पावित्र्य आणि स्वातंत्र्य

रंगभूमीचं पावित्र्य मोलाचं की अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य? हा प्रश्न आणि संघर्षच ‘सखाराम बाइंडर’ या नाटकानं त्या काळी उभा केला.
freedom of expression Vijay Tendulkar drama Sakharam Binder
freedom of expression Vijay Tendulkar drama Sakharam BinderSakal

रंगभूमीचं पावित्र्य मोलाचं की अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य? हा प्रश्न आणि संघर्षच ‘सखाराम बाइंडर’ या नाटकानं त्या काळी उभा केला. पावित्र्य आणि स्वातंत्र्य या मधील दुही ‘सखाराम’च्या आशयातही वेगळ्या प्रकारानं आहे.

राज काझी

आणीबाणीविरोधातल्या संघर्षात देशात जोरकसपणानं पुढं आलेल्या ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या अधिकाराचा जिवापाड पुरस्कार तीनेक वर्ष आधीच महाराष्ट्रात निकरानं झाला होता. विजय तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाइंडर’ या नाटकानं जन्माला घातलेल्या नैतिक-अनैतिकतेच्या मंथनात हे निशाण उंचावलं गेलं होतं!

एकूणातच एकोणीसशे बाहत्तर-त्र्याहत्तर साल तेंडुलकरांच्याच नव्हे तर मराठी रंगभूमीच्याही संदर्भात वादळी ठरलं, याला कारण त्यांची दोन नाटकं. ‘सखाराम बाइंडर’ आणि ‘घाशीराम कोतवाल त्याही आधी ‘गिधाडे’नं संस्कृती रक्षकांचा रोष ओढवून घेतला होताच.

माणसांच्या आतल्या विकृतींच्या विद्रूप चेहऱ्यांचं तेंडुलकर घडवत असलेलं विदारक दर्शन हादरून टाकणारं तर होतंच पण त्याहूनही ते भयचकित करणारं अधिक होतं. मध्यमवर्गीय मराठी माणसांच्या मिषानं एका विशिष्ट जातीवरच त्यांचा रोख आहे, ही अस्वस्थता बळावत जायला ‘घाशीराम’ पाठोपाठ ‘सखाराम’ कारण ठरलं.

‘सखाराम’मधून रंगभूमीवर प्रकटणारी हिंसा आणि लैंगिकता मराठी रंगभूमीच्या पावित्र्याला काळिमा फासणारी आहे आणि स्त्री-पुरुष संबंधांचं त्यातलं चित्रण लग्न संस्थेच्या पावित्र्याला मूठमाती देणारं आहे, हा अस्वस्थ मतप्रवाह एकीकडे आकार घेत असताना दुसरीकडं नाटक म्हणून ‘सखाराम’चं श्रेष्ठत्व मांडणारी, लेखकाच्या आविष्कार स्वातंत्र्याला मानणारी बाजूही संघटित होत गेली.

संस्कृती आणि परंपरेनं घालून दिलेल्या नियमातल्या वर्तनाला पावित्र्य मानणाऱ्या आणि त्या नियमांना उल्लंघून अनिर्बंध जगण्याचं स्वातंत्र्य घेणाऱ्या अशा दोन परस्परविरोधी जीवनप्रेरणा इथं एकमेकांना जोखताना दिसतात. मात्र इथं याला स्त्री-पुरुष संबंधांचा संदर्भ असल्यानं ते आपसूकच प्रक्षोभक ठरलं.

नाटकाच्या आरंभीच या दोन्ही परस्परविरोधी धारणा एकत्रच प्रवेशतात. सखाराम लक्ष्मीला पहिल्यांदा घरी आणतो इथंच नाटक सुरू होतं. नवऱ्यानं टाकलेल्या बायकांना सखाराम आपल्या घरात आश्रय देत असतो ते काही सामाजिक कार्य वगैरे म्हणून नव्हे. तो ते लपवतही नाही, खुल्ला मामला अन् करार असतो. सहाऱ्याला आलेल्या बाईनं त्या बदल्यात त्याची वासना भागवायची. जो पर्यंत ती ते निभवू शकेल आणि जो पर्यंत तिची तिथं राहण्याची इच्छा वा मजबुरी असेल, तो पर्यंत ती तिथं राहू शकेल.

हा करार तसा ‘ओपन एन्ड’ही असे, कधीही संपवण्याची उभयपक्षी मुभा असणारा!.. लक्ष्मी ही या मालिकेतली सातवी बाई. मूल होत नाही म्हणून नवऱ्यानं टाकलेली. देवाधर्मावरच सारी भिस्त. श्रद्धा अन् आशेवर जगणं. किडामुंगीवरही जीव. पारंपरिक मूल्यांचा अर्क. गडकऱ्यांच्या सिंधूचं पुढचं व्हर्जन.

