सफर बलूनची...इजिप्तमधली (स्निग्धा गोळे-कोटकर)

स्निग्धा गोळे-कोटकर snigdhagole@gmail.com
रविवार, 2 जून 2019

अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो...

अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो...

त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी. आदल्या दिवशी नाईल नदीच्या काठी लुक्‍सॉरला आमचं जहाज नांगरलं गेलं. इजिप्तच्या आमच्या या सहलीत खरं तर बलूनसफर समाविष्ट नव्हती; पण टूरिस्ट गाईडच्या खास शिफारशीमुळे आम्ही बलून सफरीचं बुकिंग केलं. बलूनमधून सूर्योदय पाहायला मिळावा म्हणून मुद्दाम पहाटेची वेळ निवडली. पहाटेच्या वेळी आम्हाला नेण्यासाठी गाडी आली आणि आम्ही निघालो. थोड्याच वेळात बोटींच्या धक्‍क्‍यावर पोचलो आणि नाईल नदीच्या पल्याड जाण्यासाठी एका बोटीत बसलो. बोटीत चहा-कॉफीची जय्यत तयारी होती. गरमागरम कॉफीचे घुटके घेईपर्यंत पैलतीरी पोचलोसुद्धा. तिथं एक मोठी गाडी आम्हाला गावाबाहेर घेऊन जाण्यासाठी थांबली होती. गाडीत बसून गावाबाहेरच्या दिशेनं निघालो. वाटेत दोन्ही बाजूंना पसरलेली शेती. दाट काळोखाला कापत आमची गाडी चाललेली. थंडीचे दिवस. वाटेतली खेडेगावं अगदी गाढ झोपेत. रस्त्यावर चिटपाखरूही नाही. आसमंतात नीरव शांतता. पर्यटकांच्या एखाद्‌दुसऱ्या गाडीचाच काय तो आवाज. प्रत्येक मोठ्या चौकात आणि गावागावाच्या वेशीवर पोलिस चौकी. स्टेनगनधारी पोलीस अगदी सावधचित्त उभे. जगभरात दहशतवादाचं जे थैमान सुरू आहे, त्याला इजिप्त देशही अपवाद नाही. दहशतवाद्यांकडून पर्यटकांच्या हत्येच्या घटना इथं अधूनमधून घडत असतात. पर्यटनावर देशाचं मोठं उत्पन्न अवलंबून आहे म्हणून दहशतवाद्यांपासून पर्यटकांना संरक्षण देण्यासाठी इजिप्त सरकारनं घेतलेली ही पोलिस चौक्‍यांची खबरदारी. माझ्या मनात भीतीची पाल चुकचुकली. इतक्‍या पोलिस चौक्‍या आहेत म्हणजे आपण इथं नक्की सुरक्षित आहोत का? दहशतवाद्यांचा इथं सुळसुळाट तर नसावा ना? अखेर आमची गाडी एका मोकळ्या मैदानापाशी येऊन थांबली. इथं पर्यटकांची लगबग होती. काहीजण आमच्या आधीच येऊन पोचले होते. काहीजण अजून येत होते. पहाटेची वेळ असल्यामुळे थंडीचा जोर होता. सगळेजण गरम कपडे, टोप्या, हातमोजे, बूट असा जामानिमा करून आले होते. आजूबाजूला बलून जमिनीवर निपचित पडलेले होते. धरणाकाठी वाळत घातलेल्या रंगीबेरंगी साड्यांसारखे! काही ठिकाणी बलूनमध्ये प्राण फुंकण्याची खटपट सुरू होती. उंच, मोठ्या सिलिंडरमधल्या वायूवर प्रखर ज्योती पेटवल्या जात होत्या. गरम हवेच्या झोतामुळे एकामागोमाग एक बलून "जागे' होऊन आता उठून बसू लागले होते! ते उडून जाऊ नयेत म्हणून दोरखंडानं घट्ट बांधून ठेवले होते. या बलून्सचे रंग कसे झळझळीत. कुठं गर्द हिरव्याच्या जोडीला हळदपिवळा, तर कुठं लालचुटुकच्या साथीला निळाशार. कुठं गडद नारिंगी तर कुठं मोरपिशी निळा. तळातल्या ज्योतीमुळे हे रंग अधिकच खुलत होते आणि काळोखाच्या काळ्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होते. एवढ्यात आमचा मार्गदर्शक आला आणि आमच्या गटाला बाजूला घेऊन गेला. त्यानं आम्हाला सगळ्यांना फेर धरायला सांगितलं. या लहानशा गटात कुणी चिनी, कुणी जपानी, कुणी स्वीडिश, तर आम्ही भारतीय. एकमेकांचा हात धरून सगळ्यांनी गोल रिंगण धरलं. सगळेजण मध्यभागी आलो, पुन्हा लांब जाऊन फेर धरला. बलूनच्या उजेडात सर्वांचे चेहरे उजळून गेले होते. बलूनसफारीची उत्सुकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. "इमर्जन्सी लॅंडिंग'ची वेळ आली तर काय करायचं याचा सराव करून घेतला गेला आणि आम्ही सगळे सफरीसाठी सज्ज झालो.

