

El Nino Impact on Monsoon
esakal
मयूरेश प्रभुणे - saptrang@esakal.com
झया वर्षी प्रशांत महासाा गरात एल निनो विकसित होणार आणि त्याच्या प्रभावामुळे मॉन्सून हंगामातील पर्जन्यमान सरासरीपेक्षा झकमी राहणार, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) एप्रिलच्या मध्यातच दिला होता. एप्रिल महिन्यात ‘आयएमडी’ने दिलेला सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाज मे अखेरीस आणखी कमी करून ९० टक्के करण्यात आला. मोसमी पावसाच्या केरळमधील आगमनाची तारीख २६ मे राहू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र, मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन झाले, चार जूनला. मॉन्सूनच्या केरळमधील आगमनाच्या तारखेसाठी मागे-पुढे चार दिवसांची त्रुटी गृहीत धरण्यात येते. म्हणजे यंदाचा मॉन्सूनच्या केरळमधील आगमनाचा ‘आयएमडी’चा अंदाज चुकला. प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती असताना बहुतेक वेळा मॉन्सूनचे केरळमध्ये सर्वसाधारण तारखेच्या तुलनेत उशिराने आगमन होत असते. तसेच, त्याची देशातील उत्तरेकडील प्रगतीही खंडाखंडाने होते असे आकडेवारी सांगते. जूनच्या सुरुवातीलाच प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याचे शास्त्रज्ञांनी जाहीर केले आणि यंदाच्या संपूर्ण पावसाळ्यावर एल निनोचा प्रभाव राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
एल निनोचा प्रभाव मॉन्सूनच्या आगमनावरही दिसून आला. केरळनंतर मॉन्सून दोन दिवसांत, म्हणजे सहा जूनला थेट तळ कोकणात दाखल झाला. आठ जूनला त्याने रत्नागिरीच्या हर्णेपासून सातारा, सोलापूरपर्यंतचा दक्षिण महाराष्ट्राचा भाग व्यापला. त्यानंतर मात्र, तब्बल दोन आठवडे अरबी समुद्राच्या बाजूने मॉन्सूनची वाटचाल रखडली. आठ ते २२ जून या काळात पश्चिम किनारपट्टीवर अत्यल्प पाऊस झाला. राज्याच्या इतर भागांमध्येही पावसाचे प्रमाण कमीच राहिले. परिणामी खरिपाच्या पेरणीसाठी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढत गेली. आता मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याची चिन्हे दिसत असली, तरी जूनचे बहुतेक दिवस कोरडे गेल्यामुळे पावसाची तूट मोठी आहे. एक ते २४ जूनपर्यंत देशात सरासरीपेक्षा ४२ टक्के; तर राज्यात ६३ टक्के कमी पाऊस झाला आहे. पाऊस सर्वत्र एकसारखा झाला नसल्याने पेरणीसाठी शासनाने सुचवलेला किमान १०० मिलिमीटरचा निकष अजूनही बहुतांश भागांमध्ये पूर्ण झालेला नाही. जून हातचा गेला असताना आता शेतकऱ्यांची जुलैवरच पूर्ण भिस्त आहे.