माझ्या दागिन्याला जेव्हा जीव फुटला...

माझ्या दागिन्याला जेव्हा जीव फुटला...

सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका

सिनेमात नवीन सुनेला ‘माँ के कंगन’ देणे हा तोच-तोच साज बघून आपण आता हसू लागलोय. मराठी, मल्याळी, गुजराती जवळपास सगळ्याच सिनेमामध्ये मुलाने आपली होणारी बायको आईला दाखवायला आणली की शगून किंवा खूष होऊन ती आपल्या अंगावरचा एक दागिना काढून देते. खरंच काय आहेत याच्या मागच्या भावना? आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काही कथा ऐकतो.

महाराजांनी खूष होऊन आपल्या इमानदार सुभेदाराला गळ्यातला हार भेट म्हणून दिला. आपल्या अंगावरचा दागिना देणे म्हणजे त्या माणसांवर आपला जीव ओवाळतो. अंगावर घातलेल्या आपल्या दागिन्यांत आपला हळूहळू जीव जाऊन बसतो आणि मग तो आपल्या शरीराचा भाग बनून जातो. असा शरीराचा तुकडा आपण फक्त आपल्याच माणसाला देऊ शकतो आणि ज्या माणसाला असा वापरलेला दागिना इनाम म्हणून मिळतो त्या दागिन्यांत त्यांचा आशीर्वाद तर असतोच, शिवाय त्या माणसाचा सहवास आपल्यासोबत राहतो. याचे गांभीर्य मला आधी एवढे कळले नव्हते. पण माझ्या सासूबाई जेव्हा वारल्या, तेव्हा त्यांनी आपले सगळे दागिने मुलींना आणि सुनांना वेगवेगळ्या पर्समध्ये भेट म्हणून एक छोटंस पत्र लिहून काढून ठेवले होते. एक दोन महिने गेल्यावर प्रत्येकीला तो दागिन्याचा बॉक्‍स देण्यात आला. बरेच दिवस तो उघडायची हिंमत झाली नाही. असं वाटलं, आपला एवढा प्रेमळ माणूस गेला, आता या निर्जीव वस्तूंचे काय करायचे? पण बऱ्याच दिवसांनंतर मी तो उघडला. त्यातल्या प्रत्येक आभूषणात मला त्या दिसू लागल्या. बांगड्या, पाटल्या, कंगनात ते आशीर्वादासाठी ओवाळणारे हात दिसू लागले. दिवाळीला उटणं लावून देताना त्यांच्या हातातली रुतलेली अंगठी जाणवली. माझ्या मुली लहान असताना त्यांच्या मंगळसूत्राची आणि कंठीच्या माळीला सोडवताना ते इवले हात आठवले.

घरात कुठला उत्सव असला, सणवार असला की, ती प्रत्येक वस्तू त्यांच्या अंगावर कशी सजून बसली होती, ते आठवले. आम्ही एकत्रच राहत असू तेव्हा रोज सकाळपासून त्या सगळ्या वस्तू डोळ्यापुढे सजीव होऊन आनंदाने नाचत असत. त्याला एक सुंदर मंगल ध्वनी होता. त्या गेल्यावर या निर्जीव दागिन्यांचा सजीवपणा जास्तच जाणवू लागला. मला दागिन्यांचं महत्त्व याआधी कधीच वाटलं नव्हतं. दोन जाळीच्या पाटल्या एका बाजूनं थोड्या चेपल्या होत्या. पण ते सुद्धा मला हवं-हवसं वाटू लागलं. कारण, त्यामधून त्यांचा सहवास आमच्यात राहून गेला होता. मी मनाशीच म्हटलं, कितीही ओल्ड फॅशन वगैरे हे दागिने म्हटले तरी ते बदलून सोनाराकडे कधीच नव्याने बनवून घेणार नाही. एरव्ही मला दागिन्यांविषयी अजिबात आस्था नाही. डोक्‍यात हजारो विचार सुरू असताना, महागाची वस्तू आपल्याकडून हरवेल, असं वाटत राहतं. खूप पैसे खर्च करून दागिने घडवण्यामध्ये काही लॉजिक मला कळले नव्हतं. पण आज ते लॉजिक कळलं. माझ्या मुलीने अमेरिकेच्या एका मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळवून ॲडमिशन मिळवली. त्यानंतर फार मेहनत करून मास्टर्स इन आर्किटेक्‍टची डिग्री मिळवली. कॅम्पस इंटरव्ह्यूमधूनच शिकागोच्या एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला पण लागली. आम्ही कॅनव्होकेशला गेलो. तिचे सगळे कौतुक बघून उर भरून आला. तिला म्हटलं, ‘सांग तुला काय हवंय?’. तर ती म्हणाली, ‘नंतर सांगेन’. कॉलेजनंतर नोकरीला जॉईन व्हायला काही दिवस होते. छान सुट्या घालवल्या. आमचा भारतात परतायचा दिवस आला. एअरपोर्टवर ती आम्हाला सोडायला आली. हा क्षण नेहमीच नाजूक असतो. आत सोडताना म्हणाली, ‘आई मला कळायला लागल्यापासून तुझ्या हातात जी अंगठी आहे ना ती हवीय, तुझ्या-माझ्या बोटाचा आकार आता सारखा झालाय. तुला मला काही तरी द्यायचेच होतं ना? मी म्हणाले होते ना नंतर सांगेन, कारण एवढे दिवस मला ती तुझ्या हातात बघत राहायची होती. तर तू तुझ्या हाताने ती वापरलेली अंगठी मला घालून दे.’ लगेच माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मी अंगठी काढून माझ्या बाळाच्या बोटात घालून दिली. तर ती म्हणाली, ‘आई आता तू माझ्या दूर, भारतात गेल्यावरसुद्धा असं वाटत राहील की, तू माझ्या जवळच आहेस. सतत पाठीवर हात फिरवत आहे. आता ना ही अंगठी मी माझ्या मुलीच्या मास्टर्सच्या दिवशी तिला देणार आहे.’ डोळे भरलेले असताच एकदम हसू फुटलं (जगातली सगळ्यात सुंदर अवस्था) विमानाची अनाउन्समेंट झाली. गच्च मिठी मारून आम्ही आनंदाने निघालो. त्या टाटा करणाऱ्या हातातल्या अंगठीला बघून वाटलं, इतके दिवस निर्जीव वाटणाऱ्या त्या दागिन्याला आज एक सुंदर जीव फुटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com