देहभुकेल्या आणि मनमाजोर्ड्या सखारामासारख्याच्या पायाशीही ‘कशी या त्यजू पदाला ?’ आक्रंदू शकणारी! सखारामाच्या लेखी मात्र तिची जागा ‘दोन्ही भुका भागवणारी’ इतकीच.

परिस्थितीनं चिवट बनलेली लक्ष्मी सखारामाचं सारं निभावून नेतेच वर त्याच्यात नसलेल्या सदाचरणालाही जागवू पाहते, कोडगेपणानं त्याचं सारं सहन करत, न बदलण्याच्या ईर्षेतला सखाराम कोण जाणे कसा बारीकसा बदलतोही.

‘तिच्या पदराआडून घरात शिरलेल्या’ देवाचं येणं चालवून घेतो, निदान संकष्टीला पीत नाही! पण लक्ष्मीचा (की परंपरेचा) आतताईपणा नडतो. सखारामाच्या मुस्लिम दोस्ताला ती आरती करण्यापासून रोखते आणि सखारामचा मूळचा अहं उसळतो आणि तो लक्ष्मीला घराबाहेर काढतो.

लक्ष्मीची जागा लवकरच चंपा घेते, पण ती ‘लक्ष्मी’ नसते ‘चंपा’ असते. तिला नवऱ्यानं टाकलेलं नाही, तिनं नवऱ्याला टाकलेलं आहे - तो धंद्याला बसवणार होता म्हणून त्याला बडवून ती घराबाहेर पडली आहे. बंडखोरपणात ती सखारामाच्याही दोन पावलं पुढं

असते, दसऱ्याच्या सकाळीही दारू तिला तितकीशी वावगी वाटत नाही. सखारामचा बोलघेवडा रुबाब तिच्या मस्तवालपणापुढं दबून जातो. त्याच्या हावरेपणाला तिच्यातला उफाडा पुरून उरतो, पण तेही तिच्याच मर्जीनं... आधीच्या सहांपेक्षा लक्ष्मी वेगळी होतीच मात्र चंपा अफाट अन् अनावरच. सखाराम आपला मूळचा आव पुन्हा आणण्याच्या प्रयत्नात असताना लक्ष्मी पुन्हा परतून येते. हाकलूनही जात नाही.

आपल्या गरजेनं चंपा तिला ठेवून घेते, सखारामचा नाईलाज होतो. आता त्याला तिच्या सात्त्विकपणाचंच भय जाणवू लागतं. रात्री चंपा शेजारी असताना तिची चाहूल जाणवली तरी तो थंड पडू लागतो. चंपाच्या निर्भर्त्सनेनं आणि वाढत्या मुजोरपणापुढं सखारामला त्याचं स्वत्व निसटताना जाणवू लागतं.

त्यातच लक्ष्मी त्याच्या मित्राशी आता चंपाचे संबंध सुरू झाल्याचं त्याला सांगते आणि ग्रासलेल्या संभ्रमावस्थेत त्याच्या हातून चंपा मारली जाते. घडलेल्या प्रकारानं स्वतःच हादरलेला सखाराम हतबल होतो. त्याला सावरू पाहणाऱ्या लक्ष्मीपुढं दयनीय असाहाय्य वाटू लागतो. मालकीचा सरंजामी माज बंडखोर पुरुषार्थाबरोबरच लोलागोळा होऊन पडतो.

सखाराम, लक्ष्मी आणि चंपा या तिघांचंही हे नाटक. आपापल्या धारणा आणि परंपरा असणाऱ्या या तिघांच्या माध्यमातून हे नाटक एक वेगळंच जीवनदर्शन घडवतं. तेंडुलकरांच्या आधीच्या नाटकांतून दिसलेल्या त्यांच्या पात्रांपेक्षाही ही पात्रं हाडामांसी अधिक सजीव होती, घडीव नव्हती.

आपल्या अजोड अभिनय सामर्थ्यानं निळू फुलेंनी मराठी रंगभूमीवर ‘सखाराम’ कायमचा संस्मरणीय करून ठेवला. ‘चंपा’च्या भूमिकेतल्या लालन सारंग आणि ‘लक्ष्मी’ साकारलेल्या कुसुम कुलकर्णी यांनीही या व्यक्तिरेखा शब्दश: जिवंत केल्या होत्या.

