प्रयोजनवादाची नवी पायाभरणी

भारतातील प्रयोजनवादाची वाटचाल मांडताना त्यासोबतच आंबेडकर-ड्युई यांचे विद्यार्थी आणि शिक्षक तसेच तत्त्वज्ञ आणि नेते या पातळीवरचे आकलन करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला
Evolution of Pragmatism in India - Ambedkar Dewey and the Rhetoric of Reconstruction
Evolution of Pragmatism in India - Ambedkar Dewey and the Rhetoric of Reconstructionsakal
Summary

भारतातील प्रयोजनवादाची वाटचाल मांडताना त्यासोबतच आंबेडकर-ड्युई यांचे विद्यार्थी आणि शिक्षक तसेच तत्त्वज्ञ आणि नेते या पातळीवरचे आकलन करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला

- वैभव वाळुंज

भारतातील प्रयोजनवादाची वाटचाल कशी झाली याचा अभ्यास करताना स्कॉट आर. स्ट्राऊड यांनी ‘द इव्होल्युशन ऑफ प्रॅग्मॅटिझम इन इंडिया- आंबेडकर, ड्युई अँड द ऱ्हिटोरिक ऑफ रिकन्स्ट्रक्शन’ या ग्रंथाची निर्मिती केली आहे. भारतातील प्रयोजनवादाची वाटचाल मांडताना त्यासोबतच आंबेडकर-ड्युई यांचे विद्यार्थी आणि शिक्षक तसेच तत्त्वज्ञ आणि नेते या पातळीवरचे आकलन करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.

भारतीय राजकारणामध्ये नेत्यांच्या एकूण आचरणालाच तत्त्वज्ञान समजणे ही चूक अनेक अनुयायींनी केली आहे. ‘गांधीवाद अशी विषय वस्तू अस्तित्वात नाही व मृत्यूनंतर मला कोणताही पंथ सोडून जाण्याची इच्छा नाही,’ असं सांगूनही गांधींनंतर गांधीवादी विचारांचा मोठा डोलारा तयार झाला.

आंबेडकरांच्या हयातीत व त्यानंतरही त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या अनेक पक्षांनी व अनुयायांनी आंबेडकरवाद या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न केला; मात्र या तत्त्वज्ञानाची एकूण बैठक नियम आणि सिद्धांतांच्या कसोट्यांवर मांडणारे तत्त्वज्ञान आंबेडकरांच्या अकॅदमिक काराकिर्दीच्या संदर्भाने उपलब्ध नव्हते.

आ. ह. साळुंखे, कॉम्रेड शरद पाटील, प्रदीप गोखले यांनी तत्त्वज्ञानाच्या कसोट्यांवर या संरचना बसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय तत्त्वज्ञानाच्या एकूण परिप्रेक्षात आंबेडकरांच्या विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न काहीअंशी निवडक अभ्यासकांनी व तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांनी केला आहे.

Evolution of Pragmatism in India - Ambedkar Dewey and the Rhetoric of Reconstruction
Prakash Ambedkar : NCPच्या उमेदवारामुळे कलाटेंचा पराभव, मग...; आंबेडकरांचा खोचक टोला

एकीकडे आनंद तेलतुंबडे यांनी ‘आंबेडकरवाद’ अशी तात्त्विक बैठक वेगळी अशी दाखवता येत नाही, असे मत मांडले होते; तर मीरा नंदा यांनी गीता आणि त्याच्या कर्माधारित तात्त्विक रचनेमध्ये आंबेडकरांच्या कामाला गीता असं संबोधत ‘आंबेडकरांची गीता’ ही मूळ भगवद्गीतेपेक्षा कशा पद्धतीने सरस आणि उपेक्षितांचा उद्धार करणारी आहे हे दर्शवले होते. पण भारतीय दर्शन आणि मार्क्सवाद यांच्या पलीकडे जाऊन आंबेडकरांच्या राजकारणाची सैद्धांतिक समीक्षा झाली नाही.

