दोन गोष्टी...प्रेमाच्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 श्रीकृष्णाची भक्त

दोन गोष्टी...प्रेमाच्या

आपल्या अनुभवाला येणारी सर्वात गहिरी भावना म्हणजे ‘प्रेम’! ते देहापलीकडचं असो की देहनिष्ठ, क्षणभंगुर असो वा आयुष्यभराचं. साध्या गोष्टी जादूमय करण्याची, नातं बदलण्याची, हृदयभंगाची, धडे देण्याची आणि परिणाम कसाही असला तरी आपलं जीवन आरपार बदलून टाकण्याची शक्ती त्यात असते. आणि, जेव्हा हे प्रेम दु:खाच्या अग्नीत तावून-सुलाखून निघतं तेव्हा - फिनिक्स पक्ष्याप्रमाणे - ते आपल्याला शिकवतं की, केवळ निरपेक्ष बांधिलकीच माणसाला इतरांवर मनसोक्त आणि भरभरून प्रेम करण्यासाठी सक्षम बनवते आणि त्या अनुभवातूनच माणूस शेवटी उदात्त आणि वैश्विक प्रेमाच्या जवळ पोहोचतो.

कुसुम - माझी बहीण - ही अगदी लहानपणापासून श्रीकृष्णाची भक्त होती. ही गोष्ट, निदान काही अंशी, तिला समजलेल्या राधा-कृष्णाच्या नात्याविषयी आहे. आणि, लौकिक पातळीवरती बोलायचं तर, ही गोष्ट माझ्या आईविषयीची आहे - जिनं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आपल्या पतीला भेटण्यासाठी सबंध भारतीय उपखंडात प्रवास केला आणि एका रेल्वे स्टेशनवरून युद्धभूमीच्या दिशेनं निघालेल्या आपल्या जोडीदाराला कशीबशी तासभर भेटू शकली.

कुसुममध्ये कितीतरी गोष्टीचं मिश्रण होतं! जाहिरातक्षेत्रातील लेखिका, ध्वनिमुद्रित कार्यक्रमांची निर्माती, ‘रेडिओवरचा एक नामांकित आवाज’, साहित्याची; विशेषकरून उर्दू कवितेची, जाणकार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीकृष्णाची निस्सीम भक्त. तिनं कृष्णाविषयी खूप काही वाचलं होतं आणि आत्मसात केलं होतं. त्या काळी मी तिच्याकडे राहायचो. तिचं घर म्हणजे लॉजिंग-बोर्डिंग झालं होतं. नोकरीच्या शोधात असलेले किंवा ‘निकाला’ची वाट बघत असलेले अनेकजण तिच्याकडे राहायचे!

‘कॉपी-रायटिंग डिपार्टमेंट’ची प्रमुख या नात्यानं रेडिओचे कार्यक्रम ही तिची ‘रोजीरोटी’ होती आणि मी तिचा ‘साउंडिंग बोर्ड’ अर्थात् हक्काचा श्रोता होतो. एका संध्याकाळी ती मला म्हणाली :

‘‘भैया, मी कृष्णावर थोडं लिहिलंय, ते ऐक.’’

‘‘महाभारताशी संबंधित?’’ मी विचारलं.

‘‘नाही,’’ ती म्हणाली, ‘‘राधेच्या आणि कृष्णाच्या अखेरच्या निरोपाच्या बाबतीत मी काही लिहिलंय. ऐक :’’

‘‘बलरामाला आणि कृष्णाला मथुरेला आणण्यासाठी कंसानं अक्रूराला वृंदावनात पाठवलं. कृष्ण जाणार असल्याची बातमी साऱ्या गावात वणव्यासारखी पसरली. संतप्त गोप-गोपिकांनी अक्रूराच्या रथाला वेढा घातला आणि कृष्णानं थांबावं म्हणून त्याचं मन वळवण्याच्या खूप प्रयत्न केला. सर्वांना झालेल्या दु:खाची कृष्णाला जाणीव होती; पण राधेला सोडून जाण्याचा विचार आला की त्याची पावलं अडायची.