बलूनखाली बांधलेल्या एका जाड वेताच्या उंच चौकोनी टोपलीत आम्ही चढलो (की उतरलो?). टोपली वेताची असली तरी भक्कम होती. तिच्या प्रत्येक कोपऱ्यात दोन किंवा तीन जणांना उभं केलं गेलं. आमच्या कोपऱ्यात मी आणि यजमान असे आम्ही दोघंच. चालकानं गरम हवेचा झोत वाढवला आणि काही क्षणांत आमचा बलून जमीन सोडून आकाशाकडं अलगद झेपावला. आजवर अनेकदा विमानप्रवासात जमिनीवरचं जग न्याहाळलं होतं. विमानोड्डाण करत असताना खालचं चित्र डोळ्यांना दिसलं तरी ते मनात साठवण्याच्या आधीच आपली खालच्या जगाशी ताटातूट होते; पण या बलूनची मजाच निराळी. ही एक "उडती गॅलरी'च जणू. मोकळा वारा हवा तेवढा प्यावा आणि क्षितिजापर्यंतचा सुंदर "नजारा' मनात हवा तेवढा साठवून घ्यावा. इथं विमानाचा बंदिस्तपणा नव्हता. आता हळूहळू फटफटायला लागलं होतं. एकेक चांदणी निस्तेज व्हायला लागली होती. पूर्व दिशेला क्षितिजावर हलकी गुलाबी झळाळी दिसू लागली होती. सूर्याची स्वारी येण्याची आम्ही सर्वजण वाट पाहत होतो. आजूबाजूचं सृष्टिसौंदर्य न्याहाळताना पूर्वेकडं लक्ष ठेवून होतो आणि एका सुंदर क्षणी तो आला! रोजच्या शिरस्त्याप्रमाणे त्यानं जगाच्या रंगभूमीवर प्रवेश केला आणि एखाद्या कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे एंट्रीलाच टाळ्या मिळवल्या. तसा तो रोजच येतो म्हणा; पण रोजच्या गडबडीत त्याच्याकडं पाहायला आपल्याला कुठं सवड असते? सूर्याचं हे साजिरं बालरूप मनात साठवून ठेवावंसं. कारण, काही वेळातच त्याचं तेज इतकं वाढणार होतं की त्याला न्याहाळणं-निरखणं तर दूरच; पण त्याच्याकडं साधी नजर टाकणंही कठीण होणार होतं.