हे नाटकच ‘स्वयंभू’ असल्याचं तेंडुलकरांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. कुठंतरी ओझरता ऐकलेला हा ‘सखाराम’ त्यांच्याही नकळत मनात दीर्घ काळ वाढत राहिला. एकदा रात्रीच्या गप्पांमध्ये डॉ. श्रीराम लागूंना सखारामाबद्दल सांगताना त्यांच्या कल्पनेतही नसलेले अनेक तपशील त्यात जोडले गेले. त्या रात्री सखारामनं जणू त्यांचा ताबा घेतला, पहिला प्रवेश एकटाकी पूर्ण करायला लावूनच तो थांबला!

व्यक्तिरेखांच्या चित्रणात तेंडुलकर या नाटकातून अनेक पावलं पुढं गेले, असं अभ्यासक मानतात. कारण नाट्यविधान करण्याची जबाबदारी नाटककारानं त्यांच्यावर टाकली नाही, ती आपापल्या स्वभावधर्माला धरून वागत गेलेली दिसतात. मिताक्षरी पण मर्मभेदी संवाद हे तेंडुलकरांचं अमोघ बलस्थान होतं. सखारामचं स्वतःबद्दलचं बोलणं असू दे किंवा लक्ष्मीचा मुंगळ्याशी होणारा संवाद किंवा लक्ष्मी आणि चंपामध्ये एकदा झालेली देवाणघेवाण. संवादलेखनाचा वस्तुपाठच हा...

व्यक्ती विरुद्ध व्यक्ती, व्यक्ती विरुद्ध परिस्थिती (किंवा व्यवस्था) या तो वरच्या तेंडुलकरांच्या नाटकांमधील संघर्षाचा टप्पाही त्यांनी ‘सखाराम’ मध्ये ओलांडला. ‘सखाराम’मधील संघर्ष हा ‘व्यक्ती विरुद्ध स्वत्व’ असा होता... तेंडुलकरांच्या नाटकांमध्ये ‘सखाराम’ हे त्यांचं श्रेष्ठ नाटक मानलं जातं. राष्ट्रीय रंगभूमीनंही ‘सखाराम’ची नुसती दखलच घेतली नाही तर त्याचा सन्मानही केला. अनेक देशी व परदेशी भाषांमध्ये ‘सखाराम’ अवतरला आहे.

‘सखाराम’ची आरंभीची वाट मात्र खडतर दिव्यातून जाणारी होती. कमलाकर सारंगांना या नाटकाचं दिग्दर्शन करायला कदाचित बुद्धी पणाला लावावी लागली असेल, मात्र या नाटकासाठी जो लढा त्यांनी दिला, त्यासाठी त्यांना आपलं सर्वस्व पणाला लावावं लागलं होतं... प्रचंड अवहेलना, अपमान, मनस्ताप, आर्थिक ओढग्रस्ती, धमक्या, हल्ले... सारंग दांपत्याला या सगळ्यांना तोंड द्यावं लागलं होतं.

या नाटकाविरोधात झालेली झुंडशाही आणि पुढं द्यावा लागलेला न्यायालयीन लढा या सगळ्यांची चुणूक कमलाकर सारंगांनी लिहिलेल्या ‘बाइंडरचे दिवस’ या पुस्तकातून थोडीफार अनुभवता येते… तेंडुलकर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत अखेरीस म्हणतात, ‘‘आता मागे वळून बघताना वाटते, की ही नाटके भाग्यवान. प्रसंगी नाटककाराला बाजूला ठेवून, ती करणाऱ्यांनी जिवाच्या बाजीने ती लढवली...’’

‘सखाराम बाइंडर’ हे खचितच असं भाग्यवान नाटक !

आणि बदललं नाव...

या इतक्या ‘डार्क’ नाटकाला तेंडुलकरांनी आधी ‘रात्र देवाची असते’ असं चांदण्यात न्हाल्यासारखं वेगळंच नाव दिलं होतं...दिल्लीत हिंदीमधून करायचं म्हणून सई परांजपेंनी ते वाचायला नेलं. नाटक त्यांना प्रचंड आवडलं मात्र नाव अजिबात आवडलं नाही. ‘सखाराम बाइंडर’ हे नाव त्यांनी ठरवलं आणि या नावानं हिंदीत करायचं तेंडुलकरांसमोर जाहीर केलं. सारंगांनाही हे नाव आवडलेलं पाहून तेंडुलकरांनी ते स्वीकारलं. मराठीसह पुढं अनेक भाषांमध्ये हे नाटक झालं, ते याच नावानं. ‘सखाराम बाइंडर’ नाव जसं सई परांजपेंनी सुचवलं तसंच या भूमिकेसाठी निळू फुलेंचं नाव सुचवलं होतं ते सुलभा देशपांडेंनी. निळू भाऊंसोबत लक्ष्मी साकारण्याचा त्यांच्या मनातला योग मात्र जुळून आला नाही!

(लेखक नाट्य व चित्रपट क्षेत्राचे जाणकार अभ्यासक असून पटकथाकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com