‘‘...नेहमीच्या भेटीच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. गाई घराकडे परतत होत्या. यमुना गावाभोवती प्रदक्षिणा घालत होती आणि तो गोवर्धन पाठीमागून पहारा देत होता. त्यांच्या भेटीच्या सगळ्या आठवणी तिथंच होत्या. तिथलं प्रत्येक झाड त्यांच्या ओळखीचं होतं. गवताच्या पात्यापात्यावर आणि प्रत्येक दगड-गोट्यावर त्यांचंच प्रतिबिंब उमटलेलं होतं. ज्योतीकडे पतंग आकर्षित व्हावेत तसे आबाल-वृद्ध तिथं ओढले गेले होते. तिथंच राधेची आणि कृष्णाची भेट झाली होती. तिथंच ते प्रेमात पडले होते - ‘तो’ भक्ताला आपल्यात सामावून घेण्यासाठी उत्सुक असलेला परमात्मा आणि ‘ती’ त्या दिव्य शक्तीत विलीन होण्यासाठी आसुसलेली भक्त.

‘‘...वाट बघता बघता त्यानं बासरी हातात घेतली. एकदा राधेनं रागानं विचारलं होतं : ‘तुझ्या ओठांना भिडण्याएवढी त्या वेताच्या नळीची योग्यता कोणती?’ तेव्हा तिला समजावताना तो म्हणाला होता : ‘ही नळी पोकळ आहे म्हणून तर तिच्यात मी स्वतःला भरू शकतो.’ त्याच्या बोलण्याचा रोख लक्षात घेऊन ती हसून म्हणाली होती : ‘पण माझ्यात तू आधीच पुरता भरून राहिलेला आहेस!’ हे फक्त राधाच म्हणू शकत होती. आणि, आता...?

‘‘...अचानक ती समोर उभी ठाकली. नजरेला नजर भिडवून तो तिच्याकडे बघू शकला नाही. स्वतः देव असूनही आतला कल्लोळ तो तिला सांगू शकला नाही. म्हणून साधारण मानवाप्रमाणं त्यानं तिचा हात हातात घेतला आणि यमुनेचा प्रवाह पाहत नुसता बसून राहिला. काही वेळानं ती म्हणाली : ‘गोविंदा, मला माहीत आहे, माझ्यापासून लांब जावं लागणार याचं तुला दु:ख झालंय; पण लक्षात ठेव, ते विरून जाईल.’ तो उत्तर देणार होता; पण तेवढ्यात त्याच्या ओठांवर बोट ठेवत ती म्हणाली : ‘मुरलीधरा, ऐक आणि मला सांग, कानांवर काय येतंय...?’

‘काही नाही,’ तो म्हणाला. त्याला आणखी जवळ ओढत ती म्हणाली : ‘आता पुन्हा ऐक.’

आणि, त्या क्षणी; प्रेमिकांच्या मीलनप्रसंगी घडणाऱ्या जादूमुळे वाहत्या यमुनेतून ‘कृष्ण-कृष्ण’ असा शब्दनाद त्याच्या कानावर पडला. त्यावर ती म्हणाली :

‘गोविंदा, तो शाश्वत मंत्र जसा तू ऐकलास, तसं हेही ऐक - ‘आपल्याला पहिल्यापासून माहीत होतं की, प्रेम करणं म्हणजे स्वतःला धोक्यात टाकणं. कधीतरी हृदयभंग होणार हे आधीच माहीत होतं, तरीसुद्धा आपण एकमेकांवर प्रेम केलं आणि यामुळेच आपल्याला पूर्णत्व आलं, नाही का? म्हणून, या क्षणाकडे दुःखानं पाहू नकोस. दु:ख सोड. एवढं लक्षात ठेव की, तू गेल्यावर मी एकटी असेन; पण एकाकी कधीच असणार नाही. कारण, तुझ्या नामाचा जप करत ही यमुना माझ्यातून सदैव वाहत राहील.’

