

Role of Film Critics
esakal
डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com
समीक्षकांच्या ओळी प्रेक्षक ओढतातही... ढकलतातही. आपण असे अनेक जण आहोत, शनिवारी-रविवारी त्या आठवड्यात आलेल्या त्या-त्या सिनेमाचं परीक्षण-समीक्षण पाहून तो सिनेमा पाहायचा की नाही हे ठरवतो. ते समीक्षण ठरवतं किती लोकांना, प्रेक्षकांना तो सिनेमा पाहण्यासाठी घराबाहेर पाडायचं की नाही... ते समीक्षण ठरवतं प्रेक्षकांपर्यंत संबंधित सिनेमाबद्दलचं काय पोचवायचं...
‘‘त्यांना काय कळतंय सिनेमातलं, नाटकातलं.’’
‘‘किती नाटकं केलीत त्यांनी?’’
‘‘किती सिनेमे डिरेक्ट केले आहेत?’’
‘‘हे नुसते कॉलम भरणारे पत्रकार आहेत. त्यातलं यांना किती ज्ञान आहे हे तपासायला पाहिजे. यांना काय म्हणून नेमतात परीक्षक, समीक्षक म्हणून? त्याची काही परीक्षा, काही कसोटी असते का? की कुणालाही लिहायला लावतात?’’
काय होतं, आम्ही इतक्या कष्टानं एखादी कलाकृती निर्माण करायची आणि यांनी दोन वाक्यांत आमची वासलात काढायची. संपूर्ण कलाकृती नाकारायची... सगळ्या कष्टांवर पाणी... अनेक मनुष्य तास वाया... अनेक स्वप्नं पाण्यात... असे एक ना अनेक प्रश्न समीक्षक, परीक्षक यांच्या पात्रतेबद्दल, त्यांच्या कुवतीबद्दल उपस्थित केले जातात...