दूर बघितलं तर हॅटशेपसूटचं मंदिर दिसलं. हॅटशेपसूट ही इजिप्तच्या इतिहासातली एक विख्यात राणी. शूर आणि कर्तबगार, मुक्त स्त्री. तिचं तीनमजली मंदिर याच सहलीत आम्ही बघितलं होतं. मोठमोठ्या खांबांच्या लांबच लांब ओवऱ्या असलेलं आणि एखाद्या पंचतारांकित हॉटेलपेक्षाही भव्य असं ते मंदिर आज या उंचीवरून खेळण्यातल्या एखाद्या इमारतीसारखं दिसत होतं. मंदिर आणि त्याची पाठराखण करणारे मागचे डोंगर सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हाऊन निघाले होते. गवताचं एक पातंही अंगावर न बाळगणारे ते रुक्ष डोंगर सोन्याच्या राशींसारखे चमकत होते. खाली डोकावलं तर दूरपर्यंत पसरलेली हिरवीगार शेती. पाणी पिऊन तृप्त, तरारलेली पिकं. हिरवाईच्या असंख्य छटा. मध्येच एका तळ्याचा चमकणारा आयताकृती आरसा. सरळसोट वाहत चाललेला एक पाण्याचा पाट. त्याच्या कडेला खजुराची झाडं शिस्तीनं ओळीत उभी. आपण एका वाळवंटी देशात आहोत यावर विश्वास बसू नये इतकी हिरवाई. ही सगळी नाईल नदीची कृपा! धुक्‍याची दुलई आता विरत चालली होती. क्वचित कुठं एखादा शेताकडं चाललेला शेतकरी. थंडगार हवेत एकटाच विहरणारा चुकार बगळा. बाकी आसमंतात अजून सामसूम होती. इजिप्तमधे शेतात बंगला बांधायची पद्धत नसावी बहुतेक; पण बांधला गेला तर त्या बंगल्याला "नाईलकृपा' हे नाव अगदी शोभून दिसेल! क्षितिजाकडं नजर टाकली तर अनेक रंगीबेरंगी बलून तरंगताना दिसत होते. पहाटे पाहिलेली आकाशाची काळी पार्श्वभूमी आता फिकट निळी झाली होती. आमचा बलूनचालक अगदी निष्णातपणे बलून चालवत होता. वाऱ्याच्या वेगानुसार आणि दिशेनुसार तो ज्योतीचा प्रखरपणा कमी-जास्त करत होता. ज्योत प्रखर करत तो बलून अगदी उंच घेऊन गेला आणि एका क्षणी त्यानं "आपला बलून सर्वांत जास्त उंचीवर आहे' अशी घोषणा केली. हे ऐकल्यावर आम्ही सहप्रवाशांनी एकच जल्लोष केला. जेमतेम 50-60 बलून्सचं ते छोटंसं विश्व; पण त्यातही "सर्वोच्च' असल्याची भावना आम्हाला आनंद देऊन गेली! सभोवतालच्या मनोहर दृश्‍यांचे किती फोटो काढू आणि किती नको असं होऊन गेलं. ते सृष्टिसौंदर्य शक्‍य तितकं कॅमेऱ्यात बंदिस्त केलं. सेल्फी काढण्याचा कार्यक्रमही झाला. काही ताजे ताजे फोटो माझ्या यजमानांनी लेकींना ताबडतोब पाठवून दिले. लगोलग त्यांचं उत्तर आलं, "मोबाईल सांभाळ... खाली पडला तर परत मिळायचा नाही!'

बघता बघता एक तास संपत आला. बलून खाली उतरवण्याची तयारी सुरू झाली. चालकानं ज्योत जरा मंद केली तसा बलून हळूहळू खाली येऊ लागला. एका उंच डेरेदार वृक्षाच्या माथ्यावरून त्यानं तो अलगद तरंगत कौशल्यानं पुढं नेला. बलूनला खाली खेचण्यासाठी जवळच्या शेताजवळ सात-आठजण थांबलेले होते. बलूनला बांधलेल्या दोरखंडाची एक भलीमोठी गुंडाळी चालकानं त्यांच्या दिशेनं फेकली आणि मग सुरू झाली बलून उतरवण्यासाठीची शब्दशः "रस्सीखेच'. एवढा मोठा बलून खाली उतरवणं काही सोपं नव्हतं. जोर लावून दोरखंड खेचावं लागणार होतं. खेचणाऱ्यांच्या हाताचे स्नायू तटतटले होते. भर थंडीतही ते सगळेजण पुरते घामाघूम होऊन गेले. जोरजोरात ओरडून चालक त्यांना अरबी भाषेत सतत सूचना करत होता. अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो आणि आता पुन्हा वास्तवात आलो होतो. या सफरीची आठवण म्हणून आम्हाला एक प्रमाणपत्र देण्यात आलं. एका अविस्मरणीय अनुभवाच्या आठवणी गाठीशी घेऊन आम्ही परतलो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: egypt balloon ride write snigdha gole kotkar article in saptarang