‘‘...कृष्णाचे खांदे घट्ट धरून, त्याच्या अंतरंगात डोकावून राधा म्हणाली : ‘मी तुझी ‘इति’ आहे, ‘अंत’ नव्हे. आणि, हेच सत्य आहे. तुझ्या आयुष्याचा वृंदावनवासीयांसोबतचा एक भाग इथं संपला. दुसरा अजून बाकी आहे. माझं प्रेम बरोबर असू दे आणि त्याला काही मोल असेल तर नियतीनं ठरवलेल्या वाटेवर ते तुला दिशा दाखवेल...’

‘‘...राधा म्हणाली ते खरं होतं हे त्याला माहीत होतं. जसं तिनं त्याला जवळ धरलं होतं तसंच त्यानंही तिला घट्ट पकडलं आणि म्हणाला : ‘वाटलं होतं, तू अडवशील; पण माझा भ्रम दूर करून तू मला कर्माचा मार्ग दाखवलास. मी वचन देतो, निर्मोही प्रीतीचं हे कवच धारण करून मी माझं कर्तव्य निभावेन आणि एक दिवस...’ त्याचं म्हणणं पूर्ण होण्याच्या आधीच तिनं त्याच्या ओठांवर पुन्हा बोट ठेवलं.

‘‘...त्यानं पुन्हा एकवार तिच्याकडे पाहिलं आणि तो निघून गेला.

तो गेल्याचं तिला भान होतं, ना वेळेचं. नदीत हिंदोळणाऱ्या त्या लाटांमधून उमटणारे ‘कृष्ण-कृष्ण’ हे सूर काना-मनात साठवत ती तिथंच उभी राहिली. चंद्र उगवला तरीही ती आपल्या तंद्रीतच राहिली...ध्यानमग्न असल्यासारखी. तो मागं सोडून गेलेल्या बासरीचे सूर तिच्या कानावर पडेपर्यंत ती तिथं तशीच उभी होती. मग तिचे डोळे हळुवारपण उघडले आणि अश्रूंचे मोती गालांवर ओघळले.’’

कुसुमची समजूत बरोबर की चूक असा प्रश्न मला अनेकदा पडतो. ही कहाणी खरी होती की कुसुमचा कल्पनाविलास होता? राधा आणि कृष्ण या पृथ्वीवर वावरले की नाही याला काही महत्त्व आहे का? ते देव होते की माणूस यानं काय फरक पडतो? कारण, सर्वसामान्य स्त्री-पुरुषांमध्येदेखील आपापल्या रीतीनं एकमेकांवर भावविभोर प्रेम करण्याची क्षमता असतेच. लष्करातील एका तरुण महिला अधिकाऱ्याची कहाणी हेच सांगते...

सन १९४५ च्या हिवाळ्यात, एक्कावन्नाव्या भारतीय ब्रिगेडनं ब्रह्मदेशातील ‘अरकान ऑपरेशन’मध्ये विजय मिळवला; परंतु मनुष्यबळ आणि युद्धसामग्रीची मोठी हानी झाली. त्यामुळे नव्यानं सज्ज होण्यासाठी दक्षिण भारतातील पोल्लाची इथं त्यांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. पोल्लाचीला पोहोचल्यावर बटालियनच्या कमांडरनं लाहोरच्या पलीकडे फॉरवर्ड बेस हॉस्पिटलमधील मेडिकल कॉर्प्समध्ये असलेल्या आपल्या नवविवाहित पत्नीला पत्र पाठवलं आणि आपण परत आल्याची कल्पना दिली. हेही सांगितलं की, युद्धाची तयारी जोरात सुरू असल्यामुळं भेटीची शक्यता कमी आहे. साऱ्या उपखंडातून फिरत फिरत ते पत्र कॅप्टन डॉ. लीला थोरात यांच्यापर्यंत शेवटी पोहोचलं. वाचून त्यांच्या ध्यानात आलं की, आपण आज रात्री निघालो तरच आपल्या पतीला भेटू शकू. देवाच्या भरवशावर त्या ट्रेनमध्ये चढल्या आणि आपल्या पोहोचण्याची तारीख त्यांनी पतीला तार करून कळवली. मात्र, एक्कावन्नावी ब्रिगेड ही त्यांच्या पतीच्या रेजिमेंटसह ‘ऑपरेशन झिपर’ या मोहिमेंतर्गत मलायावर मोठं आक्रमण करण्यासाठी आधीच धाडली गेली होती,याची त्यांना कल्पना नव्हती.

