हिम्मत करो, जिने को एक उमर पडी है...

जगप्रसिद्ध शायर फैज अहमद फैज हे व्यवस्थेविरोधात केलेल्या बंडखोरीसाठी सर्वांना आठवतात.
फैज अहमद फैज
फैज अहमद फैजSakal

जगप्रसिद्ध शायर फैज अहमद फैज हे व्यवस्थेविरोधात केलेल्या बंडखोरीसाठी सर्वांना आठवतात. त्यांच्या शायरीवर लोक जिवापाड प्रेम करतात. त्यांच्या समाजवादासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या जाण्यानंतर ३९ वर्षांनी जग आता १८० अंशांमध्ये बदललं आहे. अनेक देशांमध्ये समाजवाद नावाला उरला आहे. मात्र, फैज या नावातील जादू अजूनही संपलेली नाही. त्यांची शायरी, नज्म आजही एवढ्या संयुक्तिक का आहेत? फैज अहमद फैज यांची जयंती नुकतीच जगभरात उत्साहात साजरी झाली, त्या निमित्तानं फैज यांची मुलगी सलीमा हाश्‍मी यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय.

फैज तुम्हाला केव्हा समजले?

प्रत्येक मुलाला त्याचे आई-वडील खास असतात, हे समजत असतं. माझे अब्बू खास आहेत, हे मला समजलं होतं. मात्र माझे अब्बू इतरांसाठीही तेवढेच महत्त्वाचे आहेत, हे मी दहा वर्षांची होते तेव्हा उमगलं. फैजसाहेब जेव्हा तुरुंगामध्ये होते, कुटुंबापासून दूर होते, त्या वेळी आम्ही खूप संकटातून जात होतो. वडिलांनी कारागृहातून ‘जस्ते-जबा’ हे शायरीचं पुस्तक लिहिलं. ती तुरुंगाची शायरी होती. प्रकाशकानं लाहोरमध्ये प्रकाशन सोहळा ठेवला होता. मी तेव्हा दहा वर्षांची होते. मी लाल रंगाचे बूट घातले होते. जेलमध्ये असताना वडिलांनी माझ्या वाढदिवसाला ते पाठवले होते. त्या कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पुस्तकाची एक प्रत देण्याचं काम माझ्याकडे सोपवण्यात आलं होतं. लोक ते पुस्तक वाचत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून पाणी येत होतं. वडिलांनी जे काही लिहिलं होतं, त्याचा खूप परिणाम लोकांवर होत होता, हे मला जाणवलं. पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं, की माझ्या वडिलांकडे एक खास कौशल्य आहे ते म्हणजे, ते जे लिहितात त्याचा प्रचंड परिणाम होतो. त्या लिखाणामुळेच त्यांना जेलमध्ये जावं लागलं.

वडील कधी रागवायचे नाहीत...

माझे वडील खूप शांत स्वभावाचे होते. मला आईचा ओरडा मात्र नेहमी खावा लागायचा. वडील कधीच रागवायचे नाहीत. त्यामुळे ज्या गोष्टींना आई मनाई करायची, ती हवी असल्यास मी सरळ वडिलांकडे धाव घ्यायची आणि ते हमखास माझी बाजू घेत असत. मला शाळेत जायला आवडत नसे. त्यामुळे दररोज काहीतरी कारण शोधून मी शाळा बुडवायची. कधी डोकं दुखायचं, तर कधी पोट. आई वैतागायची आणि ‘तू तुझ्या वडिलांना ही कारणं सांग,’ म्हणायची. मी वडिलांकडे रडवेला चेहरा घेऊन जायची. वडील विचारायचे, ‘काय झालं?’ मी म्हणायची, ‘अब्बू, मला शाळेत जायचं नाही. माझ्या पोटात दुखतंय.’ ते लागलीच म्हणायचे, ‘बरं, नको जाऊ.’

