सुजाण नागरिक घडवणारं शिक्षण

जपानची लोकसंख्या कमी आणि कामाचे अवाजवी दर यामुळं अधिकाधिक ठिकाणी रोबोद्वारे किंवा मशिनद्वारे कामं केली जातात.
education to make conscious Citizens japan
education to make conscious Citizens japanSakal

- यजुर्वेंद्र महाजन

जपानमधील वेळेची शिस्त आम्ही अनुभवली. किती कसोशीनं ते पाळतात हे मागील लेखात मी सांगितलंच. जपानी खाद्य संस्कृतीमध्ये मांसाहारी व शाकाहारी असं दोन्ही प्रकारचं जेवण घेतलं जातं. पण शक्यतो सर्व पदार्थ उकडून खाणं, मात्र तिथला हा प्रकार वेगळाच असतो. आपल्याला तो मानवणारा नसतो हेच खरं. बेकरीचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. स्ट्रॉबेरी, संत्री, पीच ही फळं जपानमध्ये उत्कृष्ट दर्जाची मिळतात.

चहा आणि कॉफीचे वेगवेगळे थंड आणि गरम प्रकार, तसेच विविध प्रकारची शीतपेयं, जूस आणि खाण्याचे पदार्थ व्हेंडिंग मशिनमध्येच मिळतात. प्रत्येक शहरात अशी हजारो व्हेंडिंग मशिन लावलेली असतात. फॅमिली मार्ट सारखी जनरल स्टोअर्स प्रत्येक चार ते पाच किलोमीटरवर दिसून येतात. ही व्हेंडिंग मशिन आणि जनरल स्टोअर्स यावर संपूर्ण जपान चालतो. हातात सतत काहीतरी पिण्यासाठी असणं हे इथल्या युवा पिढीचं वैशिष्ट्य बनलंय.

जपानची लोकसंख्या कमी आणि कामाचे अवाजवी दर यामुळं अधिकाधिक ठिकाणी रोबोद्वारे किंवा मशिनद्वारे कामं केली जातात. हॉटेलमध्ये डिजिटल पद्धतीनं ऑर्डर द्यायची, त्याचे पैसे तिथंच व्हेंडिंग मशिनमध्ये टाकायचे.

तुम्ही ऑर्डर केलेला पदार्थ रोबो तुमच्या टेबलपाशी येऊन देऊन जातो. प्रवासाचं तिकीट काढणं असो, वस्तू खरेदी करणं असो, माहिती विचारणं, माहिती सांगणं, लाँड्रीत कपडे धुणं, अशा अनेक ठिकाणी मशिन किंवा रोबोचा सर्रास वापर दिसून येतो.

जपान फार महाग आहे असं म्हणतात. तसं आहे देखील, पण फार अवास्तव, अवाजवी खरेदी केली नाही आणि प्रवासाचे राहण्याचे योग्य मार्ग अवलंबले तर जपान बघता येऊ शकतो. तो आपला आवाक्याबाहेरचा नाही.

परंतु अनेक वस्तू आणि माणसांसंदर्भातल्या ज्या सेवा आहेत, त्या महाग आहेत. जगभर जपानमधील शिक्षणाबाबत कुतूहल आहे. विशेषतः प्राथमिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक तसेच सामाजिक उत्तम सवयी, वागण्या-बोलण्याच्या पद्धती, सार्वजनिक जीवनातील नियम शिकविले जातात. त्यासाठी योग्य वातावरण दिले जाते.

एक चांगला नागरिक बनण्यासाठीचे प्रशिक्षण दिलं जातं. या दरम्यान मात्र त्यांना विषय व विषयाचं ज्ञानकौशल्य याकडं फार लक्ष दिले जात नाही. स्वच्छता, सौंदर्य दृष्टिकोन, नीटनेटकेपणा, शिस्त, आदरयुक्त वागणूक, जपानी संस्कृती या संदर्भात धडे दिले जातात.