खरं तर, ती मोहीम सप्टेंबरमध्ये सुरू होणार होती. सैन्यदल समुद्रमार्गे पोर्ट स्वीटनहॅमला उतरणार होतं आणि मलायन द्वीपकल्पाच्या सर्व भागात विखुरणार होतं. तीन वर्षांपासून त्या देशावर कब्जा करणाऱ्या जपानी सैनिकांना हुसकावून लावण्यासाठी एक गुप्त प्रस्ताव लुईस माउंटबॅटन यांनी नुकताच मंजूर केला होता आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्याबाबत संपूर्ण गुप्तता पाळण्यात आली होती. सैन्याला समुद्रकिनाऱ्यांवर उतरवण्याची योजना आखण्यासाठी कॅप्टन लीला थोरात यांच्या पतीसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईला बोलावून, आपला ठावठिकाणा कुणालाही कळू देऊ नये, असं बजावण्यात आलं होतं.

अशा परिस्थितीत, आपली पत्नी आपल्याला भेटण्यासाठी निघाली आहे हे तिच्या पतीला - म्हणजेच माझ्या वडिलांना - माहीत असूनही ते तिला त्यांचा खरा ठावठिकाणा सांगू शकले नाहीत.

पुढं नंतर आमच्याशी गप्पा मारताना वडील त्याविषयी सांगायचे : ‘‘चौथ्या दिवशी ती पोहोचली. तिनं पाठवलेली तार माझा सहकारी कॅप्टन अलीफनं पाहिली नसती आणि तिला आमच्या कॅम्पमध्ये नेलं नसतं तर मोकळ्या प्लॅटफॉर्मनंच तिचं स्वागत केलं असतं. लष्करी तळावर पोहोचल्यावर तिथल्या अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी तिचं खूप आगतस्वागत केलं.’’

स्वागत झालं हे तसं ठीकच...पण त्यासाठी त्या गेल्या नव्हत्या. त्यांचा पती कुठं होता? कॅप्टन अलीफनं मुंबईतल्या आपल्या कमांडरशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला; पण कुणीही माहिती द्यायला तयार नव्हतं. मग आईनं स्वत:च परिस्थिती हाताळायचं ठरवलं. तिची समजूत अशी की, आपणही अधिकारी असल्यामुळं गुप्ततेचं कवच बाजूला करू शकू. तिची समजूत चुकीची होती आणि म्हणून ती अयशस्वी ठरली.

आक्रमणाची योजना आखली जात असल्यामुळे मुंबईतील लष्करी ‘आस्थापनां’मधील कुणीही तिला माहिती दिली नाही. तरीदेखील काही दिवस तिनं सतत प्रयत्न करून बघितला आणि नंतर निराश आणि संत्रस्त होऊन विदीर्ण मनानं लाहोरला परतण्याचा निर्णय घेतला.

टॅक्सी करून ती रेल्वे स्टेशनवर पोहोचली. मिलिटरी काउंटरजवळ आपल्या पतीसारखं कुणीतरी दिसतंय असं तिला वाटलं. आपली पत्नी मागं आहे याची जराही कल्पना नसलेले थोरात सिगारेट पेटवायला म्हणून वळले. आणि, त्यानंतर काय झालं ते मला नीट माहीत नाही. नंतर वडिलांनी सांगितलेली गोष्ट इतकीच होती की, त्या दिवशी त्यांची चांगलीच झाडाझडती झाली!