मी गणित विषयात नेहमी नापास व्हायची. आई मात्र गणितात पक्की होती. ती माझ्यावर खूप रागवायची. म्हणायची, ‘तुला गणित येत नाही, नालायक कुठली! जा तुझ्या वडिलांना सांग.’ मी माझे रिपोर्ट कार्ड घेऊन वडिलांकडे गेले. त्यांना म्हटलं. ‘अब्बू, मी सर्व विषयांत पास झाली आहे, फक्त गणितात फेल झाले.’ ते हळूच म्हणायचे, ‘मै भी हिसाब में कभी पास नही हुआ, कोई बात नही.’

आईनं कुटुंबाला सांभाळलं

वडिलांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मला एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, ‘मी जे काही आयुष्यात करू शकलो, ते केवळ तुझ्या आईमुळे. ती तुमचा सांभाळ करू शकते, याचा मला विश्वास होता.’ आईला लिहिलेल्या एका पत्रात फैज म्हणतात, ‘माझ्या कामामुळे, तत्त्वांमुळे तुला व मुलांना खूप त्रास सहन करावा लागतो. याचं मला खूप वाईट वाटतं.’ मात्र, माझी आई वचनाला जागणारी होती. दोघंही एका विचारधारेनं जुळलेले होते. आई खूप धाडसी होती. अगदी वाघिणीसारखी. तिला आपल्या मुलांना कसं सांभाळायचं, ते माहीत होतं. ती आम्हा भावंडांना सांगायची, ‘बेटा, तुझे वडील काही चोर, डाकू, स्मगलर नाहीत. त्यांनी कुणाचा खून केला नाही. ते खरं बोलतात म्हणून तुरुंगामध्ये आहेत.’ माझ्या लहान बहिणीला त्या वेळी आई काय बोलतेय, ते कळायचं नाही. मात्र, मला कळायला लागलं, की तुम्ही खरं बोललात तर जीवन सोप नसतं. जीवन कठीण होतं. पण खरं बोलल्यामुळे कितीतरी चांगल्या गोष्टी घडतात. जे लोक दु:खात आहेत, अडचणीत आहेत, त्यांना तुम्ही आपले वाटता.

आनंदाचे असंख्य क्षण

फैज कुटुंबाचं जीवन केवळ अडचणी, दु:खानं भरलेलं नव्हतं. आमच्या वाट्याला असंख्य आनंदाचे क्षण आले. फैजसाहेबांचा मित्रपरिवार मोठा होता. वडिलांमुळे कितीतरी चांगल्या लोकांना भेटता आलं. किंबहुना त्या काळातील एकही असं उत्तुंग व्यक्तिमत्त्व नसेल, ज्यांना आम्ही भेटलो नसू. लोक वडिलांचा खूप आदर करायचे. त्यासोबत आईचं कौतुक करायचे. अब्बू कायम सांगायचे, ‘माझ्या वाट्याला माझ्या कुवतीपेक्षा जास्त प्रेम आलं.’ सत्ताधाऱ्यांकडून त्यांना वाईट वागणूक मिळाली, त्याचं फार दु:ख नव्हतं.

लेबननची राजधानी बेरुतमधून ते पाकिस्तानात परत आले. विमानतळावर एक तरुण त्यांच्याकडे धावत गेला. म्हणाला ‘फैजसाहेब, मला कधीकधी खूप लाज वाटते. तुम्ही एवढे मोठे व्यक्ती आहात, जगभरात तुमचा सन्मान केला जातो; मात्र आपल्या देशाने तुम्हाला चांगली वागणूक दिली नाही.’ फैज त्याला ताडकन म्हणाले, ‘तू जनता आणि सत्ताधारी यांची सरमिसळ करतोयस. हे दोन वेगवेगळे घटक आहेत. सामान्य लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांना गोंधळात टाकू नकोस.’

