पुरुषी अहंकाराला ‘तिखट’ उत्तर!

स्मिता पाटील
स्मिता पाटीलsakal

पाणवठ्यावर गेलेल्या स्त्रिया अचानक टोळधाडीप्रमाणे आलेल्या घोडेस्वारांना पाहून पळ काढतात. त्यांच्यातली एक स्त्री न घाबरता थांबून राहते. घोड्यावर बसलेला उद्दाम सुभेदार तिला बघून खाली उतरतो. त्याच्या नजरेला नजर भिडवत ती शांतपणे म्हणते, ‘‘सरकार, ही जागा गावातल्या माणसांना पाणी पिण्यासाठी आहे. जनावरं तिकडे पलीकडे पाणी पितात.’’ सुभेदार चमकून तिला विचारतो, ‘‘या जनावराला इथे प्यायला पाणी मिळेल काय?’’ ती पुन्हा थंड स्वरात उत्तर देते, ‘‘माणसाप्रमाणे पाणी प्यायचं झाल्यास आधी कमरेत वाकून हात पुढे करावे लागतात.’’ सुभेदार तिच्यासमोर वाकत हात पुढे करतो. तिने घागरीतून ओतलेलं पाणी हाताची ओंजळ करून तो पिऊन टाकतो. घागर रिती होईपर्यंत.

केतन मेहता दिग्दर्शित ‘मिर्च मसाला’ या चित्रपटातला हा सुरुवातीचा प्रसंग. यानंतर कोणता संघर्ष पहायला मिळणार त्याची झलक दाखविणारा. अपेक्षेप्रमाणे तो संघर्ष उग्र स्वरूप धारण करतो आणि एका तेवढ्याच दाहक प्रसंगाने त्याचा शेवट होतो.

गुजरातच्या सौराष्ट्र भागातल्या एका लहानशा गावात घडलेली ही घटना. काळ इंग्रजांच्या अमलाखालचा, म्हणजे १९४० च्या दशकाच्या सुरुवातीचा. हा परिसर म्हणजे मिरचीचं कोठार; आणि मिरचीदेखील साधी नव्हे, तर जहाल तिखट. नुसत्या वासानेही ठसका भरेल अशी. या लालजर्द मिरचीचं तिखट आणि मसाला बनवून बाहेर पाठवण्याचा उद्योगही इथे बऱ्या‍पैकी चालतो. शेतसारा वसूल करण्यासाठी इंग्रजांच्या हाताखालचा देशी सुभेदार त्याच्या शिपायांसह अधूनमधून येणार, कर गोळा करता करता गावकऱ्यांच्या शेळ्या-कोंबड्या फस्त करून निघून जाणार, असा यांचा खाक्या. सुभेदार बदलला तरी या खाक्यात बदल होत नसतो. नदीकाठी राहुट्या टाकून मुक्काम करणाऱ्या या ‘पाहुण्यां’ची गावच्या सरपंचाने बडदास्त ठेवायची, हाही जणू शिरस्ता असतो.

यावेळचा सुभेदार (नसिरुद्दीन शाह) जरा अधिकच रगेल आणि रंगेल. दयामायेला जवळ फिरकू न देणारा. काहीसा विक्षिप्त, वरून बेडरपणाचा आव आणणारा; पण आतून भेकड असलेला. वर उल्लेख केलेल्या पाणवठ्याच्या प्रसंगात त्याला धीटपणे सामोरी जाणारी स्त्री म्हणजे सोनबाई (स्मिता पाटील). कामधंदा न करणारा आळशी नवरा लाभलेली, मिरची कारखान्यात कष्ट करून घर चालवणारी स्वाभिमानी सोनबाई. गरिबीतही आपला आब न सोडणारी अन् पुरुषी नजरांना ओळखत अशा लोकांना वेळीच जागा दाखवून देणारी. मूल होत नसल्याचं दुःख आणि त्यापायी स्त्री-पुरुषांचे टोमणे झेलणारी. तिच्या नवऱ्याला अचानक रेल्वेमध्ये नोकरी लागते आणि तो शहराकडे निघून जातो. सोनबाईला खरंतर त्याचं जाणं मंजूर नसतं. ‘शहर सगळ्यांना गिळून टाकतं’ असा तिचा समज; पण तिची समजूत घालून तो निघून जातो.

