पूर्वीचे सिद्धपूर व आताचे सुलतानपूर. उल्कानगरी लोणार व मेहकरच्या मधोमध असलेले हे गाव. गाव तसं छोटे परंतु येथील लाहोटी परिवाराने या छोट्याशा गावाला शैक्षणिक व आरोग्याचे हब म्हणून ओळख दिली आहे. केजीपासून पीजीपर्यंतचे शिक्षण व आरोग्यातीलही सर्व प्रकारचे शिक्षण या ठिकाणी दिले जाते.
यामुळेच या गावाचा चेहरामोहरा तसेच अर्थकारण बदलून गेले आहे. आजवर हजारो विद्यार्थी येथून शिक्षण घेऊन बाहेर पडून वैद्यकीय सेवेत व लोकसेवेत रुजू झाले आहेत. एखाद्या परिवाराने रुग्णसेवेपासून सुरुवात करून ज्ञान आणि आरोग्य याचा मेळ घालून दिल्याचे हे एक उत्तम उदाहरण होय.
कैलासवासी नारायणदासजी लाहोटी यांनी त्या काळात जडीबुटीद्वारे परिसरातील रुग्णांचे दुःख निवारण्याचा मनापासून प्रयत्न केला. रुग्णांना व्याधिमुक्त करून समाजसेवेचे बीज रोवले. त्यांचा मुलगा डॉ. रामप्रसाद लाहोटी यांनी वडिलांपासून मिळालेला रुग्णसेवेचा वारसा सतीचे वाण समजून पुढे नेत संतविचारांवर ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ ही उक्ती आचरणात आणली.
डॉ. रामप्रसाद यांच्या कार्याची ख्याती सर्वत्र पोहोचत असतानाच त्यांचे मोठे चिरंजीव डॉ. हेमराज लाहोटी व संजय लाहोटी यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्याने त्यांनी हा वारसा नव्या जोमाने पुढे नेण्यासाठी वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवण्याबरोबरच नवोदय शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून विविध कामे केली.
डॉ. आर. एन. लाहोटी सीबीएसई, ज्युनिअर सायन्स कॉलेज, कॉलेज ऑफ नर्सिंग, फिजोओथेरपी, बी.एस.सी. (एन) पीबीबीएससी (एन), जीएनएम कॉलेज ऑफ नर्सिंग अशी अद्ययावत शैक्षणिक दालने खुली करीत असतानाच वैद्यकीय सेवा ही नेटाने पुढे नेली.
अर्धांगवायू म्हणजे पॅरालिसीस यासारख्या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी विश्वासनीय उपचार म्हणून राज्यासह परराज्यांत डॉ. लाहोटींची ख्याती झाली. अशातच डॉ. हेमराज यांचे पुत्र डॉ. शशिराज व स्नुषा डॉ. ज्योती शशिराज या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमुसह सुसज्ज अद्ययावत रोबोटीक मशीनद्वारे श्रीराम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा दिली जाते. दर दिवशी शेकडो रुग्ण उपचारांसाठी येतात. एका वर्षभरात पाच लाखांपेक्षा जास्त रुग्ण येथे समाधानकारक उपचार घेऊन जातात.
डॉ. रामप्रसाद लाहोटी यांचे धाकटे चिरंजीव संजय लाहोटी यांनी आरोग्याला जोड दिली ती शिक्षणाची. जेमतेम चार-पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या सुविधा आहेत. ग्रामीण भागाच्या दृष्टीने शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.
संजय लाहोटी यांनी हे वास्तव ओळखून सुलतानपूरसारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय शिक्षण संस्था स्थापन करून हजारो विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. माउली मेडिकल कॉलेजच्या स्थापनेमुळे आरोग्य सेवेच्या सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कमी खर्चात उपचार आणि आरोग्यसेवा हे त्यांचे ब्रीद आहे.
२००३ मध्ये आदर्श बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यानंतर अध्यापक विद्यालय, नंतर पॉलिटेक्निक, बीए, बीकॉम, बीएससी, बीएसएम, एमबीए, एमए मराठी, इंग्रजी माध्यमाच्या केजीपासून शाळा. एसएनडीटी विद्यापीठाच्या बीएससीएलएल, फॅशन डिझायनिंगसारखे कोर्स त्यांनी या ठिकाणी सुरू केले. डॉक्टरांच्या कार्यामध्ये औषध निर्माणाला महत्त्वाचे स्थान आहे.
त्यामुळे त्यांनी या ठिकाणी डी फार्म आणि बी फार्म महाविद्यालय सुरू केली. एम फार्मची जोड दिली. आपले लक्ष आयुर्वेदाकडे वळवून आयुर्वेद मेडिकल कॉलेजची मान्यता मिळवून त्याला आपल्या वडिलांचे नाव दिले.
अर्थात आर. एन. लाहोटी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर सुलतानपूर, होमिओपॅथीमध्ये सुद्धा आर. एन. लाहोटी होमिओपॅथी महाविद्यालय आणल्याने सुलतानपूरसारख्या ठिकाणी आयुर्वेद, होमिओपॅथी, ऍलोपॅथी या तीनही वैद्यकीय शाखा कार्यरत आहेत. सुलतानपूर परिसरातच अद्ययावत माउली मेडिकल कॉलेजची भव्य अशी चार मजली इमारत आहे.
सहाशेपेक्षा जास्त बेड असलेले हे सर्व सुविधांनी संपन्न आणि सर्व आजारांवर उपचार होणारे ठिकाण बनले आहे. सर्व प्रकारच्या सर्व जाती-धर्माच्या सर्व स्तरातील रुग्णांना या ठिकाणी लाभ दिला जातो. अनेक उपचार मोफत केले जातात.
त्यांचा थोरला मुलगा देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून या क्षेत्रात नव्या उमेदीने कार्यरत आहे. लाहोटी परिवाराने केलेल्या या वैद्यकीय व शैक्षणिक कार्यामुळे आजवर मोठमोठ्या शहरातील विद्यार्थीदेखील या ठिकाणी येऊन शिक्षण घेत आहेत.
एका छोट्याशा गावात हजारो विद्यार्थी, शेकडो शिक्षक, कर्मचारी अशी संख्या वाढल्याने या गावाला छोट्याशा शहराचे रूप आले आहे. विविध बँका, पतसंस्था यांच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल या ठिकाणी होऊ लागली आहे.
सर्वसामान्य माणसाला रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. छोट्या-मोठ्या व्यवसायाच्या संधी या ठिकाणी निर्माण झाल्या. रोजगारानिमित्त शहराकडे जाणारा युवक गावातच छोटा-मोठा व्यवसाय करायला लागला. यामुळे या भागातील अर्थकारणाला गती मिळाली.
सुलतानपूर येथील श्रीराम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दर दिवशी राज्य व राज्याबाहेरून येणाऱ्या शेकडो रुग्ण व नातेवाईक आणि डॉ. आर. एन. लाहोटी शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षणांच्या संदर्भाने रोजचा असलेला हजारो लोकांचा संपर्क या मुळे निश्चितच येथील अर्थकारणाला दिशा मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.