कोलंबिया विद्यापीठात आंबेडकरांना मार्गदर्शन करणारे तसेच आंबेडकरांच्या मते ‘त्यांच्या आयुष्यावर फार मोठा प्रभाव असणारे’ त्यांचे शिक्षक जॉन ड्युई यांच्या प्रॅग्मॅटिझम या तत्त्वज्ञानाचा अभ्यास भारतीय राजकीय-सामाजिक पार्श्वभूमीवर क्वचितच केला गेला.

Evolution of Pragmatism in India - Ambedkar Dewey and the Rhetoric of Reconstruction
Rahul Gandhi : हिंडेनबर्ग प्रकरणी मोदींवर केलेले आरोप राहुल गांधींना भोवणार? लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता

हर्बट स्पेन्सर, रसेल किंवा टॉलस्टॉय यांना विसाव्या शतकातील भारतामध्ये जितके महत्त्व दिले गेले, त्या तुलनेत ड्युई यांच्या विचारांकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रॅग्मॅटिझम संकल्पनेचा भारतातील राजकीय वर्तुळांमध्ये तसेच धार्मिक पातळीवरील वापर अवाढव्य असला तरीही तात्त्विक दर्शनामध्ये त्याच्या एकूण रचनेची व भारतीय धाटणीची मांडणी करणे गरजेचे होते.

(मराठीत त्याला उपयोगीतावाद, व्यवहारवाद, व्यावहारिकतावाद, फळप्रामाण्यवाद अशा सापेक्ष नावांनी संबोधले जाते. या नावांमध्ये एक तर या तत्त्वज्ञानाला आचरणात्मक किंवा धार्मिक पातळीवर संबोधण्याची मर्यादा पडते.

म्हणून इथे प्रायोगिकतावाद असा सामाजिक- राजकीय- धार्मिक अशा सर्व स्तरांवरील चर्चांमध्ये आचरणात आणता येईल, अशी शक्यता दिसते.) ‘मोठ्या क्रांतीची किंवा राजकीय डोलाऱ्याची घडी बसवण्याची वाट न पाहता आपल्याला शक्य आहे त्या सर्व साधनांशी उपलब्ध परिस्थितीमध्ये वस्तुनिष्ठ समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे’ अशी आंबेडकरी प्रयोजनवादाची व्याख्या तेलतुंबडे यांनी केली होती.

याच धाग्याला पुढे नेत भारतातील प्रयोजनवादाची वाटचाल कशी झाली याचा अभ्यास करताना स्कॉट आर. स्ट्राऊड यांनी ‘द इव्होल्युशन ऑफ प्रॅग्मॅटिझम इन इंडिया- आंबेडकर, ड्युई अँड द ऱ्हिटोरिक ऑफ रिकन्स्ट्रक्शन’ या ग्रंथाची निर्मिती केली आहे.

भारतातील प्रयोजनवादाची वाटचाल मांडताना आंबेडकर-ड्युई यांचे विद्यार्थी आणि शिक्षक तसेच तत्त्वज्ञ आणि नेते या पातळीवरचे आकलन करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. त्यासोबत आंबेडकरांच्या पुनर्रचनेचे आख्यान मांडण्याचा प्रयत्न लेखक करताना दिसतात.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिकेच्या तात्त्विक क्षितिजावर उगम पावलेल्या अमेरिकी प्रयोजनवादी तत्त्वज्ञानाचा भारतीय जनमानसावर झालेला परिणाम आणि त्यासाठी आंबेडकरांनी आत्मसात केलेली तात्त्विक पुनर्रचनावाद आणि प्रयोजनवादाची भारतीय आवृत्ती ही या पुस्तकाची विषयवस्तू आहे. या पुस्तकात स्ट्राऊड यांनी आंबेडकरी आंदोलन, राजकारण तसेच नवयान बुद्धधम्माच्या तात्त्विक विवेचनाचा अभ्यास केला आहे.

Evolution of Pragmatism in India - Ambedkar Dewey and the Rhetoric of Reconstruction
Maharashtra Politics: महाराष्ट्रातसुद्धा वेलकम! शिरसाठांनी राष्ट्रवादीला दिली खुली ऑफर

आपल्या लंडनमधील वास्तव्यानंतर आंबेडकरांच्या विचारसरणीवर येथील अनेक तत्त्ववेत्त्यांचा प्रभाव पडला होता. आपल्या विद्यार्थी दशेत अगदी सुरुवातीच्या लेखनात त्यांनी बर्ट्रांड रसेल यांच्या गाजलेल्या ग्रंथाची समीक्षा केली होती.