नवरा परगावी गेल्यानंतर सोनबाई एकटी असल्याचा सुगावा सुभेदाराला लागतो. वासनांध सुभेदार तिला वश करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करतो; पण ती त्याला दाद लागू देत नाही. एका गावकऱ्याला फितवून तो सोनबाईला रात्री आपल्याकडे आणायला सांगतो. मात्र, तिच्याऐवजी दुसरीच बाई आणल्याने तो भडकतो. एकदा नदीवर सोनबाई एकटी असताना सुभेदार तिची छेड काढतो, तेव्हा ती त्याच्या मुस्काटात ठेवून देत पळ काढते. सुभेदाराचे शिपाई तिचा पाठलाग करतात. ती त्यांना चुकवत जुन्या देवडीत असलेल्या मिरची कारखान्यात जाऊन लपते. तिथला म्हातारा चौकीदार अब्बूमियाँ (ओम पुरी) याला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आल्याने तो कारखान्याचं मुख्य दार आतून बंद करतो. बंदूकधारी शिपाई दरवाजा उघडण्यासाठी बाहेरून धडका मारतात, धमक्या देतात. पण एकेकाळी सैन्यात असलेला प्रामाणिक अब्बूमियाँ त्या दबावाला बळी पडत नाही. तोही बंदूक घेऊन आत पहारा देत थांबतो. सुभेदार आता कारखान्याच्या मालकाला आणि गावच्या सरपंचाला (सुरेश ओबेरॉय) बोलावून घेतो आणि सोनबाईला आपल्या हाती सोपवण्यासाठी धमक्या देतो. पण, त्या प्रयत्नांनासुद्धा यश येत नाही. सोनबाई हाती लागत नाही म्हटल्यावर सुभेदार पिसाळतो, तर गावातल्या बाईचं शीलरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि जीव गेला तरी आपण दरवाजा उघडणार नाही, असं चौकीदार अब्बूमियाँ ठणकावून सांगतो.

कारखान्यात लपलेली सोनबाई भेदरलेली असली तरी सुभेदाराच्या धमकीला बळी न पडण्यावर ती ठाम असते. इतर कामगार महिलांची मात्र चलबिचल सुरू असते. सत्तेपुढे शहाणपण काय चालणार, असं म्हणत त्या बायका सोनबाईला सुभेदाराकडे शरण जाण्याचा सल्ला देतात. आदल्याच रात्री सुभेदाराच्या राहुटीत गुपचूप जाऊन आलेली एक स्त्री ‘अजूनही वेळ गेलेली नाही, जा त्याच्याकडे’ असं म्हणत सुभेदाराने बक्षीस म्हणून दिलेली सोन्याची अंगठी सोनबाईला दाखवते; पण सोनबाईला कशाचीही भुरळ पडत नाही, ती नकारावर ठाम असते. दरम्यान, त्या स्त्रियांमधल्या एकीला फीट येऊन ती कोसळते. तिला सावरत असतानाच एका गरोदर स्त्रीला प्रसूतिवेदना सुरू होतात. तिला बाहेर नेता येत नाही म्हणून इतर स्त्रिया त्या अडलेल्या बाळंतिणीची तिथेच सुटका करतात. त्या महिलेला मुलगी होते. तिच्या जन्माचा आनंद साजरा करावा की आपल्या सुटकेचा मार्ग शोधावा, या पेचात त्या साऱ्या‍जणी असतात.

गावकऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही हे पाहून खवळलेला सुभेदार ‘बऱ्या‍ बोलाने सोनबाईला माझ्या हाती सोपवा, नाही तर सारा गाव जाळून टाकीन,’ अशी धमकी देतो. पुन्हा गावकऱ्यांची बैठक बोलावली जाते. सगळेजण पुन्हा कारखान्याच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन सोनबाईची मनधरणी करतात. ‘सारा गाव संकटात आहे, गावासाठी एवढा त्याग कर, उद्या तुझा नवरा परत आला आणि त्याने तुला नांदवायला नकार दिला, तर आम्ही तुझी जबाबदारी घेऊ...’ असं सरपंच तिला सांगतो; पण त्यावरही सोनबाईचा नकार कायम असतो. ग्रामस्थ आता सुभेदाराकडे जाऊन विनवणी करतात. ‘हवी तर आम्ही दुसरी एखादी बाई पाठवतो; पण सोनबाईचा हट्ट सोडा,’ असं सरपंच म्हणतो. पण सुभेदार ऐकायला तयार नसतो. ‘तुमची मागणी आम्ही मान्य करू, पण एका अटीवर, यापुढे तुम्ही अशा प्रकारची मागणी आमच्याकडे करायची नाही,’ असंही सरपंच सुचवतो. सुभेदार तोही प्रस्ताव धुडकावून लावतो. सरपंचाला दिलेली मुदत संपताच तो शिपायांसह कारखान्यावर चाल करून जातो. त्याने ओरडून इशारा दिल्यानंतरही अब्बूमियाँ दरवाजा उघडत नाही. अखेर शिपाई दरवाजावर धडका मारत तो तोडून टाकतात. अब्बूमियाँ बंदुकीने त्यांचा मुकाबला करतो; पण चकमकीत तो मृत्युमुखी पडतो. सर्व शिपायांना बाहेर थांबवून सुभेदार आत जातो. सोनबाई हातात विळा घेऊन आत्मरक्षणास सज्ज होते. सुभेदार पुढे चाल करून जातो आणि तेवढ्यात, इतर स्त्रिया जमिनीवर रचून ठेवलेली लाल तिखटाची भुकटी पोत्यासकट उचलून आणत सुभेदाराच्या तोंडावर फेकतात. एका पाठोपाठ एक अशा चार-पाच पोत्यांवरच्या तिखटाचा अनपेक्षित मारा झाल्याने सुभेदार आक्रोश करत खाली कोसळतो. नेस्तनाबूत होतो. सर्वत्र पसरलेल्या लालभडक रंगाच्या पार्श्वभूमीवर सोनबाईचा निग्रही चेहरा उठून दिसत असतानाच चित्रपटाचा शेवट होतो.

