अपूर्णत्वाची जाणीव; अध्यात्माची पहिली पायरी

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन
सोमवार, 8 जुलै 2019

इनर इंजिनिअरिंग

इनर इंजिनिअरिंग
तुम्ही आत्ता काही आहात त्याच्या पलीकडचं तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे का? तर तुम्हाला आत्ता आपण जसे आहोत ते पुरेसं नाहीये, हे लक्षात आलं पाहिजे. अपूर्णत्वाची भावना तीव्र होत नाही, तोपर्यंत तुम्ही इतर कोणत्याही मोठ्या गोष्टीचा शोध घेणार नाही. काहीही जीव ओतून तुम्ही शोधणारही नाही. आजकाल पुष्कळ लोक असे शिकवताना आढळतात, की स्वतःला सतत असं सांगत राहा की ‘मी अदभूत आहे,’ ‘मी महान आहे.’ तुमच्या मुलांना तुम्ही सांगत असता ‘तू विलक्षण आहेस’ ‘आय लव्ह यू’ ‘डोंट वरी’, ‘सर्वकाही ठीक आहे,’ वगैरे.’ असा विचार केल्यावर तुम्हाला वाटतं की, तुम्ही जणू या जगाचे राजेच आहात. हा निव्वळ मूर्खपणा आहे. हे म्हणजे तुमच्या सीमित मर्यादांना गौरवण्यासारखं आहे.

सर्वप्रथम तुम्ही महान आहात, हे तुम्हाला इतर कुणी दुसऱ्याने सांगण्याची किंवा तुम्ही स्वतःसुद्धा स्वत:ला महान म्हणण्याची गरज काय? कारण तुमच्यात एक प्रकारचं अपूर्णत्व आहे म्हणून. तुम्हाला आपण अपूर्ण आहोत, असं वाटत असेल तर माझ्या मते ही खूप चांगली गोष्ट आहे. ही अपूर्णत्वाची भावना फार तीव्र होते केवळ तेव्हाच तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य घडावे याची ओढ निर्माण होते. तुमच्या कमतरता तुम्ही गोड, मधुर शब्दांमागे लपवत असाल तर तुम्ही कधीच काही करण्यासाठी पुढे सरसावणार नाही. आपल्यामध्ये आहे ते अद्‌भुत आहे, अशीच तुम्ही स्वतःची समजूत काढत राहाल. याचा अर्थ असा नाही की जीवन आहे तसा आपण त्याचा आनंद लुटत नाही. पण ते पुरेसं नाहीये आणि याची जाणीव झाली तरच तुम्ही शाश्वत असं काही शोधू लागाल. मग फक्त चहा आणि पोहे यावर तुमचं समाधान होणार नाही. पण बऱ्याच लोकांसाठी एवढंच पुरेसं असतं. आयुष्यात कित्येक लोकांना हीच एक सर्वोच्च प्राप्ती वाटते. चहासोबत पोहे हा अगदी जबरदस्त, सुस्तावणारा बेत वाटतो. अनेक लोकांसाठी ही त्यांच्या आयुष्यात परमतृप्ती वाटते. तुम्हाला ज्यावेळी असं वाटतं की निव्वळ खाणं, पिणं, झोपणं एवढंच पुरेसं नाही, तुम्ही करत असलेल्या यासारख्या छोट्या गोष्टी पुरेशा नाहीत, तेव्हाच तुमच्यात अधिक जाणून घेण्याची इच्छा प्रबळ होते. अशी इच्छा जागृत होते, तेव्हा जीवनाचे आणखी आयाम अनुभवण्याची उत्कटता वाढीस लागते, त्याशिवाय हे होणे शक्‍य नाही.

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first step of Spirituality