- विवेक पंडित, pvivek2308@gmail.com
जयप्रकाशजींच्या आंदोलनात झालेल्या एका मेळाव्यात त्यांनी संपूर्ण क्रांतीची कल्पना सांगितली होती. ‘विवाहामध्ये हुंडा घेणार नाही आणि देणार नाही’ अशी शपथ त्यांनी तरुणांना घ्यायला लावली होती. ‘भेदभाव नष्ट करण्यासाठी जाती-पातींची बंधनं तोडा’ असं त्यांचं आवाहन होतं. जयप्रकाशजी नेहमी सांगत की, ‘देशाच्या संसदेतून राष्ट्र उभारणी होत नाही, गावागावात अशी संसद निर्माण झाली पाहिजे आणि त्यामार्फत लोकशाही गेली पाहिजे. प्रत्येक गावात लोकशाही रुजली तर ती देशात रुजेल... जर गावात लोकशाही रुजली नाही, तर ती देशातही रुजणार नाही...’ त्यातूनच आजच्या ‘विधायक संसद’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.