आतापर्यंत कितीतरी मोठे शायर होऊन गेले; मात्र त्यातील अनेकांच्या वाट्याला प्रेम आलं नाही. लोकांनी त्यांना ओळखलं नाही, त्यांना सन्मान दिला नाही, यासाठी ते कायम दु:खी होते. मात्र, माझ्या वडिलांच्या तोंडून असे शब्द बाहेर पडले नाहीत. फैज आयुष्यभर साध्या माणसासारखे जगले. त्यांना अंहकार नव्हता. सत्ताधाऱ्यांकडून त्यांना त्रास दिला गेला; मात्र तरीही त्यांना त्याचं दु:ख नव्हतं. पाकिस्तान, भारतासह जगभरातून त्यांना प्रेम मिळालं.

फैजच्या शायरीत अनेक पैलू

एका चांगल्या शायरच्या शायरीमध्ये अनेक पैलू दडलेले असतात. तुम्ही त्यांना कुठल्याही प्रकारे समजू शकता, जाणून घेऊ शकता. आज आपण गालिबचे शेर वाचले, तर त्यातून शेकडो अर्थ निघतात. त्याचप्रमाणे असं म्हणतात की, फैज एक रुमानियत शायर होता. माझ्या मते ते इन्कलाबी, इंसान-दोस्त शायर होते. त्यांच्या काळातले ते एक मोठे निरीक्षक होते, साक्षीदार होते. त्यामुळे अशा शायरचा शेर, गजल किंवा नज्म काळाला भेदून पुढच्या काळात जाते. आज भारतात जेव्हा तरुण ‘हम देखेंगे’ ही नज्म गातात, मात्र ही नज्म एका वेगळ्या काळात, वेगळ्या परिस्थितीत लिहिली गेली होती. कमाल बानोनं लाहोरमध्ये ज्या प्रकारे गायलं, त्याचे अर्थ त्या वेळी वेगळे होते. मात्र, भारतात जेव्हा तरुण फैजची नज्म गातात, त्याचेही वेगळे अर्थ निघतात.

बोल के लब आज़ाद है तेरे

फैज यांनी आपल्या तरुणपणी ही शायरी लिहिली. त्यात तरुणाईचा जोश, ऊर्जा आहे. त्यामुळं ज्या लोकांना बोलण्याची मनाई आहे, ते जेव्हा ही नज्म वाचतात, त्यांच्यात बोलण्याची हिंमत येते.

फैज यांच्या शायरीत सर्वकाही आहे, जे तुमच्या माझ्या जीवनाचा एक भाग आहे. लोकांना आयुष्यात रुमान, जज्बा, जोश, रुमानियत, हिंमत लागते. कारण जीवन जेव्हा कठीण होतं, त्या वेळी कुठंतरी प्रकाश येईल, अशी आशा असते. ती आशा फैजसाहेबांच्या ‘बोल के लब आज़ाद है तेरे’ या शायरीतून मिळते. जीवन अजून संपलेलं नाही, या आशेवर माणूस जगतो. फैजसाहेब आजारी असताना त्यांनी एक नज्म लिहिली.

हिम्मत करो, जिने को एक उमर पडी है

शांत व्यक्तिमत्त्व

फैज एक मध्यम, शांत स्वभावाचे व्यक्ती होते. ते कधी कधी बोलायचे. त्यांना रागावताना मी कधी पाहिलं नाही. चेहऱ्यावर हास्य कायम असायचं. त्यांना शेर ऐकवण्याचा, ऐकण्याचा खूप शौक होता. त्यांच्या आयुष्यात दु:खाचे खूप क्षण आले. जवळच्या मित्रांचं निधन झालं. मात्र, हे दु:ख त्यांच्या शायरीतून बाहेर पडायचं. फैज कधी आपल्या भावना व्यक्त करत नसायचे. ते सर्व त्यांच्या शायरीतून यायचे. फैज म्हणायचे, ‘माझ्या लहाणपणी माझ्या कुटुंबानं मला प्रेम दिलं, सांभाळ केला. मला सज्जन व्यक्ती बनवलं.’ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात चांगुलपणा, लोकांमध्ये मिसळण्याचे गुण होते. जे दु:ख होतं, राग होता तो केवळ शायरीत... त्यांनी आव्हानही शायरीतूनच दिलं.

