात. नव्या काळातल्या समस्या सोडवायच्या असतील तर नव्या काळातलं शिक्षण लागेल.

केवळ डोळ्यांना दिसताहेत त्याच समस्या आहेत, असं शिक्षण मानत नाही. अन्यथा, डोळ्यांना न दिसणारा विषाणू-जिवाणू कधी समजलाच नसता! येऊ घातलेलं शिक्षण अधिक सामायिक असणार आहे. एखादी समस्या सोडवण्यासाठी एकाच पद्धतीचं शिक्षण उपयोगाचं ठरेल असं नाही. त्यामुळे अनेकानेक विद्याशाखांचं शिक्षण एकत्रित देणारी व्यवस्था निर्माण होत जाईल.

भारताच्या नव्या शैक्षणिक धोरणात ते एक ठळक वैशिष्ट्य आहे. त्याचा दूरगामी परिणाम होणार आहे. तंत्रज्ञानातल्या बदलाच्या वेगाचा परिणाम शिक्षणावर अपरिहार्य आहे. शिक्षणात सातत्यानं बदल होत राहतील. आजचा अभ्यासक्रम पुढची दहा वर्षं रेटायचा, हा प्रकार निरर्थक असेल. केवळ शिकणाराच नव्हे तर, शिकवणाऱ्यावरही शिक्षण ४.० चे परिणाम अपेक्षित आहेत.

नवी रीत

आता या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या प्रश्नांकडे पाहिलं तर रोबोट्सनं दिलेलं शिक्षण किंवा ‘एआय’नं ताब्यात घेतलेली शिक्षणव्यवस्था किंवा ‘एआय शिक्षक’ हे सारं तंत्रज्ञानाचा एक भाग इतपतच मर्यादित आहे हे लक्षात येईल.

शिक्षण आणि तंत्रज्ञान परस्परांना पूरक अशीच व्यवस्था उभी करत जातं. तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे आणि तो वाढतच जाणार आहे, तर शिक्षणात त्याचा शिरकाव होणारच. तो नाकारणं,

टाळणं आणि फक्त मौखिक शिक्षणपरंपरेचं गोडवे गाणं भविष्यकाळाशी सुसंगत नाही याची जाणीव व्हायला हवी. शिक्षणात तंत्रज्ञान राहणारच. तो शिक्षणाचा भागच आहे. ते शिकणं आणि शिकून समस्या सोडवण्यासाठी वापरणं ही ‘शिक्षण ४.०’ ची रीत असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com