नव्वदच्या दशकातली गोष्ट. मी चौथीला होतो, तेव्हा एक दिवस शाळा सुटल्यावर घरी जाताना लव्हार आळीजवळ आल्यावर मांजराच्या पिल्लाचा म्याव म्याव असा आवाज येऊ लागला, पण तो आवाज नेमका कुठून येतोय हे मात्र समजेना. त्याचं ते केविवाणं रडणं मला फार व्यथित करू लागलं. मी त्या आवाजाच्या दिशेनं बराच वेळ शोध घेतल्यावर एका कोरड्या खोल बारवेत अगदी छोटंसं पिल्लू दिसलं. इवलासा बिचारा जीव मदतीसाठी आशेनं वर बघत होता.
मांजराला जास्त पिल्लं झाल्यावर काही निष्ठूर माणसं पिल्लांना कोरड्या बारवेतसुद्धा (विहरीत) फेकून देत. कोरड्या बारवेत एकदा का मांजर टाकलं, की ते ओरडून ओरडून पाच सहा दिवसानं आपोपाप मरून जाई. काही महिन्यांनी शेवटी त्याचा फक्त सापळाच उरे. हा विचार करतानाच त्या कोवळ्या पिल्लाचाही सापळा माझ्या डोळ्यांसमोर तरळू लागला.
मीरा सोबत होती. तिनं विचारलं, 'बबू आता काय करायचं? ह्या बारवेला पायऱ्याही नाही, कसं वाचवायचं ह्याला?'
'पिल्लाला वाचावलं तर पाहिजे गं, काहीही करून त्याला वर काढलं पाहिजे गं.' असं म्हणून संप्याकड दफ्तर देऊन बारवेच्या दगडाच्या बेचक्याच्या साह्याने हळूहळू खाली उतरू लागलो. बारव पंधरा-सोळा फूट खोल होती. ‘पडशील ये येड्या’ असं म्हणून संप्या समजावू लागला, पण माझ्या डोक्यात एकच होतं की, त्या पिल्लाला वाचवलं पाहिजे. मी खाली उतरतोय हे पाहून मीरा घाबरून घरी पळाली.
तळाला पोहोचून पिल्लाला मी पकडू लागलो, पण ते इतकं भेदरलं होतं की, ते हातीच लागेना. ते इकडून तिकडे पळत राहिलं. शेवटी हाती लागलं. किती पळणार ते बिचारं? आईच्या दुधापासून तुटलेलं, उपाशी होतं ते. त्याचा जीव घाबरून धडधड करत होता. मायेनं जवळ घेऊन त्याच्या थरथरणाऱ्या अंगावरून हात फिरवून त्याला थोडा धीर दिला. त्याला खूप भूक लागलेली असावी म्हणून ते माझ्या अंगठ्याला त्याच्या आईचे स्तन समजून चुटुचुटु चोखू लागलं.
मला भडभडून आलं. बिचाऱ्या निरागस ओठांपासून त्याच्या आईचे स्निग्ध स्तन हिरावणाऱ्या निष्ठुर माणसांचा मला फार राग आला. मी त्याच्या तोंडातून माझं बोटं काढलं नाही. तसंच राहू दिलं. त्या बारवेच्या तळाला उभं राहून विचार करायला जास्त वेळ नव्हता. ते सुरक्षितही नव्हतं. वरून संप्या सारखा आवाज देतच होता.
मी पटकन माझ्या खाक्या चड्डीला चांगलं पिळकावनं टाकून शर्ट चड्डीत घालून घट्ट ‘इन’ केली अन ते पिल्लू वरून शर्टात टाकलं. ते आतल्या आत खूप वळवळ करू लागलं. मी जसा खाली उतरलो, तसं पटकन मला वरती चढता मात्र येईना. बेचक्यामधून बोटे निसटू लागली. जीव रडकुंडीला आला. कोरड्या बारवेत एखादा साप असला, तर बाहेर येऊन मला डसेल अशी भीतीही वाटू लागली. पिल्लू अंगाला चाटत असल्यानं गुदगुल्याही होत होत्या.