आईनं अधिक नि:संकोचपणे सांगितलेली कहाणी रोमांचक होती; पण ‘...आणि, त्यानंतर ते आनंदानं नांदू लागले,’ अशातली ही कथा नाही. कारण, जेव्हा पुनर्भेटीचा भर ओसरला तेव्हा वडिलांनी आईला सांगितलं : ‘‘पुढच्या एका तासात माझी ट्रेन निघते आहे. पोल्लाचीला पोहोचल्यावर लगेचच मला मलायाला रवाना व्हावं लागेल. तिथं उतरणारी पहिली रेजिमेंट आमची असेल आणि म्हणून आमच्या तुकडीची मोठी हानी होऊ शकते.’’

सोप्या आणि सरळ भाषेत याचा अर्थ असा होता : ‘‘माझं तुझ्यावर प्रेम आहे; पण तू माझ्याबरोबर पोल्लाचीला येऊ शकत नाहीस; काळजी घे. मी कदाचित परत येणार नाही.’’

अतिशय कोरड्या स्वरात त्यांनी हे आईला सांगितलं. त्यात नाट्यमय असं काहीच नव्हतं. सैन्यातला ऑलिव्ह-ग्रीन गणवेश जेव्हा अंगावर चढवला तेव्हाच त्यांनी हे सगळं गृहीत धरलं होतं. नशिबानं मिळालेला तो एक तास त्यांनी एकमेकांचे हात हातात घेऊन रेल्वे कॅन्टीनमध्ये बसून घालवला. जे काही बोलायचं होतं ते बोलून झालं होतं. अधिक बोलण्यासारखं काही उरलं नव्हतं.

पुढं बऱ्याच वर्षांनी आईनं मला सांगितलं की, ‘त्या दिवशी अनेकदा तिचं मन विदीर्ण झालं होतं.’ प्लॅटफॉर्मवरून ट्रेन जशी निघाली तशी वडिलांना आई म्हणाली:

‘‘तेरी तलाश में अपने सिवा कहाँ जाऊँ?

ये एक राह मिली है, हर एक राह के बाद’’

(तुझा शोध घेण्यासाठी मी माझ्या अंतरंगाशिवाय आणखी कुठं जाऊ? साऱ्या वाटा धुंडाळून अखेर हीच एक वाट सापडली आहे.)

आई-वडील किंवा बहीण यातलं कुणीही आज हयात नाही. कुसुमनं सांगितलेली राधा-कृष्णाची गोष्ट असो किंवा माझे आई-वडील स्वतः जगले ती कहाणी असो, या सगळ्याचा विचार करताना मला असं वाटतं की, इच्छा आणि इच्छापूर्ती या दोन किनाऱ्यांच्या मधून शतकानुशतकं अखंड वाहणाऱ्या त्या महान जीवनगंगेविषयीच्याच या कहाण्या आहेत. नदीच्या या काठावर स्थिरता, यथास्थितीपण, सुरक्षा आणि आराम आहे आणि त्या काठावर मात्र आहे एक अज्ञात प्रदेश... काळोखा, अनिश्चित आणि रहस्यमय. पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची हमी नसताना उडी मारण्याचं धाडस करणं हाच जीवनाचा गाभा आहे.

आपण ते करू शकलो तर कदाचित् आपल्याला प्रेमाचा अर्थ खरा कळेल...

ये एक राह मिली है, हर-एक राह के बाद.

(सदराचे लेखक ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ, तसंच अर्थशास्त्र-इतिहास-राजकीय घडामोडी या विषयांचे अभ्यासक-संशोधक आहेत.)

(अनुवाद : डॉ. रघुनाथ कडाकणे)

raghunathkadakane@gmail.com

Web Title: Educationist Kusum Sister Devotee Of Lord Krishna Since Childhood Educationist

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..