रसेल आणि ड्युई हे तात्त्विक मैदानातील एकमेकांचे प्रतिद्वंदी होते. त्यांच्यादरम्यान झालेला वाद पाश्चात्य वर्तुळांमध्ये चर्चिला गेला होता. असे असतानाही आंबेडकरांनी त्यांच्या ग्रंथाची समीक्षा लिहून आपला वैचारिक अवकाश फक्त प्रयोजनवादापुरता मर्यादित न ठेवता त्याला अनेक नवीन संकल्पनांची जोड दिली.

आंबेडकरांनी रचलेला बुद्धिझममधील ‘नवयान प्रयोजनवाद’ हा म्हणूनच फक्त एका व्यक्तीने धर्मांतर करण्यापुरता मर्यादित राहत नाही, तर त्यासोबत घडणारे राजकीय- सामाजिक चळवळ आणि लोकशाहीची मूल्ये वृद्धिंगत करणारी एक संस्था म्हणून समोर येतो.

हेगेलपंथी चिद्वाद आणि एका काल्पनिक आदर्श नंदनवन समाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न तत्कालीन इंग्लंडमधील विद्यापीठांमध्ये केला जात होता. त्या आदर्शवादी तत्त्वज्ञानाला अनेकतावादाच्या दृष्टीतून उत्तर देण्याचा प्रयत्न ड्युई यांनी केला.

आंबेडकर यांनी मात्र मधला मार्ग निवडत भारतासमोरील समस्या सोडवण्यासाठी कोणते तत्त्वज्ञान जास्तीत जास्त वापरता येईल, याच दृष्टीने प्रयत्न केले. त्यामुळे या पुस्तकाची समीक्षा लिहिताना त्यांनी ड्युई यांच्या विचारांचा वापर करत भारतीय परिस्थितीमध्ये बहुजनांच्या कल्याणाचा मार्ग शोधण्याचा पहिला प्रयत्न केला असावा, अशा निष्कर्षापर्यंत स्ट्राऊड येतात.

यादरम्यान अनेक अभ्यासकांनी आंबेडकरांच्या बौद्ध धर्मामध्ये धर्मांतरित होण्याबद्दल अनेक तात्त्विक विवेचनांचा प्रयत्न केला आहे. सावरकरांनी हे धर्मांतर हिंदू परंपरांच्या अंतर्गत असल्याचे सांगितल्यापासून ते इस्लामिक आणि ख्रिस्ती तत्त्वज्ञानांपासून घेतलेली फारकत या सर्व कल्पनांचा मागोवा या पुस्तकामध्ये घेण्यात आला आहे;

मात्र त्याही अर्थाने हे पुस्तक फक्त धर्मांतर आणि त्याच्या चळवळीपर्यंत मर्यादित राहत नाही, तर जातीनिर्मूलनाच्या पलीकडे जाऊन प्रायोगिकतावाद कशा पद्धतीने पुनर्रचनावाद आणि मायावाद या दोन्ही तत्त्वज्ञानाच्या दरम्यान आपल्या राजकारणाची नवी परिभाषा ओवून घेतो, याकडे लेखकाने लक्ष वेधले आहे.

अनेकदा राजकीय तत्त्वज्ञानाच्या विचारांचा अभ्यास करताना त्याचे एककल्ली अनुकरण करणारे अनुयायी दाखवले जातात. स्ट्राऊड यांनी प्रयोजनवादी आंबेडकरी तत्त्वज्ञान दाखवताना त्यातील नवनिर्मित गाभ्याचाही अभ्यास केला आहे.

‘आंबेडकरांइतके लिहिणारे, वाचणारे आणि काळाच्या कसोटीवर सतत प्रगल्भ होत जाणारे नेते आणि त्यांच्यावरील सर्व प्रभावांचा अभ्यास करणे अवघड काम आहे,’ अशी प्रांजळ कबुली लेखक देतात. आंबेडकर हे एका वेगळ्या पार्श्वभूमीमधून अमेरिकी समाजामध्ये पसरलेल्या प्रायोगिकतावादाच्या तत्त्वज्ञानाकडे पाहत होते.