फैज एक आशेचा किरण

जनरल झिया उल हक यांनी १९७७ मध्ये निवडून आलेलं सरकार पाडलं. त्यांनी दडपशाही सुरू केली. समाजातील अल्पसंख्याक, महिला, कामगारांना दाबून टाकलं. कामगार, विद्यार्थी चळवळींवर बंदी घातली. लोकांना जेलमध्ये डांबलं. अनेकांना जन्मठेप दिली, फासावर चढवलं. त्या वेळी लोकांनी हे सहन केलं. अनेक जण मला सांगायचे की आम्ही त्या वेळी फैज यांच्या शायरीवर जगलो. त्यांची नज्म आमच्यासाठी आशेचा किरण होती. शायराची हीच तर भूमिका असते. आज लोक खरं बोलायला घाबरतात. त्यामुळे सध्याच्या काळात फैजच्या शायरीची अधिक गरज भासते. त्यामुळे फैज सांगतात, तुम्ही बोला, तुमची बोलण्याची वेळ आली आहे. तुम्ही बोला, कारण जिंदगी अभी बाकी है. कठीण काळात शायरीचं महत्त्व अधिक आहे. त्यामुळे झिया उल हक यांच्या काळात वडील बेरुतमध्ये होते. त्यांनी पॅलेस्टाईन लोकांशी नाते जोडले. तिथून पत्राद्वारे ते त्यांची नवीन कविता पाठवायचे. मी सर्व पत्रकारांना फोन करून सांगायची, की फैज यांची कविता आली आहे. ती गायली जायची. काही तासांत ती सर्वत्र पोचायची. आमच्या मनातील गोष्ट फैज कित्येक किलोमीटर अंतरावरून पाठवायचे.

गेल्या आठवड्यात वडिलांची जयंती होती. जगभरातून लोक त्या उत्सवात सहभागी झाले होते. फैजसाहेब गेल्यानंतरही त्यांचा प्रत्येक शब्द जिवंत वाटतो. वाटतं की त्यांनी आजच्यासाठीच लिहिलं आहे.

vinod.raut@esakal.com

भारतासोबतचे ऋणानुबंध

महात्मा गांधी यांची हत्या झाली, त्या दिवशी फैज प्रचंड अस्वस्थ झाले. त्यांनी ‘पाकिस्तान टाइम्स’मध्ये विशेष संपादकीय लिहिलं. केवळ लिहून ते थांबले नाहीत, तर त्यांनी गांधीजींच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. ती जोखीम होती, कारण त्या वेळी दोन्ही देश काश्मीरवरून युद्धाच्या उंबरठ्यावर होते. केवळ गांधीजींप्रति पाकिस्तानच्या भावना, आस्था सीमेपलिकडे पोहचण्यासाठी ते भारतात आले. भारत-पाक फाळणीमुळे फैज दु:खी होते, त्यांनी फाळणीवर केवळ एक नज्म (कविता) लिहिली. मी त्यांना विचारले, की ‘‘एवढी मोठी घटना झाली, तुम्ही केवळ एका कवितेत त्यावर व्यक्त झालात?’’ फैज म्हणाले, ‘‘we could not cope.’’ एवढ्याच शब्दांत त्यांनी फाळणीचे दु:ख व्यक्त केले. ‘‘दोन देशांच्या नकाशावर रेषा रेखाटल्या आहेत, लोकांच्या हृदयावर नाहीत,’’ असं फैज म्हणाले. फैज यांचे शेवटच्या श्वासापर्यंत अनेक भारतीय राजकारणी, लेखक, कवींसोबत अत्यंत मैत्रीचे संबंध होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com