'विलासरावांच्या एका फोनवर मी शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री झालो होतो'

'विलासरावांच्या एका फोनवर मी शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री झालो होतो'

औरंगाबाद : शरद पवार साहेबांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार होता, आणि त्यासाठी संभाव्य नावे अंतिम करण्यात आली. मंत्रीपदासाठी मी देखील इच्छुक होतो, मराठवाड्यातून माझा समावेश व्हावा यासाठी मी अशोकराव चव्हाणांकडे शब्द टाकला होता. पण मंत्रीमंडळ विस्तार जवळ आला आणि त्यात माझे नाव नसल्याचे मला कळाले. पण मी निराश झालो नाही. ठीक आहे आपण प्रयत्न केले, पुन्हा कधीतरी यश मिळेल, अशी मनाची समजूत घालून मी शांत बसलो. पण नियतीच्या मनात मी मंत्री व्हावे हे असावे बहुदा.

दरम्यान एक दिवस मला विलासरावांचा फोन आला, त्यांनी माझे अभिनंदन केले. मला आश्‍चर्य वाटले, मी अभिनंदनाचे कारण विचारले तेव्हा तुम्हाला मंत्री केले आहे असे ते म्हणाले. मला विश्‍वास बसत नव्हता, पण विलासरावांच्या एका फोनवर मी मंत्री झाल्याचे नंतर मला कळाले. अशी आठवण माजी राज्यमंत्री व जिल्हा कॉंग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अनिल पटेल यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना सांगितली. 

विलासरावांच्या या आठवणी अनिल पटेल यांच्याच शब्दात......
विलासरावांच्या बाबतीत माझ्या अनेक आठवणी आहेत. 1994 मध्ये राज्यमंत्रीमंडळात माझा समावेश झाला तो केवळ त्यांच्यामुळेच. किल्लारीचा भूकंप झाल्यानंतर तेथील पुर्नवसनाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू होते. तत्कालीन मुख्यमंत्री त्या कामावर स्वःत लक्ष ठेवून होते. याच काळात राज्यमंत्रीमंडळ विस्ताराची तयारी सुरू होती. अशोकराव चव्हाणांमार्फत मी विलासरावांकडे इच्छा व्यक्त केली. कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी जर्नादन पुजारी तेव्हा औरंगाबादला आले होते, त्यांना नांदेडला घेऊन जाण्याची जबादारी माझ्यावर होती. प्रवासा दरम्यान त्यांच्याकडेही मी मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा ते म्हणाले, 'मग काय अडचण आहे, तुम्ही पाटील आहात मंत्री होणारच.' पण मी पाटील नाही, तर पटेल आणि गुजराती असल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा 'मला दिल्लीला येऊन भेटा,' असे सांगून ते पुन्हा माघारी परतले. 

इकडे मंत्रीमंडळ विस्ताराचा मुर्हूत जवळ येत होता, अनेकांची नावे समोर येत होती पण त्यात मी नव्हतो. आता आपल्याला संधी नाही असा विचार करून मी गप्प बसलो. विलासराव, अशोकराव शरद पवार साहेबां सोबतचा किल्लारी भागाचा दौरा आटोपून मुंबईत येणार होते. मी आधीच मुंबईत गेलो होतो. विमानतळावर उतरताच विलासरावांनी मला पाहिले आणि, "अरे अनिल काय नाराज दिसतो?" असे म्हणत विचारणा केली, त्यावर मी नाही साहेब एवढेच म्हणालो.

त्यानंतर मराठवाड्यातून मंत्रीपदासाठी कुणाचे नाव दिले, याची विचारणा शरद पवारांनी विलासरावांकडे केली. तेव्हा विलास खरात आणि अनिल पटेल ही दोन नावे असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल पटेल चांगला कार्यकर्ता आहे, विधानसभेतील त्यांचे काम देखील उत्तम असल्याचे विलासरावांनी पवार साहेबांना सांगितले. तेव्हा अनिल पटेल इथे आले आहेत का? अशी विचारणा त्यांनी केली, तेव्हा हो पण सध्या कुठे थांबलेत माहित नाही, मी त्यांना निरोप देतो असे विलासरावांनी पवारांना सांगितले. 

दुसऱ्या मिनिटाला त्यांनी मला फोन केला, अभिनंदन तुम्ही मंत्री झालात असे म्हणत त्यांनी, मला शरद पवार साहेबांना ताबडतोब फोन करण्यास सांगितले. मी पवार साहेबांना फोन केला, तेव्हा उद्या सायंकाळी पाच वाजता शपथविधीसाठी या, असा निरोप त्यांनी दिला. क्षणभर माझा  विश्‍वासच बसला नाही, पण ते खरे होते. विलासराव देशमुख साहेंबाच्या एका फोनने मी मंत्री झालो होतो. 

शपथ विधी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी साहेबांच्या बंगल्यावरच मी सुट-बुट मागवून घेतला. त्यांच्या गाडीतूनच मी शपथविधीला गेलो. अशोकराव, विलासराव यांच्या उपस्थितीत माझा मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. त्यानंतर आम्ही अशोकरावांच्या घरी गेलो, तिथे त्यांच्या आईने म्हणजेच काकूंनी माझे औक्षण केले आणि आता पैठणचे तीनजण मंत्री झाले, असे म्हणत त्यांनी माझे कौतुक केले. पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला विलासरावांनी न्याय दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com