लहान मुलांची, त्यांच्या भावविश्वाची खूप काळजी घेतली जाते. त्यांचं बालपण आनंदी, उत्साही राहील, त्यांना कौटुंबिक ऊब व माया मिळेल याची काळजी घेतली जाते. त्यांचे खेळ, व्यावहारिक ज्ञान, सामाजिक कौशल्य यावर भर दिला जातो.

वर्षातून एक वेळा शाळेतर्फे गावातील बाजाराच्या ठिकाणी मोठ्या रस्त्यावर सर्व विद्यार्थी एक महोत्सव साजरा करतात. त्यामध्ये मुलांसाठी भरपूर मजा, लहान मुलांसाठी खेळ, नृत्य, गाणी, खाण्याचे विविध जापनीज पदार्थ असतात.

आपल्याकडची जत्राच म्हणू या. मुलं-पालक एकत्र येतात, धमाल करतात. जपानमध्ये चहा ही त्यांच्या संस्कृतीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. चहा बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. त्या वेळेस कुठले कपडे असावे, हालचाली कशा असाव्यात, कोणत्या वस्तू आणि भांडं वापरावं, हे सगळं निश्चित केलेलं असतं आणि ते शाळेमध्ये मुलांना शिकवलं जातं. त्याचं प्रात्यक्षिक या महोत्सवात मुलं करतात.

यासोबतच प्रशासनाचे वेगवेगळे विभाग तिथं आपले स्टॉल्स लावतात. भूकंप आल्यानंतर कशा प्रकारे वागायचं हे सांगणारा एक विभाग, आग लागल्यावर काय प्रकारचं काम अग्निशमन दल करतं त्याचा एक विभाग असतो.

त्यामध्ये गॅस सिलिंडर या संदर्भात कशी काळजी घ्यावी हे सांगितलं जातं. एका विभागात पोलीस खात्याची लोक असतात, ते जागरूकता व प्रबोधन करतात. बँकांचे व्यवहार समजून सांगणारे गट असतात. अशाप्रकारे जीवन शिक्षण मुलांना मिळेल या प्रकारे काळजी घेतली जाते. योगायोगाने या जत्रेचाही आम्हाला प्रत्यक्ष अनुभव घेता आला.

शाळेतील पहिली पाच ते सहा वर्ष तेथील मुलांच्या शिक्षणात अधिकाधिक भर हा चांगल्या सवयी, शिस्त, स्वच्छता अशा बाबींवर दिला जातो. वैयक्तिक जीवनात व सार्वजनिक जीवनातील कार्य संस्कृती रुजवण्यावर शालेय व महाविद्यालयीन जीवनात भर दिला जातो. त्याचा चांगला परिणाम पुढं उत्तम नागरिक बनण्यात दिसून येतो.

परंतु हे करत असताना त्यासोबतच विषयांच्या संकल्पना स्पष्ट होणं, त्यात आवड निर्माण होणं, गणित, इंग्लिश, सामाजिक शास्त्र असे विषय सुरुवातीचे सहा वर्ष पाहिजे तसे विकसित होत नाहीत. अशा अनेक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तिथल्या सरकारनं काही बदल करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू केले आहेत.

दिव्यांगांसाठी संपूर्ण सोयी सुविधा आहेत. कार्यालयं, उद्यानं, प्रेक्षणीय स्थळं, घरं, हॉटेल्स, प्रवासाची सर्व साधनं यात सगळीकडं अस्थिव्यंग, अंध अशा सर्वच दिव्यांगांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. ते कोणाचीही मदत न घेता या सर्व ठिकाणी सहजपणानं जाऊ शकतात आणि त्यामुळं ते स्वयंपूर्ण आहेत. समाजात सर्वत्र त्यांचा सहभाग दिसून येतो.