गुजराती लेखक चुनीलाल मडिया यांच्या ‘अंत:स्रोत’ या कथेवर केतन मेहता आणि शफी हकीम यांनी ‘मिर्च मसाला’ची पटकथा तयार केली. यातले प्रभावी संवाद हृदय लानी व त्रिपुरारी शर्मा यांनी लिहिले होते. थोड्या वेळापूर्वी सोनबाईला दूषणं देणाऱ्या स्त्रिया सुभेदार अंगावर आल्यानंतर मात्र त्याच्यावर हल्ला करतात. हा बदल कसा घडून आला असावा? सुटकेचे सर्व मार्ग खुंटल्यामुळे की गरोदर स्त्रीने मुलीला जन्म दिल्यानंतर एक विलक्षण शक्ती अंगी संचारल्यामुळे? प्रश्न अनुत्तरित राहिला तरी हा शेवट स्तंभित करून सोडतो, यात शंका नाही.

थरारक शेवटाबरोबरच एका स्त्रीने स्वतःच्या शीलरक्षणार्थ दिलेल्या लढ्यासाठीही हा चित्रपट लक्षात राहतो. संपूर्ण चित्रपट स्मिता पाटीलच्या प्रभावी अभिनयाने तोलून धरला होता. (‘मिर्च मसाला’ पूर्ण झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत स्मिताचं अकाली निधन झालं.) सोनबाई स्वाभिमानी आहे, फटकळ आहे; परंतु उर्मट नाही. नवऱ्याने गाव सोडून जाऊ नये यासाठी तिचं काळीज तिळतिळ तुटतं; पण तो गेल्यानंतर त्याच्या माघारी ती खंबीरपणे घर चालवते. तिच्या व्यक्तिमत्त्वाचे हे कंगोरे स्मिताने केवळ नजरेच्या आणि देहबोलीच्या बळावर प्रभावीपणे दाखविले. पाण्याच्या दोन कळशा डोक्यावर ठेवून खेडवळ बाईप्रमाणे अनवाणी चालत जाण्याची तिची सहजताही लक्षात राहणारी.

स्त्री-पुरुष भेदावर हा चित्रपट भेदक भाष्य करून जातो. गावचा सरपंच बाहेरख्याली असतो आणि त्याचं समर्थन करताना तो ‘पुरुषाने अधूनमधून एखादी रात्र बाहेर नाही घालवली, तर लोक काय म्हणतील? एवढा गावाचा प्रमुख आणि एक बाईसुद्धा ठेवू शकत नाही?’ असं पत्नीला सुनावतो. कारखान्यात अडकून पडलेल्या स्त्रिया सोनबाईला दूषणं देताना ‘तुझ्याच वागण्यात काहीतरी दोष आहे, अन्यथा इतरांना सोडून तो तुझ्याच मागे कसा लागला?... त्या सुभेदाराच्या थोबाडीत मारायची काय गरज होती... इज्जत-अब्रू हे श्रीमंतांचे चोचले आहेत, गरिबांना परवडणारे नाहीत... तू तर जाशीलच, पण आम्हालाही मारून टाकशील.. नतद्रष्ट कुठली!’ असा तळतळाट करतात तेव्हा सोनबाई अगतिक होऊन त्यांना विचारते, ‘‘माझा दोष तरी काय म्हणून तुम्ही मला बोल लावताय...? मी वांझ आहे म्हणून? माझा नवरा बाहेर गेला म्हणून? मी परपुरुषाला जवळ येऊ दिलं नाही म्हणून?’’ सोनबाईचे प्रश्न बिनतोड तर आहेतच; पण आजच्या काळातही ते तंतोतंत लागू पडणारे आहेत.

(सदराचे लेखक सुगम संगीताचे जाणकार, हिंदी-मराठी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com