निम्म्यापर्यंत आलो, पण तिथून पुढे वर चढता येईना म्हणून कसाबसा तिथेच तग धरून उभा राहिलो. खाली पडून मरतोय का काय, अशी माझी अवस्था झाली. तेवढ्यात आईचा आवाज आला. बहुतेक मीरानं तिला बोलवून आणलं असावं. थोडा आधारही वाटला अन् तिची भीतीही मनात दाटली.
आईनं पटकन काठाजवळ येऊन खाली डोकावून ‘कशाला गेल्तास खाली?’ म्हणून एक शिवी हासडली. आजूबाजूला रस्सी नसल्यानं तिनं पटकन डोकं चालवलं. तिनं तिचं नेसलेलं नऊवारी लुगडं फेडलं. फक्त कंबरेभोवती थोडंस लुगडं नावालाच ठेवून बाकीचं लुगडं माझ्या दिशेनं खाली सोडलं. मी ते पटकन धरलं. संप्या व आईनं ते वर ओढायला सुरुवात केली.
वर आल्या आल्या सगळ्यात आधी मी मांजर बाहेर काढून ठेवलं. दप्तर हातात घेणारच तेवढ्यात आईनं सनकन माझ्या मुस्काडात ठेवून दिली. लुगडं नेसताना रागानं म्हणाली, “मुडद्या, मरंतो का काय तू ह्या मांजालड्यापायी? त्याला वर काढायच्या नादात तू जर खाली पडून मेलाबिला अस्ता मंग?”
मी गप्प बसून खाली मान घालून गाल चोळत राहिलो. माझा कान धरून मला ती घरी घेऊन गेली. घरी गेल्यावर मात्र तिनं जवळ घेऊन कौतुक केलं, 'बाळा, बोलनाऱ्याचा जीव क्वानीबी जानीतंय रं, पन त्वा त मुक्या जीवाला वाचावलंय रं; आरं पन हे करताना सौताच्या जीवालाही जपत जा, तुह्यबिगार दुसरं कोन हाये रं मला ह्या तिरभवनात?’
आईच्या बोलण्याचा मला अजिबात राग आला नाही. तिच्या बोलण्यावर मी फार विचार केला. मीही त्या मांजराच्या पिल्लाच्या जागी स्वतःला अन पिल्लाच्या आईच्या जागी माझ्या आईला ठेवून पाहिलं. चारही डोळ्यांची बारव पुन्हा एकदा आसवांनी भरून वाहिली. खाली पडून मी मेलो असतो म्हणून माझ्या मुस्काडात मारणारी आई अजिबात चुकीची नव्हती ह्याची जाणीव मला झाली.
मी विचार केला की, जसं उन्हात खेळणाऱ्या लेकराला ‘सावलीत येऊन मर’ असं जेव्हा आई म्हणते तेव्हा खरंच का ती लेकराला ‘मर’ असं म्हणत असते का हो? नाही ना? तिच्या बोलण्याचा उद्देश चांगला असतो, फक्त तो आपल्याला समजला पाहिजे इतकंच. तिच्या प्रत्येक वाक्यात, कृतीत, संतापात फक्त अन् फक्त प्रेमंच असतं. माया असते नाही का?
एवढं जरी मुलांना समजलं, तरी आई-वडिलांबद्द्लचे गैसमज कमी होतील. आताच्या युगात अन् विशेषतः मोबाईल युगात अगदी क्षुल्लक कारणामुळे मुलांची सहनशक्ती कमी होत चाललीय की काय असा प्रश्न मला सतावत राहतो. कारण केवळ आई-वडिलांनी रागावल्यामुळे मुलांनी थेट फाशी घेऊन आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचल्यावर मनाला फार वेदना होतात.
खरं तर, आपले आई-वडील आपल्याच भल्यासाठी आपल्याला कधी तरी कटू शब्द बोलत असतात, ते फक्त आपण समजून घेतले पाहिजेत. जर मीही आईला समजून घेतलं नसतं, तर राग मनात ठेवला असता अन् पुन्हा तशीच चूक केली असती. मग माझ्या जीवाला काही तरी धोका नक्कीच झाला असता की नाही? त्यामुळेच असं वाटतं की, माझ्या कातड्याचे जोडे करून जरी तिच्या पवित्र पायात घातले, तरी तिच्या उपकाराची परतफेड सात जन्मात करता येणार नाही!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.