एखादा दिव्यांग जर व्हीलचेअरनं स्टेशनवरून प्रवास करणार असल्यास त्यानं तिकीट काढल्यानंतर स्टेशनवरील एक कर्मचारी त्याच्या सोबत बोगीपर्यंत जातो आणि बोगीला रॅम्प लावतो. ती व्यक्ती सहज आत प्रवेश करते आणि दरवाजा बंद होतो.

ज्या स्टेशनवर ती व्यक्ती उतरणार असते, तिथं आधीच ही माहिती पोहोचलेली असते आणि त्या बोगीचं दार जिथं उघडतं, तिथं एक व्यक्ती हजर असते, तो पुन्हा रॅम्प लावतो आणि ती व्यक्ती इलेक्ट्रिक व्हीलचेअरनं बाहेर पडते. अत्यंत महत्त्वाची बाब ही, की अशी सुविधा फक्त दिव्यांगांसाठीच नाही तर ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांसाठी सुद्धा उपलब्ध असते. त्यामुळं ज्येष्ठ व्यक्तींना, तसेच लहान बाळ असणाऱ्या कुटुंबांचा प्रवास सुद्धा सुखकर होतो.

एकूण २२ दिवस मी जपानमध्ये होतो. यातील एकही दिवस मला कोणी हॉटेलमध्ये उतरू दिले नाही, काही दिवस मी माझ्या बहिणीकडे होतो. त्यानंतर दहा दिवस टोकियोमध्ये जायचे होते. बहिणीने टोकियोमध्ये आमच्या हॉटेलचे बुकिंग करून ठेवले होते.

मंदार पेंडसे हे माझ्या मित्राचे मित्र मेटा लाइफ इन्शुरन्समध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यांची भेट घेण्याचं आधीच ठरलं होतं. त्यांना आमचा हॉटेलचा बेत कळल्यावर त्यांनी आग्रहाने आम्हाला पाचही जणांना स्वतःच्या घरी नेलं. असं आदरातिथ्य पूर्वी आपल्या देशात असायचं !

त्यानंतर टोकियो मराठी मंडळाच्या कार्यक्रमासाठी मी थांबलो आणि माझे कुटुंबीय भारतात परतले. मी तेथील कासाई भागात एखादी सिंगल रूम किंवा डोरमिटरीमध्ये राहणार होतो. योगेंद्र पुराणिक यांच्याशी माझा आधी संपर्क झाला होता. जपानमध्ये निवडणुकीतून निवडून आलेले ते पहिले भारतीय आहेत. राजकीय, प्रशासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत.

त्यांचे तिथे रेका नावाचे खूप प्रसिद्ध भारतीय रेस्टॉरंट आहे. त्यांना मी पाच दिवस त्या भागात राहणार असे कळताच ते मला आग्रहाने त्यांच्या घरी घेऊन गेले. योगेंद्र पुराणिक यांच्यामुळे मला जपानी शाळा बघता आली. ते सध्या त्या शाळेचे प्राचार्य आहेत. सरकारनं शिक्षण क्षेत्रासाठी नेमलेल्या अभ्यास गटातही पुराणिक कार्यरत आहेत.

जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून स्वप्नील आणि राणी आवटे यांच्याशी ऑनलाइन जोडलो गेलो होतो. त्यांनी दोन दिवस सुट्टी घेऊन मला जपानमधील स्वयंसेवी संस्था आणि दिव्यांगांसाठीची राष्ट्रीय संस्थांची भेट घडवून आणली. कॅप्टन अमित गोरे हे सुद्धा माझ्यासोबत अनेक ठिकाणी आले. टोकियो मराठी मंडळाचे अध्यक्ष निरंजन गाडगीळ यांच्या संपूर्ण परिवारासह छान वेळ घालविता आला.