त्यामुळे त्यांनी जॉन ड्युई यांच्या समग्र तत्त्वज्ञानाचा अभ्यास जरी केला असला तरी आपल्या आचरणामध्ये त्यांनी या तत्त्वज्ञानामध्ये मूलभूत बदल केले. अनेकदा त्यांनी प्रायोगिकतावादाच्या मूलभूत संकल्पनांना छेद देण्याचा प्रयत्न केला व स्वतःचे वेगळे असे तात्विक अस्तित्व उभे केले. अमेरिकी प्रयोजनवादाच्या सोबतीने भारतीय तत्त्वज्ञानाची तयार झालेली एक समांतर उभारणी दिसून येते.

आंबेडकरांच्या समोर म्हणूनच एक नंदनवन उभे होते; तर बदलांना विरोध करणारा कठोर हिंदू समाज होता. या परिस्थितीत त्यांनी अमेरिकी प्रयोजनवादामध्ये अनेक बदल केले. अनेक ठिकाणी त्यांनी ड्युई यांच्या विचाराला विरोध केला व आपल्या अनुभवांवरून तत्त्वज्ञानातील नव्या शक्यता उलगडल्या, याचीही नोंद लेखक घेतात.

काळाच्या कसोटीवर प्रभाव टाकणारे एक मोठे विचारक आणि लेखक असण्यासोबतच आंबेडकरांचे वक्ता म्हणून भारतीय समाजातील अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न फारच कमी वेळा झाला आहे. आंबेडकरांनी केलेल्या भाषेचा प्रगल्भ वापर आणि आपल्या रचनांना मूर्त रूप देताना त्यामध्ये अनुस्यूत असलेल्या वक्तृत्वाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करताना स्ट्राऊड यांनी व्याख्यानशास्त्र या तत्त्वज्ञानातून आंबेडकरी वक्तृत्वाकडे पाहिले आहे.

आजही सर्वांत जास्त वाचले जाणारे पुस्तक ‘जातीप्रथेचे निर्मूलन’ लिहिताना बाबासाहेबांनी एका भाषण स्वरूपात मांडले होते. या सर्वाचा अभ्यास करताना पाश्चात्य समाजातील पुनर्रचनावादी भाषणशास्त्राच्या कसोट्यांनी उलगडत जाणारे आंबेडकरी दर्शन हा या पुस्तकाचा सर्वांत रोचक भाग आहे.

या सर्व विषयवस्तूंचा मागोवा घेताना आंबेडकरी अनुयायांनी आंबेडकरी प्रयोजन वाद नेमका कुठवर विकसित केला, त्यांनी आपापल्या राजकीय क्षितिजांवर केलेल्या प्रयोगांमध्ये या तत्त्वज्ञानाची कोणती रूपं दिसून येतात, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

दलित पॅंथरपासून ते रिपब्लिकन राजकारणापर्यंत, शहरातील वस्त्यांमध्ये, गावांमध्ये जयंतीच्या निमित्ताने होणारं सत्तामंथन ते शाहिरी आणि कविता या माध्यमातून संवैधानिक तसेच क्रांतिकारी अशा दोन्ही गटांमध्ये विभागलेल्या आंबेडकरी तत्त्वज्ञानाला त्यापुढील वर्गवारी विद्याशाखांमध्ये रूपांतरित करता येईल का, आल्यास त्यांना जोडणारे किंवा विभागणारे प्रयोजनवादी तत्त्वज्ञान ठोकळ आहे, की गतिशील हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तत्त्वज्ञानाला फक्त पुस्तकांमध्ये न ठेवता कांशीराम यांनी प्रयोजनवादाचा यशस्वी राजकीय प्रयोग करून देशातील सर्वांत मोठ्या राज्यांमध्ये दलित मुख्यमंत्री होईल इतपत मार्गक्रमण केले. या आणि अशा अनेक अनुभवांना आता फक्त राजकीय व सामाजिक नव्हे, तर तात्त्विक आलेखांमध्ये गुंफण्याची वेळ आली आहे. स्ट्राऊड यांच्या या नव्या पुस्तकाद्वारे ही परंपरा अजून पुढे जाईल ही आशा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com