२५ वर्षे या दांपत्याने मराठी मंडळात बहुमोल योगदान दिले आहे. निरंजन व मीरा, अमोल बनसोडे, राजीव सुपेकर, मयूरी, राहुल सलगर, स्वाती राहुल देसाई, संदीप उंडप, नयन, अभिषेक व नमिता साळी, कॅप्टन अमित व तेजस्विनी, स्वप्नील व राणी यांच्या सोबत भोजनाचा आस्वाद घेता आला. त्या निमित्ताने सर्व कुटुंबांचा परिचय झाला. माझे काही विद्यार्थी, काही खान्देशातील, महाराष्ट्रातील परिवाराची भेट झाली.

टोकियो महाराष्ट्र मंडळाने माझं व्याख्यान आणि त्या जोडीला सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केले होते. चारशे व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रम खरोखर अचंबित करणारे होते. दीपस्तंभ व मनोबलचा प्रवास याबद्दल झालेल्या माझ्या व्याख्यानानंतर जपानमधील अनेक भारतीय मंडळी संस्थेच्या कामाशी जोडली गेली.

सर्व भेटीगाठी आणि भरगच्च कार्यक्रमांनी मला भारावून टाकले. अजून अनेकांना भेटायचे होते, पण राहून गेले. राहुल पाठक नावाचे उद्योजक खास आम्हाला गप्पा मारता याव्यात म्हणून मला एअरपोर्ट वर सोडण्यासाठी माझ्यासोबत आले. योगेंद्र पुराणिक आणि तेजस्विनी गोरे यांनी मला प्रवासात न्याहारी व जेवणासाठी भरपूर पदार्थ सोबत दिले. आपण मांसाहार करत नसू तर घरच्या पदार्थांची खूप मदत होते. कारण जपानमध्ये तसेच हॉंगकॉंगमध्ये शाकाहारी जेवण मिळणे सहज शक्य नसते.

येताना मी विमान प्रवासात विचार करत होतो, खरंच आपण किती भाग्यवान आहोत. जपानमध्ये किती प्रेम, आदर, सन्मान, आदरातिथ्य आपल्याला लाभलं. जपानमधील या सगळ्या मित्र परिवाराप्रति मी मनापासून आनंद, प्रेम व कृतज्ञता व्यक्त करतो.

हे सर्व शक्य झालं ते दीपस्तंभ मनोबलच्या कार्यामुळं. या कामामुळं अक्षरशः हजारो व्यक्ती जोडल्या गेल्या आहेत. याच व्यक्ती भारतातील आणि इतर देशांतील व्यक्तींना जोडत राहतात. कित्येक जण प्रत्यक्ष भेटलेले नाहीत, मात्र ते वेगवेगळ्या कारणाने संस्थेच्या कार्याशी जोडले गेले आहेत आणि भेटीनंतर जोडले जात आहेत.

जपानमध्ये खूप फिरलो, खूप निरनिराळ्या प्रकारचे अनुभव घेतले. त्यांचे संस्कार, त्यांची संस्कृती यांचं जवळून दर्शन घेतलं. अनेक प्रकारच्या नकारात्मक गोष्टी व आव्हानं यांना तोंड देऊन हा देश अजोड अशी प्रगती करतो आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हाने सुद्धा आहेत. त्यांच्या बाबतच्या अनेक त्रुटी सुद्धा आहेत, परंतु आपण उजळ बाजू बघावी आणि त्यातूनच आपल्याला काही शिकता यावं, शिकता येईल का याचा प्रयत्न करावा.

स्वामी विवेकानंद असं म्हटले होते, “जगामधल्या प्रत्येक धर्मात, प्रत्येक संस्कृतीमध्ये काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी आहेत. त्यातील चांगल्या गोष्टी एकत्र करून त्या आपण शिकाव्या आणि चुकीच्या नकारात्मक गोष्टी सोडून द्याव्या.” या देशाच्या संस्कृतीतून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, हे नक्की !

( उत्तरार्ध )

(लेखक हे ‘दीपस्तंभ फाउंडेशन’चे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com